ग्राहक तक्रार क्र. 130/2014
अर्ज दाखल तारीख : 07/07/2014
अर्ज निकाली तारीख: 02/07/2015
कालावधी: 0 वर्षे 11 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. संकल्प पब्लिसिटी,
प्रोप्रायटर - संजय विजयकुमार मैंदर्गी,
वय - 38 वर्षे, धंदा – व्यापार,
रा. तुळजापूर ह.मु. समता कॉलनी,
उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
भारतीय स्टेट बँक,
शाखा, बस स्थानक जवळ, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधिज्ञ : श्री.देवीदास वडगांवकर.
विप तर्फे विधिज्ञ : श्री.पी.डी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा
अ) 1. विरुध्द पक्षकार (विप) बँकेकडील आपल्या खात्यात डिसीसी बँकेचे दोन चेक जमा केल्यानंतर ते जनता बँकेत पाठवून त्यातील रकमांपासून तक्रारकर्ता (तक) याला वंचित करुन सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक ने ही तक्रार विप विरुध्द केली आहे.
2. तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. तक तुळजापूरचा रहिवाशी असून उस्मानाबाद येथे जाहिरात एजंन्सी चालवितो. जिचे नाव ‘’संकल्प पब्लिसीटी’’ असे आहे. विप बँकेत एजंन्सीच्या नावाने चालू खाते क्र.30826942270 असून स्वत:चे नावे बचत खाते क्र.11289522299 असे आहे. त्यामुळे तक विप चा ग्राहक आहे. ग्रामपंचायत पाडोळी यांनी कामाचा मोबदला म्हणून तक ला उस्मानाबाद डिसीसी बँक पाडोळी शाखेचे धनादेश क्र.004513 रु.2,705/- दि.14/01/2013 आणि 00414 रु.4,161/- दि.14/01/2013 संकल्प पब्लीसीटी या नावाने दिले. तक ने विप कडील त्या खात्यात जमा करण्यासाठी ते धनादेश दि.17/01/2013 रोजी विप च्या डब्यात टाकले. मात्र विप कडील खात्यात धनादेशाची रक्कम जमा झाली नाही. तक ने विप कडे वारंवार धनादेशाबद्दल चौकशी केली दि.31/03/2014 पर्यंत वीस वेळा तक ने विप कडे अशी चौकशी केली पण विप तर्फे कोणताही प्रतीसाद देण्यात आला नाही व तक ला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.
3. शेवटी दि.12/05/2014 रोजी विप ने तक ला पत्र दिले व कळविले की खात्यामध्ये रक्कम नसल्यामुळे धनादेश परत आले. ते सोबत जोडले. धनादेश हाताळण्याची रक्कम रु.150+150/- अशी तकच्या खात्यात नावे टाकली. तक ने चौकशी केल्यावरुन ग्रामपंचायतने दि.12/05/2014 चे पत्र देऊन कळवले की डिसीसी बँकेच्या त्यांच्या खात्यात धनादेश वटवण्यापुरती रक्कम होती. बँकेचा खाते उतारापण ग्रामपंचायतने पाठवला. तक ने दि.17/01/2013 रोजीच उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचा धनादेश क्र.492664 रु.37992/- चा विप कडे वटविण्यासाठी जमा केला होता. ती रक्कम विप कडील खात्यात जमा झालेली आहे. वादातील धनादेश सुध्दा विप ने डिसीसी बँकेकडे न पाठवता जनता बँकेकडे पाठवले त्यामुळे जनता बँकेने ते धनादेश आपलेकडील नसल्याच्या कारणावरुन परत पाठवले. मात्र विप ने दि.17/01/2013 पासून धनादेश योग्य त्या बँकेत न पाठवता स्वत:कडे ठेऊन घेतले. शेवटी दि.12/05/2014 रोजी चुकीचे कारण नमूद करुन धनादेश परत पाठवले. अशा प्रकारे विप ने सेवेत त्रुटी केली आहे. वीस वेळा तक ने विप कडे धनादेशाची चौकशी केली असता विप ने टाळाटाळ केली व मानसिक त्रास दिला. प्रत्येक वेळेस रु.2,000/- प्रमाणे रु.40,000/- मानसिक त्रासाबद्दल विप कडून मिळणे जरुर आहे. धनादेशांची रक्कम तक ला दि.17/01/2013 पासून मिळाली नाही त्यामुळे चालू खात्यावरील व्याज द.सा.द.शे.18 दराने मिळणे जरुर आहे तसेच जर रक्कम मिळाली असती तर त्या पासून तक ला रु.7,000/- चा लाभ झाला असता. ती रक्कम मिळणे जरुर आहे या तक्रारीचा खर्चा रु.5,000/- तक ला मिळणे जरुर आहे. हाताळणीचा खर्च रु.300/- विप ने तक च्या नावे टाकला तो मिळणे जरुर आहे. या रकमा मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दि.07/07/2014 रोजी दाखल केलेली आहे.
