जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 2/2016 तक्रार नोंदणी दि. :-27/1/2016
तक्रार निकाली दि. :-21/06/2016
निकाल कालावधी :-5 म. 26 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- सुनिल रामचंद्र जिभकाटे,
वय – 29 वर्षे, व्यवसाय – व्यापार,
राहणार – शेगांव टोली, आरमोरी,
तहसिल आरमोरी, जिल्हा – गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- युनायटेड इंडीया इंश्युरंस कंपनी लिमिटेड,
तर्फे शाखा अधिकारी,
राधेय बिल्डींग, चामोर्शी रोड, गडचिरोली,
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री विजय पटाईत व अन्य
गैरअर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री के.डी.देशपांडे व अन्य
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री सादिक मो.झवेरी, सदस्य )
(पारीत दिनांक : 21 जून 2016)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने स्वतःचे उपयोगाकरीता इंडिका विस्टा ही गाडी विकत घेतली असून त्याचा रजिस्ट्रेशन क्र. एम.एच.33 ए 4064 असून रंग पांढरा आहे. सदर गाडी अर्जदार स्वतःकरीता व कुटुंबाचे उपयोगाकरीता वापरत असून सदर गाडीचा विमा गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 27.10.2014 ते 26.10.2015 या कालावधीकरीता काढलेला होता. अर्जदार यांनी सदर गाडी चालविण्याकरीता श्री.शैलेश तुळशिराम रामटेके यांना पगारी चालक म्हणून ठेवले असून त्याचा वाहन परवाना क्र. एम.एच.33 20100001691 दि.22.4.2010 असून तो दि.21.04.2030 पर्यंत वैध आहे. अर्जदार व त्याचे कुटुंब दि.15.04.2015 रोजी आरमोरीवरुन नागपूर येथे लग्नासाठी जात असतांना रात्री 10 ते 10-30 चे सुमारास कारचे समोरील उजव्या बाजूचा टायर दगडाचे माराने फुटुन अपघात झाला व गाडी अरसोडा फाटयाजवळ रस्त्याचे खाली उतरुन पलटी झाली. यामध्ये गाडीचे अंदाजे रुपये 2 लाख 70 हजार चे नुकसान झाले. या अपघातात अर्जदाराचे डोक्याला गंभीर स्वरुपाचा मार लागल्याने अर्जदाराचे स्मृती गेली व त्याकरीता उपचार घेत असल्याने अर्जदार वेळीचे पोलीस तक्रार करु शकला नाही. त्यानंतर अर्जदाराने गाडीचे चालकासोबत दिनांक 4.5.2015 रोजी आरमोरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलीसांनी डायरी नोंदणी क्र. 26/2015 दि.4.5.2015 नुसार नोंद घेवून घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराने गाडीचा अपघात झाल्याची माहिती विमा कंपनीचे मॅनेजर श्री.देशपांडे व चंद्रपूर येथील ए.के.गांधी कार शोरुम यांना मोबाईलवरुन दुस-या दिवशी दिली. त्यानंतर वर्कशॉप मॅनेजरने क्षतिग्रस्त कार दिनांक 16.5.2015 ला टोर्इंगव्दारे चंद्रपूर येथे नेली, त्याकरीता अर्जदाराचे ड्रायव्हरने रुपये 7500/- टोर्इंग चार्जेस म्हणून दिले. सदर क्षतिग्रस्त कार ए.के.गांधी कार वर्कशॉप येथे दुरुस्त करण्यात आली. त्याचा खर्च रुपये 1,53,186/- अर्जदाराकडून घेतले. त्याचा टॅक्स इनव्हाईस दिनांक 30.6.2015 असा आहे.सदर टॅक्स इनव्हाईसमध्ये ए.के.गांधी, चंद्रपूर यांनी तारखांमध्ये घोळ व विमा कंपनीचे नांव बजाज अलायंझ असा घोळ केला. तसेच अर्जदारास चालकासह 7 वेळेस चंद्रपूर येथे जावे लागले, त्यापोटी 14000/- खर्च आला. गैरअर्जदार यांनी पी.ए.टु. ओनर याकरकीता प्रिमियम घेतले आहे. अर्जदारास अपघातामुळे गंभीर दुखापत झाल्याने, वेगवेगळया डॉक्टरांकडे उपचारापोटी रुपये 24,690/- खर्च आला तसेच चंद्रपूर व नागपूर येथे औषधोपचार व तपासणीकरीता 9 ते 10 वेळा जाण्याकरीता भाडयापोटी रुपये 31500/- व इतर खर्चापोटी रुपये 3500/- इतका खर्च आला. अर्जदाराने गाडीचे नुकसानभरपाईपोटी व स्वतःचे औषधोपचाराकरीता लागणा-या खर्चाची मागणी विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार संपुर्ण कागदपत्रासह क्लेम फॉर्म भरुन गैरअर्जदाराकडे केली. त्यानंतर गैरअर्जदाराचे इन्वेस्टीगेटर यांनी करुन काही दिवसानंतर अर्जदारास नागपूर येथील कार्यालयात बोलाविले असता अर्जदार मुळ कागदपत्रासह नागपूर येथील कार्यालयात गेला असता मुळ कागदपत्रे दिसत नाही त्यामुळे क्लेम फॉर्मवर अर्जदाराची सही घेवून सर्व झेरॉक्स कागदपत्रे ठेवून घेतली. त्यानंतर काही दिवसांनी गैरअर्जदार यांनी दि. 5.11.2015 चे पत्रान्वये अर्जदाराचा दावा फेटाळून लावल्याचे कळविले. गैरअर्जदाराने वाहनाचे नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळले असल्याने गैरअर्जदाराची कृती ही अनुचीत व्यापार प्रथेत मोडते. त्यामुळे अर्जदारास मानसिक, शारीरीक ञास झाला. गैअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास मोटार गाडीचे दुरुस्तीपोटी रुपये 1,53,186/-, टोईंग चार्जेसपोटी रुपये 7500/-, अर्जदारास औषधोपचाराकरीता आलेला खर्च रुपये 24,690/-, वाहन भाडयापोटी रुपये 31,500/-, इतर खर्चापोटी रुपये 3,500/- व गाडी दुरुस्तीसाठी आरमोरी ते चंद्रपूर जाण्या-येण्यापोटी रुपये 14,000/- तसेच शारीरिक, मानसिक ञास, सेवेतील ञुटी व आर्थीक नुकसानापोटी रुपये 1,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह मिळावे अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 7 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.13 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराचे खाजगी मोटर वाहन क्र.एम.एच.-33 ए 4064 चा विमा दि.27.10.2014 ते 26.10.2015 या कालावधीसाठी काढलेला होता, हे मान्य आहे. अर्जदाराने श्री.शैलेश तुळशिराम रामटेके यांना ड्रायव्हर म्हणून नेमले होते, हे माहितीअभावी अमान्य केले आहे. तथापि, अर्जदाराने विमा दावा गैरअर्जदाराकडे क्लेम फॉर्म व इतर कागदपत्रासह सादर केला, हे मान्य केले आहे. गैरअर्जदार कंपनीने नेमलेल्या इन्वेस्टीगेटरने एफ.आय.आर.ची प्रत आरमोरी पोलीस स्टेशन येथून प्राप्त केलेली आहे. इन्वेस्टीगेटरने तीन ते चार वेळा आरमोरी येथे भेट दिली व गाडीच्या अपघाताबाबत माहिती गोळा केली, तसेच अर्जदाराचे घरातील सदस्य/पोलीस यांच्याशी चर्चा देखील केली व घटनास्थळाचा पंचनामा केला. त्याचा अहवाल गैरअर्जदार कंपनीकडे सादर केलेला आहे. अर्जदाराने मे.ए.के.गांधी, चंद्रपूर यांचे ईस्टीमेट गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा दाव्यासह सादर केले आहे, त्यामध्ये दिनांक 14.5.2015 चे जॉब कार्ड नमुद आहे. याचा अर्थ नादुरुस्त गाडी दिनांक 14.5.2015 ला दुरुस्तीकरीता नेण्यात आलेली आहे. तथापि, टोईंग चार्जेस/ट्रांसपोर्टींग चार्जेस चे देयक दि.21.5.2015 चे आहे, ते नादुरुस्त गाडी दि.16.5.2015 ला आरमोरीवरुन उचलून चंद्रपूर येथील वर्कशॉपला आणल्याचे दिसून येते व त्यापोटी रुपये 7500/- आकारल्याचे दिसून येते. तसेच अर्जदाराने मे.ए.के.गांधी, चंद्रपूर यांनी दिनांक 14.5.2015 चे अयोग्य देयक दिलेले असल्याने त्यांना तक्रारीमध्ये आवश्यक पार्टी म्हणून समाविष्ट केलेले नाही. मे.ए.के.गांधी, चंद्रपूर यांनी वादातीत गाडी क्रमांक एम.एच.33-ए-4064 चे विमा कंपनी म्हणून बजाज अलायंझ चे नांव नमुद केले आहे. अर्जदार हा गैरअर्जदाराचे नागपूर येथील विभागीय कार्यालयात, विमा दाव्याचे पुर्ततेकरीता गेला हे माहीतीअभावी अमान्य केले आहे. कोणताही विमा दावा हा वेगवेगळया विभागाकडून/अधिका-याकडून मार्फत जाते व इन्वेस्टीगेटरचा अहवाल, कागदपत्रे यांची छाननी केल्यानंतर अंतिम निर्णय दावेदारास लेखी स्वरुपात कळविल्या जाते. मे.ए.के.गांधी, चंद्रपूर व अर्जदार यांच्याकडून तारखेबाबत झालंल्या चुकीकरीता गैरअर्जदार विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नाही. अर्जदाराने खोटी व तथ्यहीन तसेच दिशाभूल करणारी तक्रार कोर्टासमोर दाखल केली आहे. सबब तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी प्रार्थना केली.
4. अर्जदाराने तक्रारी कथना पृष्ठयर्थ नि.क्र.15 नुसार पुरावा शपथपञ, नि.क्र.16 नुसार 1 दस्ताऐवज, नि.क्र.18 नुसार तक्रार अर्जातील मजकूर व रिजॉइंडरमधील मजकूर हा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा, अशी पुरसिस दाखल केली आहे. गैरअर्जदाराने नि.क्र.14 सोबत 4 दस्तऐवज दाखल केले. तसेच, गैरअर्जदाराने नि.क्र.19 नुसार पुरसिस दाखल करुन लेखी उत्तरातील मजकूर हा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा, असे नमुद केले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार यांनी केलेल्या तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार : नाही
केला आहे काय ?
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून त्यांचे वाहनाकरीता विमा पॉलीसी काढली होती, त्याची मुदत दि.27.10.2014 ते 26.10.2015 या कालावधीकरीता होती.याबाबत कोणताही वाद नसल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराने नि.क्र.2 वर दाखल केलेल्या दस्त क्र. 4 ची पडताळणी केली असता असे दिसून येते की, सदर दस्तऐवज घटनास्थळ पंचनामा आहे व त्याप्रमाणे अर्जदाराचे वाहन दि.15.4.2015 रोजी रात्री टायर फुटल्याने अपघात होऊन नुकसान झाले. दस्त क्र.5 ची पडताळणी केली असता, असे दिसून येते की, सदर वाहन शो-रुममध्ये टोईंग करुन दि.16.5.2015 ला दुरुस्तीकरीता नेण्यात आले. दस्त क्र.6 ची पडताळणी केली असता शो-रुमच्या देयकामध्ये जॉब कार्डची तारीख/दिनांक 14.5.2015 अशी दर्शविण्यात आलेली आहे. व वादातीत वाहनाची विमा कंपनी बजाज अलायंझ दर्शविण्यात आली आहे. यावरुन असा संशय वाटतो की, जेव्हा वादातीत वाहन शो-रुममध्ये दि. 14.5.2015 ला देण्यात आले, त्या वाहनाला दि.16.5.2015 ला परत टोईंग करुन कशाला शो-रुममध्ये आणण्यात आले होते. सदर वाहनाचे दुरुस्ती देयकांत विमा कंपनीचे नांव बजाज अलायंझ दर्शविण्यात आले, यावरुन हे ही संशय वाटते की, सदर वाहन दुरुस्तीबाबत दाखल केलेले देयक खरे आहे की खोटे आहे. याबाबत अर्जदाराने साक्षीपुरावा म्हणून कोणतेही स्पष्टीकरण तक्रारीत नमुद केलेले नाही. अर्जदाराने शो-रुममधून दिलेल्या देयकामध्ये तारीख/विमा कंपनीचे नांव चुकलेले आहे किंवा खरे आहे याबाबतही साक्षीपुराव्याव्दारे तक्रारीत स्पष्टीकरण दिलेले नाही. वरील दस्तऐवजामध्ये दर्शविलेल्या तारखा व विमा कंपनीच्या चुकलेल्या नावावर विमा कंपनी (गैरअर्जदार) यांनी लक्ष देवून अर्जदाराने दाखल केलेल्या स्वयंघोषणापत्रावर दिलेली माहिती चुकीची ठरवून अर्जदाराचा विमा दावा नाकारुन गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती कोणतीही सेवेत त्रृटी दिलेली नाही, असे सिध्द होते व असे मंचाचे मत ठरलेले आहे. म्हणून मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
7. मुद्दा क्र.1 ते 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-21/6/2016