::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये श्री .उमेश व्ही. जावळीकर मा. अध्यक्ष )
(पारीत दिनांक :- ०८.०५.२०१८)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. तक्रारकर्त्याने हायवा ट्रक क्रं. सी जी -१० सी – ४२९७ श्री विनयकुमार हरीनंदनसिंग यांच्याकडून दि.२६.१२.२०१५ रोजी विकत घेतला त्याअनुषंगाने आर.टी. ओ.कार्यालय चंद्रपूर येथे तक्रारकर्त्याचे नावाने तशी दि.०८.०१.२०१६ रोजी नोंद घेण्यात आली व तसे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष विमा कंपनीला कळविले होते व सदर इन्शुरन्स पॉलीसी तक्रारकर्त्याचे नावाने हस्तांतरित /ट्रान्सफर करण्याकरिता सूचित केले होते व तसा प्रपोजल फॉर्म भरून चंद्रपूर येथील कार्यालयाला कळविले होते. तक्रारकर्त्याच्या आधीचे ट्रकचे मालक श्री विनयकुमार हरीनंदनसींग यांनी सदर ट्रक वी.प.कडून पॉलिसी क्र. २७०२०१३११पि १०८९२०४१३ दि.२३.०१.२०१५ ते २२.०१.२०१६ या कालावधीकरिता विमाकृत केला होता. तक्रारदाराचे सदर वाहनाचा दिनांक २०.०१.२०१६ रोजी गडचांदूरकडे येणाऱ्या गडचांदूर विष्णू मंदिरासमोर पहाडावरील दगडाला आदळून अपघात झाला. त्यामध्ये सदर वाहनाला क्षती पोहचली. तक्रारकर्त्याने सदर वाहन दुरुस्तीकरीता देण्यापूर्वी विमा कंपनीला कळविले होते. त्याप्रमाणे वि.प. यांनी त्यांचे निरीक्षक श्री. सय्यद अकबर अली व श्री सुधीर कायरकर यांना सदर वाह्नाचे परीक्षण करण्याकरिता पाठविले त्यावेळी त्यांनी सदर वाहनाचे परीक्षण केले व नंतर तक्रारकर्त्यास सदर क्षतीग्रस्त वाहन दुरुस्त करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने सदर वाहन राजेश बाडी वर्क्स चंद्रपूर यांच्याकडे दुरुस्तीकरिता दिले.क्षतिग्रस्त ट्रकचे संपूर्ण काम राजेश बाडी वर्क्स व सूचित मेकनिकल मिस्त्री ,गोपाल डिझेल्स,मारोती क्रेन्स व इतर यांनी केलेल्या कामाचा एकूण खर्च रु.२,३५,२३८.७१/-असा आला .सदर बिल क्लेम फार्मसह विरुद्ध पक्ष विमा कं.चंद्रपूर शाखेमध्ये जमा केले परंतु विरुद्ध पक्षांनी आजपर्यंत विमादाव्याची रक्कम दिली नाही व विमादाव्याबाब्त काहीही कळविले नाही. तक्रारकर्त्याने वि.प यांना सदर रक्कम देण्याची विनंती केली, परंतु रक्कम न दिल्याने तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे लेखी तसेंच तोंडी स्वरुपात मागणी केली परंतु गैरअर्जदारांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही तक्रारकर्त्याला विमा दावा रक्कम मिळालेली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने दि. १६.०८.२०१६ रोजी अधिवक्त्यांमार्फत नोटीस पाठविला सदर नोटीस मिळून सुध्दा त्याची पुर्तता गैरअर्जदारांनी केली नाही. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला विमादावा रक्कम न देवून सेवेत ञृटी केली आहे. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
२. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास दिलेली सेवा अनुचित व्यापार पद्धती व न्युनतापूर्ण सेवा ठरविण्यात यावी. तसेच वी.प यांनी तक्रारकर्त्यास त्याचे विमाकृत गाडीचे दुरूस्तीच्या खर्चाची रक्कम रु. २,३६,२३८.७१/- व त्यावर द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे व्याज द्यावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. ५०,०००/- व तक्रारीचा खर्च १०,०००/- रु. गैरअर्जदारांकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
३. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरुद्ध पक्ष यांना नोटीस प्राप्त होऊनसुद्धा ते मंचासमक्ष हजर न झाल्याने त्यांचेविरूध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
४. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, दस्तावेज, शपथपञ व तक्रारअर्ज व शपथपत्र हेच लेखी युक्तिवाद समजण्यांत यावा अशी पुरसीस दाखल, तक्रारकर्ता यांचा तोंडी युक्तीवाद आणि तक्रारअर्जातील कथनावरुन मंचाचे निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास विमा कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