4. तक ने तक्रारीसोबत दि.17/01/2013 रोजी विप कडे दाखल केलेल्या तीन धनादेशाच्या पावत्या हजर केल्या आहेत त्यावर विप चे सही शिक्का नाही. त्यानंतर 26 वेगवेगळया तारखांना विप कडे रकमा जमा केल्याबद्दल पावत्या हजर केल्या आहेत. त्यापैकी फक्त एका पावतीवर विप चा सही शिक्का आहे. ग्रामपंचायतचे दि.04/06/2014 चे पत्र व ग्रामपंचायत बँक खात्याचा उतारा ग्रामविकास अधिका-याने सत्यापन केलेला हजर केला आहे. विप चे दि.12/05/2014 चे पत्र हजर केले आहे. युक्तिवादासोबत तक ने विविध संस्थांनी पब्लिसीटी साठी तक ला रकमा दिल्याबद्दलच्या पावत्या हजर केल्या आहेत. तसेच विवादीत चेकच्या झेरॉक्स प्रती हजर केल्या आहेत.
ब) विप ने हजर होऊन लेखी म्हणणे दि.21/11/2014 रोजी दाखल केलेले आहे. धनादेश संकल्प पब्लीसीटीचे असल्या कारणाने व अर्जदाराचे चालू खाते असल्याकारणाने ही तक्रार चालणार नाही असे विप ने म्हंटले आहे. तक चे खाते असल्याबद्दल वाद नाही. तक ने धनादेश जमा केल्याबद्दल वाद नाही. वादातील धनादेश अनावधानाने उस्मानाबाद जनता सहकारी बँक उस्मानाबाद यांचेकडे वटण्यासाठी गेले. विप यांचे निदर्शनास हि बाब आल्यावर विप ने दिलगीरी व्यक्त करुन धनादेश वटवण्याची हमी दिली. मात्र तक ने ते धनादेश विप कडे आणले नाही. विप ने सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. ज्या तारखांना तक विप कडे आला होता त्या तारखांना त्याने धनादेशाची चौकशी केली नाही. तो इतर कामाकरीता विप बँकेत आला होता. विप तक यांना कोणत्याही प्रकारची रक्कम देणे लागत नाही त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) तक ची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे तसेच विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
1. विप कडे तक चे चालू खाते व बचत खाते आहे तक सदर खात्यामधून रकमा काढतो व ठेवतो त्या रकमांवरच विप चा व्यवसाय चालतो. चेक जमा व नावे टाकणे फी घेऊन करतो म्हणून तक हा विप चा ग्राहक आहे. तक विप चा ग्राहक नाही असे विप चे म्हणणे नाही. ग्रामपंचायत पाडोळीने उस्मानाबाद डिसीसी बँकेचे धनादेश रु.2,705/- व रु.4,164/- चे दि.14/01/2013 चे तक ला दिले होते याबद्दल ही वाद नाही. ते धनादेश तक च्या संकल्प पब्लीसीटी या फर्मच्या नावे दिल्याचे दिसते. तक हा त्या फर्मचा सोल प्रोप्रायटर असल्याबद्दल वाद नाही. त्या फर्मचे विप कडे चालू खाते आहे. तक ने विप चे ड्रॉप बॅाक्समध्ये ते दोन चेक टाकले व अशा प्रकारे विप कडे जमा केले ते विप ला कबूल आहे. तक ने त्याबद्दल स्लिप तयार केल्या त्यावर दि.17/01/2013 अशी तारीख टाकलेली आहे. त्या स्लिपवर विप चा सही शिक्का नाही कारण चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकले होते. चेक मिळाल्याबद्दल विप ची तक्रार नाही. चेक वटल्यानंतर त्या रकमा तक चे चालू खात्यात जमा व्हायला पाहिजे होत्या तशा त्या जमा झाल्या नाहीत या बद्दल ही वाद नाही.
2. ग्रामपंचायत पाडोळीने खात्यात रकमा नसतांना जर तक ला चेक दिले असते तर चेक परत येणे स्वाभाविक होते. दि.12/05/2014 चे विप चे पत्राप्रमाणे अशा प्रकारे खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे चेक परत आले होते. चेक ची हाताळणी फी रु.150/- अधिक 150/- विप ने तक चे खात्यात नावे टाकली. विप चा हा स्टॅण्ड चुकीचा आहे हे दाखाविण्यासाठी तक ने ग्रामपंचायत पाडोळीचे दि.04/06/2014 चे पत्र हजर केले आहे सोबत ग्रामपंचायत चे डिसीसी कडील खात्याचा उतारा पण हजर केलेला आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतच्या खात्यात प्रस्तूत वेळी पुरेशी रक्कम होती खात्यात पैसे नसल्यामुळे चेक परत येण्याचा प्रश्न उदभवलेला नाही. विप ने त्याबद्दल दिलेले पत्र तद्दन चुकीचे आहे. तक ने पुढे म्हंटले आहे की विप ने ते चेक डिसीसी बँकेकडे न पाठवता जनता सहकारी बँकेकडे पाठवले. विप ने आपल्या म्हणण्यामध्ये ही बाब कबूल केलेली आहे मात्र लेखी युक्तिवादामध्ये असा स्टँण्ड घेतला की डीसीसी बँकेचे व्यवहार गोठवण्यात आल्यामुळे डिसीसी बँकेचे चेक क्लिअर होऊ शकलेले नाहीत. हे खरे आहे की तक ने परत आलेल्या चेकच्या झेरॉक्सप्रती हजर केल्या त्याच्या पाठीमागील शेरे अस्पष्ट आहेत. मात्र ते जनता बँकेचे असावेत असे दिसते. शिवाय विप ने लेखी म्हणण्यात आपली वरील चूक कबूल केलेली आहे.
