निकाल
दिनांक- 27.08.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार श्री.दत्तात्रय काकासाहेब ढोले यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला नं.1 व 2 यांनी सेवेत त्रुटी केली म्हणून नुकसान भरपाई मिळावी व रक्कम रु.4,50,000/- ही तक्रारदार यांची मासिक प्राप्ती योजनेत जमा करण्याचे आदेश व्हावे व त्याचा फायदा मिळावा यासाठी केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे सेवानिवृत्त झालेले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 बँकेमध्ये त्याचे बचत खाते क्रमांक 067/0002990 दि.01.01.2001 रोजी उघडलेले असून तक्रारदार हे त्या खात्यातून त्याचे दैनंदिन व्यवहार करीत असतात. तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनी रक्कम रु.4,50,000/- मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत सामनेवाला क्र.2 यांच्याकडे गुंतविण्याचे ठरविले. तक्रारदार यांनी दि.25.08.2011 रोजी सामेनवाला क्र.2 यांना सामनेवाला क्र.1 यांच्याकडे असलेल्या बचत खात्याचा धनादेश क्रमांक 002343 दि.25.08.2011 रोजी दिला व त्याचप्रमाणे मासिक प्राप्ती योजनेबाबत आवश्यक असणारे सर्व कागदपत्र, अर्ज याची पुर्तता केली.
तक्रारदार यांनी मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी खात्यात रक्कमेची तरतुद करुन ठेवलेली होती व ती रक्कम सामनेवाला क्र.1 यांच्याकडे असलेल्या अकाऊंटमध्ये जमा होती. सामनेवाला क्र.2 यांनी दिलेला चेक त्यांनी वटविण्यासाठी सामनेवाला क्र.1 बँकेकडे पाठविला, तो धनादेश दि.09.09.2011 रोजी तक्रारदाराच्या खात्यात वटण्यासाठी आला. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचे खात्यातून चेकमधील रक्कम काढून घेतल्याबाबत नोंद केली. अशाप्रकारे तक्रारदार यांच्या खात्यातून रक्कम रु.4,50,000/- सामनेवाला यांनी चेक अन्वये काढल्याचे दाखवले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे सदरील रक्कम त्यांच्या खाती जमा झाली किंवा नाही? याबाबत विचारणा केली, सामनेवाला क्र.2 यांनी योग्य ती माहिती दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवावी लागली. सामनेवाला क्र.1 यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांच्या खात्यातून कमी केली असताना सुध्दा ती रक्कम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविली नाही. तक्रारदार हे ग्राहक असून सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी सेवा देण्यास त्रुटी व निष्काळजीपणा दाखविलेला आहे. तक्रारदार यांना मिळणा-या लाभापासून वचित ठेवलेले आहे. सबब तक्रारदार यांची मागणी की, सामनेवाला क्र.2 यांनी दि.25.08.2011 पासून अर्जदार यांना मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत सर्व फायदे देण्यात यावे. तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सेवेत त्रुटी ठेवल्याबाबत तक्रारदार यांना जो मानसिक व शारिरिक त्रास झाला, त्यापोटी रक्कम रु.50,000/- देण्यात यावे, व तक्रारीचा खर्च रु.10,000/- देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.
