निकालपत्र :- (दि.02/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याय्य व योग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारुन सेवा त्रुटी केल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार क्र.1 या मयत आनंदा विष्णू पाटील यांची पत्नी असून तक्रारदार क्र. 2 व 3 ही उभयतांची मुले आहेत. तक्रारदार क्र.1 ते 3 हे मयत आनंदा पाटील यांचे सरळ वारस आहेत. तक्रारदाराचे मयत पती हे कुंभी कासारी सह.साखर कारखाना लि.कुडित्रे ता.करवीर जि.कोल्हापूर यांचेकडे नोकरीला होते.सदर कारखान्याने त्यांचे कर्मचा-यांचा विमा जनता अपघात विमा योजनेअंतर्गत ग्रुप इन्शुरन्स उतरविला होता. विमा पॉलीसीचा क्र.160501/47/98/ 00584 असा होता.
ब) दि.11/06/2005 रोजी विमाधारक आनंदा विष्णू पाटील यांचा पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला.त्यावेळी विमा पॉलीसी चालू स्थितीत होती. तक्रारदाराने कारखान्यामार्फत योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन विमा रक्कमेची मागणी केली असता दि.22/03/2006 चे पत्राने वेळेत कागदपत्र सादर केली नाही असे चुकीचे कारण देवून क्लेम नामंजूर केला. कागदपत्रांची पूर्तता करुनही चुकीच्या कारणास्तव क्लेम नाकारुन सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. तक्रारदार हे लाभार्थी असलेने सदर क्लेम मिळणेस पात्र आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन विमा पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/-दि.11/06/2005 पासून सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याज मिळावे तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-व तक्रार अर्जाचा खर्चाचे रु.3,000/-सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, फायनल रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.06/10/2008 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांना क्लेमसाठीचे पाठवलेले कागदपत्राचे पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना ए समरी रिपोर्ट बाबतचे दिलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार परिच्छेद निहाय सामनेवालांनी तक्रार नाकारली आहे. तक्रार अर्ज कलम 2 मधील मजकूर सर्वसाधारण मान्य केला आहे. सामनेवालांकडे पॉलीसी क्र;160501/47/98/61/00584 दिली आहे. मात्र त्याची विमा देणेची जबाबदारी ही विमा पॉलीसीतील अटी व शर्ती, एक्सेप्शन, अनेक्शर यास अधीन राहून असेल. वस्तुत: क्लेम मागणी अर्ज मिळालेबरोबर सामनेवालांनी कुंभी कासारी सह.साखर कारखाना लि. कुडीत्रे यांचेकडे कागदपत्रांची मागणी केली होती. सदर कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी क्लेम मंजूर व नामंजूर करणे शक्य झाले नाही. सबब दि.22/03/2006 रोजीच्या पत्राने प्रस्तुत क्लेम नाकारला आहे. कुंभी कासारी साखर कारखाना यांना आवश्यक पक्षकार करणे गरजेचे होते. सबब Non Joinder of necessary Party या तत्वाची बाधा येत असलेने तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे.सबब सदर वस्तुस्थिती विचारात घेता सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी केली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवालांनी आपले लेखी म्हणणेचे पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
(6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवालांचे लेखी म्हणणे, दि;11/05/2009 चे मंचाचे आदेशानुसार साक्षीदार म्हणून कुंभी कासारी कारखान्यास कागदपत्र दाखल करणेचा आदेश झाला होता व त्याप्रमाणे दाखल केलेली कागदपत्रे व उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) प्रस्तुतचे तक्रारीस Non Joinder of necessary Party ची बाधा येते का? --- नाही. 2) सामनेवालांनी सेवात्रुटी ठेवली आहे का? --- होय. 3) तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? --- होय. 4) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1:- कुंभी कासारी साखर कारखाना लि. कुडित्रे यास आवश्यक पक्षकार केले नसलेने Non Joinder of necessary Party ची बाधा येत असल्याने तक्रार चालणेस पात्र नाही असा आक्षेप सामनेवालांनी घेतला आहे. नमुद कारखान्यामार्फत त्यांचे कर्मचा-यांचा जनता अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवालांकडे ग्रुप इन्शुरन्स उतरविला होता.नमुद कारखान्यास दि.11/05/2009 चे मंचाचे आदेशान्वये साक्षीदार म्हणून कागदपत्रे दाखल करणेचा आदेश केला होता. त्याप्रमाणे त्यांनी मे. मंचासमोर कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सबब सामनेवालांचा नमुद आवश्यक पक्षकार करणेबाबतचा आक्षेप हे मंच फेटाळत आहे. प्रस्तुत तक्रारीस सदर तत्वाची बाधा येत नसल्याने सदर तक्रार या मंचात चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2:- सामनेवाला विमा कंपनीने वर नमुद कारखान्याने त्यांचा कर्मचा-यांचा जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. त्याचा पॉलीसी क्र.160501/47/98/61/00584 आहे हे सामनेवालांनी आपले लेखी म्हणणेत मान्य केले आहे.