::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/07/2015 )
माननिय सदस्या श्रीमती जे.जी.खांडेभराड, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
दिनांक 15/06/2013 रोजी मानोरा, जि. वाशिम या परिसरात अतिवृष्टी (पाऊस) झाला. पाऊस जास्त असल्यामुळे अक्षय ट़्रेडींग कंपनी (दुकान) व गोडावून मध्ये मोठया प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे तक्रारकर्त्याचे दुकानात असलेला माल, ज्यामध्ये अनेक कंपन्याचे बियाणे, कपाशी, चना, तूर, भुईमुग, दुकानातील फर्निचर, लाईन फिटींग, पंखे, कुलर, कॉम्प्युटर, प्रिन्टर इत्यादी दुकानातील व गोडावून मधील साहित्याचे नुकसान पाण्यामुळे झालेले आहे. त्यावेळेस तक्रारकर्त्याचे दुकानात रुपये 40,00,000/- चा माल होता.
दिनांक 15/06/2013 रोजी तलाठी व तहसिलदार साहेब यांनी सुध्दा पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन, दुकानातील नुकसानीचा अहवाल दिला.
- कपाशी 25 क्विंटल रु. 1,22,500/-
- साखर 50 क्विंटल रु. 1,56,000/-
- चना (हरभरा) 30 क्विंटल रु. 88,500/-
4. तूर 50 क्विंटल रु. 2,10,000/-
5. भुईमुग 30 क्विंटल रु. 1, 23,000/-
एकूण रु. 7,00,000/-
एकूण रु. 7,00,000/- नुकसानीचा अहवाल दिला. तसेच दुकानातील फर्निचर, लाईन फिटिंग, पंखे, कुलर, कॉम्प्युटर, प्रिन्टर इत्यादी व गोडावून
मधील साहित्याचे नुकसान पाण्यामुळे झालेले आहे. तक्रारकर्त्याने
व्यवसायासाठी कर्ज, बॅंके मधून काढले होते, त्यावर व्याज भरावे लागते. सदर नुकसान पाण्यामुळे झालेले असल्याने, तक्रारकर्त्यास व्यवसायामध्ये रुपये 9,00,000/- नुकसान सहन करावे लागत आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष – ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी ली. कडून पॉलिसी क्र. 182202/11/2014/130 नुसार रुपये 20,00,000/- चा विमा काढला होता व विमा कालावधी दि. 10/05/2013 ते 09/08/2013 पर्यंत होता. सदर घटनेच्या वेळी विमा चालु स्थितीत होता. विमा कंपनीचे सर्वेअर सुध्दा तक्रारकर्ते यांचेकडे येऊन गेले व पाहणी करुन सर्व कागदपत्रे नेली. तक्रारकर्त्याने विमा लाभ मिळण्याकरिता, विरुध्द पक्ष कंपनीकडे अर्ज केला होता तसेच नोटिस सुध्दा हया अगोदर दिली आहे. परंतु विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारकर्त्यास कोणताही विमा लाभ दिलेला नाही. विरुध्द पक्ष कंपनी फक्त नफा कमविण्यासाठी व्यवसाय करीत आहे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत आहे.
म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन विनंती केली की, तक्रार मंजूर करुन तक्रारकर्ता यांना विम्यानुसार रक्कम रु. 9,50,000/- व तक्रार दाखल केल्यापासून 18 % दराने रक्कम मिळेपर्यंतचे व्याज, तसेच झालेल्या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 45,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाकडुन देण्यात यावेत, इतर इष्ट व न्याय दाद देण्यात यावी.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 9 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब :-
विरुध्द पक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब निशाणी 09 प्रमाणे मंचासमोर दाखल करुन, तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे नमुद केले ते थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारकर्त्याने तक्रारीत सत्य बाब लपवून अवास्तव नुकसान भरपाईची व व्याजाची मागणी केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या, दुकान व गोडाउनचे सर्व्हेअर मार्फत सर्व्हे केला, त्यावेळी सर्व्हेअरच्या असे लक्षात आले की, सदरहू गोडावून व दुकानामध्ये कुठूनही पाणी आतमध्ये शिरल्याचे दिसून आले नाही, त्याबाबत 15 जुन 2013 रोजी काढलेल्या फोटोवरुन स्पष्ट दिसून येते व ही बाब सर्व्हेअरने आपल्या रिपोर्टमध्ये सुध्दा स्पष्टपणे नमुद केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या गोडाउन मधील पाणी हे बेसमेंटमध्ये भिंतीमधून झिरपल्यामुळे (पर्क्युलेशन / सीपेज ) आलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याने बेसमेंटमध्ये माल ठेवतांना कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही व कुठल्याही शक्यता विचारात घेतल्या नाहीत. गोडाउन मधील बेसमेंटमध्ये तक्रारकर्त्याने इतरही प्रकारचा माल ठेवलेला असून त्याबाबत तक्रारकर्त्याने फुड सेफ्टी अँन्ड स्टँडर्ड अॅक्ट 2006 नुसार सदरहू माल ठेवण्यास परवानगी घेतलेली नव्हती व त्याबाबतचे लायसन्स सुध्दा तक्रारकर्त्याला, विरुध्द पक्ष यांनी तसेच सर्व्हेअर यांनी वेळोवेळी मागीतले, परंतु तक्रारकर्त्याने सदरहू महत्वाची कागदपत्रे विरुध्द पक्ष यांना दिली नाहीत. तक्रारकर्त्याचे गोडाउन बेसमेंट हे जमीन स्तराच्या खाली तळघरात असून, तक्रारकर्त्याने माल ठेवतांना कुठलीही काळजी घेतली नाही, तसेच माल ठेवतांना जमीन स्तरापासून उंचावर माल ठेवायला पाहिजे होता तो तक्रारकर्त्याने कुठलाही उंचवटा न करता जमीनीवर ठेवला. त्यामुळे तक्रारकर्त्याचे झालेले नुकसान हे त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे, निष्काळजीपणा- मुळे झालेले आहे, त्यास विरुध्द पक्ष जबाबदार नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार ही विरुध्द पक्ष यांना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने व स्वत:ची चूक लपविण्याचे दृष्टीने दाखल केलेली असून ती खर्चासह खारीज करण्यांत यावी.
सदर जबाब, विरुध्द पक्ष यांनी, शपथेवर, सादर केला.
3) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व उभय पक्षाचा लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यास असे दिसते की,
या प्रकरणात उभय पक्षाला मान्य असलेली बाब अशी आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष विमा कंपनीकडे ‘ Standard Fire & Special Perils Policy ’ ज्याचा कालावधी हा दि. 10/05/2013 ते 09/08/2013 पर्यंत होता, ही काढलेली होती व त्यानुसार रिस्क ही रुपये 20,00,000/- पर्यंत कव्हर होती.
तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, दिनांक 15/06/2013 रोजी मानोरा जि. वाशिम या परिसरात अतिवृष्टी झाली. सदर नुकसानीचा पंचनामा तलाठी व तहसिलदार यांनी करुन त्यामध्ये एकंदर तक्रारकर्त्याचे रक्कम रुपये 7,00,000/- चे नुकसान झाले, असा अहवाल दिला आहे. तक्रारकर्त्याने विम्याचा लाभ घेण्याकरिता विरुध्द पक्षाकडे विमा दावा दाखल केला असता, त्यांनी कोणताही लाभ दिलेला नाही.
यावर विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या सर्व्हेअरने या घटनेचा सर्व्हे केला असता, त्याला निरीक्षणामध्ये असे आढळले की, सदरचे पाणी हे तळघरामध्ये व ग्राउंड फ्लोअरमध्ये झिरपल्यामुळे हे नुकसान झाले आहे. पूराचे पाणी दुकानात शिरले नाही. परंतु तक्रारकर्त्याने योग्य ती काळजी जसे की, तळघरात ताडपत्री न अंथरता, कोणताही उंचवटा न करता, माल फरशीवर ठेवलेला होता. त्यामुळे सदरहू नुकसान हे पाणी झिरपल्यामुळे झाले आहे. त्याबद्दल सर्व्हे रिपोर्ट दाखल असून त्यानुसार रुपये 91,000/- एवढे नुकसान झालेले आहे. परंतु सदरहू नुकसान पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये बसत नसल्यामुळे विरुध्द पक्ष - विमा कंपनी हे नुकसान देण्यास तयार नाही.
उभय पक्षाचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचाने दाखल असलेल्या पॉलिसीचे शेडयूल तपासले असता, त्यात रिस्क डिटेलस् मध्ये, ‘ On Stock of Grains, Soyabeen, Toor, Chana etc and lose Cotton ’ व Sun Insured मध्ये रुपये 2,00,000/- असे लिहलेले दिसून येते. तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर एक पंचनामा दाखल केला आहे, परंतु त्यातील मुद्दे हे समाधानकारक नाही. जसे की, त्यामध्ये सदर पंचनामा हा पुराने वाहून गेलेल्या नैसर्गिक आपत्तीचा दिसून येतो. शिवाय हा पंचनामा योग्य त्या पुराव्यानिशी तक्रारकर्त्याने सादर केलेला नाही. या उलट विरुध्द पक्षातर्फे दाखल असलेले दस्तऐवज जसे की, सर्व्हे रिपोर्ट व त्याबद्दलचा प्रतिज्ञालेख असे दर्शवितात की, त्यांच्या मते जरी हे नुकसान बेसमेंटमध्ये भिंतीमधून पाणी झिरपल्यामुळे झाले तरी हे पाणी पूरामुळेच आले होते, असे मंचाचे मत आहे. शिवाय सर्व्हे रिपोर्टमध्ये, सर्व्हेअरने असे कबूल केले आहे की, तक्रारकर्त्याच्या गोडाऊनमध्ये पाणी साचले होते व त्यामध्ये भुईमुग शेंग व कापूस साठवलेला होता व पॉलिसीनुसार याची रिस्क कव्हर होती. सर्व्हेअरने याबद्दलचे नुकसान रुपये 91,000/- एवढे असेस केले आहे. शिवाय पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये नुकसान झालेला माल अंतर्भुत आहे, त्यामुळे विरुध्द पक्षाला सदरहू रक्कम देण्यास कोणतीही अडचण नव्हती. परंतू केवळ तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या पत्रांची दखल घेतली नसल्यामुळे सदरहू विमा दावा तक्रारकर्त्याला दिलेला नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुनच मंचाने असा निष्कर्ष काढलेला आहे की, तक्रारकर्ता दिनांक 15/06/2013 रोजी झालेल्या अतिवृष्टीत त्याचे गोडाऊनमधील झालेल्या मालाच्या नुकसानीपोटी विरुध्द पक्षाच्या सर्व्हेअरने रिपोर्टमध्ये नमूद केलेली विमा दाव्याची रक्कम विरुध्द पक्षाकडून सव्याज मिळण्यास पात्र आहे.
म्हणून, अंतिम आदेश पारित केला तो पुढीलप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला विमा पॉलिसीनुसार भरपाई म्हणून रुपये 91,000/- (रुपये एक्क्यान्नव हजार फक्त ) इतकी दरसाल, दरशेकडा 8 % व्याजदाराने दिनांक 21/02/2014 ( प्रकरण दाखल तारीख ) पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व प्रकरणाचा खर्च रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) तक्रारकर्त्यास दयावा.
- विरुध्द पक्ष / विमा कंपनी यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
svGiri जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.