::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/01/2016 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले,यांचे अनुसार : -
1) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ता क्र. 1 व 2 हे स्वाद्वाद एज्युकेशन सोसायटी, अनसिंग, रजि.नं. एफ 70, चे पदसिध्द अनु्क्रमे सचिव व अध्यक्ष आहेत. संस्थेच्या माध्यमातून महाविद्दयालय व शैक्षणीक कामे सुरु आहेत व संस्थेचे आर्थिक व्यवहार होण्याकरिता विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांच्या नांवाने खाते क्र. 202154 दिनांक 14/10/2006 पासुन सुरु आहे. त्यामुळे तक्रारकर्ते हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत.
परंतु विरुध्द पक्ष यांनी गेल्या दिड वर्षापासुन, कोणतीही पुर्वसुचना तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांना न देता, कोणत्याही न्यायालयाचे आदेश नसतांना परस्पर त्यांचे संयुक्त खाते गोठविले. त्यानंतर तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे खाते का गोठविले व व्यवहार का बंद केले याबद्दल लेखी अर्ज सादर केले. परंतु विरुध्द पक्ष यांनी त्या विनंतीची कोणतीही दखल घेतली नाही व संयुक्तीक खुलासा दिला नाही. परिणामत: खात्यात जमा असलेली अंदाजे 35,000/- रक्कम संस्थेच्या विकास कामी वापरता आली नाही. तसेच खाते गोठविल्यामुळे संस्थेला लोकांकडून दानाच्या/ देणगीच्या स्वरुपात, धनादेशाव्दारे, धनाकर्षाव्दारे मिळणारी रक्कम स्विकारता आली नाही, त्यामुळे संस्थेचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यास विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे संयुक्तरित्या जबाबदार आहेत. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे, दिनांक 19/04/2014 व 22/04/2014 रोजी विरुध्द पक्षांना वकिलामार्फत रजिष्टर्ड नोटीस देण्यात आली. नोटीस प्राप्त होवूनसुध्दा विरुध्द पक्षाने मागणीप्रमाणे पुर्तता केली नाही किंवा त्या नोटीसीला कोणतेही ऊत्तर दिले नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्षाच्या सेवेतील न्युनतेमुळे व तक्रारकर्ते यांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली ती पुढीलप्रमाणे . . . . . .
1) सेवेत न्युनता ठेवल्याबद्दल 2,00,000/- रुपये
2) सुविधा न दिल्याबद्दल 1,00,000/- रुपये
3) मानसिक त्रासाबद्दल 1,00,000/- रुपये
4) शारीरिक त्रासाबद्दल 50,000/- रुपये
5) तक्रारीचा खर्च व झालेल्या खर्चाबद्दल 50,000/- रुपये
तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन विनंती केली की, विरुध्द पक्षाकडून एकूण 5,00,000/- नुकसान भरपाई मिळण्याचा आदेश व्हावा व विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेकडे सुरु असलेले खाते क्र. 202154 हे पुर्ववत सुरु करण्याचा आदेश व्हावा तसेच तक्रारकर्ते यांच्या हितावह योग्य दाद देण्यात यावी.
सदर तक्रार तक्रारकर्त्यांनी प्रतिज्ञापत्रावर केली व दस्तऐवज यादीप्रमाणे एकूण 06 दस्त सोबत दाखल केलेली आहेत.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब : - विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ने त्यांचा संयुक्त लेखी जबाब (निशाणी 11 ) दाखल करुन, बहुतांश विधाने नाकबूल केली आहेत. जबाबातील अधिकचे कथनात नमुद केले त्याचा थोडक्यात आशय असा की, स्वाद्वाद एज्युकेशन सोसायटी, अनसिंग, रजि.नं. एफ 70, या संस्थेचे खाते क्र. 202154 हे विरुध्द पक्ष यांच्या बँकेकडे आहे. सदरहू खात्यामध्ये संस्थेचा व्यवहार हा सुरळीत चालू होता परंतु संस्थेचे अध्यक्ष श्री.धर्मचंद्र कुंडलसा वाळली (जैन) अध्यक्ष यांनी दिनांक 09/02/2013 रोजीच्या नोटीस व सुचनेप्रमाणे संस्थेच्या सर्व खात्यामधील बँकींग व्यवहार त्वरीत बंद करण्याबाबतच्या दिलेल्या नोटीसवजा पत्रावरुन त्याचे खात्यामध्ये अपव्यवहार चालू आहेत, असे सुचित करण्यात आले होते. तरी ही बँकेने त्याची कोणतीही दखल न घेता बँकेच्या खात्यामध्ये व्यवहार ज्या ज्या वेळी केले त्या त्या वेळी त्याची नोंद घेण्यात आली आहे. दिनांक 09/02/2013 चे तक्रारीनंतर सुध्दा दिनांक 31/05/2013 रोजी बँक खात्यामध्ये रुपये 25,000/- रोख जमा केल्याची नोंद आहे. त्यानुसार स्पष्ट होते की, बँकेने आपल्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता ठेवली नाही. इतकेच नव्हे तर वेळोवेळी जमा रकमेवर व्याजसुध्दा देण्यात आलेले आहे. सदरहू संस्थेचे खाते हे सुरळीत चालू होते व आजही चालू आहे. दिनांक 09/02/2013 रोजीच्या नोटीस व सुचनेबाबत पत्राची प्रत प्रकरणात दाखल करीत आहोत. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी कोणत्याही प्रकारचा कायद्याचा भंग केलेला नाही. सर्व शासकीय व्यवहार सुध्दा विरुध्द पक्षाच्या बँकेमार्फत केल्या जातात. सदरहू स्वाद्वाद एज्युकेशन सोसायटी, अनसिंग यांचे कार्यकारी मंडळाचे पदाबाबत अंतर्गत वाद चालू असून त्याबाबत न्यायालयामध्ये ब-याच केसेस प्रलंबीत आहेत. या गोष्टीचा फायदा घेवून तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना सदरहू प्रकरणामध्ये खोडसाळपणे व परिस्थीतीजन्य चा गैरफायदा घेवून गुंतविण्याचा प्रयत्न केला आहे. करिता तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी केलेला तक्रारअर्ज हा प्रत्येकी रुपये 5,000/- नुकसान भरपाई म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना देण्याबाबातच्या आदेशासह खारिज करण्यात यावा.
3) या प्रकरणात मुळ तक्रारअर्जा मध्ये प्रतीपक्ष म्हणून सामिल करण्याबाबत निशाणी-16 प्रमाणे धर्मचंद्र कुंडलसा वाळली यांच्यातर्फे वकिलामार्फत अर्ज करण्यात आला. सदरहू अर्ज दिनांक 26/10/2015 चे आदेशाप्रमाणे नामंजूर करण्यात आला.
4) कारणे व निष्कर्ष ः-
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला.
सदर प्रकरणात उभय पक्षाला हे मान्य आहे की, तक्रारकर्ते क्र. 1 व 2 हे विरुध्द पक्ष बँकेचे ग्राहक असुन, त्यांचे विरुध्द पक्ष क्र. 1 च्या बँकेत खाते क्र. 202154 हे आहे. तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी कोणतीही पुर्वसुचना न देता किंवा कोणत्याही न्यायालयाचे आदेश नसतांना परस्पर तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांचे संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले संयुक्त खाते गोठविले, त्यामुळे आर्थिक नुकसान झाले. ही विरुध्द पक्षाची सेवा न्युनता आहे, त्यामुळे तक्रारकर्ते यांनी मंचाला अशी विनंती केली की, तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांचे प्रकरण मंजूर होवून मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासाबद्दल विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी रुपये 5,00,000/- नुकसान भरपाई दयावी व विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेकडे असलेले खाते क्र. 202154 हे पुर्ववत सुरु करुन देण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्ते यांनी अंतरिम अर्ज दाखल केला असून, त्याची सुचना विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना मिळूनही त्यांनी कोणतेही निवेदन या अंतरिम अर्जावर सादर न केल्याने मा. सदस्य, ग्राहक मंच, वाशिम यांनी दिनांक 19/08/2014 रोजी, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर खाते हे प्रकरणात जबाब दाखल करेपर्यंत नियमीत व पुर्ववत सुरु करावे, असे अंतरिम आदेश पारित केले होते. पुढे प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी लेखी जबाब दाखल केला व अंतरिम आदेशाची पुर्तता करुन तक्रारकर्ते क्र. 1 व 2 यांचे खाते क्र. 202154 हे पुर्ववत सुरु करुन दिले.
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या दस्तांवरुन, जो युक्तिवाद केला, त्यात मंचाला तथ्य आढळले, कारण या दाखल दस्तांवरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते संस्थेचे अध्यक्ष श्री. धर्मचंद्र कुंडलसा वाळली व या प्रकरणातील सदस्य सचिव व सदस्य अध्यक्ष ( तक्रारकर्ते क्र.1 व 2 ) यांचे आपसी वाद असून त्यांचे अनेक वाद वेगवेगळया न्यायालयात दाखल आहेत, त्यामुळे श्री. धर्मचंद्र कुंडलसा वाळली यांनी विरुध्द पक्षाला दिलेल्या नोटीस मुळे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्ते / संस्थेचे सदर खाते गोठविले होते, परंतु मंचाच्या अंतरिम आदेशान्वये ते त्यांनी सुरु केलेले आहे. त्यामुळे यात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा कोणताही वाईट हेतू, तक्रारकर्ते क्र.1 व 2 यांनी कागदोपत्री मंचात सिध्द न केल्याने, प्रार्थनेतील नुकसान भरपाई तक्रारकर्ते यांना देता येणार नाही. सबब तक्रार मंजूर करता येणार नाही. म्हणून अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
::: अं ति म आ दे श :::
१) तक्रारकर्ते यांची तक्रार खारिज करण्यांत येते.
२) न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारित नाही.
3) उभय पक्षास आदेशाची प्रत निशुल्क दयावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri