निकालपत्र :- (दि.20.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला क्र.1 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तक्रारदार व सामनेवाला क्र.2 तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांची गणेश आईस फॅक्टरी असून त्याकरिता सामनेवाला क्र.2 यांचेकडून रक्कम रुपये 15 लाख कर्ज घेतले आहे. सदर बँकेने सामनेवाला क्र.1 यांचेकडे रुपये 19,70,000/- ची विमा पॉलीसी घेतली आहे. त्याचा पॉलीसी नं.160305/11/04/00931 असा असून त्याचा कालावधी दि.07.02.2005 ते दि.06.02.2006 असा आहे. दि.27.07.2005 ते दि.09.02.2005 या कालावधीमध्ये महापूर आल्याने तक्रारदारांची फॅक्टरी 15 दिवस पाण्यातच राहिली व त्यामध्ये एकूण नुकसानी रुपये 7,28,300/- इतकी झाली. सदर नुकसानी दुरुस्ती करुन घेतली असता त्यास रुपये 7,14,210/- इतका खर्च आलेला आहे. याबाबतची मागणी क्लेम फॉर्म भरुन केली असता सामनेवाला कंपनीने रक्कम रुपये 50,890/- इतकी रक्कम देणेचे मान्य केले. सदरची रक्कम तक्रारदारांची गरज असल्याने हक्क राखून स्विकारीत आहे असे म्हटले असता सामनेवाला विमा कंपनीने तोंडी नाकारले. सबब, क्लेम रक्कम रुपये 7,14,210/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत व्हॅल्युएशन रिपोर्ट व बिल्स्, व्हॅल्युअर यांचे सर्टिफिकेट, क्लेम फॉर्म, पॉलीसी,सामनेवाला क्र.2 यांचा मेमो ऑफ सँक्शन तसेच नुकसानीचा पंचनामा दि.14.08.05 व दि.18.08.05 इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. त्यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारीत उल्लेख केलेली नुकसानी नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांचा क्लेम मागणी अर्ज आलेनंतर सामनेवाला विमा कंपनीने सर्व्हेअर यांची स्वतंत्रपणे नेमणुक केली आहे व सदर सर्व्हेअर यांनी सविस्तर अहवाल देवून रुपये 51,000/- इतकी रक्कम निश्चित केली आहे. तसेच, सदरची रक्कम तक्रारदारांनी अंतिम परिपूर्ती म्हणून स्विकारली आहे. त्यामुळे सामनेवाला यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ दिघे सर्व्हेअर यांचा रिपोर्ट व पॉलीसीची प्रत दाखल केली आहे. (6) सामनेवाला क्र.2 बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. (7) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. त्यामधील सर्व्हेअर यांनी दिलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता सर्व्हेअर यांनी रुपये 51,000/- इतकी नुकसानी निश्तित केली आहे. सदरची रक्कम ही तक्रारदारांनी डिस्चार्ज व्हौचर वरती सही करुन अंतिम परिपुर्ती म्हणून रक्कम स्विकारलेली आहे. डिस्चार्ज व्हौचर वरती सही करुन अंतिम परिपुर्ती म्हणून रक्कम स्विकारली असल्याने तक्रारदारांना त्यानंतर कोणतीही मागणी करता येत नाही. याचा विचार करता प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |