- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 26 फेब्रूवारी 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने आपले उत्पन्नाचे साधन म्हणून दि.29.4.2011 रोजी टाटा-315-इ बॅखो लोडर हे वाहन युनिव्हर्सल इंडस्ट्रीयल इक्विपमेंट अॅन्ड टेक्नीकल सर्विस प्रायवेट लिमिटेड, हिंगणा वाडी, नागपूर यांचेकडून रुपये 20,50,000/- ला खरेदी केले. अर्जदाराने त्याचदिवशी गैरअर्जदाराकडे सदर वाहन विमा पॉलिसी क्र.500400/44/10/ 07/30000069 नुसार दि.29.4.2011 ते 27.4.2012 या कालावधीकरीता विमाकृत केले व त्याप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदारास विमापञ दिले. सदर वाहनाचा नोंदणी क्र.एम.एच.-33/4290 असा आहे. अर्जदाराचे सदर वाहनाचा उपयोग दि.5.3.3012 रोजी बेलगाव ते धानोरा मार्गावर सुरु असतांना 35 ते 40 अनोळखी नक्षलवादी बंदुकधारी इसमांनी सदर वाहन जाळले. सदर घटनेची पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन धानोरा यांनी दाखल घेवून 35-40 अनोळखी नक्षलवादी इसमा विरुध्द अपराध क्र.13/2012 प्रमाणे कलम 435, 341, 143, 147, 148, 149 भा.दं.वि. व कलम 3/25 भा.ह.का. तसेच 135 मु.पो.का. अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. अर्जदाराचे वाहन सदर घटनेत संपूर्णपणे जळाले असून ते दुरुस्ती योग्य राहीलेले नाही. अर्जदाराने दि.5.3.2012 च्या घटनेमुळे वाहनाचे झालेले संपूर्ण नुकसान भरुन मिळण्यास गैरअर्जदाराकडे दि.30.3.3012 रोजी सर्व आवश्यक कागदपञासह दावा केला होता. गैरअर्जदाराने सर्व्हेअर घटनास्थळावर पाठवून घटनेची व वाहनाची चौकशी केलेली आहे. गैरअर्जदाराचे सर्व्हेअरकडेसुध्दा वाहनाचे नुकसान भरपाईच्या दाव्या संबंधाने आवश्यक सर्व कागदपञांची पुर्तता केली होती. अर्जदाराने अधिवक्ता मार्फत दि.31.10.2012 रोजी नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. गैरअर्जदाराने दि.1.12.2012 चे उत्तर नोटीस अर्जदाराला पाठवून वाहनाचे नुकसान ‘दहशतवादी कृत्य’ असल्याने वाहनाचा नुकसान भरपाई दावा नाकारण्यात आला असल्याचे कळवीले. गैरअर्जदाराने वाहनाचे नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळले असल्याने गैरअर्जदाराची कृती ही ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(r) नुसार अनुचीत व्यापार प्रथेत मोडते. त्यामुळे अर्जदारास मानसिक, शारीरीक ञास झाला. अर्जदाराने वाहन क्र.एम.एच.-33/4290 ची नुकसान भरपाई रक्कम रुपये 19,47,500/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह तसेच, शारीरिक, मानसिक ञास, सेवेतील ञुटी, छळवाद केला व आर्थीक नुकसानापोटी रुपये 25,000/-, तक्रार खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावे अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 13 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.7 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.7 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, मोटर वाहन क्र.एम.एच.-33/4290 ची फ्री इंन्शुरन्स कव्हर नोटीस क्र.2944/10-11 युनायटेड इंडिया कंपनीने दि.29.4.2011 ते 27.4.2012 या कालावधीसाठी जारी केली होती. ही फ्री इंन्शुरन्स पॉलिसी/मास्टर पॉलिसी कोड नंबरप्रमाणे कॉन्ट्राक्टर प्लान अॅन्ड मशिनरी इंन्शुरंस पॉलिसी म्हणून देण्यात आली होती. अर्जदाराने मोटार वाहन कायद्याचे अंतर्गत रितसर विमा पॉलिसी प्रिमियम देवून विमा कपंनीकडून घेतली नाही. सदर फ्रि विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या आधीन राहून अर्जदाराची नुकसान भरपाईची मागणी रितसर फेटाळून लावण्यात आली. फ्रि विमा पॉलिसीच्या Exclusion clause item no.(0) प्रमाणे नक्षलवादी कारवाईमुळे मोटार वाहनाचे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीवर नाही. अर्जदाराने खोटी व तथ्यहीन तसेच दिशाभूल करणारी तक्रार कोर्टासमोर दाखल केली आहे. सबब तक्रार खर्चासह व विनाकारण मानसिक ञास दिल्याबद्दल रुपये 50,000/- नुकसान भरपाईसह खारीज करण्यात यावी, अशी प्रार्थना केली.
4. अर्जदाराने तक्रारी कथना पृष्ठयर्थ नि.क्र.10 नुसार पुरावा शपथपञ, नि.क्र.12 नुसार 2 दस्ताऐवज, नि.क्र.16 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.13 सोबत रिजॉईन्डर व 1 दस्त दाखल केले. तसेच, गैरअर्जदाराने नि.क्र.14 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार : नाही.
केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : नाही.
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून टाटा 315 ई बॅखो लोडर (TATA 315 E BACKHOE LOADER) या वाहनाकरीता विमा पॉलिसी क्र.500400/44/10/ 07/30000069, दि.29.4.2011 ते 27.4.2012 या कालावधीकरीता काढलेली आहे. सदर बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे म्हणून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होत आहे. म्हणून मुद्दा क्र.1 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
6. अर्जदाराने तक्रारीत परिच्छेद क्र.3 मध्ये कथन केले आहे की, ‘‘दि.5.3.2012 रोजी अर्जदाराचे वाहन क्रमांक एम.एच.-33/4290 चा उपयोग हा बेलगाव ते धानोरा मार्गावर सुरु असता 35 ते 40 अनोळखी नक्षलवादी बंदुकधारी इसमांनी सदर वाहन जाळले. पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन, धानोरा यांनी सदर घटनेची दखल घेवून 35-40 अनोळखी नक्षलवादी इसमां विरुध्द अपराध क्रमांक 13/2012 प्रमाणे कलम 435, 341, 143, 147, 148, 149 भा.दं.वि. व कलम 3/25 भा.ह.का. तसेच 135 मु.पो.का. अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे.’’ तसेच अर्जदाराने नि.क्र.2 चे खाली दस्त क्र.1 वर पहिली खबर (फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम 154 अन्वये) ची प्रत दाखल केली आहे. त्यात शेवटच्या परिच्छेदात असा उल्लेख केला आहे की, ‘‘वाहन जळतेवेळी 12-15 बंदुकधारी नक्षलवादी होते व जंगलामध्ये 20-25 नक्षलवादी होते असे एकूण 35-40 हिरवे ड्रेस घातलेले अनोळखी बंदुकधारी नक्षलवादींनी वाहनाची तोडफोळ, जाळपोळ करुन नुकसान केले तरी त्याचेवर कार्यवाही होणेस तोंडी रिपोर्ट देत आहे.’’ सदर कथन तक्रारदाराने एफ.आय.आर.मध्ये केलेले आहे असे दिसून येते. तसेच नि.क्र.2 वरील दस्त क्र.3 मध्ये इंशुरन्स सर्टीफिकेटची पडताडणी करतांना असे दिसून आले की, सदर पॉलिसीच्या एक्सक्लुझन क्लॉज (Exclusion Clause) मध्ये (O) Loss or damage caused by any act of “terrorism”. मंचाच्या मताप्रमाणे जळालेले वाहन हा नक्षलवादांनी जाळलेला आहे हे अर्जदाराला स्विकृत आहे, तसेच सदर कृती ही आतंकवादी कृत्यांमध्ये (Terrorism Act) येत आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा या वरील कारणामुळे नाकारुन अर्जदाराप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही, असे सिध्द होते. अर्जदार हा विमा पॉलिसीच्या अटीप्रमाणे कोणताही विमा दावा मिळण्यास पाञ नाही, म्हणून मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-26/2/2014