सबब तक्रारदाराचे पतीचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराचे पतीचा दि.11/06/2005 रोजी पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला व त्यावेळी पॉलीसी चालू स्थितीत होती. तक्रारदाराने कारखान्यामार्फत क्लेम मागणी केली असता दि.22/03/2006 रोजीचे पत्राने Non Complaince of even after repeated reminders या कारणास्तव क्लेम नाकारला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. वादाचा मुद्दा असा आहे की क्लेमसोबत कागदपत्रांची पूर्तता केली किंवा नाही? याचा विचार करता साक्षीदार कुंभी कासारी कारखान्याने दि.09/02/2010रोजी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.01/09/2005चे जा.न.एलडब्ल्युओ(18)2005-2006/1976अन्वये सामनेवाला यांना पाठविलेल्या पत्रामध्ये क्लेम नं.160501/47/05/00015पॉलीसी क्र.160501/47/98/00584 नमुद असून जनता अपघात विमा क्लेमबाबत नमुद कारखान्याचे कर्मचारी आनंदा विष्णू पाटील रा.माजनाळ यांचा दि.11/06/2005 रोजी पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झालेने क्लेम मंजूर करणेविषयी विंनती केली आहे व सोबत 1. संपूर्ण भरलेला क्लेम फॉर्म, 2. मृत्यू दाखला,3. ग्रामपंचायत वारस दाखला 4.पोलीस पंचनामा सत्यप्रत.5.पोस्ट मार्टेम रिपोर्ट सत्यप्रत इत्यादी कागदपत्रे पाठवून दिलेबाबतची नोंद केली आहे. दि.01/09/2005 रोजीच संपूर्ण भरलेल्या क्लेम फॉर्मसोबत दि.14/07/ 2005 चे मृत्यूप्रमाणपत्र, माजनाळ ग्रामपंचायत मागणी, नोंदणी क्र.10 नुसार दि.27/06/2005 च्या दाखल्यानुसार मृत्यूचा दिनांक 11/06/2005 आहे.म्हणजेच वेळेत 17 दिवसात मृत्यू दाखला घेतलेला आहे. दि.11/06/2005 चे सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूरचे मृत्यू कारण प्रमाणपत्रामध्ये बुडून मृत्यूची केलेली नोंद आहे. ग्रामपंचायतीचा तक्रारदार क्र. 1 ते 3 मयताचे सरळ वारस असलेचा दिऋ13/07/2007 चा वारस दाखला, दिऋ11/06/2005 चा F.I.R. वर्दी जबाब, पंचनामा, तक्रारदारचे पती गट नं.107 चे ऊस शेताचे असणारे पश्चिमेकडून पुर्वेकडे वाहणा-या कासारी नदीचे पात्र. पाण्यात बुडू मृत्यू झाल्याचे व प्रेत मिळाल्याचे नमुद केले आहे. दाखल पी.एम.रिपोर्ट मध्ये बुडून मृत्यू झालेची नोंद आहे. दि.11/04/2006 रोजी नमुद कारखान्याने सामनेवालांना पाठविलेल्या पत्रामध्ये- विमा कंपनीचे पत्र दि.22/03/2006च्या क्लेम नाकारलेच्या संदर्भाचे पत्राबाबत खुलासा पाठविलेला आहे व सदर खुलाशात क्लेमसोबत सर्व कागदपत्रे पाठवल्याचे नमुद केले आहे. तसेच 'A' Summary Report ची प्रतही पाठवून दिलेचे नमुद केलेले आहे; वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता नमुद कारखान्याने योग्य ती आवश्यक कागदपत्रे क्लेमफॉर्मसोबत पाठविलेली होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. दि.22/03/2006 चे क्लेम नाकारलेच्या पत्राव्यतिरिक्त अन्य पूर्वी पाठवलेची स्मरणपत्रे प्रस्तुत प्रकरणी सामनेवालांनी दाखल केलेली नाहीत. तसेच वादाकरिता अशी पत्रे पाठवली असतील तर नेमकी कोणती कागदपत्रे पाठवली नाहीत. याबाबत सामनेवालांनी कोणताही स्वयंस्पष्ट पुरावा प्रस्तुत कामी दाखल केलेला नाही. सबब क्लेम फॉर्मसोबत योग्य ते कागदपत्रे पाठवूनही सामनेवालांनी कागदपत्रे न पाठविलेने क्लेम नाकारला आहे. सदरचा क्लेम कोणत्याही आधाराशिवाय नाकारला आहे. ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3:- विमाधारक आनंदा पाटील यांचा विमा कालावधीत पाण्यात बुडून अपघाताने मृत्यू झाल्याने त्यांचे सरळ वारस म्हणून तक्रारदार क्र. 1 ते 3 हे नमुद विमापॉलीसी प्रमाणे रक्कम रु.1,00,000/- व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.4:- तक्रारदार ही निराधार विधवा स्त्री असून तिचे पदरात मुलगी-रुपाली वय-19 व मुलगा-जालंदर-वय-17 असून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्यावर आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्याने ती आर्थिक अरिष्टात सापडली.त्यावेळी तिला सदर पॉलीसीच्या रक्कमेचा आधार होता. मात्र सामनेवालांनी केलेल्या सेवात्रुटीमुळे तिला विमा रक्कम मिळू शकलेली नाही. तसेच तक्रारदार ही मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.22/06/2006 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे. (3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |