निकालपत्र
निकाल दिनांक – १९/०६/२०२०
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार यांचा सुपा ता.पारनेर जि. अहमदनगर येथे आनंद कॉम्प्लेक्स या ठिकाणी मे.आर.के. कलेक्शन अॅण्ड मोबाईल शॉपी या नावाने कापड विक्रीचा तसेच मोबाईल विक्रीचा व्यावसाय आहे. तक्रारदाराने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराचे दुकानात लाखो रूपयांचे कपडे मोबाईल ठेवलेले असतात. मोबाईल दुकानाचा व त्यात असलेला माल त्याचे दुकानाचा शॉप किपर्स इन्शुरन्स पॉलिसी सामनेवालेकडे उतरविली होती. सदर पॉलिसीचा प्रिमीयम रक्कम रूपये ८,७००/-सामनेवालेकडे भरण्यात आला व त्याचे दुकानाची रक्कम रूपये १६,००,०००/- चा विमा उतरविला. सदर विमा पॉलिसीचा क्रमांक १६२५००२६१६पी१०३१७८४९८ व कालावधी दिनांक ०६-०६-२०१६ ते ०५-०६-२०१७ पर्यंत होता. दिनांक ०८-०९-२०१६ रोजी तक्रारदार हे घरी असतांना सकाळी ६.४५ वाजता तक्रारदार यांचे सेल्समन पुष्पा गवळी यांना कांचन येणारे यांनी यांच्या फोनवरून सांगण्यात आले की, तुमच्या दुकानातुन धुर निघत आहे. त्वरीत तक्रारदार आले व त्यांच्या दुकानाला आग लागलेली होती. सदरची आग शेजारी दुकानाचे शटर उचकटुन विझवत होते. सदर ठिकाणी जमलेल्या लोकांनी अहमदनगर महानगरपालीका अहमदनगर यांच्याकडील अग्नीशमन यांना कल्पना दिल्याने सदर ठिकाणी महानगरपालीका अहमदनगर यांचा अग्नीशामक दल येऊन अथक प्रयत्नानंतर सदरची आग आटोक्यात आली. अहमदनगर महानगरपालीका यांचे अग्नीशमनची फि रक्कम रूपये १०,३६०/- तक्रारदार यांनी भरली व तक्रारदार यांच्या दुकानातील रेडीमेड कपडे, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल व अॅक्सेसरीज, कॉम्प्युटर तसेच दुकानातील सर्व फर्निचर अशाप्रकारे दुकानातील एकुण रक्कम रूपये १४,९३,०००/- चा माल जळुन खाक झाला. त्यामुळे तक्रारदारला आर्थिक नुकसान झाले. सदर आग जळीत घटनेसंदर्भात तक्रारदाराने पोलीसांकडे फिर्याद दिली. पोलीसांनी सर्व प्रकारची पाहणी करून पंचनामा केला. तसेच गुन्हा रजिस्ट नंबर ३/२०१६ चा दाखल केला. सदरची आग ही अचानक शॉर्टसर्कीट होऊन लागली तक्रारदाराचे भरपुर नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदर घटनेबद्दल सामनेवाले विमा कंपनीकडुन भरपाईची कल्पना दिलेली होती. सदर तक्रारदार यांनी सर्व कागदपत्र सामनेवाले विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची रक्कम रूपये १४,९३,०००/- मिळणेसाठी विमा क्लेम सादर केलेला होता. सामनेवाले कंपनीने श्री.नरेंद्र लोहाडे यांना इन्व्हेस्टीगेटर म्हणुन नेमुन अहवाल देण्याबाबत कळविले होते. त्यांना देखील कागदपत्र दिले असुन त्यांनी सामनेवाले यांच्याकडे अहवाल दिलेला आहे. सामनेवाले कंपनीला विमा दाव्याकरीता दाव्याकरीता अनेकदा तक्रारदाराने संपर्क साधुनही त्यांचा विमा क्लेम प्रलंबीत ठेवला होता व कोणतीही दाव्यावर निर्णय घेण्यात आलेला नव्हता. शेवटी तक्रारदाराने सामनेवाले यांना वकिलामार्फत दिनांक २५-०१-२०१८ रोजी नोटीस पाठवुन विमा क्लेमच्या रकमेची मागणी केली. सामनेवाले यांना नोटीस मिळूनही त्यावर कोणतेही उत्तर दिले नाही. म्हणुन सामनेवालेविरूध्द सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
३. तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, सामनेवाले कंपनी कडुन तक्रारदाराची विमा क्लेमची रक्कम रूपये १४,९३,०००/- मिळणेचा आदेश व्हावा. तसेच तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व्याजासह मिळणेचा आदेश सामनेवालेविरूध्द व्हावा.
४. तक्रारदार यांची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्यात आली. सदर नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले प्रकरणात हजर झाले व निशाणी १२ वर त्यांचे लेखी उत्तर दाखल केले. सामनेवालेने त्याचे लेखी उत्तरात असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी तक्रारीत सामनेवाले यांच्या कंपनीविरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. सामनेवालेने मान्य केलेले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवालेकडुन दुकानाकरीता विमा पॉलिसी उतरविली होती व त्या विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक ०६-०६-२०१६ ते ०५-०६-२०१७ पर्यंत होता. सदर पॉलिसीची एकुण जोखीम रक्कम रूपये १६,००,०००/- होती. सामनेवालेने पुढे असे कथन कलेले आहे की, तक्रारदाराने त्याचे दुकानात आग जळीतबाबत माहिती दिनांक ०८-०९-२०१६ ला सामनेवाले कंपनी यांना दिली. त्या अनुषंगाने सामनेवाले कंपनीने श्री.नरेंद्र लोहाडे यांची निरीक्षक म्हणुन नियुक्ती केली. त्यानुसार श्री.नरेंद्र लोहाडे यांनी घटनास्थळाची तपासणी करून दिनांक ०९-०९-२०१६ पत्राद्वारे तक्रारदाराला कागदपत्रांची मागणी केली. नंतर दिनांक १५-०१-२०१६ रोजी तक्रारदार यांनी पोलीसांच कागदपत्रासोबत सामनेवालेकडे विमा क्लेम सादर केला. सामनेवाले कंपनीने टेक्नोट्रॅक डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस कंपनीला आग जळीत बाबत व विमा क्लेमबाबत तपासणी करीता नियुक्त केले आहे. त्या निरीक्षकाने पडताळणी करता असे सुचवीले की, तक्रारदाराने इनशुरन्स कंपनीकडे विमा दाव्यासेबत खोटे बिल सादर केलेले होते. तसेच निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमीटेड (MSEDCL) येथुन माहिती घेतली. त्यामध्ये असे दिसुन आले की, ज्या दुकानात आग जळीत घटना झाली होती त्या दिवशी त्या ठिकाणी कोणताही इलेक्ट्रीसीटी सप्लाय झाला नव्हता. त्यामुळे आग जळीताचे कारण इलेक्ट्रीसीटी शॉर्ट सर्कीट होऊ शकत नाही आणि तसेच आग जळीताचे कारण पोलीस रेकॉर्डमध्ये दर्शविण्यात आले होते ते व इलेक्ट्रीसीटी डिपार्टमेंटमधुन घेण्यात आलेली माहिती यामध्ये विसंगती आहे. त्याप्रमाणे त्या इन्व्हेस्टीगेटरने दिनांक २०-०४-२०१७ रोजी इन्शुरन्स कंपनीला रिपोर्ट पाठविला. सदर रिपोर्टच्याआधारे तक्रारदार यांनी योग्य क्लेम सादर केलेला नाही. तसेच बॅंकेमध्ये असलेले व्यवहार पाहता प्रत्येक दिवशी रक्कम रूपये ३५०/- पेक्षा जास्त नाही. तक्रारदाराने ज्या खरेदी केलेल्या बिलाची माहिती दिलेली आहे ती त्या बॅंकेच्या व्यवहारामध्येही विसंगती आहे. सदरील अहवालाप्रमाणे तक्रारदार यांचे जास्तीत जास्त रक्कम रूपये १,३८,५००/- चे नुकसान झालेले आहे व सदरील मा. मंचाचा हा निर्णय होतो की, या तक्रारदाराचे नुकसान झाले तर सामनेवालेचे निरीक्षकाने दिलेल्या अहवालाप्रमाणे रक्कम रूपये १,३८,५००/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. सदरील तक्रारीमध्ये पुराव्याची आवश्यकता आहे तसेच तक्रारदार त्याची तक्रार दिवाणी न्यायालयातही दाखल करू शकतो. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना त्रास देणेसाठी सदर तक्रार दाखल केली असुन सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
५. तक्रारदाराची दाखल तक्रार, दस्तऐवज सामनेवालेनी दाखल केलेला जबाब, शपथपत्र, पुरावा व उभयपक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकला असता मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवालेने तक्रारदारास न्युनतम सेवा दर्शवीली आहे काय ? | होय |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
६. तक्रारदार यांनी त्यांच्या आर.के. कलेक्शन अॅण्ड मोबाईल शॉपी या दुकानाकरीता सामनेवाले कंपनीकडुन विमा पॉलिसी क्रमांक १६२५००२६१६पी१०३१७८४९८ अन्वये सामनेवालेकडे प्रिमीयम रक्कम रूपये ८,७००/- देऊन रक्कम रूपये १६,००,०००/- चा विमा उतरविला. सदर विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक ०६-०६-२०१६ ते ०५-०६-२०१७ पर्यंत होता. ही बाब उभयपक्षांना मान्य असुन तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.२ –
७. तक्रारदार यांनी सामनेवाले कंपनीकडे त्याचे दुकानात झालेल्या आग जळीत बाबत तसेच त्या अनुषंगाने झालेल्या नुकसानीबाबत दावा सामनेवाले कंपनीकडे दाखल केला होता व सामनेवाले कंपनी यांनी त्या संदर्भात श्री.नरेंद्र लोहाडे यांची निरीक्षक म्हणुन नियुक्ती केली होती व त्यांनी दिनांक ०९-०९-२०१६ रोजी तक्रारदाराकडुन कागदपत्राची मागणी केली होती. ही बाब तक्रारदाराने दाखल तक्रार व दस्तऐवज यावरून सिध्द होते. तसेच सदर बाबीवर सामनेवालेने कोण्ताही आक्षेप घेतलेला नाही. तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाले कंपनीने टेक्नोट्रॅक डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस कंपनी यांना तक्रारदाराचे दुकानात झालेल्या आग जळीत व झालेल्या नुकसानीची पडताळणी करण्याकरीता नियुक्त केले होते. ही बाबही तक्रारदाराला माहित होती. तसेच तक्रारदाराने निशाणी ६/६ वर दाखल केलेले दस्तऐवज दिनांक ०७-०३-२०१७ चे पत्रावरून दिसुन येते. सामनेवाले कंपनीने तक्रारदाराच्या विमा दाव्याच्या संदर्भात आलेला अहवाल प्रकरणात दाखल केलेला आहे. सदर अहवाल टेक्नोट्रॅक डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस यांनी दिनांक २०-०४-२०१७ रोजी सामनेवाले कंपनीला दिलेला होता. त्या अनुषंगाने तक्रारदाराचे दुकानामधील झालेल्या आग जळीत घटना शॉर्ट सर्कीटमुळे झालेली नव्हती तसेच तक्रारदाराचे नुकसान रक्कम रूपये १,३८,५००/- होते. असे नमुद करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात सामनेवाले यांनी श्री. नंदकिशोर बद्रीनारायण मुंदडा यांचे शपथपत्रही सादर केलेले आहे. सदर शपथपत्रात तक्रारदारने श्री. नंदकिशोर बद्रीनारायण मुंदडा यांनी टेक्नोट्रॅक डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस द्वारे देण्यात आलेला अहवाल सुध्दा आहे. तक्रारदाराने श्री. नंदकिशोर बद्रीनारायण मुंदडा यांना दिलेल्या शपथपत्र पुराव्यावर कोणताही उलट तपास घेतलेला नाही. सामनेवाले कंपनी यांना दिनांक २५-११-२०१७ पर्यंत तपासणीचा अहवाल प्राप्त झाला होता, तरीसुध्दा तक्रारदाराचे विमा दाव्यावर कोणताही निर्णय न करणे ही सामनेवालेची तक्रारदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविते. तक्रारदाराने त्याकरीता सामनेवाले कंपनीला वकिलामार्फत दिनांक २५-०१-२०१८ रोजी नोटीसही पाठविली आहे. सदर नोटीस प्राप्त होऊनसुध्दा सामनेवालेने तक्रारदाराचे विमा दाव्यावर कोणताही निर्णय नाही घेतला व त्या संदर्भात कोणताही पत्र व्यवहार केला नाही, ही बाब सुध्दा सामनेवालेची तक्रारदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविते. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३ -
८. मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरून तसेच सामनेवालेने निरीक्षकाचे अहवालाचा विचारसुध्दा केला नाही, सदर बाब ग्राह्य धरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदाराला झालेली नुकसान भरपाईची रक्कम रूपये १,३८,५००/- (एक लाख अडोतीस हजार पाचशे मात्र) दिनांक २५-११-२०१७ रोजीपासुन द.सा.द.शे. १२ टक्के व्याजासह रक्कम द्यावी. . |
३. सामनेवालेने तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये १०,०००/- (अक्षरी दहा हजार मात्र) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |