नि का ल प त्र:- (व्दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि.11-04-2016)
1) वि. प. युनियन बँक ऑफ इंडिया यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारदार सेवानिवृत्त सैनिक शहाजी हरिबा घाटगे यांचे वि.प. नं. 1 युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा- लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे बचत खाते क्र. 321402030008925 असून सदर खात्यावर पेन्शन जमा होते. तक्रारदार यांना नियमित पेन्शनबरोबर डिसअॅबिलिटी इलेमेंट ऑफ पेन्शन मिळणेस पात्र आहेत.
3) तक्रारदार यांचे मते वि.प. यांनी शासनाकडून मिळणारी खात्यात जमा होणारी रक्कम त्वरीत अदा करणे हे बँकेचे कर्तव्य असताना वि.प. यांनी ते न करुन सेवेत त्रुटी केली आहे.
4) तक्रारदार यांची मुख्य विनंती आहे की, दि मराठा एल. आय. रेकॉर्ड सी/ओ 56 अे.पी.ओ. दि. 31-10-2013 व त्यासोबतच्या पी.पी.ओ. नुसार थकबाकी रक्कम अदा करणेचा वि.प. यांना आदेश दयावा. सदर पत्राची प्रत तक्रारदार यांनी अ. क्र. 5 वर दाखल केली आहे. सदर पत्रात, वि.प. नं. 2 यांना डिसअॅबीलिटी पेन्शनची रक्कम तक्रारदार यांच्या बचत खाते क्र. 321402030008925 जमा करण्यास विनंती केली आहे.
5) तक्रारदार यांनी आपल्या अर्जात परि. 10–(अ) नुसार वि.प. नी रक्कम रु. 1,19,771/- द्यावेत असा आदेश देणेची मागणी केली. पुढे लेखी युक्तीवाद सादर करतांना तक्रारदार यांनी परि. 2 मध्ये म्हटले की, दि. 26-09-2014 रोजी वि.प. यांनी रक्कम रु. 76,924/- नमूद बचत खात्यात जमा केली आहे.
6) तक्रारदार यांचे म्हणणेनुसार नियमाप्रमाणे दि.31-12-2013 रोजीपर्यंत पेन्शनची रक्कम रु. 2,66,278/- मिळणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी मान्य केले की, वि.प. यांनी दि. 27-12-2013 रोजी रक्कम रु. 1,46,507/- खात्यावर जमा केले व उर्वरीत रक्कम रु. 1,19,771/- वि.प. यांनी देणे बंधनकारक आहे.
7) तक्रारदार यांचे मते वि.प. हे रु.1,19,771/- मधून दि. 26-09-2014 रोजी जमा केलेली रक्कम वजा जाता अद्यापी रक्कम रु. 42,847/- तक्रारदार यांना देणे नियमाने आवश्यक आहे. सदर रक्कमेवर व्याज व नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्चाची मागणी केली.
8) तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे सुक्ष्म अवलोकन करता असे दिसून येते की, वि.प. बँकेस दि. 31-10-2013 रोजी मराठा एल.आय. रेकार्ड सी चे पत्र मिळाल्यावर, वि.प. यांनी तक्रारदार यांच्या बचत खात्यावर दि. 27-12-2013 रोजी रक्कम रु. 1,46,507/- जमा केले, व प्रस्तुत तक्रार अर्ज प्रलंबित असताना दि. 26-09-2014 रोजी रक्कम रु. 76924/- जमा केले. तक्रारदार यांचे मते वि.प. हे अद्यापी रु. 42,847/- देणेस जबाबदार आहेत.
9) तक्रारदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रे पाहिले असता, त्यांनी दि. 18-03-2013 , 9-05-2013 व 1-10-2013 राजी वि.प. यांना पेन्शनची रक्कम मिळणेसाठी पत्र पाठवून विनंती केली व त्वरीत उपाययोजना करण्याची विनंती केली.
10) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी म्हटले की, वि.प. बँकेने सदर विनंतीचा विचार न करता, योग्य वेळेत त्यावर कार्यवाही केली नाही. तक्रारदार यांचे मते मार्च 2013 पासून सतत पाठपुरावा करुन व मेजर सिनियर रेकॉर्ड ऑफिस यांचे दि. 16-05-2013 रोजीच्या पत्राचा देखील विचार वि.प. यांनी केला नाही.
11) तक्रारदार यांनी वि.प. नं. 1 यांनी दि. 11-11-2013 रोजी पाठविलेले अ.क्र. 6 वर दाखल केले आहे. सदर पत्रातील मजकूर पाहता असे दिसून येते. तक्रारदार यांनी वि.प. कडे मागणी केली होती तसेच तक्रारदार यांची डिसॅऑबिलीटी पेन्शन चालु असल्याचे, वि.प. ना सिनियर रेकॉर्ड ऑफिसरनी दि. 16-05-2013 रोजी कळवून देखील, त्याबद्दल
दि. 11-11-2013 रोजीपर्यंत कार्यवाही न करणे ही वि.प. यांचे सेवेतील त्रुटी आहे. आपल्या खातेदारांच्या हिताचे रक्षण करणे वि.प. चे कर्तव्य होते.
12) तक्रारदार हे माजी सैनिक आहेत व त्यांना डिसॅऑबिलीटी पेन्शनची रक्कम मिळणेसाठी सतत पाठपुरावा वि.प. नं.1 कडे करतात याकडे दुर्लक्ष सतत सहा महिने करणे हे अन्यायकारक आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेला पत्रव्यवहार पाहता व सर्व परिस्थितीचा विचार करता तक्रारदार यांना मानसिक त्रासांना सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट होते.
13) वि.प. ही भारतातील नामांकित राष्ट्रीयीकृत बँक असून येथे लक्षावधी पेन्शनची कामे असतात हे सत्य आहे. वि.प. यांनी दि. 31-10-2013 रोजीचे पत्र मिळाल्यावर त्वरीत कार्यवाही करुन, प्रकरणाचा अभ्यास करुन दि. 27-12-2013 रोजी व दि. 26-09-2014 रोजी पेन्शनची रक्कम जमा केली याबद्दल बँकेने देण्यात येणा-या सेवेत त्रुटी झाली असे म्हणता येणार नाही.
14) वि.प. यांनी नियमाप्रमाणे पेन्शनची रक्कम तक्रारदार यांना अदा केली असे म्हटले आहे. तक्रारदार यांनी रक्कम नियमाप्रमाणे मिळाली नसल्याचे म्हटले आहे. सदर अकॉऊंटसंबंधीचा मुद्दा ग्राहक मंचाचे अखत्यारीत येत नाही.
15) मंचाचे मते, तक्रारदार हे डिसॅअॅबीलिटी पेन्शनर असून त्यांना दिली गेलेली पेन्शनची रक्कम, मिळणेसाठी विलंब झाला हे दिसून येते. सदर विलंब हा त्रास देणेचे हेतुने झाला असे दिसून येत नाही.
16) तक्रारदारांनी सतत पाठपुरावा करुन व अनेकवेळा पत्रव्यवहार करुन व मेजर सिनियर रेकॉर्ड ऑफिसचे दि. 16-05-2013 रोजीचे पत्यावर योग्य मुदतीत कार्यवाही वि.प. नं. 1 च्या संबंधीत कर्मचा-यांनी न केल्याने, तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल त्यांना रक्कम रु. 10,000/- नुकसान भरपाई मिळणे न्यायाचे आहे. सदर रक्कम सामान्य जनतेच्या करामधून दिली असल्याने, ती रक्कम ज्या संबंधित कर्मचा-याच्या निष्काळजीपणामुळे सेवेत त्रुटी झाली त्यांचेकडून वसुल करणे आवश्यक आहे या निर्णयाप्रत हे मंच येत आहे.
17) मंच न्यायाचे दृष्टीने पुढील आदेश पारीत करीत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) वि.प. नं. 1 यांनी तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त ) दोन महिन्यात द्यावेत, न दिल्यास सदर रक्कमेवर रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 6 % व्याज द्यावे.
2) खर्चासंबंधी कोणतेही आदेश नाहीत.
3) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.