रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग – रायगड.
तक्रार क्रमांक 53/2011
तक्रार दाखल दिनांक :- 26/07/2011
निकालपत्र दिनांक 31/12/2014
श्री. साई शंकर मर्चंडे,
रा. एक्साईज ऑफीस शेजारी,
सरकारी गोदामा समोर, अलिबाग,
पो. ता. अलिबाग, जि. रायगड. ..... तक्रारदार
विरुध्द
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.,
तर्फे शाखाधिकारी,
पत्ता – 914/915, बु-हाणी मॅन्शन,
नेताजी सुभाषचं¦ बोस रोड, टपाल नाका,
पनवेल, ता. पनवेल, जि. रायगड. ..... सामनेवाले
उपस्थिती - तक्रारदारातर्फे ॲड. दिपक व्ही. नागे
सामनेवालेतर्फे ॲड. सचिन बी. जोशी.
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर,
मा.सदस्या, श्रीमती उल्का अं. पावसकर
मा. सदस्य, श्री.रमेशबाबू बी. सिलीवेरी,
नि का ल प त्र –
(31/12/2014)
द्वारा मा. सदस्या, श्रीमती उल्का अं. पावसकर
1. तक्रारदाराने सदरहू तक्रार सामनेवाले इन्शुरन्स कंपनी विरुध्द तक्रारदारांचे वाहन विमा रक्कम नाकारल्याने दाखल केलेली असून त्याची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे आहे.
2. तक्रारदारांनी त्यांचे कुटुंबाचे खाजगी वापराकरीता महिंद्रा या कंपनीची बोलेरो एस.एल.एक्स. 7 एस.टी.आर.बी.एस. 2 ही गाडी ग्लोबल गॅलेरी, पनवेल यांचेकडून विकत घेतली होती. सदरहू गाडीचा कॉम्प्रेहेन्सीव्ह स्वरुपाचा विमा त्यांनी सामनेवालेकडे उतरविला होता. सदर गाडीकरीता तक्रारदारांनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्विसेस लि. यांचेकडून रक्कम रु. 4,95,000/- चे द.सा.द.शे. 10.50% व्याज दराने अर्थसहाय्य घेतले होते. सदरहू वाहनाचा विमा रक्कम रु. 5,81,268/- इतक्या रकमेचा विमा तक्रारदारांनी सामनेवालेकडे दि. 07/05/2009 ते 06/05/2010 या कालावधीकरीता उतरविला होता. तक्रारदारांचे वडील श्री. शंकर मर्चंडे यांचे मित्र श्री. संतोष पांडे यांनी सदरहू वाहन दोन दिवसांकरीता बाहेर जाण्यासाठी तक्रारदारांकडून दि. 23/08/09 रोजी घेऊन श्री. संतोष पांडे यांनी त्यांच्या कोपरखैरणे येथील घरी नेले होते. श्री. पांडे यांनी त्यांचेच घराच्या तळमजल्यावर असलेल्या मे. म्हात्रे सर्व्हिस सेंटर येथे सदर गाडी सर्व्हिसिंगसाठी दिली होती. गाडीचे सर्व्हिसिंग झाल्यानंतर श्री. पांडे यांनी सर्व्हिस सेंटरच्या बाजूला असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये सदरहू वाहन पार्क केले होते. दुस-या दिवशी दि. 24/08/09 रोजी श्री. पांडे सकाळी 5.00 वाजता पत्र्याच्या शेडमध्ये आले असता त्यांना तेथे सदर वाहन नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी याबाबत तक्रारदारांना कल्पना दिली. व त्यानंतर तक्रारदार, त्यांचे वडील व श्री. पांडे यांनी कोपरखैरणे पोलिस स्टेशनला जाऊन दि. 24/08/09 रोजी गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दिली. परंतु पोलिसांनी गणेशोत्सवाचे बंदोबस्तामुळे सदर तक्रार ही दि. 04/09/09 रोजी नोंद केली.
3. त्यानंतर तक्रारदारांनी आर.टी.ओ. कार्यालय, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स व सामनेवाले यांना सदरहू गाडी चोरीला गेल्याचे कळविले. सामनेवालेकडे प्रत्यक्ष जाउन त्याठिकाणी क्लेम फॉर्म भरुन दिला व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे दिली. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारांना वेळोवेळी पत्रे पाठवून कागदपत्रांची पूर्तता करणेविषयी कळविले. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांना कागदपत्रे दिलेली असून क्लेम मंजूर करणेविषयी वेळोवेळी सामनेवाले यांना कळविले. परंतु सामनेवाले यांनी दि. 06/01/11 रोजी तक्रारदारांचे वडीलांना पत्र पाठवून दि. 26/03/10 रोजीच क्लेम नाकारण्यात आला आहे असे कळविले. सदरहू पत्रास दि. 02/02/11 रोजी तक्रारदारांनी पत्र पाठवून विमा दाव्याबाबत अंतिम निर्णय घेणेबाबत कळविले, परंतु त्या पत्रास सामनेवाले यांनी उत्तर दिले नाही, किंवा तक्रारदारांस विमा क्लेम दिला नाही, म्हणून तक्रारदारांनी विमा पॉलिसीची पूर्ण रक्कम रु. 5,81,268/- द.सा.द.शे. 10.50% व्याज दराने तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/-, न्यायिक खर्चापोटी रु. 15,000/- मिळणेसाठी सदरहू तक्रार दाखल केली आहे.
4. तक्रारदारांनी नि. 4 सोबत गाडी खरेदी केल्याचे ग्लोबल गॅलेरी, पनवेल यांचेकडील टॅक्स इन्व्हॉईसची सत्यप्रत, महेंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस यांचेकडील वाहनाच्या कर्जाबाबतचे प्रिन्सीपल इंट्रेस्ट बॅकअप रिपोर्ट सत्यप्रत, पेण आर.टी.ओ. कडील स्मार्टकार्डची सत्यप्रत इत्यादी 23 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यानंतर दि. 24/02/12 रोजी सदरहू गाडीची कर्ज बँक स्टेटमेंट, लवादाकडील प्रकरण हजर केले.
5. सदरहू तक्रारीची नोटीस सामनेवाले यांना पाठविणेत आली. सामनेवाले यांनी दि. 28/12/11 रोजी लेखी म्हणणे दाखल केले, ते नि. 9 वर आहे. तक्रारदारांनी दि. 24/02/12 रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले, ते नि. 11 वर आहे. सामनेवाले यांनी 02/07/2014 रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले, ते नि. 12 वर आहे. तसेच दि. 16/08/14 रोजी सामनेवाले यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला, तो नि. 13 वर आहे. तक्रारदार यांना लेखी युक्तीवाद दाखल करणेसाठी संधी देऊनही त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला नाही.
6. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे का ॽ
उत्तर - होय
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले यांनी तक्रारदारांचा वाहन चोरी विमा दावा नाकारुन
सेवेत त्रुटी केल्याची बाब सिध्द केली आहे काय ?
उत्तर - होय
मुद्दा क्रमांक 3 - सामनेवाले हे तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत
काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 4 - तक्रारदारांची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ?
उत्तर - होय.
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे वादग्रस्त गाडीचा विमा उतरविला असून सामनेवाले ही तक्रारदारांना सेवा पुरवित असल्याने तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होतात तक्रारीचे कारण या मंचाच्या अधिकारक्षेत्रात घडलेले असल्याने या मंचास सदरहू तक्रार चालविण्याचा अधिकार असून तक्रारदारांनी सदरहू तक्रार दि. 26/07/2011 रोजी दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी दि. 13/05/2009 रोजी ग्लोबल गॅलेरी पनवेल यांचेकडून महिंद्रा कंपनीची बोलेरो एस.एल.एक्स. 7 एस.टी.आर.बी.एस. 2 ही गाडी खरेदी केली होती. सदरहू गाडी ही तक्रारदारांचे वडीलांचे मित्र श्री. संतोष पांडे हे दि. 23/08/09 रोजी त्यांचे घरी कोपरखैरणे येथे घेऊन गेले होते व तेथे त्यांनी त्याच दिवशी गाडी त्यांच्याच रहात्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या श्री. म्हात्रे सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसींगसाठी दिली व सदरहू सर्व्हिस सेंटरच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये श्री. पांडे यांनी गाडी पार्क करुन ठेवली होती. सदरहू गाडी त्याठिकाणी नेली होती हे तक्रारदाराने नि. 4/1 वर दाखल केलेल्या सर्व्हिसींगच्या पावतीवरुन शाबित होते. परंतु दुस-या दिवशी दि. 24/08/09 रोजी पहाटे 5.00 चे सुमारास श्री. पांडे यांचे कुटुंबिय अलिबाग येथे येण्यास निघाले असता सदरहू गाडी त्याठिकाणी आढळून आली नाही. तक्रारदारांची गाडी दि. 24/08/09 रोजी चोरीला गेल्याने तक्रारदार, त्यांचे वडील व श्री. पांडे यांनी कोपरखैरणे पोलिस स्टेशनला जाऊन दि. 24/08/09 रोजी गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दिली. परंतु पोलिसांनी गणेशोत्सवाचे बंदोबस्तामुळे सदर तक्रार ही दि. 04/09/09 रोजी नोंद केली. त्यानंतर तक्रारदारांनी आर. टी. ओ. पेण यांचेकडे दि. 09/09/09 रोजी कळविले. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स लि. यांनाही गाडी चोरीस गेल्याबाबत तक्रारदारांनी कळविले. त्यानंतर तक्रारदार स्वत: सामनेवाले यांचे पनवेल कार्यालयात जाऊन त्यांनी गाडी चोरीस गेल्याबाबत माहिती दिली. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून क्लेम फॉर्म भरुन घेतला. त्यावेळी तक्रारदारांनी काही आवश्यक कागदपत्रे दिली. त्यानंतर तक्रारदाराने दि. 21/10/09 रोजी गाडीच्या दोन सेट मधील चाव्या व इतर कागदपत्रे सामनेवाले यांनी नेमलेल्या स्मार्ट इनव्हेस्टीगेटर श्री. इंदरपाल सिंग यांना त्यांचे कार्यालयात दिले व त्याची पोच इंदरपाल सिंग यांनी दिलेली आहे. ती तक्रारदारांनी नि. 4/11 कडे सादर केलेली आहे. सामनेवाले यांनी दि. 27/10/13 रोजी पुन्हा कागदपत्रांची मागणी केली. परंतु तक्रारदारांनी सदरहू कागदपत्रे पूर्वीच सामनेवाले यांचे कार्यालयातील श्रीमती साहू यांचेकडे दिलेली होती. त्यानंतर दि. 16/08/10 रोजी पुन्हा तक्रारदारांनी आणखी कागदपत्रे जमा केली. तरीही सामनेवाले यांनी तक्रारदारांना क्लेम अदा केला नाही. म्हणून तक्रारदारांनी दि. 07/12/10 रोजी रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवून विमा दाव्याबाबत निर्णय घेण्यास कळविले. सदरहू पत्र नि. 4/21 कडे तक्रारदारांनी सादर केले आहे. या पत्रास अनुसरुन सामनेवाले यांनी सदरची फाईल दि. 26/03/2010 रोजी नाकारण्यात येऊन बंद केलेली आहे, असे दिनांक 06/01/11 रोजी तक्रारदारांचे वडीलांना पत्र पाठवून कळविले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांना दि. 26/03/10 रोजी पत्र प्राप्त झालेले नाही. सामनेवाले यांच्या म्हणण्यानुसार दि. 26/03/10 रोजी क्लेम फाईल बंद केलेली आहे. त्यामुळे तक्रारीचे कारण हे दि. 26/03/10 रोजी सर्वप्रथम सुरु झालेले आहे. इन्शुरन्स कंपनी जेव्हा क्लेम नाकारते तेव्हापासून (From the date of repudiation of claim) तक्रारीचे कारण चालू होते, त्या तारखेपासून दोन वर्षांचे आत तक्रारदारांनी सदरहू तक्रार दाखल केलेली असल्यामुळे तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे. असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदारांनी सामनेवालेकडे रक्कम रु. 5,81,268/- एवढया रकमेचा विमा उतरविलेला आहे. सदर विमा पॉलिसी नि. 4/3 कडे तक्रारदारांनी सादर केलेली आहे. सदरहू पॉलिसी ही दि. 07/05/2009 ते 06/05/2010 या कालावधीकरीता असून या मुदतीत म्हणजे दि. 24/08/09 रोजी वादातील गाडी चोरीस गेलेली आहे. सदरहू पॉलिसी ही कॉम्प्रीहेन्सीव्ह पॉलीसी असून याबाबत सामनेवाले यांचा कोणताही वाद नाही. तक्रारदारांनी गाडी चोरीबाबत पोलिस स्टेशन कोपरखैरणे, आर.टी.ओ. पेण, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स यांचेकडे तसेच सामनेवाले यांना कळविले. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम फॉर्म भरुन घेतला व तक्रारदाराने दि. 21/10/09 रोजी गाडीच्या दोन सेट मधील चाव्या, रजिस्ट्रेशन बुक, आर.टी.ओ. कडे दिलेली तक्रार आदी कागदपत्रे सामनेवालेकडे जमा केली व त्याची पोचपावती सामनेवाले यांचे नेमलेले इनव्हेस्टीगेटर श्री. इंदरपाल सिंग यांनी दिलेली आहे. ती पावती नि. 4/11 कडे आहे. परंतु त्याला अनुसरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांस विमा रक्कम देणेऐवजी दि. 27/10/09 रोजी पत्र देऊन 11 कागदपत्रांची मागणी केली. सदरहू पत्र नि. 4/12 वर आहे.
त्यानंतर तक्रारदार यांनी दि. 18/01/10 रोजी सामनेवाले यांचे कार्यालयात जाऊन श्रीमती साहू यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी यांचे कोर्टात सादर केलेला रिपोर्ट, आर.टी.ओ. फॉर्मस, विमा पॉलिसीची झेरॉक्सप्रत आदी कागदपत्रे दाखल केली आहेत. त्याला सामनेवालेतर्फे पोच देण्यात आलेली आहे ती नि. 4/15 कडे तक्रारदारांनी सादर केली आहे. तक्रारदाराची मूळ कागदपत्रे गाडीतच असल्याने गाडी चोरीला गेली तेव्हा ती कागदपत्रे गाडी बरोबरच चोरीला गेल्याचे प्रतिज्ञापत्र कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडे करुन सामनेवाले यांना दिलेले होते, ते नि. 4/16 वर आहे. तरीही सामनेवाले यांनी विमा रक्कम न दिल्याने तक्रारदारांनी दि. 09/02/10 व दि. 06/03/10 रोजी सामनेवाले यांना स्मरणपत्रे पाठविली. ती अनुक्रमे नि. 4/17 व 4/18 वर दाखल आहेत. परंतु त्यानंतरही सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडे कागदपत्रांची मागणी केली. वास्तविक सदरहू कागदपत्रे सामनेवाले यांना सर्व कागदपत्रे पोच असताना सामनेवाले यांनी क्लेम कामी पुन्हा कागदपत्रांची मागणी करणे हे चुकीचे आहे. त्यानंतर तक्रारदारांनी पुढे दि. 16/08/10 रोजी आणखी काही कागदपत्रे दिलेली आहेत. त्यांची पोच श्रीमती साहू यांनी दिलेली आहे. ती नि. 4/20 कडे आहे. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारांचा क्लेम मंजूर करणे क्रमप्राप्त होते. परंतु सामनेवाले यांनी तसे केले नसल्याने तक्रारदाराने दि. 07/12/10 रोजी रजिस्टर पत्र पाठवून विमा दाव्याबाबत निर्णय कळविण्यास कळविले, सदर पत्र नि. 4/21 कडे आहे. त्याला अनुसरुन सामनेवाले यांनी सदर फाईल दि. 26/03/10 रोजी बंद केल्याचे दि. 06/01/11 रोजी कळविले, सामनेवाले यांनी सदरचा क्लेम नाकारल्याचे लगेचच स्वत:हून तक्रारदारांना कळविले नाही तर तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 07/12/10 रोजी पत्र पाठविल्यानंतर दि. 26/03/10 रोजी फाईल बंद केल्याचे सुमारे 9 महिन्यांनंतर तक्रारदारांना कळविले. तसेच त्याच पत्रात पुन्हा मूळ आर.सी. बुक, मूळ टॅक्स बुक, गाडीच्या दोन चाव्यांचा सेट, आर.टी.ओ. दाखला, फायनान्सर यांना दिलेल्या पत्राची प्रत देण्याबाबत कळविले. त्यामुळे सामनेवाले यांना तक्रारदार यांना विमा क्लेमचे पैसे द्यावयाचे नसल्याने हेतूपुरस्सर सातत्याने पत्रव्यवहार करुन नाहक त्रास देत आहेत. हे एकंदरीत सर्व पत्रव्यवहार पहाता लक्षात येते. त्यामुळे सामनेवाले यांनी हेतूपुरस्सररित्या तक्रारदारांचा क्लेम नाकारुन तक्रारदारांना देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केलेली आहे. अशा निष्कर्षाप्रत मंच येत आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्रमांक 3 व 4 - तक्रारदाराने सदरचे वाहन रक्कम रु. 6,11,861/- या रकमेला विकत घेतलेले असून त्याकरीता महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस यांचेकडून रक्कम रु. 4,95,000/- चे द.सा.द.शे. 10.50% व्याजदराने अर्थसहाय्य घेतलेले आहे. त्याकरीता तक्रारदारने टॅक्स इन्व्हॉईसची प्रत नि. 4/1 व कर्जाचा बॅकअप रिपोर्ट नि. 4/2 कडे हजर केलेला आहे. तक्रारदारांनी रक्कम रु. 5,81,268/- एवढया रकमेचा विमा सामनेवाले यांचेकडे उतरविलेला असून सदरहू पॉलिसी ही कॉम्प्रीहेन्सीव्ह पॉलीसी असून त्याची मुदत 07/05/2009 ते 06/05/2010 अशी आहे. तक्रारदारांची गाडी दि. 24/08/09 रोजी चोरीला गेलेली आहे. व त्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये केलेली फिर्याद नि. 4/6 वर दाखल आहे. त्याची प्रत कोपरखैरणे पोलिस स्टेशनला दाखल आहे. त्याप्रमाणे कोपरखैरणे पोलिस स्टेशनने अलिबाग पोलिस स्टेशनला शोध घेणेविषयी कळविले होते. तसेच तक्रारदारांनी दि. 09/09/09 रोजी आर.टी.ओ. पेण यांनाही गाडी चोरीला गेल्याबाबत कळविले. सामनेवाले यांनी आपले म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी वाहन सुरक्षित जागी गाडी पार्क न करुन त्याची काळजी घेतलेली नसल्याने व गाडी चोरीची तक्रार पोलिस स्टेशनला 10 दिवसांच्या विलंबाने दिलेली असल्याने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केलेला असल्याने विमा नाकारण्यात आलेला आहे असे म्हटले आहे. परंतु तक्रारदारांचे वडीलांचे मित्राने सदरहू वाहन हे त्यांचेच रहात्या बिल्डींगच्या खाली पत्रयाच्या शेडमध्ये पार्क केलेले होते, तसेच गाडी चोरीची तक्रार तक्रारदारांनी पोलिस स्टेशनला लगेचच दिलेली होती. परंतु पोलिसांनी गणेशोत्सवाचा बंदोबस्त असल्याने सदरची तकारर लगेचच नोंद केली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे असे म्हणता येणार नाही. मुळात पॉलिसीच्या अटी व शर्तींचा कागद याकामी सामनेवाले अथवा तक्रारदारांनी जोडलेला नाही त्यामुळे कोणत्या प्रकारच्या अटी व शर्ती आहेत हे सामनेवाले यांनी शाबित करणे गरजेचे आहे. परंतु सामनेवाले यांनी ते शाबित केलेले नाही. त्यानंतर सामनेवाले यांनी ते वाहन चोरी तक्रारीचा समरी रिपोर्ट झालेला नसल्याने वाहनाचा तपास चालू असल्याने विमा क्लेम मागण्याचा हक्क तक्रारदारांना नाही असे नमूद केलेले आहे. परंतु याकामी तक्रारदाराने दि. 24/02/2012 रोजी त्यासंबंधी दि. 30/12/09 रोजी सदरहू गुन्हा अ समरी झाल्याबाबतची कागदपत्रे नि. 10 सोबत हजर केलेली आहेत. त्यामुळे सदरहू वाहनाचे गुन्हा संदर्भात प्रकरण अ समरी झाल्याने, तसेच सदरहू पॉलिसी वाहन चोरी गेली तेव्हा वैध होती, सदरहू पॉलिसी नि. 4/8 चे अवलोकन करता दिसून येत असल्याने सामनेवाले यांनी विमा रक्कम तक्रारदार यांना अदा करणे आवश्यक होते. सदरहू पॉलिसी रक्कम रु. 5,81,268/- एवढया रकमेसाठी इन्शुअर्ड केलेली आहे. त्यासाठीचा हप्ता रक्कम रु. 22,587/- तक्रारदाराने भरलेला दिसतो. तक्रारदाराने हजर केलेल्या कागदपत्रांवरुन सदरहू वाहन चोरीला गेल्याने तक्रारदाराने शाबित केलेले आहे. तक्रारदाराला विमा कॉम्प्रीहेन्सीव्ह असल्याबाबत सामनेवाले यांचा वाद नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी विमा पॉलिसीची पूर्ण रक्कम रु. 5,81,268/- ही रक्कम तक्रारदारांना देणे योग्य आहे असे आमचे मत आहे.
तक्रारदारांनी सदरहू गाडी ही कर्ज प्रकरण करुन खरेदी केलेली आहे. त्या करीता त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. यांचेकडून कर्जाबाबत व्याज बॅकअप रिपोर्ट हजर केलेला आहे. तो नि. 4/2 वर दाखल आहे. त्याचे अवलोकन करता तक्रारदार रक्कम रु. 4,95,000/- चे कर्ज व हप्ता रक्कम रु. 12,639/- भरावा लागत आहे हे दिसून येते. तक्रारदाराने दि. 24/02/12 रोजी हजर केलेल्या फायनान्सरच्या स्टेटमेंटप्रमाणे दि. 23/05/11 पर्यंत हप्ते भरलेले आहेत, सदरहू हप्ते 10.50% व्याजदराने तक्रारदाराने भरलेले आहेत. त्यानंतरचे हप्ते, विम्याचे पैसे तक्रारदार अदा करु शकलेला नाही. त्यामुळे सामनेवाले हे तक्रारदारांना विमा रक्कम व्याजासहित देण्यास पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. सामनेवाले यांनी सदरहू रक्कम 9% व्याजदराने तक्रारदारांस देणे योग्य आहे अशा निष्कर्षाप्रत मंच आले आहे. तक्रारदाराने हप्ते न फेडल्यामुळे कर्ज प्रकरण लवादाकडे गेल्याची नोटीस तक्रारदारांना आलेली आहे. परंतु त्याचा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळे तक्रारदारांची अतिरिक्त 3% व्याजदराची मागणी मंजूर करता येणार नाही. मुद्दा क्रमांक 2 मध्ये विश्लेषित केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना देण्यात येणाऱ्या सेवेत कसूर करुन तक्रारदारांचा क्लेम विनाकारण नाकारल्याने त्यांना मानसिक त्रास झालेला आहे तसेच तक्रारदारांना आर्थिक खर्चात टाकलेले आहे. त्यामुळे सामनेवाले हे तक्रारदारांस विमा संरक्षित रक्कम व नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 3 व 4 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत असून खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
अंतिम आदेश
1. तक्रार क्रमांक 53/2011 अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांचा वाहन चोरी विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांस विमा रक्कम रु. 5,81,268/- (रु. पाच लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे अडुसष्ट मात्र) दि. 26/03/10 रोजी पासून (From the date of repudiation of claim) आदेशाची पूर्तता होईपर्यंत 9% व्याजदराने अदा करावी.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांस तक्रारीच्या खर्चापोटी, शारिरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून एकत्रित रक्कम रु. 40,000/- (रु. चाळीस हजार मात्र) अदा करावेत.
5. सदरहू आदेशाची पूर्तता आदेश प्राप्तीपासून 60 दिवसांचे आत करावी. अन्यथा उपरोक्त नमूद आदेश कलम क्रमांक 3 मधील रक्कम 9% व्याजासह तक्रारदारांस अदा करावेत.
6. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना पाठविण्यात याव्यात.
ठिकाण - रायगड-अलिबाग.
दिनांक – 31/12/2014
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.