निकाल
(घोषित दि. 15.09.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार या टाका तालुका अंबड जि.जालना येथील रहिवाशी असून शेती करतात. त्यांचे पती कारभारी खुशालराव गितखाने यांचा मृत्यू दिनांक 18.01.2013 रोजी वाहन अपघातात झाला. वरील घटनेची नोंद गुन्हा रजिस्टर क्रमांक 01/2013 अन्वये गोंदी पोलीस स्टेशन तालुका अंबड येथे झालेली आहे. कारभारी गितखाने यांना वैद्यकीय उपचारासाठी अपेक्स हॉस्पीटल, औरंगाबाद येथे भरती करण्यात आले. तेथून दिनांक 18.01.2013 रोजी औषध उपचार करुन घरी आणले असता त्याच दिवशी रात्री सुमारे 09.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
कारभारी गितखाने हे शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी महाविद्यालयीन सेवकांची सहकारी पतपेढी यात गैरअर्जदार विमा कंपनीकडे स्वत:चा रुपये 5,00,000/- चा विमा उतरविला होता. वरील पॉलीसीचा कालावधी दिनांक 20.07.2012 ते 19.07.2013 असा होता. तक्रारदारांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्या नंतर दिनांक 01.03.2013 रोजी चेअरमन यांच्या मार्फत तक्रारदारांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे आवश्यक कागदपत्रासहीत विमा प्रस्ताव दाखल केला. त्या नंतर सुमारे एक वर्षा नंतर गैरअर्जदार कंपनीने दिनांक 26.02.2014 रोजी पत्र पाठवून कळविले की, दवाखान्याच्या डिस्चार्ज कार्ड वरुन डिस्चार्ज घेताना रुग्णाची स्थिती चांगली होती असे दिसते. मृत्यू हा दवाखान्यातून डिस्चार्ज घेतल्या नंतर झालेला आहे. त्यामुळे कारभारी गितखाने यांचा मृत्यू अपघातात झालेल्या जखमांशी संबंधित नाही असे कारण दाखवून प्रस्ताव नाकारला. प्रत्यक्षात कारभारी गितखाने यांचा मृत्यू दिनांक 18.01.2013 रोजी झालेला अपघातामुळेच झालेला आहे. पोलीसांनी वरील प्रकरणात चार्जशिट दाखल करतांना देखील अज्ञात आरोपी विरुध्द कारभारी खुशालराव गितखाने यांना अपघातात गंभीर जखमी केले व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाले असे आरोप केले आहे व भा.द.वि कलम 304 (अ) अन्वये देखील गुन्हा नोंदविला आहे. असे असतांना विमा कंपनीने अपघातग्रस्त व्यक्ती अपघाताने मरण पावलेली नाही असे कारण देवून खोटेपणाने तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर केलेला आहे. ही गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत केलेली त्रुटी आहे. म्हणून तक्रारदार विनंती करतात की, त्यांना विमा रक्कम रुपये 5,00,000/- 9 टक्के व्याजासहीत मिळावेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत गैरअर्जदारांचे विमा नाकारल्याचे पत्र, मयताचा वाहन चालवण्याचा परवाना, महाविद्यालयीन सेवकांची पतपेढी यांनी गैरअर्जदार यांच्या नावाने दिलेले पत्र, विमा पॉलीसीची कव्हरनोट, एस.टी.सी क्रमांक 310/2013 यातील सर्व कागदपत्रे, तसेच मोटार अपघातात दावा क्रमांक 308/2013 चा नि.5 वरील आदेश, अपेक्स हॉस्पीटल यांचे मेडीको लिगल प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. जबाबात शवविच्छेदन अहवाल व इतर कागदपत्रांच्या अभावी कारभारी गितखाने यांचा मृत्यू अपघातात झालेला होता ही गोष्ट ते नाकारतात. अपेक्स हॉस्पीटलच्या डिस्चार्ज कार्डवर, “Patient was stable, conscious and he was taking full oral diet”. असे नमूद केले आहे. तसेच रुग्णाचा मृत्यू दवाखान्यातून सुट्टी दिल्या नंतर झालेला आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदारांनी तक्रारदारांचा दावा नाकारला ही सेवेतील कमतरता होत नाही. रुग्णाचा मृत्यू अपघाती होता हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदारांची आहे ती त्यांनी पार पाडलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, गैरअर्जदारांचा जबाब व दाखल कागदपत्र यांच्या अभ्यासा वरुन मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.तक्रारदार गैरअर्जदारांकडून विमा
रक्कम मिळण्यास पात्र आहे का ? होय
2.काय आदेश ? अंतिम आदेश नुसार
तक्रारदारातर्फे विव्दान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदारांतर्फे विव्दान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – दाखल कागदपत्रात विमा पॉलीसीची कव्हरनोट आहे. त्यावरुन श्री.कारभारी गितखाने यांचा रुपये 5,00,000/- साठीचा विमा गैरअर्जदार विमा कंपनी यांचेकडे दिनांक 20.07.2012 ते 19.07.2013 या कालावधीसाठी काढल्याचे स्पष्ट होते ते गैरअर्जदारांनी नाकारलेले नाही. गैरअर्जदार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव मृत्यू अपघाती झाल्याचे सिध्द होत नाही या एकाच कारणाने नाकारलेला दिसतो. अपेक्स हॉस्पीटल यांच्या मेडीको लिगल प्रमाणपत्रात कारभारी गितखाने यांना दिनांक 30.12.2012 रोजी त्यांच्या दवाखान्यात Indoor Patient म्हणून भरती केल्याचे दिसते. त्यांना अपघातामुळे छाती, पोट, गळा अशा अनेक ठिकाणी गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असल्याचे त्यात नमूद केले आहे. एस.टी.सी क्रमांक 310/2013 मधील चार्जशीट वरुन आरोपी सोमनाथ यांच्या विरुध्द “दिनांक 30.12.2012 रोजी बबन मस्के व कारभारी गितखाने यांच्या मोटार सायकलला इनोव्हा कारने धडक दिली व दोघांनाही गंभीर जखमी केले. बबन मस्के हे दिनांक 08.01.2013 रोजी मरण पावले व कारभारी गितखाने हे अपेक्स हॉस्पीटल येथून औषध उपचार करुन घरी आणतांना दिनांक 18.01.2013 रोजी मरण पावले व या दोघांच्याही मृत्यूस आरोपी कारणीभूत आहे” असे नमूद केल्याचे दिसते. मा.मोटार अपघात प्राधिकरण यांनी दावा क्रमांक 308/2013 चा नि.5 वरील आदेशात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केले आहे. केवळ शवविच्छेदन झालेले नाही म्हणून तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू अपघाताने झालेला नाही असे म्हणता येणार नाही असे मंचाला वाटते.
अपेक्स हॉस्पीटल यांचे प्रमाणपत्र, एस.टी.सी. नंबर 310/2013 मधील चार्जशीट, घटनास्थळ पंचनामा व मृत्यू प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांवरुन कारभारी गितखाने यांचा मृत्यू दिनांक 30.12.2012 रोजी झालेल्या मोटार अपघातामुळे झाला आहे असे दिसते. अशा परिस्थितीत शवविच्छेदन झालेले नाही व त्यामुळे अपघाती मृत्यू झाला हे सिध्द होत नाही या कारणाने विमा दावा नाकारुन गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केली आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांना विमा रक्कम रुपये 5,00,000/- 9 टक्के व्याजासह देणे उचित ठरेल असे मंचाला वाटते.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना विमा रक्कम रुपये 5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लाख फक्त) विमा नाकारल्याच्या दिवसा पासून म्हणजे दिनांक 26.02.2014 पासून तक्रारदारांना रक्कम प्राप्त होई पर्यंच्या कालावधीसाठी 9 टक्के व्याज दरासहीत द्यावी.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.