नि.२५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४२९/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ११/०८/२०१०
तक्रार दाखल तारीख : १२/०८/२०१०
निकाल तारीख : १५/०३/२०१२
----------------------------------------------------------------
श्री महादेव गजानन निराळे
उ.व.५३, धंदा – व्यवसाय
प्रोप्रा. मे.शेती सेवा केंद्र
रा.संभाजी चौक, एस.टी.स्टॅंडरोड,
इस्लामपूर, ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
शाखा व्यवस्थापक
दी रत्नाकर बॅंक लि.
शाखा इस्लामपूर ता.वाळवा जि. सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.पी.एस.खोत
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री यू.जे.चिप्रे
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज जाबदार बॅंकेने दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांचे जाबदार बॅंकेमध्ये मे.शेती सेवा केंद्र या नावाने कॅश क्रेडीट खाते आहे. जाबदार यांच्या व्यवसायाच्या रुढी पध्दतीनुसार ज्या कंपन्यांकडून माल घेतला जातो त्या कंपन्यांना मालाच्या सुरक्षिततेकरिता कोरे चेक द्यावे लागतात. तक्रारदार यांनी सन २००२-०३ साली मेघमणी ऑरगॅनिक्स अकोला यांना दोन चेक क्र.६२१७२६ व ६२१७२७ दिलेले होते. सदर चेक देताना अर्जदार यांनी त्यावर दि.३१/३/२००३ अशी तारीख टाकून व सही करुन सदरचे चेक दिले होते. अर्जदार यांनी ज्या व्यवहारासाठी चेक दिले होते, तो व्यवहार संपुष्टात आला आहे. अर्जदार यांनी दिलेल्या चेकची मुदत सहा महिन्यानंतर म्हणजे दि.३०/९/२००३ रोजी संपलेली होती. परंतु कंपनीने सदर चेकपैकी नंबर ६२१७२७ या चेकवरील तारखेमध्ये दि.३१/३/२००३ मध्ये खाडाखोड करुन २००३ ऐवजी २००९ अशी खाडाखोड करुन रु.२६,२४८/- हा आकडा टाकून सदर चेक वटविण्यासाठी जमा केला. चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १९८१ मध्ये चेकवर काही खाडाखोड असेल आणि त्याठिकाणी चेक देणा-या व्यक्तीची सही नसेल तर असा चेक वटवू नये अशी तरतूद आहे. परंतु सदरचा चेक जाबदार बॅंकेमध्ये वटविणेकरिता आला असता सदर तरतुदीच्या विरोधात जावून सदर चेकवरील तारखेमध्ये खाडाखोड स्पष्ट दिसत असताना त्याठिकाणी अर्जदार यांची सही नसताना सदर चेक दि.२९/१/२००९ रोजी पास करुन त्याची रक्कम सदर कंपनीस अदा केलेली आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी अर्जदार यांना सदोष सेवा दिलेली आहे. सदरची चूक लक्षात आलेनंतर अर्जदार यांनी जाबदार यांना दि.२३/११/२००९ रोजी व पुन्हा दि.२०/१/२०१० रोजी पत्र पाठवून जाबदार बॅंकेकडून नजरचुकीने झालेली चूक दुरुस्त करुन सदरची रक्कम अर्जदार यांचे खात्यावर जमा करण्याबाबत कळविले होते परंतु जाबदार यांनी दि.४/५/२०१० रोजी सदरची गोष्ट नाकारली आहे. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज चेकची रक्कम रु.२६,२४८/- या मागणीसाठी व इतर तदानुषंगिक मागणीसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ९ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार व जाबदार यांचेतील वाद हा दिवाणी स्वरुपाचा आहे, अर्जदार हे बॅंकेचे ग्राहक होत नाहीत असे नमूद केले आहे. अर्जदार यांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्ये मेघराणी ऑरगॅनिक्स कंपनी अकोला यांनी चेकचा गैरवापर केला असे नमूद केले आहे. अर्जदार यांनी सदर कंपनीस याकामी पक्षकार न केलेने प्रस्तुत तक्रारअर्जास नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते. अर्जदार यांनी सदरचे चेक मेघराणी ऑरगॅनिक्स या कंपनीला दिले होते याबाबत जाबदार यांना कोणतीही माहिती नाही. अर्जदार यांनी सदर चेकवर दि.३१/३/२००३ अशी तारीख टाकून चेक दिला होता व अर्जदार व जाबदार यांचेतील व्यवहार पूर्ण झाला होता तर दिलेल्या चेकचा गैरवापर घेवू नये म्हणून बॅंकेस स्टॉप पेमेंट बाबत कळविणे अथवा योग्य ती सूचना देणे अशा प्रकारची कोणतीही काळजी घेतली नाही. अर्जदार यांचा चेक वसुलीसाठी आल्यावर सदर खातेदाराच्या खात्यावर रक्कम शिल्लक असल्याची खात्री करुन घेवून खातेदारांची स्पेसिमेन सिग्नेचर तपासून त्यावर उघडपणे अथवा वरवर न पाहता तारखेमध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड दिसून न आल्यामुळे सदरचा चेक वटविण्यात आला आहे. त्यामध्ये जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. अर्जदार यांनी योग्य ती काळजी घेवून सूचना बॅंकेस दिली असती तर अशी घटना घडली नसती. अर्जदार यांनी कंपनीने खाडाखोड करुन चेक वटवून घेतला याबाबत संबंधीत कंपनीवर कोणत्याही प्रकारची फौजदारी अथवा दिवाणी स्वरुपाची कारवाई केलेली नाही. यावरुन अर्जदार हे कोणत्याही प्रकारे खाडाखोड नसताना देखील जाबदार बॅंकेकडून रक्कम उकळण्याचा प्रयत्न करीत आहेत ही बाब स्पष्ट होते. सदरचा चेक हा स्टेट बॅंक ऑफ इंडिया या नामांकित बॅंकेकडून वसुलीसाठी आला होता सदर बॅंकेसही खाडाखोड आहे असे वाटले असते तर सदर बॅंकेने चेक जाबदार यांचेकडे वसुलीसाठी पाठविला नसता. जाबदार बॅंकेने स्टेट बॅक ऑफ इंडियाला दि.३०/११/१० रोजी पत्र पाठवून मेघमणी ऑरगॅनिक्स कंपनी अकोला या कंपनीस अद्यापी पेमेंट झाले नसेल तर पेमेंट करु नये अशी विनंती केली आहे. जाबदार यांनी दि.८/१/२०१० रोजी जाबदार बॅंकेस पत्र देवून २६ चेकचे पेमेंट स्टॉप करणेबाबत कळविले आहे. सदर पत्रात वादातील चेकचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र तो किती तारखेचा आहे याचा उल्लेख सदर पत्रात करण्यात आला नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१४ ला प्रतिज्ञापत्र व नि.१५ च्या यादीने ४ कागद दाखल केले आहेत. जाबदार यांनी नि.१८ च्या यादीने मूळ चेक दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी नि.२२ च्या यादीने कागद दाखल केले आहेत तसेच नि.२४ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.२३ ला तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरसिस दाखल केली आहे. जाबदार यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे व दाखल कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद यांचे अवलोकन केले. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत असे जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे व्यापारी कारणासाठी खाते उघडले आहे व तक्रारदार यांचा सर्व व्यवहार हा व्यापारी स्वरुपाचा आहे तसेच जाबदार हे तक्रारदार यांना खात्यावर रक्कम भरणेसाठी व काढण्यासाठी निशुल्क सेवा देत आहे. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत असे जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले. तक्रारदार यांचे जाबदार बॅंकेमध्ये कर्ज खाते आहे व सदर कर्जखात्याच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून सेवा घेतलेली आहे. सदर खात्यावर जाबदार हे कोणतेही व्याज आकारीत नाहीत असे कोणतेही जाबदार यांचे कथन नाही त्यामुळे सदरची सेवा निशुल्क आहे या जाबदार यांचे कथनामध्ये कोणतेही तथ्य वाटत नाही. तक्रारदार यांचा व्यवहार हा व्यापारी कारणासाठी असल्याने व तक्रारदार यांनी सदरची सेवा व्यापारी कारणासाठी घेतली असलेने तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत असेही जाबदार यांनी नमूद केले. तक्रारदार यांचे व्यवसायाचे स्वरुप पाहता तक्रारदार यांचा मे.शेती सेवा केंद्र या नावाने किटकनाशक विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार हे सदर व्यवसायाचे स्वत: प्रोप्रायटर आहेत. यावरुन तक्रारदार हे सदरचा व्यवसाय स्वत:चे उदरनिर्वाहासाठी करतात हे स्पष्ट होते. तक्रारदाराचा व्यवसाय हा पूर्णपणे व्यापारी स्वरुपाचा आणि मोठया स्वरुपाचा असून सदरचा व्यवसाय तक्रारदार हे स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगारातून करीत नाहीत असे दर्शविण्यासाठी जाबदार यांनी कोणताही पुरावा मंचासमोर आणला नाही त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होत नाहीत या जाबदार यांचे कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे.
६. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून चेकची रक्कम परत मिळावी व त्याअनुषंगाने मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा इ.मागण्या केल्या आहेत. सदरचे मागण्यांचा विचार करताना तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा दिली आहे का ही बाब पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्येच तक्रारदार यांनी मेघमणी ऑरगॅनिक्स या कंपनीस दि.३१/३/२००३ रोजी चेक दिले होते व सदरचा व्यवहार हा संपुष्टात आला आहे असे नमूद केले आहे. दि.३१/३/२००३ रोजी व्यवहार संपुष्टात आल्यानंतर असे चेक मेघमणी कंपनीकडून तक्रारदार यांनी परत मागवून घेतले असे दर्शविणारा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. सदर मेघमणी ऑरगॅनिक्स या कंपनीस याकामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. सदर चेक स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा अकोला यांचेकडून जाबदार यांचेकडे क्लिरन्ससाठी आला होता. सदर बॅंकेसही याकामी सामील केलेले नाही अथवा चेक पास झाल्यावर अशी रक्कम अदा करु नये याबाबत सदर बॅंकेस कळविलेले नाही. जाबदार बॅंकेस चेक स्टॉप पेमेंट करणेबाबत दि.८/१/२०१० रोजी कळविले असून सदरचे पत्र नि.१५/३ वर दाखल आहे. त्यामध्ये चेक क्र.६२११२७ चा उल्लेख अनुक्रमांक १६ येथे करण्यात आला आहे. त्यावर चेक किती तारखेला दिला याची तारीख नाही. सदरचे पत्र हे दि.८/१/२०१० रोजी दिले आहे व तक्रारदार यांचा चेक हा तक्रारदार यांचे म्हणण्यानुसारच दि.२९/८/२००९ रोजी पास झाला आहे. सदर चेकची मूळ प्रत पाहिली असता मूळ प्रत नि.१८/१ वर दाखल आहे. त्यामध्ये दि.२९/३/२००९ अशी तारीख नमूद आहे. परंतु सदरची तारीख २००३ ची २००९ करण्यात आली आहे ही बाब सहज लक्षात येण्यासारखी नाही हे मूळ चेकवरुन स्पष्ट होते. मेघमणी ऑरगॅनिक्स कंपनीने खाडाखोड करुन कोणताही गैरव्यवहार केला असेल तर त्यांचेविरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आल्याबाबत कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. मुळातच तक्रारदार यांचे म्हणण्यानुसार चेक जर २००३ मध्ये दिले असतील व व्यवहार २००३ मध्येच संपुष्टात आला असेल तर तक्रारदार यांनी सदरचे कोरे चेक मेघमणी कंपनीकडून परत घ्यावयास हवे होते अथवा जाबदार बॅंकेस त्याबाबत असे चेक वटवू नयेत अशी लेखी सुचना देणे गरजेचे होते. सदरची सूचना तक्रारदार यांनी चेक वटवून गेलेनंतर दिली आहे. वरील सर्व बाबी पाहता जाबदार बॅंकेने तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिली आहे असे दिसून येत नाही त्यामुळे तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १५/०३/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.