सामनेवाला क्र.1 तर्फे अड.पंडीत हे मंचापूढे हजर झाले. परंतू त्यांनी मुदतीत लेखी म्हणणे दिले नाही, अगर पुराव्याचे कामी शपथपत्र व कागदपत्र हजर केले नाही. सामनेवाला क्र.1 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
सामनेवाला क्र.2 वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, जेव्हा चेकद्वारे रक्कम जमा करण्यात येते त्यावेळेस एक नमुना अर्ज (Pay in slip) भरुन द्यावा लागतो व त्यासोबत एका स्लिपवर नमुना स्वाक्षरी द्यावी लागते. तो चेक प्रथम तपासणीसाठी एस बी असिस्टंटकडे द्यावा लागतो व तशी पावती चेक जमा करणा-यास दिली जाते. जर चेक हा स्थानिक बँकेचा असेल तर संबंधित पोस्ट ऑफीस चेकची रक्कम जमा करुन घेते. अर्जाचा फॉर्म आणि Pay in slip त्यांच्याकडे जमा करुन घेतली जाते व चेक रक्कम वसूलीसाठी संबंधित बँकेकडे पाठविली जाते. संबंधित बँकेकडून रक्कम आल्यानंतर नियमाप्रमाणे खाते उघडले जाते व रक्कम जमा केल्याची नोंद पासबूकमध्ये नोंदविली जाते. तक्रारदार यांना जेव्हा चेक बँकेतून पास होऊन येईल तेव्हा तक्रारदाराच्या नावे खाते उघडून चेक नियमाप्रमाणे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे कळविले होते. तक्रारदार यांच्या नावे आष्टी येथे मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत खाते उघडण्यात आले नव्हते, तसेच चेक हा बँकेत वटला नाही, सदरील रक्कम पोस्ट ऑफीसच्या खात्यावर वर्ग झाली नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी कोणतीही सेवेत कसूर केलेली नाही. सेवेतील कसूरीबाबत बँक जबाबदार आहे. सामनेवाला क्र.2 यांनी चेक वटविण्यासाठी सामनेवाला क्र.1 बँकेकडे पाठविला, ती रक्कम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे जमा न झाल्याने तक्रारदार यांचे खाते उघडता आले नाही. सबब सामनेवाला क्र.2 यांची विनंती की, त्यांचेविरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व सोबत दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री.देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.2 यांचे शपथपत्र व सोबत दाखल केलेले कागदपत्राचे अवलोकन केले. सामनेवाला क्र.2 चे प्रतिनिधी यांनी युक्तीवाद केला.
न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला क्र.1 यांनी, तक्रारदार यांना सेवा देण्यास
त्रुटी केली आहे, ही बाब तक्रारदार यांनी सिध्द केली
आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी केलेली दाद
मिळण्यास पात्र आहे काय? होय. सामनेवाला 1 विरुध्द
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 3 ः- तक्रारदार यांचे साक्षी पुरावा व सोबत दाखल केलेले दस्तऐवज याचे अवलोकन करता, तक्रारदार हे शिक्षक होते व ते सेवानिवृत्त झाले. तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग लावावा व त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये ती रक्कम कामी यावी म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत रक्कम रु.4,50,000/- मुदतठेवीत ठेवून त्यावर मिळणा-या व्याजाची मासिक प्राप्ती मिळावी या हेतुने रक्कम गुंतविण्याचे ठरविले. सामनेवाला क्र.1 बँकेत तक्रारदार यांचे खाते क्रमांक 067/0002990 उघडलेले होते. सदरील खात्यामध्ये रु.4,50,000/- एवढी रक्कम शिल्लक होती, सदरील रक्कम मासिक प्राप्ती योजनेमध्ये गुंतवून त्याचा लाभ घेण्याचे तक्रारदार यांनी ठरविले. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांच्याकडे मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी गेले. तक्रारदार यांनी योग्य तो अर्ज भरुन दिला व सामनेवाला क्र.2 यांच्याकडे रक्कम रु.4,50,000/- चा धनादेश दिला, तो धनादेश सामनेवाला क्र.2 यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद आष्टी जिल्हा बीड यांचे मार्फत रक्कम मिळणे कामी पाठविला. सदरील चेक हा तक्रारदार यांचे खाते सामनेवाला क्र.1 यांच्या बँकेचा होता, त्या खात्यातील सदरील चेक सामनेवाला क्र.2 यांच्याकडे वटण्यासाठी आला. सामनेवाला क्र.1 यांनी तो चेक वटविण्यासाठी मिळाल्यानंतर तक्रारदार यांच्या खात्यातील रक्कम दि.09.09.2011 रोजी चेक नं.002343 अन्वये ट्रान्सफर केल्याचे दाखविले व तशी नोंद तक्रारदार यांच्या खाते उता-यात करण्यात आली. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या खात्यातून सदरील रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे असे दाखविले असले तरी प्रत्यक्षात ती रक्कम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे वर्ग करण्यात आली नाही. त्यासंबंधी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांनी दाखल केलेला उतारा हजर केला आहे. सदरील बाब लक्षात घेता असे निदर्शनास येते की, सामनेवाला क्र.1 यांच्याकडे चेक वटविण्यासाठी आला असता त्यांनी तो चेक वटवला आहे असे दाखवून तक्रारदार यांच्या खात्यातून सदरील रक्कम चेकने काढून घेण्यात आली आहे अशी नोंद करुन सुध्दा ती रक्कम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे तक्रारदार यांनी उघडलेल्या मासिक प्राप्ती योजना खात्यामध्ये जमा करण्यास पाठविली नाही. सामनेवाला क्र.2 यांची सदरील कृती ही तक्रारदार यांचे नुकसान व्हावे व त्यांची फसवणूक व्हावी अशा दृष्टीने केलेली दिसते.
सामेनवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या खात्यातून रक्कम काढली आहे असे दर्शविले परंतू ती रक्कम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे वर्ग केली नाही. सदरील कृती ही सेवेत त्रुटी ठेवणारी आहे, व तक्रारदार यांचे नुकसान करण्याच्या हेतुने केलेली आहे ही बाब सिध्द होते. सामनेवाला क्र.1 यांनी या मंचापूढे हजर होऊन कोणताही पुरावा दिला नाही, अगर लेखी म्हणणे दिले नाही. यावरुन सामनेवाला क्र.1 यांचा हेतू तक्रारदार यांना फसविण्याचा होता ही बाब सिध्द होते. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी सेवा देण्यास त्रुटी ठेवली आहे व त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले आहे. तक्रारदार यांचे मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत खात्यामध्ये सदरील रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे तक्रारदार हे त्यांना मिळणा-या फायद्यापासून वंचित राहीलेले आहे.
सामनेवाला क्र.2 यांचा पुरावा व कथन विचारात घेता सामनेवाला क्र.1 यांना तक्रारदार यांनी दिलेले चेक सामनेवाला क्र.2 कडे वटविण्यासाठी पाठविला आहे व ती रक्कम जमा झाल्यानंतर तक्रारदार यांचे मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत खात्यात जमा करुन लाभ देण्याचे ठरले होते. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना दिलेला चेक सामनेवाला क्र.1 यांच्याकडे पाठविला तो चेक वटवून सामनेवाला क्र.1 यांनी रक्कम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे वर्ग केली नाही. म्हणून तक्रारदार यांच्या खाती रक्कम जमा झाली नाही व त्याला फायदा मिळाला नाही. सदरील बाबीचा विचार करता सामनेवाला क्र.2 यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केली आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झालेले आहे.
संपूर्ण कागदपत्राचे व पुराव्याचे अवलोकन केले असता या मंचाचे असे मत पडते की, सामनेवाला क्र.1 शाखाधिकारी, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा आष्टी यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यास त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांनी दिलेली त्यांच्या खात्यातील चेकची रक्कम काढून घेतलेली आहे असे दर्शवून ती रक्कम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे वर्ग केली नाही व त्यामुळे तक्रारदार हे मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत मिळणा-या फायद्यापासून वंचित राहीलेले आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांच्या विरुध्द दाद मिळण्यास पात्र आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या खात्यातील रक्कम रु.4,50,000/- सदरील चेकद्वारे विनाविलंब सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविण्यात यावी, व तसे केल्याबाबत तक्रारदार यांना कळविण्यात यावे. सामनेवाला क्र.2 यांनी सदरील रक्कम मिळाल्यानंतर तक्रारदार यांचे मासिक प्राप्ती योजनेच्या खात्यात जमा करावी व तक्रारदार यांना त्याचा लाभ द्यावा.
तक्रारदार यांना मासिक प्राप्ती योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला त्यापोटी सामनेवाला क्र.1 यांनी रक्कम रु.10,000/- व खर्चापोटी रु.5,000/- द्यावे. सबब, मंच मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.1 यांना असे आदेश देण्यात येते की, त्यांनी रक्कम
रु.4,50,000/- (अक्षरी रु.चार लाख, पन्नास हजार) आदेश प्राप्त
झाल्यापासून 30 दिवसाचे आत सामनेवाला क्र.2 यांच्याडे वर्ग
करावी. सामनेवाला क्र.2 यांनी सदरील रक्कम मिळाल्यानंतर
तक्रारदार यांच्या मासिक प्राप्ती योजनेअंतर्गत खात्यात जमा करुन
तक्रारदार यांना लाभ द्यावा.
3) सामनेवाला क्र.1 यांनी, तक्रारदारास दिनांक 09.09.2011 पासून ते
पैसे वर्ग करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे.
4) सामनेवाला क्र.1 यांनी, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक
त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/-
द्यावे.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड