निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांनी चोरीस गेलेल्या ट्रकचा विमा दावा मंजूर करावा या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी त्यांच्या मालकीच्या ट्रक क्रमांक एम.एच.१८-एए-००३२ ची विमा पॉलिसी सामनेवाले यांच्याकडून काढली होती. त्याचा क्रमांक १६०८००३११२०१००००१२७६ असा आहे. तर विम्याचा कालावधी दि.११-१०-२०१२ ते दि.१०-१०-२०१३ असा होता. तक्रारदार यांचा वरील ट्रक दि.१३-१२-२०१२ ते दि.१४-१२-२०१२ च्या मध्यरात्री वापी जि.आय.डी.सी. गुजरात येथून चोरीस गेला. त्याबाबत सामनेवाले यांना माहिती कळविण्यात आली. दि.१९-१२-२०१२, दि.२८-१२-२०१२, दि.१९-०३-२०१३, दि.२९-०६-२०१३, दि.०३-०७-२०१३ या दिवशी सामनेवाले यांना वेळोवेळी पत्रे पाठवूनही त्यांनी तक्रारदार यांचा विमादावा मंजूर केला नाही. चोरीस गेलेल्या ट्रकची विमा पॉलिसी रु.१२,००,०००/- एवढया किमतीची होती. हा ट्रक चोरीस गेल्याने मासिक उत्पन्न बुडत आहे असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतेही उत्तर कळविलेले नाही, मात्र ते विमा दावा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांची ही कृती म्हणजे सेवेतील त्रुटी असून सामनेवाले यांना विमादावा मंजूर करण्याचा आदेश द्यावा, ट्रक चोरीस गेल्यापासून झालेल्या नुकसानीपोटी भरपाई रु.७,५०,०००/-, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.५०,०००/- अशी भरपाई मिळावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
(३) तक्रारदार यांनी तक्रारीसोबत पोलिसात दिलेली खबर (मराठी अनुवादासह), अंतिम अहवाल (मराठी अनुवादासह), अनुवाद करणारे अॅड.हिमांशु वाणी यांचे प्रतिज्ञापत्र, पॉलिसीची नक्कल, सामनेवाले यांना दि.१९-१२-२०१२, दि.२८-१२-२०१२, दि.१९-०३-२०१३, दि.२९-०६-२०१३, दि.०३-०७-२०१३ रोजी दिलेले सुचनापत्र, सामनेवाले यांचे दि.१७-०६-२०१३ चे पत्र आदी कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(४) सामनेवाले हे नोटीस मिळाल्यानंतर मंचात हजर झाले. मात्र त्यांनी खुलासा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द म्हणणे नाही असा आदेश पारीत करण्यात आला आहे.
(५) तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय |
(ब) आदेश काय ? | : अंतिम आदेशाप्रमाणे |
| | | |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून त्यांच्या ट्रकची विमा पॉलिसी उतरविली होती. त्याचा क्रमांक १६०८००३११२०१००००१२७६ असा आहे. या पॉलिसीची छायांकीत प्रत तक्रारदार यांनी दाखल केली आहे. त्यावरही वरील क्रमांक नमूद आहे. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते.
तक्रारदार यांचा ट्रक दि.१३-१२-२०१२ ते दि.१४-१२-२०१२ च्या मध्यरात्री चोरीस गेला. त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि.१९-१२-२०१२ रोजी कळविले होते. त्यानंतर वेळोवेळी म्हणजे दि.२८-१२-२०१२, दि.२०-०३-२०१३, दि.२९-०६-२०१३, दि.०३-०७-२०१३ या दिवशीही तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सूचनापत्र देऊन संपर्क साधला असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. दि.०३-०७-२०१३ च्या पत्रासोबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी मागितलेली कागदपत्रेही पाठविली आहेत. सामनेवाले यांनी दि.१७-०६-२०१३ रोजी पत्र पाठवून तक्रारदार यांच्याकडे या कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याशी कोणताही संपर्क साधल्याचे व त्यांना विमा दावा मंजुरीबाबत निर्णय कळविल्याचे दिसून येत नाही.
सामनेवाले यांनी दि.१७-०६-२०१३ रोजी तक्रारदार यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी त्यांचा विमा दावा मंजुरीसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सुचविले आहे. याच पत्राचा संदर्भ घेऊन तक्रारदार यांनी दि.०३-०७-२०१३ च्या पत्रासोबत कागदपत्रांची पूर्तता केली आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता, त्यात तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेल्या नोंदी आणि पॉलिसीतील नोंदी जुळत असल्याचे दिसून येते. पॉलिसीत नमूद केल्यानुसार विमा पॉलिसीचा कालावधी दि.११-१०-२०१२ ते दि.१०-१०-२०१३ असा असल्याचे दिसून येते. तर एकूण विमा रकमेची किंमत रु.१२,००,०००/- असल्याचे दिसून येते. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीत ती रक्कम मागितली आहे. सामनेवाले यांच्या दि.१७-०६-२०१३ च्या पत्रावरुन निष्कर्ष काढल्यास, तक्रारदार यांचा ट्रक चोरीस गेला असून त्याबाबत तक्रारदार हे विमा दाव्याची रक्कम मागत आहेत आणि तक्रारदार यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विमाकंपनी ती रक्कम देण्यास तयार आहे असा निष्कर्ष निघतो. याचाच अर्थ तक्रारदार हे मागत असलेली विमा दाव्याची रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार असून ती रक्कम देण्यास ते तयार आहेत असाही अर्थ निघतो. तथापि, तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सामनेवाले हे रकम देण्यास टाळाटाळ करीत आहेत असेही दिसून येते. दि.१७-०६-२०१३ रोजीच्या पत्रानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याशी कोणताही संपर्क साधल्याचे आणि त्यांना विमा दावा मंजुरीबाबत कोणताही निर्णय कळविल्याचे दिसून येत नाही. यावरुन तक्रारदार यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे या मंचाचे मत बनले आहे.
वरील विवेचनाचा विचार करता, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून ट्रकची विमा पॉलिसी काढली होती, तक्रारदार यांचा ट्रक चोरीस गेला आहे, तक्रारदार हे त्या ट्रकचा विमा दावा सामनेवाले यांच्याकडून मागत आहेत, सामनेवाले हे सदर विमा दावा देण्यास जबाबदार आहेत, सामनेवाले हे सदर विमा दाव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत हे स्पष्ट होते. म्हणूनच तक्रारदार हे त्यांची विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे आमचे मत बनले आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि दाखल केलेला लेखी युक्तिवाद यावर सामनेवाले यांनी हजर झाल्यावर कोणताही खुलासा दाखल केलेला नाही. तथापि, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता आणि वरील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे त्यांच्या चोरीस गेलेल्या ट्रकची विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत आणि सामनेवाले ती रक्कम देण्यास जबाबदार आहेत, असे मंचाचे मत बनले आहे. तथापि, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम देण्याचे नाकारलेले नाही. त्याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी समोर आणलेला नाही. सामनेवाले हे रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत, एवढया कारणावरुन तक्रारदार हे या मंचात तक्रार घेऊन आले आहेत. सामनेवाले यांनी विमा दावा नाकारल्यामुळे त्यांना या मंचात यावे लागले, असे म्हणता येणार नाही. याचाच अर्थ तक्रारदार हे स्वत:हून या मंचात आले आहेत. म्हणूनच तक्रारदार यांना मानसिक आणि शारीरिक त्रासापोटीची भरपाई आणि तक्रारीचा खर्च देणे उचित होणार नाही असे आम्हाला वाटते. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(२) सामनेवाले यांनी, या आदेशाच्या प्राप्तीपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदार यांना त्यांच्या चोरीस गेलेल्या ट्रकच्या विमा दाव्याची रक्कम विमा पॉलिसीप्रमाणे १२,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये बारा लाख मात्र) अदा करावी.
(३) उपरोक्त आदेश कलम (२) मधील रक्कम मुदतीत न दिल्यास, संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ टक्केप्रमाणे व्याजासह रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
धुळे.
दिनांक : २०-११-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (श्री.व्ही.आर.लोंढे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.