५. तक्रारकर्त्याने हायवा ट्रक क्रं. सी जी -१० सी – ४२९७ श्री विनयकुमार हरीनंदनसिंग यांच्याकडून दि.२६.१२.२०१५ रोजी विकत घेतला त्यानुषंगाने आर.टी. ओ.कार्यालय चंद्रपूर येथे तक्रारकर्त्याचे नावाने तशी दि.०८.०१.२०१६ रोजी नोंद घेण्यात आली व तसे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष विमा कंपनीला कळविले होते व सदर इन्शुरन्स पॉलीसी तक्रारकर्त्याचे नावाने हस्तांतरित /ट्रान्सफर करण्याकरिता सूचित केले होते व तसा प्रपोजल फॉर्म भरून चंद्रपूर येथील कार्यालयाला कळविले होते हे तक्रारकर्त्याने दखल केलेल्या दस्तावेजावरून निदर्शनास येते . सदर वाहनाची आर.सी. तसेच विमा प्रपोजल फॉर्म हे दस्तावेज तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केले आहेत.विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याचे नावाने सदर पौलीसी तक्रारकर्त्याने सदर विमा प्रपोजल फॉर्म दिल्यानंतर करायला हवी होती परंतु वी.प.यांनी सदर पालीसी तक्रारकर्त्याने नावाने हस्तांतरित /ट्रान्सफर केली नाही .विरुद्ध पक्ष यांना नोटीस प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी प्रकरणात हजर होऊन तक्रारकर्त्याचे सदर कथन खोडून काढले नाही त्यामुळे सदर इन्शुरन्स पॉलीसी तक्रारकर्त्याचे नावाने हस्तांतरित /ट्रान्सफर करण्याकरिता तक्रारकर्त्याने वी.प.यांना सूचित केले होते व तसा प्रपोजल फॉर्म भरून चंद्रपूर येथील कार्यालयाला कळविले होते हे तक्रारकर्त्याचे कथन ग्राह्य धरण्यायोग्य आहे. दिनांक २०.०१.२०१६ रोजी गडचांदूरकडे येणाऱ्या गडचांदूर विष्णू मंदिरासमोर पहाडावरील दगडाला तक्रारकर्त्याचे उपरोक्त वाहन पहाडावरील दगडावर आदळून अपघात झाला. त्यामध्ये सदर वाहनाला नुकसान झाले हे तकारकर्त्याने दाखल कलेल्या घटनास्थळ पंचनाम्यावरून सिध्द होते. तक्रारकर्त्याने सदर वाहन दुरुस्तीकरीता देण्यापूर्वी विमा कंपनीला कळविले होते. त्याप्रमाणे वि.प. यांनी त्यांचे निरीक्षक श्री. सय्यद अकबर अली व श्री सुधीर कायरकर यांना सदर वाह्नाचे परीक्षण करण्याकरिता पाठविले त्यावेळी त्यांनी सदर वाहनाचे परीक्षण केले व नंतर तक्रारकर्त्यास सदर क्षतीग्रस्त वाहन दुरुस्त करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने सदर वाहन राजेश बाडी वर्क्स चंद्रपूर यांच्याकडे दुरुस्तीकरिता दिले. क्षतिग्रस्त ट्रकचे संपूर्ण काम राजेश बाडी वर्क्स व सूचित मेकनिकल मिस्त्री ,गोपाल डिझेल्स,मारोती क्रेन्स व इतर यांचेकडे दुरूस्त केले व वाहनाच्या दुरुस्तीकरीता रक्कम रु. २,२४,५२८/- एवढा खर्च आला हे तकारकर्त्याने सादर केलेल्या पावत्यांवरून सिध्द होते. सदर बिल क्लेम फॉर्मसह विरुद्ध पक्ष विमा कं. चंद्रपूर शाखेमध्ये जमा केले परंतु विरुद्ध पक्षांनी आजपर्यंत विमादाव्याची रक्कम दिली नाही व विमादाव्याबाबत काहीही कळविले नाही. व कोणतीही दखल घेतली नाही.
६. सबब मंचाच्या मताप्रमाणे विरूध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याच्या क्षतिग्रस्त वाहनाच्या दुरूस्ती खर्चाची रक्कम न देवून तक्रारकर्त्यांस सेवेत त्रुटी दिली हे सिद्ध होते व त्यामुळे तक्रारकर्त्यांस शारिरीक व मानसीक त्रास झाल्याने तक्रारकर्ता वि. प.यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(१) ग्राहक तक्रार क्र.१०८/२०१६ अंशतः मंजूर करण्यात येते
(२) विरूध्द पक्षांनी तक्रारदार यांना विमा दावा कराराप्रमाणे, ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
(३) विरूध्द पक्षांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्यास विमाकृत वाहनाची दुरूस्ती खर्चाची विमा दावा रक्कम रु. २,२४,५२८/- दिनांक ०५.१०.२०१६ पासून अदा करेपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
(४) विरूध्द पक्ष यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळून एकूण रक्कम रु. १०,०००/- आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत दयावी.
(५) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
(अधि. कल्पना जांगडे (कुटे))(अधि. किर्ती वैदय(गाडगीळ)) (श्री.उमेश व्ही. जावळीकर)
मा.सदस्या. मा. सदस्या मा.अध्यक्ष.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.