निकाल
दिनांक- 13.06.2013
(द्वारा- श्रीमती माधूरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे शाखेमध्ये दि.23.06.10 रोजी 12 महिने मुदतीकरीता रु.1,00,000/- द.सा.द.शे.10.5 टक्के व्याजदराने मुदतठेव पावती क्र.05961 अन्वये तसेच मुदतठेव पावती क्र.05960 अन्वये रु.60,000/- ठेवले आहेत.
तक्रारदारांच्या मुदतठेव पावत्यांची मुदत दि.23.06.2011 रोजी संपुष्टात आली असल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पैशाची मागणी केली. परंतू गैरअर्जदार क्र.1 यांनी रक्कम न देता पावत्यांची मुदत दि.23.06.13 पर्यंत वाढवून दिली.
तक्रारदारांनी वेळोवेळी तोंडी व लेखी पत्राद्वारे मुदत ठेवीच्या रकमेची मागणी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे करुनही अद्याप पर्यंत रक्कम अदा केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द ‘नो से ‘ चा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे मुदतठेव योजने अंतर्गत मुदतठेव पावती क्र.05960 अन्वये रु.60,000/- तसेच मुदतठेव पावती क्र.05961 अन्वये रु.1,00,000/- एवढी रक्कम दि.26.06.10 रोजी ठेवली आहे. सदर मुदतठेव पावतीची मुदत दि.23.06.12 रोजी संपुष्टात आल्यानंतर दि.23.06.13 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
तक्रारदारांनी दि.07.05.12 रोजीच्या पत्रान्वये गैरअर्जदार यांचेकडे शस्त्रक्रियेसाठी सदर पैशाची आवश्यकता असल्यामुळे मागणी केल्याचे दिसून येते. परंतू गेरअर्जदार यांनी तक्रारदारांना सदर रक्कम अदा न करता मुदतठेव पावतीची मुदत दि.23.06.13 पर्यंत वाढवून दिल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकउे मुदतठेव योजने अंतर्गत ठेवलेली रक्कम त्यांचे स्वतःकरीता वापरण्याचा हक्क व अधिकार आहे. तसेच गैरअर्जदार बँकेने तक्रारदारांची रक्कम आवश्यकतेनुसार तक्रारदारांना अदा करणे बंधनकारक आहे. गैरअर्जदार बँकेची सदरची कृती सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारीत दाखल पुराव्यानुसार तक्रारदार वयोवृध्द असून औषधोपचारा करिता ता.28.11.2011 पासून अनेक वेळा मुदतठेव अंतर्गत जमा असलेल्या रक्कमेची मागणी केली. परंतू गैरअर्जदार बँकेने सदर रक्कमा अदा न करता मुदतठेव पावतीचा कालावधी तक्रारदारांची इच्छा नसूनही वाढवून दिला आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांना मुदतठेव पावती क्र.05960 अंतर्गत जमा असलेली रक्कम रु.60,000/- तसेच मुदतठेव पावती क्र.05961 अंतर्गत जमा असलेली रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.10.5 टक्के व्याज दराने ता.23.06.2010 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यत गैरअर्जदार बँकेने देणे न्यायोचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना व्यक्तीगतरित्या व संयूक्तीकरित्या
आदेश देण्यात येतो की, मुदतठेव पावती क्र.05960 अन्वये
जमा असलेली रक्कम रु.60,000/- (अक्षरी रुपये साठ हजार
फक्त) तसेच मुदतठेव पावती क्र.05961 अन्वये जमा असलेली
रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त)
ता.23.06.2010 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यत
द.सा.द.शे.10.5 टक्के व्याज दराने होणा-या व्याजासहीत द्यावी.
2) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच
तक्रारदाराला परत करावेत.
3) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड