जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 104/2012.
तक्रार दाखल दिनांक : 17/04/2012.
तक्रार आदेश दिनांक : 26/08/2013. निकाल कालावधी: 01 वर्षे 04 महिने 09 दिवस
श्री राजस्थानी विकास मंडळ संचलित पब्लीक ट्रस्ट ऑफीस
जमनालाल जाजू स्मारक भवन, जाजू चौक, बाळी वेस, सोलापूर
तर्फे : अधिकृत प्रतिनिधी श्री. रामकिसन भिकुलाल डागा,
व्यवस्थापक, गिता ज्ञान पुस्तकालय (श्री राजस्थानी विकास मंडळ
सोलापूर संचलित), वय 58 वर्षे, व्यवसाय : सामाजिक कार्य,
रा. 64, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर – 2. तक्रारदार
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ऑफ इंडिया लि.,
407/08, जोडभावी पेठ, सोलापूर – 413 002.
(2) ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ऑफ इंडिया लि., फ्लॅट नं.306/7,
अशोक भोपाळ चेंबर्स, एस.पी. रोड,
सिकंदराबाद – 500 003. (आंध्रप्रदेश) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार स्वत: हजर
विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, तक्रारदार ही नोंदणीकृत पब्लीक ट्रस्ट असून तक्रारदार श्री. रामकिसन भिकुलाल डागा हे गिता प्रेस पुस्तकालय या सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापक आहेत. तक्रारदार यांनी गिता प्रेस, गोरखपूर यांच्याकडे 1595 पुस्तकांच्या खरेदीची ऑर्डर दिली आणि त्याप्रमाणे गिता प्रेस, गोरखपूर यांनी दि.22/9/2009 रोजीच्या बील नं. 257, रु.33,553.88 किंमतीची 1595 पुस्तके एकूण 11 बंडलमध्ये तक्रारदार यांना पाठविण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्या ताब्यात दिली. विरुध्द पक्ष यांनी त्यांना पुस्तकांचे 11 बंडल देण्याऐवजी 10 बंडल ताब्यात दिले आणि दिलेल्या पावती क्र.808479652, दि.19/10/2009 च्या पाठीमागे 1 बंडल कमी दिल्याबाबत शेरा व स्वाक्षरी नमूद केली आहे. तक्रारदार यांनी तपासणी केली असता 1 बंडल कमी मिळाल्यामुळे 109 पुस्तके त्यांना कमी मिळालेली आहेत. त्याची किंमत रु.3,175/- होत असल्यामुळे नुकसान भरपाई मिळविण्याकरिता विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविली असता दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून नुकसान भरपाई रु.3,175/- व्याजासह वसूल होऊन मिळावी आणि खर्चापोटी रु.1,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर ते मंचासमोर उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
3. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे व लेखी युक्तिवादाचे अवलोकन करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांच्या खरेदी ऑर्डरप्रमाणे गिता प्रेस, गोरखपूर यांनी दि.22/9/2009 रोजीच्या बील नं. टी.000257, रु.33,553.88 किंमतीची 1595 पुस्तके तक्रारदार यांच्या संस्थेच्या नांवे विक्री केल्याचे बील अभिलेखावर दाखल आहे. ती पुस्तके तक्रारदार यांच्याकरिता सोलापूर येथे पाठविण्याकरिता 11 बंडलमध्ये विरुध्द पक्ष यांच्या ताब्यात दिली आणि त्यांनी ते स्वीकारल्याचे पावती क्र.808479652, दि.19/10/2009 वरुन निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांच्याकडून तक्रारदार यांना 11 बंडल पोहोच करण्याऐवजी 10 बंडल पोहोच करण्यात आले आणि विरुध्द पक्ष क्र.1 यांनी पावतीच्या पाठीमागे 1 बंडल कमी दिल्याचा शेरा व स्वाक्षरी केलेली आहे. तक्रारदार यांनी पुस्तकांची संपूर्ण तपासणी केली असता तपासणी केली असता 1 बंडल अप्राप्त राहिल्याने 109 पुस्तके कमी मिळून त्यांचे रु.3,175/- चे नुकसान झाले आणि त्याची भरपाई मिळविण्याकरिता विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविली असता दखल न घेतल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
5. विरुध्द पक्ष यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि लेखी म्हणणे दाखल केले नाही. तसेच त्यांनी तक्रारदार यांच्या नोटीसला उत्तर दिले नसल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांच्या तक्रारीचे स्वरुप पाहता, विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर उपस्थित राहून लेखी म्हणणे दाखल करणे आवश्यक होते. परंतु विरुध्द पक्ष हे मंचासमोर येऊन तक्रारीबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करीत नसल्यामुळे व तक्रारदार यांच्या तक्रारीतील मजकुराचे किंवा दाखल कागदपत्रांचे खंडन करीत नसल्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांना मान्य आहे, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन विरुध्द पक्ष यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या 11 बंडलपैकी 1 बंडल कमी मिळाल्याचे सिध्द होते. ज्या विश्वासार्हतेने सोलापूर येथे पोहोच करण्यासाठी पुस्तकांचे बंडल विरुध्द पक्ष यांच्या ताब्यात दिले होते, त्या विश्वासास पात्र राहून ते सुस्थितीत, नुकसान व गहाळ न करता पोहोच करण्याची विरुध्द पक्ष यांच्यावर जबाबदारी व कर्तव्य होते. परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे पुस्तकाचे 1 बंडल गहाळ केलेले आहे आणि तक्रारदार यांना ते परत मिळवून देण्याबाबत किंवा त्यांची किंमत परत करण्याबाबत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. अशा परिस्थितीत, 1 बंडलमधील 109 पुस्तकांची किंमत रु.3,175/- परत करणे विरुध्द पक्ष यांच्यावर बंधनकारक होते व आहे. वरील विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते.
6. मा.सर्वोच्च न्यायालयाने 'नाथ ब्रदर्स एक्झीम इंटरनॅशनल लि. /विरुध्द/ बेस्ट रोडवेज लि.', 1 (2000) सी.पी.जे. 25 (एस.सी.) या निवाडयामध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की,
The liability of a carrier to whom the goods are entrusted for carriage is that of an insurer and is absolute in terms, in the sense that the carrier has to deliver the goods safely, undamaged and without loss at the destination, indicated by the consignor. So long as the goods are in the custody of the carrier, it is the duty of the carrier to take due care as he would have taken of his own goods and he would be liable if any loss or damage was caused to the goods on account of his own negligence or criminal act or that of his agent and servants.
7. तक्रारीची वस्तुस्थिती व वरील नमूद न्यायिक तत्व पाहता, विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदार हे रु.3,175/- दि.19/10/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने नुकसान भरपाई स्वरुपात मिळविण्यास पात्र आहेत, या अंतीम निर्णयास आलो आहोत.
8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.3,175/- दि.19/10/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/26813)