3. चेक उशीरा दाखल केले अशी विप ची केस नाही. ते दि.17/01/2013 रोजी जमा करण्यात आले असावेत त्याच दिवशी जनता बँकेचा रु.37,192/- चा चेक तक ने विप कडे दाखल केला तो जनता बँकेकडे जाऊन वटल्यामुळे ती रक्कम तक च्या खात्यात जमा झाली असे तक चे म्हणणे आहे. विप चा त्याबद्दल काहीही वाद नाही. वादातील चेक सुध्दा त्याच चेक सेाबत विप कडून जनता बँकेकडे पाठविल्याचे दिसते. ते चेक चुकीने आल्याबद्दल जनता बँकेने विप ला ताबोडतोब कळविणे जरुर होते त्यानंतर विप ने ते चेक डिसीसी बँकेकडे पाठविणे जरुर होते असे काहीही न होता सव्वा वर्षानंतर विप ने तक ला पत्र दिले व खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे वादातील चेक परत आले असे चुकीचे कळवले तसेच हाताळणीची फी तक च्या खात्यात नावे टाकल्याचे कळवले वस्तुत: ग्रामपंचायतचे खात्यामध्ये प्रस्तुत वेळी दीड लाखापेक्षा अधक रक्कम जमा होती केवळ विप चे निष्काळजीपणामुळे तक ला चेकची रक्कम मिळू शकलेली नाही. विप ने निष्काळजीपणाने वादातील डीसीसी बँकेचे चेक जनता बँकेकडे पाठवले जनता बँकेकडून चेक परत आल्यानंतर त्यावरील कारणाची शहानिशा न करता तक ला चुकीचे कळवले की चेक खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे परत आलेले आहेत. विप चे चुकीमुळे तक ला चेकचे पैसे मिळू शकले नाहीत व उलट वटणावळ त्याच्या खात्यात नावे टाकली अशा प्रकारे विप ने सेवेत त्रुटी केलेली आहे.
4. विप चे कैफियतीत म्हंटले की विप ने तक ला पुन्हा चेक वटवण्याची हमी दिली. दि.12/05/2014 नंतर चेक टाईमबार झाले असणार ग्राम पंचायत पोडोळीने तक ला पुन्हा नवे चेक देणे हा पर्याय होता. कदाचित तो अवलंबला असेल अगर इतर मार्गाने तक ला ग्रामपंचायतकडून येणे रक्कम मिळालेली असेल कारण तक ने चेकच्या रकमेची विप कडून मागणी केलेली नाही. मात्र किमान सव्वा वर्ष विप ने चेक बद्दल मैान बाळगून तक चे रु.27,05/- अधिक रु.4,164/- त्याला मिळून दिले नाहीत. तक चे म्हणणे आहे की वीस तारखांना त्याने विप कडे जाऊन वादातील चेक बद्दल दि.31/03/2014 पर्यंत चौकशी केली संबंधीत तारखांना तक ने चेक वगैरे विप कडे जमा केले हे दाखविण्यास पावत्या हजर केल्या आहेत. त्यापैकी फक्त एकाच पावतीवर विप चा सही शिक्का आहे म्हणजेच इतर चेक सुध्दा ड्रॉपबॅाक्समध्ये टाकले असणार मात्र विप कडे व्यवहारासंबंधाने जाऊन वादातील चेक संबंधी तक ने चौकशी करणे नैसर्गीकच आहे. वीस तारखांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल प्रत्येकी रु.2,000/- ची मागणी तक ने केली ती अवास्तव वाटते. हे खरे आहे की जस जसे महिने निघून गेले तस तशी वादातील चेबद्दलची तक ची चिंता वाढत गेली असणार या उलट विप कडून समाधानकारक खुलासे दिलेले नसणार त्यामुळे तक ला मानसिक त्रास झाला हे उघड आहे. तक चे म्हणणे आहे की वादातील चेक च्या रकमा मिळाल्या असत्या तर त्याचा व्यवसायात वापर करुन त्याला रु.7,000/- चा लाभ झाला असता. हे म्हणणे सुध्दा अवाजवी वाटते मात्र ती रक्कम व्यवसायात लाऊन तक ला नक्कीच काही लाभ भ झाला असता तो सुमारे रु.2,000/- धरता येईल. वीस तारखांच्या मानसिक त्रासाबद्दल तक रु.4,000/- मिळण्यास पात्र आहे तसेच तक च्या नावे टाकलेले रु.300/- परत मिळण्यास तो पात्र आहे. तसेच तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यास तक पात्र आहे असे आमचे मत आहे म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते
1) विप ने तक ला भरपाई म्हणून रु.6,300/-(रुपये सहा हजार तीनशे फक्त) द्यावे.
2) विप ने तक ला वरील रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 दराने व्याज द्यावे.
3) विप ने तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..