निकालपत्र :- (दि.22/07/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याय्य व योग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार या बुजवडे ता.राधानगरी जि.कोल्हापूर येथील कायमच्या रहिवाशी आहेत. सामनेवाला विमा कंपनी असून ती विमा व्यवसाय करते. तक्रारदाराचे पती दुधगंगा वेदगंगा सह.साखर कारखाना बिद्री लि. मौनीनगर येथे नोकरीस असताना त्यांचा विमा जनता अपघात विमा योजनंअतर्गत मौनीनगर साखर कारखाना लि. सेवकांची सह.पत संस्था यांचेमार्फत सामनेवालाकडे उतरविलेला होता व आहे. तक्रारदारचे पतीचा दि.19/07/2006 रोजी त्यांचे राहते घरी सकाळी 7 वाजण्याचे सुमारास शिडीवर चढून माळयावरील वैरण काढत असताना शिडीचा पायंडा मोडून शिडीवरुन खाली फरशीवर पडल्याने त्यांचे डोकीस व छातीस जबर मार लागलेने ते बेशुध्द अवस्थेत होते. औषधोपचारासाठी गुरुकृपा हॉस्पिटल कोल्हापूर येथे त्यांना दाखल केले असता उपचार सुरु असताना दुपार 4 वाजणेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झालेला होता व आहे. सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्हापूर येथे शवविच्छेदन केलेले आहे. तक्रारदाराचे पतीचा अपघाताने पडलेने मृत्यू झालेमुळे C.R.P.C.174 अहवाल करणेत आलेला होता व आहे. सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलीस स्टेशन येथे झालेली आहे. तक्रारदाराचे पतीचे अपघाती मृत्यूनंतर योग्य त्या कागदपत्रासह मुदतीत विमा रक्कम मिळावी म्हणून क्लेम फॉर्म भरुन पाठवला. दि.08/08/2007 रोजी '' नो क्लेम '' या कारणावरुन क्लेम नाकारल्याचे कळवले आहे. ब) तक्रारदार ही एक गरीब विधवा असून ती राधानगरी तालूक्यातील दुर्गम भागातील राहणारी आहे. तिचे कुटूंब शेतीवर अवलंबून होते व आहे. पतीचे निधनामुळे तिचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच विमा क्लेमप्रमाणे रक्कम तिला वेळेत न मिळाल्यामुळे मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. क) सबब तक्रारदाराचा न्याय्य क्लेम बेकायदेशीरपणे नाकारुन सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे तक्रारदाराची तक्रार दाखल करणेत आली. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत यावी. विमा क्लेम रक्कम रु.1,00,000/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत तक्रारदाराने सामनेवाला यांना भरुन दिलेला क्लेम फॉर्म, सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, पोलीसांनी तयार केलेला अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवलेली नाही. तक्रार अर्जातील कलम 1 मधील तक्रारदाराचे पतीचा जी.पी.ए. अंतर्गत विमा उतरविलेला आहे. त्याचा पॉलीसी नं.160501/47/01/61/00001330 असून कालावधी दि.16/08/2001 ते 15/08/2006 असा आहे. मात्र सदर पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तसे M.V.Act प्रमाणे सामनेवाला विमा कंपनी रक्कम देणेस जबाबादार नाहीत. तक्रार अर्जातील कलम 2 ते 8 मधील कथने अमान्य केली आहेत. वस्तुत: तक्रारीस कारण घडलेले नाही. मयत पांडूरंग पाटील यांचे पी.एम.रिपोर्टचे अवलोकन केले असता त्यांचे शरीरावर बाहय जखमा नसल्याचे नमुद आहे तसेच छातीच्या बरगडया व कवटी यांना अंतर्गत जखमा दिसून येत नाही. Brain was oedeomatous तक्रारदारचे पतीचा मृत्यू हा Pulmonary and cerebral Oedema in an old case of Rheumatic heart disease. सबब सदरचा मृत्यू हा अपघाती नाही. सबब तक्रारदार क्लेम मिळणेस पात्र नाही. सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासहीत फेटाळणेत यावा व तक्रारदाराकडून सामनेवालांना कॉम्पेंसेंटरी कॉस्ट मिळावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत डॉ;विजयकुमार पाटील यांचे अॅफिडेव्हीट, व त्यांचा रिपोर्ट व पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2) तक्रारदारा विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? --- होय. 3) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1:- अ) तक्रारदाराचे पतीचे नांवे सामनेवालांकडे जनता व्यक्तीगत अपघात योजनेअंतर्गत विमा उतरविल्याचे सामनेवालांनी मान्य केले आहे. विमा पॉलीसी नं;160501/47/01/61/00001330 असून विमा कालावधी दि.16/08/2001 ते 15/08/2006 असा आहे. ब) तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा दि.19/07/2006 रोजी झाला आहे. सदरचा मृत्यू हा विमा कालावधीत झाला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच योग्य त्या कागदपत्रांसह विमा क्लेम मागणी केली. तक्रारदारचे पतीचा मृत्यू हा अपघाती आहे का ? हा वादाचा मुद्दा आहे. सामनेवालांनी सदर मृत्यू अपघाती नसलेचे प्रतिपादन केले आहे. दाखल केलेले क्लेम फॉर्मच्या सत्य प्रतीत तक्रारदारचे पती विमाधारक पांडूरंग पाटील यांचा मृत्यू घरातील माळयावरुन वैरण काढताना शिडीवरुन पडून अपघात झालेचे नमुद आहे. त्या अनुषंगाने अपघाताची नोंद राधानगरी पोलीस स्टेशनला केली आहे. त्याचा F.I.R. प्रस्तुत कामात दाखल आहे. सदर तक्रारदारचे पती दि.29/07/2006 रोजी सकाळी 7 वाजता माळयावरुन वैरण काढत असताना शिडीवरुन पडले व त्यांचे डोक्यास व छातीस मार लागून ते बेशुध्द पडले त्यांना कोल्हापूर येथे गुरुकृपा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारा दरम्यान त्याचदिवशी दुपारी 4 वाजता त्यांचा मृत्यू झाला. तदनंतर सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर येथे पोस्ट मार्टेम केले. सदर पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा Pulmonary and cerebral Oedema in an old case of Rheumatic heart disease- unnatural असे स्पष्ट नमुद केले आहे. क) सामनेवालांतर्फे डॉ.विजयकुमार शिवाजीराव पाटील यांनी सदर मृत्यू अपघाती नाही. अपघातामुळे मृत्यू झालेला नसून Pulmonary and cerebral Oedema in an old case of Rheumatic heart disease मुळे झाला आहे. असे त्यांनी दाखल असलेल्या पी.एम.वरील नोंदीवरुन त्यांचे मत शपथपत्रावर दिले आहे. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणासाठी पोस्ट मार्टेम रिपोर्ट हा Conculsive proof आहे. सबब पोस्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याचे स्पष्ट नमुद केलेले आहे. सबब तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाती झालेला आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. ड) तक्रारदार ही गरीब विधवा महिला असून पतीच्या निधनामुळे ती निराधार झाली आहे. जी.पी.ए. चा मूळ हेतू विचारात न घेता सामनेवालांनी त्यांचे पॅनेलवरील डॉक्टरांनी दिलेल्या मताचा (Opinion) चा विचार करुन क्लेम नाकारला आहे. पोस्ट मार्टेममधील Unnatural Death या नोंदीची दखल घेतलेली नाही. सबब तक्रारदाराचा योग्य व न्याय्य क्लेम दि.08/08/2007 रोजी '' नो क्लेम '' या कारणाने सामनेवाला यांनी नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदार विमा पॉलीसीप्रमाणे तक्रारदारचे पती पांडूरंग पाटील यांचा मृत्यू झालेमुळे विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत. मुद्दा क्र.3 :- सामनेवालांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. सबब तक्रारदार त्यापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.08/08/2007 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे. (3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |