निकालपत्र
( दिनांक 28-07-2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार बाबासाहेब पि. संजय भिसे हा बजाज अॅटो क्रं. एम.एच.26-एसी/ 4086 चा मालक व ताबेदार आहे. अर्जदाराने आपल्या अॅटोचा विमा गैरअर्जदार यांच्याकडे योग्य ती फीस भरुन काढलेला आहे. सदर विम्याचा कालावधी दिनांक 24.10.2013 ते दिनांक 24.10.2014 असा आहे. दिनांक 28.6.2014 रोजी अर्जदाराचा ड्रायव्हर रिकामा अॅटो क्रं. एम.एच.26-एसी/ 4086 हा बरकत कॉम्पलेक्स येथून अर्जदाराच्या घराकडे रात्री 8.00 च्या सुमारास जात असतांना लक्ष्मीनगर रोडवर अॅटोसमोर एक गाय पळत आल्यामुळे गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात अर्जदाराचा अॅटो पल्टी झाला. त्यात अॅटोचे जवळपास 70 ते 80 हजाराचे नुकसान झाले. सदरची घटना घडल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीला माहिती दिली. त्यानंतर गैरअर्जदार यांच्या सर्व्हेअर व लॉसअसेसरने जायमोक्यावर येवून अर्जदाराच्या अॅटोचा सर्व्हे केला व नुकसानीचा अहवाल तयार करुन गैरअर्जदार यांच्याकडे दिला. पोलीस स्टेशन विमानतळ यांना घटनेबद्दलची माहिती दिली असता पोलीसांनी जायमोक्यावर येवून घटनास्थळ पंचनामा केला व अपघात क्र. 21/2014 अन्वये अपघाताची नोंद घेतली. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अॅटोची नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम दाखल केला. गैरअर्जदार यांनी दिनांक 5.12.2014 रोजीचे पत्राने अर्जदाराच्या अॅटोचा कलर हा पिवळा व काळा आहे व तो पांढरा नाही म्हणून अॅटोच्या नुकसान भरपाईचा क्लेम नामंजूर केला. अपघाताच्या वेळी अॅटो हा रिकामा होता कोणत्याही प्रकारचे पॅसेंजर वाहतूक करीत नव्हते. अर्जदार सदर अॅटो स्वतःसाठी वापरीत होता. अॅटोचा अपघात गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात अॅटो पल्टी झाल्यामुळे झाला. त्यामुळे गैरअर्जदाराने अॅटोचा कलर पिवळा व काळा आहे म्हणून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीरपणे व चुकीच्या कारणाने नामंजूर केलेला आहे. अर्जदाराने सदरचा अॅटो दुरुस्ती करुन घेतलेला आहे. गैरअर्जदार यांनी चुकीच्या कारणामुळे अर्जदाराचा क्लेम नामंजूर केल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून अॅटोच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 80,000/- 10 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/-ची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
2. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
3. अर्जदाराने सदर अॅटो भाडे-विक्री तत्वावर सुवर्णा इंटरप्राइजेस परळी वैजनाथ यांचेकडून घेतलेला असल्याने त्यांना आवश्यक पार्टी केलेले नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार फेटाळण्यायोग्य आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून पॉलिसी घेतलेली असून पॉलिसीचा कालावधी दिनांक 24.10.2013 ते दिनांक 24.10.2014 असल्याबद्दलचे कथन मान्य केलेले आहे. अर्जदाराने अॅटोचा अपघात झाला हे निवेदन खोटे केलेले असून संबंधीत पोलीसांबरोबर संगनमत करुन खोटी स्टेशन डायरी नोंद व खोटा पंचनामा तयार करण्यास भाग पाडलेले आहे. पंचनाम्यामध्ये अॅटो चुकीच्या बाजुने जात असल्याचे कथन व चिन्हे असल्यामुळे तसेच कथीत घटनेची माहिती गैरअर्जदारास ताबडतोब न देता उशीरा दिल्यामुळे लॉस असेसर यांनी दुर्घटनाग्रस्त अॅटोची पाहणी कथीत घटनास्थळी न करता गॉरेजमध्ये केलेली आहे. अॅटोचा रंग प्रादेशिक परिवहन कार्यालयात पांढरा असतांना असेसमेंट व पोलीस पंचनाम्याप्रमाणे काळा-पिवळा होता म्हणून सदर घटनेबद्दल विरुध्द अर्थ Adverse inference काढण्यात यावा. भाडे तत्वावर अॅटो चालविणे हे पॉलिसी अटीचा भंग असल्याने अर्जदार लाभ मिळण्यास पात्र नाही त्यामुळे अर्जदाराचा विमा दावा दिनांक 05.12.2014 रोजी गैरअर्जदार यांनी नाकारलेला आहे. सदरील अॅटो अर्जदार स्वतः व कुटूंबासह वापरीत होता हे संदिग्ध आहे. माल वाहतूक करीत होत हे गृहीत धरल्यास चालकाकडे वैध व परिणामकारक परवाना नव्हता म्हणून सुध्दा अर्जदार विमा लाभ मिळण्यास पात्र नाही. अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
4. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
5. अर्जदार यांनी त्याचा अॅटो क्रं. एम.एच.26-एसी/ 4086 चा विमा गैरअर्जदार यांच्याकडे काढलेला असून पॉलिसीचा कालावधी दोन्ही पक्षांना मान्य आहे. दिनांक 28.6.2014 रोजी अर्जदाराच्या अॅटोचा अपघात झालेला असल्याचे घटनास्थळ पंचनाम्यावरुन सिध्द होते. सदरील घटनास्थळ पंचनामामध्ये गायीला वाचविण्यासाठी अॅटो रोडच्या बाजूस घेतला असता नालीत जावून अपघात झालेला असल्याचे नमूद आहे. सदरील अॅटोमध्ये कुठलेही प्रवासी वाहतुक करीत असल्याचे घटनास्थळ पंचनाम्यामध्ये नमूद नाही. अर्जदाराच्या अॅटोचा अपघात झाल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे विमा रक्कमेची मागणी केली असता अर्जदाराचा विमा दावा दिनांक 05.12.2014 च्या पत्रान्वये नाकारलेला असून दावा नाकारतांना खालील कारणे दिलेली आहेत.
The photographs taken by our surveyor show the colour of insured vehicle as Block and Yellow. This vehicle is insured under private car package policy by the Nanded DO. As the actual commercial vehicle for hire and reward and not white as mentioned in the RC Book, this amounts to breach of motor vehicle act 1988 and rules there under In view of the above, we regret to admit the liability under the policy and your please acknowledge the receipt.
गैरअर्जदार यांनी दिलेले कारण हे अर्जदाराच्या वाहनाचा रंग हा सर्व्हेअरने काढलेल्या फोटोग्राफवरुन काळा-पिंवळा होता. अर्जदाराने प्राव्हेट कार पॅकेज पॉलिसी घेतलेली असून आर.सी. बुकामध्ये अर्जदाराच्या वाहनाचा रंग हा पांढरा असल्याचे नमूद आहे. ज्याअर्थी अर्जदाराचे वाहन काळया व पिवळया रंगाचे आहे व त्याचा अर्थ अर्जदार हा वाहनाचा वापर व्यवसायीक कारणासाठी करीत होता असा निष्कर्ष गैरअर्जदार यांनी काढलेला आहे. सदरील निष्कर्ष काढतांना गैरअर्जदार यांनी पॉलिसीचे अवलोकन केलेले असल्याचे दिसून येत नाही. कारण गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या पॉलिसीमध्ये वाहनाचा कलर कोणता आहे त्याबद्दल कुठलाही उल्लेख केलेला नाही. उलट कलर या कॉलममध्ये रिकामी जागा ठेवलेली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये झालेल्या करारात पॉलिसीवरील नियम व अटी लागू आहेत. सदर पॉलिसीमध्ये वाहनाचा रंग नमूद नाही त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन काळया व पिवळया रंगाचे असल्यामुळे विमा दावा नाकारण्याचे कोणतेही कारण नाही.
6. अर्जदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपर्सचे अवलोकन केले असता अर्जदार हा त्याचे वाहन व्यवसायिक कारणासाठी वापरीत असल्याचे दिसून येत नाही. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदार त्याचे वाहन व्यवसायिक कारणासाठी वापरीत असल्याबद्दलचा कोणताही पुरावा मंचासमोर दिलेला नाही. विमा दावा नाकारतांना दिलेल्या पत्रामध्ये सर्व्हेअरने वाहनाचे फोटोग्राफ काढलेले असल्याचे म्हटलेले आहे. सदरील फोटोग्राफ किंवा सर्व्हेअरच्या अहवाल गैरअर्जदार यांनी दाखल केलेला नाही. यावरुन गैरअर्जदार हे अर्जदार त्याचे वाहन व्यवसायिक कारणासाठी वापरीत होता ही बाब पुराव्यानिशी सिध्द करु शकलेला नाही त्यामुळे अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार यांनी चुकीच्या कारणामुळे नाकारुन सेवेत त्रुटी दिलेली आहे, असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी सर्व्हेअरचा अहवाल दाखल केलेला नाही तसेच अर्जदार यांनी वाहनाचे दुरुस्तीसाठी किती खर्च आलेला आहे याबद्दलचा पुरावा दिलेला नाही त्यामुळे मंच खालील आदेश देत आहे. आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सर्व्हेअरच्या अहवालात नमूद केलेली नुकसान भरपाईची
रक्कम आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत अदा करावी.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.