नि.39 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 38/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.07/08/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.07/12/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या झीशान रज्जाक काझी रा.उद्यमनगर, राजापूरकर कॉलनी, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द शाखाधिकारी, दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि., जावकर प्लाझा, नगर वाचनालयासमोर, जयस्तंभ, ता.जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.एस.एस.पडवेकर सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.एम.बी.भाटवडेकर -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.अध्यक्ष, श्री.अनिल गोडसे 1. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज त्यांच्या गाडीच्या विमा दाव्याबाबत दाखल केला आहे. 2. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशिल खालीलप्रमाणेः- तक्रारदार यांचे मालकीचा टेंपो टाटा 207 या वाहनाचा विमा सामनेवाला यांच्याकडे उतरविला आहे. तक्रारदार यांच्या टेंपोस विमा मुदतीत दि.08/11/2009 रोजी अपघात झाला. तक्रारदार यांनी सदरचा टेंपो शुभश्री गॅरेज, एम.आय.डी.सी.रत्नागिरी यांच्याकडे दुरुस्तीसाठी दाखल केला. सदर शुभश्री गॅरेज यांनी सदर टेंपोच्या दुरुस्तीसाठी रु.2,13,212/- इतका खर्च सुचविला. तक्रारदार यांनी टेंपोचा अपघात विमा मिळावा म्हणून सामनेवाला यांच्याकडे विमा दावा दाखल केला परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांचे विमा दाव्याबाबत निर्णय घेण्यास विलंब लावला व सरतेशेवटी कोणतेही संयुक्तिक कारण नसताना तक्रारदारांचा विमा दावा फेटाळल्याचे दि.29/03/2010 चे पत्राने तक्रारदारास कळविले. तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर न झाल्याने तक्रारदार यांचा टेंपो दुरुस्तीविना गॅरेजमध्ये पडून आहे त्यामुळे तक्रारदार यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे व तक्रारदार यांना त्यांचे व्यवसायासाठी अन्य भाडयाने वाहन घ्यावे लागत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी वाहन दुरुस्तीसाठी येणारी खर्चाची रक्कम रु.2,13,212/- तसेच भाडयाच्या वाहनासाठी आलेला खर्च रक्कम रु.2,00,000/- व या दोन्ही रकमांवर दि.29/03/2010 पासून 18% दराने व्याज तसेच शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा म्हणून प्रस्तुतची तक्रार या मंचाकडे दाखल केली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जासोबत नि.2 ला शपथपत्र व नि.5 चे यादीने एकूण 4 कागद दाखल केले आहेत. 3. सामनेवाला यांनी याकामी हजर होवून नि.14 ला आपले म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे वाहनास विमा मुदतीत अपघात झाला ही गोष्ट मान्य केली आहे. तथापी सदर वाहनाच्या दुरुस्तीस रु.2,13,212/- इतका खर्च अपेक्षित आहे ही गोष्ट अमान्य केली आहे. तक्रारदार यांचे वाहनाचा सामनेवाला यांनी त्यांच्या सर्व्हेअरमार्फत सर्व्हे केला असून सर्व्हेअर अभय पंडीत यांनी वाहनाचा सर्व्हे रिपोर्ट सामनेवाला यांच्याकडे सादर केला आहे. अपघातादिवशी तक्रारदार यांच्या वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपली आहे व तक्रारदार यांनी फिटनेस सर्टिफिकेट नसताना वाहन चालवून मोटर व्हेईकल ऍक्ट 1988 मधील कायदेशीर तरतूदींचा भंग केला असून विमा पॉलिसीमधील तरतूदीचाही भंग केला असल्याने सामनेवाला कंपनीने तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला आहे. यामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यासोबत नि.15 ला शपथपत्र व नि.16 चे यादीने एकूण 8 कागद दाखल केले आहेत. 4. तक्रारदार यांनी नि.21 ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे त्यामध्ये त्यांनी सामनेवाला यांच्या म्हणण्यातील मजकूर नाकारलेला आहे. तक्रारदार यांनी नि.22 च्या अर्जाने व नि.23 च्या यादीने एकूण 2 कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.29 वर साक्षीदार यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवालातर्फे सदर साक्षीदार यांचा उलटतपास घेण्यात आला. तोही नि.29 वर नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार यांनी नि.30 वर व सामनेवाला यांनी नि.33 वर जादा तोंडी पुरावा देण्याचा नाही अशी पुरशीस सादर केली आहे. सामनेवाला यांनी नि.36 वर लेखी युक्तिवादाबाबत पुरशीस सादर केली आहे. 5. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, प्रतिउत्तर, झालेला साक्षीपुरावा व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन सामनेवाला यांनी त्यांना सदोष सेवा दिली आहे काय ? | होय. | 3. | तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | अंशतः मंजूर. | 4. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 6. मुद्दा क्र.1- तक्रारदार यांनी आपल्या वाहनाचा सामनेवाला यांच्याकडे विमा उतरविला होता त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 2 (ड) मधील ग्राहक या शब्दाच्या व्याख्येप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मोबदला देवून विमा सेवा घेतली होती तसेच ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 2 (ओ) मधील सेवा या शब्दाच्या व्याख्येचे अवलोकन केले असता “विमा” ही बाब सेवा या सदरात येत असल्याने तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत सदरचा न्यायमंच आला आहे. 7. मुद्दा क्र.2- तक्रारदार यांच्या वाहनाचा अपघात दि.08/11/2009 रोजी झाला व तक्रारदार यांचा विमा दावा नाकारल्याचे सामनेवाला यांनी दि.29/03/2010 च्या पत्राने तक्रारदार यांना कळविले. सदरचे पत्र तक्रारदार यांनी नि.5/1 वर दाखल केले आहे. त्यामध्ये अपघातादिवशी वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट वैध नव्हते या कारणास्तव विमा दावा नाकारण्यात आल्याचे कळविले आहे. सामनेवाला यांनी विमा दावा नाकारण्यासाठी दिलेले कारण संयुक्तिक आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये सामनेवाला यांनी आपल्या वाहनाचा विमा दावा कोणतेही संयुक्तिक कारण नसताना फेटाळला असे नमूद केले आहे व त्यासाठी तक्रारदार यांनी सन्मा.राष्ट्रीय आयोग यांचा G.Kothainachiar V/s. The Br.Manager, United India Insurance Co.Ltd., हा Revision Petition No.1503/2001 निकाल तारीख 29 ऑक्टोबर 2007 हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयाचे अवलोकन केले असता केवळ फिटनेस सर्टिफिकेट नाही म्हणून पॉलिसीमधील अटी किंवा शर्थींचा भंग होत नाही व विमा दावा नाकारण्यास कारण होवू शकत नाही असा निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार यांचा विमा दावा कोणतेही संयुक्तिक कारण नसताना सामनेवाला यांनी नाकारला या तक्रारदाराचे युक्तिवादामध्ये तथ्य असल्याचे दिसून येते. तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन तसेच त्याबाबत निर्णय घेण्यास विलंब करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यास सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. 8. मुद्दा क्र.3- तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये गाडी दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची रक्कम रु.2,13,212/- तसेच अपघात झाल्यापासून तक्रारदाराचे वाहन नादुरुस्त असल्याने तक्रारदारास आपले व्यवसायासाठी अन्य वाहन भाडयाने घ्यावे लागले व त्यापोटी रक्कम रु.2,00,000/- इतका खर्च आला ही खर्चाची रक्कम तसेच वर नमूद दोन्ही रकमांवर दि.29/03/2010 पासून 18% व्याज, शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रक्कम रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- या रकमेची मागणी केली आहे. तक्रारदार यांनी आपल्या मागणीच्या पृष्ठयर्थ नि.5/3 वर शुभश्री गॅरेज यांचे कोटेशन दाखल केले आहे. तसेच सदर गॅरेजचे मॅनेजर ईश्वराज पाटील यांचे शपथपत्र नि.29 वर दाखल केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या खर्चाच्या मागणीबाबत आक्षेप घेतला असून सामनेवाला यांचे सर्व्हेअर अभय पंडीत यांनी दिलेल्या सर्व्हे रिपोर्टची प्रत नि.16/3 वर दाखल केलेली आहे. सर्व्हेअर यांनी आपल्या रिपोर्टमध्ये रक्कम रु.1,03,000/- इतका खर्च सुचविला आहे. सदर वाहनाचे नुकसानीची रक्कम ठरविताना दाखल असलेला कागदोपत्री पुरावा व साक्षीदार यांचे शपथपत्र यांचे अवलोकन करणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी साक्षीदार यांचे पत्र नि.29 वर दाखल केले आहे. सदर साक्षीदार यांचा उलटतपास सामनेवालातर्फे घेण्यात आला. सदर साक्षीदार यांनी आपल्या उलटतपासामध्ये मोटर मॅकेनीकमधील तांत्रिक शिक्षण झालेले नाही तसेच आपले शिक्षण B.A.पर्यंत झाले असल्याचे मान्य केले आहे. तसेच कोटेशन तयार करताना वाहनाच्या घसारा मुल्याचा विचार करण्यात आला नाही हेही मान्य केले आहे. त्यामुळे साक्षीदार यांचा पुरावा व त्यांनी सादर केलेले कोटेशन हा आधारभूत पूरावा होणार नाही असे मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी नि.16/3 वर दाखल केलेला सर्व्हेअर यांच्या रिपोर्टचे अवलोकन केले असता सर्व्हेअर यांचे शिक्षण B.E.(Automobile) इतके झालेले आहे. त्यामुळे सर्व्हेअर यांनी दिलेला रिपोर्ट हा पुराव्याच्या दृष्टीने अंत्यंत महत्त्वपूर्ण आहे व तक्रारदार यांनी सदर सर्व्हेअर यांचा रिपोर्ट नाकारलेला नाही अथवा त्याबाबत कोणताही आक्षेप घेतलेला नाही. सामनेवाला यांनी आपल्या युक्तिवादाच्या पृष्ठयर्थ सन्मा.राष्ट्रीय आयोग यांचा 2007 NCJ 117 (NC) Deen Dayal Chamoli V/s. National Insurance Co.Ltd., हानिवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयामध्येही सन्मा.राष्ट्रीय आयोग यांनी “Surveyor’s report being valuable piece of evidence hence State Commission rightly relied upon it” असा निष्कर्ष नोंदविला आहे. त्यामुळे सर्व्हेअर यांनी रिपोर्टमध्ये नमूद केलेली रक्कम रु.1,03,000/- विचारात घेणे गरजेचे आहे. 9. सामनेवाला यांनी आपल्या युक्तिवादामध्ये तक्रारदार यांचा विमा दावा नॉन-स्टँडर्ड बेसीसवर विचारात घ्यावा असेही नमूद केले. तथापी तक्रारदार यांनी दाखल केलेला वर नमूद Revision Petition 1503/2004 मधील निवाडयाचे अवलोकन केले असता सर्व्हेअर यांनी सुचविलेली संपूर्ण रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी या रकमेवर 18% दराने व्याजाची मागणी केली आहे. सामनेवाला यांनी कोणतेही संयुक्तिक कारण नसताना तक्रारदार यांचा विमा दावा नाकारला व त्याबाबत निर्णय घेण्यासही विलंब केला ही बाब विचारात घेता रक्कम रु.1,03,000/- या रकमेवर दि.29/03/2010 पासून द.सा.द.शे.12% दराने व्याज मंजूर करणे संयुक्तिक ठरेल असेही मंचाचे मत आहे. 10. तक्रारदार यांनी त्यांचे वाहन नादुरुस्त असल्याने व्यवसायासाठी भाडयाचे वाहन करावे लागले व त्यासाठी रक्कम रु.2,00,000/- इतका खर्च आला त्या खर्चाची रक्कम मिळण्याची मागणी केली आहे. तक्रारदार यांनी त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही तसेच तक्रारदार यांची सदर भाडयाची रक्कम मिळण्याची मागणीही अप्रस्तुत वाटत असल्याने सदरची मागणी नामंजूर करण्यात येत आहे. 11. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांचा विमा दावा नाकारल्यामुळे तक्रारदार यांना निश्चितच शारिरिक, मानसिक त्रासास सामोरे जावे लागले तसेच तक्रारदार यांचे वाहन अद्यापही नादुरुस्त पडून आहे हे नि.29 वरील साक्षीदार यांच्या शपथपत्रावरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व बाबी विचारात घेता तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.15,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल असे या मंचाचे मत झाले आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2. तक्रारदार यांना त्यांच्या वाहनाच्या अपघात विमा दाव्यापोटी रक्कम रु.1,03,000/- (रु.एक लाख तीन हजार मात्र) व सदर रकमेवर दि.29/03/2010 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत संपूर्ण रकमेवर द.सा.द.शे. 12% दराने व्याज अदा करावे असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 3. तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.15,000/- (रु.पंधरा हजार मात्र) अदा करावेत असा सामनेवाला यांना आदेश करण्यात येतो. 4. वर नमूद आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी दि.07/01/2011 पर्यंत करण्याची आहे. 5. सामनेवाला यांनी विहीत मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील. रत्नागिरी दिनांक : 07/12/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |