न्या य नि र्ण य
(दि.22-08-2024)
व्दाराः- मा. श्री.अरुण रा.गायकवाड, अध्यक्ष
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दाव्याची अंशत: रक्कम अदा करुन सामनेवाला यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदयाअंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. सदर तक्रारदार संस्था बँकींग स्वरुपाची कामे करते. तक्रारदार संस्थेच्या गुहागर, चिपळूण, दापोली, भरणे येथे शाखा असून प्रधान कार्यालय खेड येथे आहे. श्री शशांक सदानंद बुटाला हे तक्रारदार संस्थेचे शाखा/वसुली अधिकारी असूनसदरची तक्रार दाखल करण्याचे अधिकार दि.12/06/2023 रोजी सभेच्या ठराव क्र.10 अन्वये दिलेले आहेत.
2. तक्रारदार संस्था गेली अनेक वर्षे अग्नी वगैरे (FIRE ALLIED PERILS) आपत्ती पासून तक्रारदार संस्थेच्या जिवीताचे व स्थावर व जंगम मालमत्तेचे संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने विमा घेत आलेली आहे. त्याप्रमाणे तक्रारदार संस्थेचे प्रधान कार्यालयासह तिच्या सर्व शाखांचा मिळून दि.01-04-2021 ते 31/03/2022 पर्यंतच्या कालावधीसाठी जीएसटीसह प्रिमियमची रक्कम रु.12,51,185/- भरणा करुन विमा घेतलेला असून त्याचा पॉलिसीचा नं.1709014821160000 0001 असा आहे. तक्रारदार संस्थेची शाखा चिपळूण येथील चिंच नाक्यात असून ती कृष्णाजी कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये अप्पर ग्राऊंड फ्लोअरवर कार्यान्वीत आहे. दि.22 व 23 जुलै-2021 रोजी चिपळूण शहरात अतिवृष्टी झाल्याने महापुराचे पाणी तक्रारदार पतसंस्थेच्या शाखेत घुसल्याने सदर शाखेतील सर्व फर्निचर, स्टेशनरी, संगणक, प्रिंटर्स, तिजोरी इत्यादी सर्व साहित्य पाण्याखाली गेल्याने तक्रारदार पतसंस्थेचे सुमारे बारा लाखाचे फर्निचर व फिटिंग खराब झाले आहे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, संगणक, एसी, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रिंटर, रंगकाम इत्यादीचे सुमारे रु.7,88,500/- चे असे एकूण रक्कम रु.19,88,500/- चे नुकसान झालेले आहे. याबाबत शासनाने प्राथमिक पंचनामे करुन माहिती घेतली असून सामनेवाला विमा कंपनीमार्फत सर्व्हेअर यांनी पाहणी करुन त्यांचा सर्व्हे रिपोर्ट विमा कंपनीकडे दिलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीला वेळोवेळी त्यांचे मागणीप्रमाणे नुकसानग्रस्त साहित्याची बीले व अन्य कागदपत्रे सादर केलेली आहेत. असे असताना सामनेवाला विमा कंपनीने केवळ रक्कम रु.75,000/- इतकी नाममात्र रक्कम तक्रारदार पतसंस्थेच्या खात्यात वर्ग केली आहे. त्याबाबत तक्रारदाराने आक्षेप नोंदवून दिलेली नुकसान भरपाई मान्य नसल्याचे सामनेवाला विमा कंपनीला कळविले. त्यानंतर विमा कंपनीने तक्रारदाराचे सदर क्लेमपोटी दि.23/12/2021रोजी आणखी रक्कम रु.1,87,141/- तक्रारदार पतसंस्थेच्या खात्यात वर्ग केले. अशाप्रकारे सामनेवालांनी तक्रारदारास क्लेमपोटी नुकसान झालेल्या रक्कमेच्या 10 % म्हणजे एकूण रक्कम रु.2,62,141/- इतकी नाममात्र रक्कम अदा केलेली आहे. तक्रारदाराने सदरची नुकसान भरपाई मान्य नसलेचे सामनेवाला विमा कंपनीला लेखी कळविले. परंतु त्याबाबत सामनेवाला यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. म्हणून तक्रारदाराने दि.31/03/2023 रोजी वकीलामार्फत लेखी नोटीस पाठविली. सदरची नोटीस मिळूनदेखील सामनेवाला यांनी सदर नोटीसला कोणतेही उत्तर दिलेले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा दिलेने सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदारास सामनेवाला यांचेकडून मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम रु.2,62,141/- वजा जाता उर्वरित रक्कम रु.17,26,359/- मिळणेबाबत आदेश व्हावेत. तसेच तक्रारदारास मनस्तापापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,00,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने आयोगास केली आहे.
3. तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.5 कडील कागदयादीने एकूण 20 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसी, वकीलामार्फत दि.31/03/2023 रोजी पाठविलेली नोटीस, पोष्टाची पावती, नोटीस पोहोचलेची पोष्टाची पोहोच पावती, पंचयादी पंचनामा, दि.27/07/21 रोजीचे सामनेवालास पाठविलेले पत्र, सामनेवालांचा दि.12/08/21रोजीचा ई-मेल, विमा दाव्याची रक्क्म जमा केलेबाबतचा सामनेवालाचा ई-मेल, दि.14/09/21 रोजीचा सामनेवालचा ई-मेल, वस्तुचे दि.27/09/21 रोजीचे कोटेशन बील, पुरात खराब झालेल्या वस्तुची फेरतपशील यादी, रक्कम रु.1,87,141/- क्लेम मंजूर केलेबाबतचा सामनेवालांचा ई-मेल, तक्रारदाराने सामनेवालास दि.14/12/21रोजी जमा रक्कम नामंजूर असलेबाबतचे पत्र, रक्कम रु.1,87,141/- क्लेम रक्कम जमा केलेबाबतचा सामनेवालाचा ई-मेल, तक्रारदाराने नवीन घेतलेल्या वस्तुंचे दि.10/05/2022 रोजीचे कोटेशन व बील, सामनेवालाकडे कागदपत्र मागणीचा केलेल्या दि.23/07/22 व दि.25/07/22 रोजीच्या अर्जाची प्रत, सामनेवाला यांना दिलेले स्मरणपत्र, पुरात खराब झालेल्या वस्तुंचे एकूण 6 फोटो, ठरावीच प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.13 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.15 तक्रारदार तर्फे साक्षीदार श्री सुनिल मधुकर खेडेकर यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल, नि.16 कडील कागदयादीने एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये प्रसाद स्केल कंपनीचे पत्र, चिले एन्टरप्राईजेसचे पत्र, क्लासिक सिस्टम्सचे पत्र, तक्रारदार संस्थेचे फर्निचर खतावणी रजिस्टर उतारा, जितू फर्निचर योचेकडील उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.17 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.25 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. नि.26 कडील कागदयादीने एकूण 8 पॉलिसीच्या प्रती दाखल केल्या आहेत.
4. प्रस्तुत कामी सामनेवाला वकीलांमार्फत हजर होऊन नि.10 कडे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा व खोडसाळ असलेने सामनेवालास मान्य व कबूल नसलेने तो खर्चासह फेटाळण्यात यावा असे कथन केले आहे. सामनेवाला पुढे सांगतात की, सामनेवाला यांनी मिलींद मोडक या सर्व्हेअर मार्फत पहिल्यांदा तक्रारदारांच्या दुकानातील झालेल्या नुकसानीबाबतचा सर्व्हे केला. त्यामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु जसे की, कॉम्प्युटर, पैसे मोजण्याचे मशीन, इन्व्हर्टर बॅटरी, सोने वजन करण्याचा काटा, लाईट फिटींग, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर या सर्वांचे मुल्य तसेच त्यावरील घसारा व त्याची नुकसानी याबाबींचा विचार करता व रिपोर्टनुसार रु.2,62,141/- एवढी नुकसान भरपाईची रक्कम दोन हप्त्यामध्ये म्हणजे दि.12/08/21 रोजी रक्कम रु.75,000/- व दि.25/07/22 रोजी रु.1,87,141/- तक्रारदारांना अदा केलेली आहे. सर्व्हेअर श्री मिलींद मोडक यांनी पहिल्यांदा फर्निचरचे मुल्यांकन करत असताना तक्रारदाराचे म्हणणेनुसार फर्निचरचे एकंदर रु.12,58,174/- इतके मुल्य होते. परंतु सदर फर्निचरच्या खरेदीबाबत कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे उपलब्ध खरेदी बीलांनुसार त्याचे मुल्यांकन रु.2,60,000/- एवढे केले होते. मात्र सर्व्हेअर श्री मोडक यांनी दि01/09/2023 रोजी दुस-यांदा Revised Survey Report सामनेवाला यांचेकडे सादर केला. त्यामध्ये रु.7,00,457/- एवढे फर्निचरचे वाढीव मुल्यांकन केल्याचे दिसून येते. त्यामुळे नुकसान भरपाईमध्ये झालेली वाढीव रक्कम रु.3,92,913/- सामनेवाला यांनी दि.01/11/2023 रोजी तक्रारदार यांचे ॲक्सेस बँकेच्या खातेवर जमा केले आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारांना वेळोवेळी 3 हप्त्यांमध्ये नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम म्हणजेच रु.6,55,468/- अदा केलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी तहसिलदारसो, चिळपूण यांनी केलेली पंचयादीतील मजकूराचे अवलोकन करता त्यामध्ये रक्कम रु.21,00,000/- एवढे इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झालेबाबत नमुद आहे. परंतु सदरचे मुल्यांकन कशाचे आधारे व कसे केले तसेच कोणत्या वस्तु होत्या याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. तक्रारदाराने कागदयादीतील अनु नं.15 येथे नविन घेतलेल्या वस्तुंचे कोटेशन व बीले हजर केली आहे. परंतु सदरची बीले व कोटेशन हे पुराच्या तारखेनंतर खरेदी केल्याबाबतची असून बहूतांश बीले तक्रारदार यांच्या खेड शाखेशी संबंधीत असल्याचे दिसून येते. तक्रारदार यांच्या चिपळूण शाखेसाठी मूळात कोणत्या वस्तु घेतल्या होत्या हे दाखविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदाराने कागदयादीतील अनु.नं.19 येथे हजर केलेल्या फोटोच्या शाबीतीसाठी सर्टिफिकेट दाखल केलेले नाही. सदरचे कागदपत्रे खोटे व खोडसाळ असून पश्चात बुध्दीने नंतर तयार केलेली आहेत. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
5. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.12 कडील कागदयादीने एकूण 7 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये श्री सॅमसन जॉन यांना दिलेल्या अधिकारपत्राची प्रत, दि.12/08/21 रोजी रुपये 75,000/- तक्रारदारास अदा केलेची पेमेंट रिसीट, दि.25/07/22रोजी रु.1,87,141/- तक्रारदारास अदा केलेची पेमेंट रिसीट, दि.01/11/2023 रोजी रुपये 3,92,913/- तक्रारदाराचे ॲक्सीस बँकेत जमा केलेचे स्टेटमेंट, सर्व्हेअर श्री मोडक यांना रुपये15,784/- चे पेमेंट केलेची पावती, सर्व्हेअर श्री मोडक यांचा दि.23/11/21 रोजी व दि.01/09/2023 रोजी तक्रारदार यांचा दिलेला मुल्यांकन अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.19 कडे सर्व्हेअर श्री मोडक यांचा दि.23/1121 व 01/09/23 रोजीचा तक्रारदार यांचा मुल्यांकन अहवाल व श्री मोडक यांना रक्कम रु.18,626/- अदा केलेची पेमेंट रिसीट, तसेच सामनेवाला बँकेचा ॲक्सिस बँकेचा दि.01/11/23 रोजीचा खातेउतारा इत्यादी कागदपत्रांच्या व्हेरिफाईड प्रती दाखल केल्या आहेत. नि.22 कडे सरतपसाचे प्रतिज्ञापत्र दाखल, नि.23 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल. नि.27 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
6. वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे म्हणणे,दाखल कागदपत्रे व व उभयतांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? | होय. |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईची अंशत: रक्कम अदा करुन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न–
मुद्दा क्रमांकः 1 ते 3 –
7. तक्रारदार यांनी नि.26 कडे दाखल केलल्या सामनेवाला यांचेकडील पॉलिसींचे अवलोकन करता तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून सन-2015 पासून योग्य तो प्रिमियम भरुन पॉलिसी घेत आहेत. सदरची बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेली असून उभयतांमध्ये त्याबाबत कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला विमा कंपनी ही सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
8. तक्रारदार संस्थेच्या चिपळूण येथील शाखेत दि.22 व 23 जुलै-2021 रोजी अतिवृष्टी झाल्याने महापुराचे पाणी घुसल्याने सदर शाखेतील सर्व फर्निचर, स्टेशनरी, संगणक, प्रिंटर्स, तिजोरी इत्यादी सर्व साहित्य पाण्याखाली गेल्याने तक्रारदार पतसंस्थेचे सुमारे रक्कम रु.12,00,000/- चे फर्निचर व फिटिंग खराब झाले आहे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, संगणक, एसी, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रिंटर, रंगकाम इत्यादीचे सुमारे रु.7,88,500/- चे असे एकूण रक्कम रु.19,88,500/- चे नुकसान झालेने तक्रारदार यांनी दि.27/07/21 रोजी सामनेवाला विमा कंपनीकडे विमा दावा केला. सदरचे पत्र तक्रारदाराने नि.5/6 कडे दाखल केले आहे. सदर विमा दाव्यापोटी सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.12/08/21 रोजी रक्क्म रु.75,000/- अदा केलेबाबतचा पाठविलेला ई-मेलची प्रत तक्रारदाराने नि.5/8 कडे दाखल केली आहे. तसेच नि.5/14 कडे दि.23/12/21 रोजी रक्क्म रु.1,81,141/- अदा केलेबाबतचा पाठविलेल्या ई-मेलची प्रत तक्रारदाराने नि.5/14 कडे दाखल केली आहे. तक्रारदार यांना सदरची रक्कम अमान्य असलेने तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.31/03/2023 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली. सदरची नोटीस तक्रारदाराने नि.5/1 कडे दाखल केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा दाव्याचा तिसरा हप्ता रक्कम रु.3,92,913/- दि.01/11/2023 रोजी अदा केलेला आहे. म्हणजेच तक्रारदारास सामनेवाला यांचेकडून विमा दाव्यापोटी रक्कम रु.6,55,054/- अदा केलेले आहेत. सदरची बाब तक्रारदारास मान्य आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हे रिकव्हरी करता येणा-या प्रकारातील असल्यामुळे तसेच सोने वजन काटा हा सुस्थितीत असल्यामुळे दोन्हींचे मुल्य नुकसान भरपाईमध्ये धरण्यात आलेले नाहीत असे नमुद केले आहे. परंतु तक्रारदार यांनी नि.16/1 कडे प्रसाद स्केल कंपनीचे दि.26/07/21 रोजीचे पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये सदर हेक्सा स्केल कंपनीचा इलेक्ट्रॉनिक सोने वजन काटा पूर्णणे खराब झाल्याचे व परत वापरता येण्यासारखा नसलेचे कथन केले आहे तसेच नि.16/2 कडे दाखल केलेल्या चिले एंटरप्राईजेसचे दि.26/07/21रोजीचे पत्रामध्ये सर्वर बंद पडून हार्डडिस्कमध्ये पाणी आणि चिखल गेला असलेने सॉफ्टवेअर बंद पडलेले आहे असे नमुद आहे. तसेच 16/3 कडे क्लासिक सिस्टीमचे दि.26/07/21 रोजीचे पत्राचे अवलोकन करता तक्रारदारांचे डेल कंपनीचे तीन संगणक सेट पुराच्या पाण्यामध्ये पूर्णपणे खराब झाले असलेने डाटा रिकव्हर होण्यासारखा नाही. तसेच झेरॉक्स प्रिंटर, व पासबुक प्रिंटर, थम मशीन, पूर्णपणे भिजून व गाळ जाऊन खराब झाले आहेत व ते वापरण्यासारखे नाहीत असे नमुद केलेले आहे. यावरुन तक्रारदाराचे चिपळूण शाखेतील दोन कॉम्प्युटर-प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, इंटरनेट फिटींग, नेट मॉडेम, स्टेशनरी, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक सोने तारण वजन काटा या सर्व वस्तु खराब झालेल्या आहेत हे तक्रारदाराने दाखल केलेल्या फोटोवरुन स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे खराब झालेले दोन कॉम्प्युटर-प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, इंटरनेट फिटींग, नेट मॉडेम, स्टेशनरी, कॉम्प्युटर सॉफ्रटवेअर, इलेक्ट्रॉनिक सोने तारण वजन काटा यांचे मुल्यांकनातुन घसारा वजा जाता उर्वरित रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदारास न देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा दिलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. परंतु सदर वस्तुंची योग्य रक्कम ठरविणेकरिता तक्रारदार यांनी या आयोगासमोर कोणतेही कागदपत्रे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे सामनेवाला यांचे सर्व्हेअर यांनी दि.01/09/2023 रोजी दिलेल्या सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे तक्रारदारास 2 कॉम्प्युटर-प्रिंटरची रक्कम रु.50,000/- सीसीटीव्ही कॅमे-याची रक्कम रु.75,000/-, इंटरनेट फिटींगची रु.9,000/-, नेट मॉडेमची रु.5,000/-, सोने तारण वजन काटा रु.20,945/- स्टेशनरीचे रु.50,000/- व कॉम्प्युटर सॉर्फटवेअरचे रु.3,20,000/- अशी एकूण रक्कम रु.5,29,945/- होते. सदर रक्कमेवर 50% घसारा वजा जाता होणारी एकूण रक्कम रु.2,64,972/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर या आयोगाने होकारार्थी दिले आहे.
8 सबब तक्रारदार हे सामनेवाला विमा कंपनीकडून तक्रारदाराच्या चिपळूण शाखेचे सन-2021चे महापुरामुळे झालेली नुकसानीपोटी फर्निचरची नुकसान भरपाईची रक्कम रु.6,55,054/- सामनेवाला यांनी तक्रारदारास अदा केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला यांचेकडून दोन कॉम्प्युटर-प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, इंटरनेट फिटींग, नेट मॉडेम, स्टेशनरी, कॉम्प्युटर सॉफ्रटवेअर, इलेक्ट्रॉनिक सोने तारण वजन काटा यांची होणारी नुकसानीची होणारी रक्कम रु.2,64,972/-मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.15,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्रदा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांकः 4 –
10. सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदार यांना दोन कॉम्प्युटर-प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा, इंटरनेट फिटींग, नेट मॉडेम, स्टेशनरी, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक सोने वजन काटाची नुकसानीची होणारी रक्कम रु.2,64,972/- (रुपये दोन लाख चौसष्ट हजार नऊशे बहात्तर फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % दराने व्याज अदा करावे.
3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-
(रुपये पंचवीस हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत सामनेवाला यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.