जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 691/2010.
तक्रार दाखल दिनांक : 18/11/2010.
तक्रार आदेश दिनांक : 06/01/2014. निकाल कालावधी: 03 वर्षे 01 महिने 19 दिवस
शशिकांत गोविंद रोकडे, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. कोठाळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
ब्रँच मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया, गोधेश्वर ब्रँच,
गोधेश्वर, ता. मोहोळ, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.जी. शहा
विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी मौजे कोठाळे, ता. मोहोळ येथील गट नं.119, क्षेत्र 2 हे. 66 आर. शेतजमीन श्री. लक्ष्मण रामचंद्र रोकडे यांचेकडून दुय्यम निबंधक, सोलापूर यांच्या नोंदणीकृत दस्त क्र.1048/2008 द्वारे खरेदी केलेली असून ते प्रस्तुत शेतजमिनीचे मालक आहेत. प्रस्तुत शेतजमिनीवर विरुध्द पक्ष बँकेचा रु.50,000/- रकमेचा बोजा असून त्याची परतफेड करण्यास तक्रारदार तयार आहेत. तक्रारदार यांनी लेखी अर्ज देऊन रक्कम भरण्याची तयारी दर्शवली असता विरुध्द पक्ष यांनी जमीन विक्रत्याने रु.50,000/- अतिरिक्त कर्ज घेतल्याचे व त्याचा बोजा जमिनीवर असल्याचे सांगितले. विरुध्द पक्ष यांची मागणी बेकायदेशीर असून नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरिता नकार देण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे रु.50,000/- व्याजासह स्वीकारुन मालमत्ता हक्काचे अभिलेखावरुन बोजा कमी करण्यासाठी नादेय प्रमाणपत्र देण्यात यावे आणि मानसिक त्रास, तक्रार खर्च व नुकसान भरपाईकरिता रु.65,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर उचित संधी देऊनही ते मंचासमोर उपस्थित झाले नाहीत आणि लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
3. तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिल्याचे सिध्द होते काय ? नाही.
2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 :- तक्रारदार यांनी श्री. लक्ष्मण रामचंद्र रोकडे यांचेकडून खरेदी केलेल्या गट नं.119, क्षेत्र 2 हे. 66 आर. शेतजमिनीवर विरुध्द पक्ष बँकेचा रु.50,000/- रकमेचा बोजा असल्याचे तक्रारदार यांना मान्य असून ते त्या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यास तक्रारदार तयार आहेत. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी लेखी अर्ज देऊन रक्कम भरण्याची तयारी दर्शवली असता विरुध्द पक्ष यांनी जमीन विक्रत्याने रु.50,000/- अतिरिक्त कर्ज घेतल्याचे व त्याचा बोजा जमिनीवर असल्याचे सांगितल्याचे व विरुध्द पक्ष हे बेकायदेशीर मागणी करीत असून त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरिता नकार दिल्याची तक्रार आहे.
5. प्रामुख्याने, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीवर श्री. रामचंद्र चोकोबा रोकडे यांना विरुध्द पक्ष यांनी कर्ज दिले असून दि.23/1/2009 पर्यंत रु.1,31,736/- देय असल्याचे प्रमाणपत्र अभिलेखावर दाखल आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे दिलेल्या लेखी अर्जामध्ये कै. लक्ष्मण रामा रोकडे यांनी थकीत कर्जाची परतफेड न केल्यामुळे प्रस्तुत गट क्र.119 वर थकीत असलेले रु.50,000/- कर्ज भरण्याची तयार दर्शविलेली आहे. यावरुन तक्रारदार यांना गट क्र.119 वर थकीत कर्जाची माहिती ज्ञात होती, हे स्पष्टपणे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी गट क्र.119 शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी त्यावर असलेल्या कर्जाची किंवा बोजाची विरुध्द पक्ष यांच्याकडून माहिती घेतली नाही किंवा त्यांना कल्पना दिलेली नाही, हे मान्य करावे लागते. अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन श्री. लक्ष्मण रामचंद्र रोकडे यांच्याकडून शेतजमीन खरेदी केलेली आहे. परंतु बँकेच्या प्रमाणपत्रावरुन श्री. रामचंद्र चोखा रोकडे यांच्या कर्जाकरिता शेतजमीन गहाण असल्याचा उल्लेख आहे. तक्रारदार यांनी आपली तक्रार सिध्द करण्याकरिता बँकेसंदर्भातील उचित व आवश्यक कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली नाहीत. एका अर्थाने, तक्रारदार हे आपली तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरलेले आहे.
6. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविलेली आहे. नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर उपस्थित होऊन त्यांचे लेखी म्हणणे दाखल करण्याचा व तक्रारीचे खंडन करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. अशी वस्तुस्थिती असली तरी तक्रारदार हे आपली तक्रार सक्षमपणे सिध्द करण्यास असमर्थ ठरलेले आहेत, हे स्पष्ट होते आणि तक्रारीचा गुणवत्तेवर निर्णय देत असताना विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नसल्यामुळे तक्रारदार यांची तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात आलेले आहे. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/6114)