निकालपत्र :- (दि.11/08/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-यातील तक्रारदारच मयत पती दिलीप कांबळे यांनी सामनेवाला विमा कंपनीकडून विमा पॉलीसी घेतली होती. तक्रारदार यांनी कोडोली अर्बन बॅंकेतर्फे कर्ज घेतले होते. सदर बँकेतर्फे तक्रारदाराच्या मयत पत्नीची ग्रुप विमा पॉलीसी घेतली. सदर पॉलीसीचा विमा हप्ता सामनेवाला विमा कंपनीकडे कोडोली अर्बन को-ऑप बँक,बांबवडे यांच्यामार्फत विमा कंपनीकडे अदा केला होता. यातील तक्रारदार यांचे पती हे दि.12/06/2006 रोजी बांबवडे गांवी त्यांचे कामानिमित्त रस्त्याने चालत जात असताना त्यांना एम.एच-09-जी'6474 या ''हिरो होंडा'' मोटरसायकलने धडक दिली होती. त्यावेळी त्यांना उपचारकरिता सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर येथे दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरु असताना दिलीप कांबळे हे मयत झालेले आहेत. तक्रारदाराचे पती हे त्यांना वर नमुद केले हिरो होंडा मोटरसायकलने धडक दिलेने त्यांचे डोक्यास जबर मार लागलेने मयत झालेले आहेत.तक्रारदाराच्या पतीच्या अपघाती निधनानंतर तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे पॉलीसीच्या नियमाप्रमाणे नुकसानभरपाई रक्कम मिळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म दाखल केला.वारंवार चौकशी करुनही विम्याची रक्कम मिळाली नाही म्हणून तक्रारदाराने दि.26/09/2008रोजी वकीलांमार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठवली. तरीही तक्रारदारास विम्याची रक्कम मिळाली नाही म्हणून अखेर तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार मा.मंचासमोर दाखल करुन आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. तक्रारदारास विम्याची रक्कम रु.25,000/-द.सा.द.शे.18टक्के व्याजासह मिळावेत तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (2) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत दि कोडोली अर्बन को-ऑप बँकेचे पत्र, ग्रुप पॉलीसीची यादी, तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, नोटीस मिळालेची पोष्टाची पोच पावती, तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्यू झालेबद्दल पोलीसांनी केलेली चार्टशिट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (3) सामनेवाला विमा कंपनीने आपल्या कथनामध्ये तक्रारदाराच्या तक्रारीला तीव्र आक्षेप घेतला आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या क्लेमपेपर्सची काळजीपूर्वक तपासणी केल्यावर असे लक्षात आले की, तक्रारदाराच्या विमा पॉलीसीचा हप्ता सामनेवालांकडे कधीही पोहचला नाही. त्यामुळे सदर सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदार म्हणतात तशी विमा पॉलीसी कधीही उतरवलीच नाही.तक्रारदार व सामनेवाला विमा कंपनी यांच्यामध्ये ग्राहकत्वाचे नातेच निर्माण झाले नसल्यामुळे तक्रारदारास सामनेवालाने नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळे सामनेवालाच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नाही. सब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी व कॉम्पेंसेंटरी कॉस्ट म्हणून रु.10,000/-लावावी अशी मागणी सामनेवालाने केली आहे. (4) सामनेवाला यांनी आपले म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाही.
(5) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने दि.07/04/2010 रोजी अर्ज देऊन कोडोली अर्बन को-ऑप बँकेला पार्टी करावे अशी विनंती केली. मा. मंचाने तक्रारदाराचा अर्ज मान्य केल्यावर सामनेवाला क्र.2 कोडोली अर्बन को-ऑप बँक लि. यांना सदर तक्रारीमध्ये पार्टी करुन घ्यावे असा आदेश करणेत आला. सदर आदेशाप्रमाणे तक्रारदाराने दि कोडोली अर्बन को-ऑप बँक लि.यांना सामनेवाला क्र.2 म्हणून पार्टी करुन घेतले. (6) प्रस्तुत कामी मंचातर्फे सामनेवाला क्र.2यांना त्याप्रमाणे नोटीस पाठवण्यात आली. परंतु सदर कामी सामनेवाला क्र.2 बँक हजर झाली नाही किंवा त्यांनी आपले म्हणणेही दाखल केले नाही. अंतिम युक्तीवादाच्या वेळी तक्रारदार व त्यांचे वकील अनुपस्थित होते. सामनेवालाच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून सदर काम निकालावर ठेवणेत आले. (7) या मंचाने तक्रारदारांची तक्रार तसेच सामनेवाला विमा कंपनीने दाखल केलेले लेखी म्हणणे तपासले तसेच सामनेवाला विमा कंपनीच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. (8) तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रात तक्रारदाराची विमा पॉलीसी दाखल नाही. तक्रारदाराच्या पतीचे दि.12/06/2006 रोजी अपघाताने निधन झाले ही वस्तुस्थिती समोर आली आहे. परंतु विमा पॉलीसीप्रमाणे नुकसानभरपाई मिळण्यासाठी मुळात विमा पॉलीसी निर्विवाद सिध्द झाली पाहिजे. सदर पॉलीसी सामनेवाला विमा कंपनीकडून घेतली होती हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदाराची होती. तक्रारदाराने आपल्या मयत पतीच्या नावाची विमा पॉलीसी होती हे कुठल्याही कागदपत्रांच्या आधारे सिध्द केले नाही. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाला विमा कंपनी यांच्यामध्ये प्रिव्हीटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट नाही. तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहकच नाहीत. त्यामुळे सेवात्रुटीचा प्रश्नच उदभवत नाही हे सामनेवालाचे म्हणणे हे मंच ग्राहय धरुन पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत येते. 2) खर्चाविषयी कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |