::: निकालपञ:::
(आयोगाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 30/11/2021)
1. अर्जदाराचीप्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंन्वये दाखल केलेली आहे. सदर तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराचे वि प. बँकेत बचत खाते क्र. 31502405633 असून विरुध्द पक्ष बँकेने सदर खात्याला डेबीट कार्ड एटीएम सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. अर्जदाराने सदर एटीएम कार्डद्वारे दिनांक 9/5/2016 रोजी भारत पेट्रोलपंप, गडडीगोदाम, नागपूर येथीलएटीएममधून सकाळी 10.30 ते 11.10 वाजताचे सुमारास रु. 5000/- काढण्याचा प्रयत्न केला, मात्र एटीएम मधून रक्कम निघाली नाही तसेच सदर व्यवहाराबददल पावतीदेखील मिळाली नाही. म्हणून अर्जदाराने तशी ऑनलाईन तक्रार दिनांक 19/5/2016 व 17/9/2016 रोजी वि.प.कडे नोंदविली. विरुध्द पक्ष यांनी तक्रारीची दखल घेवून चौकशी केली परंतु अर्जदाराच्या बँक खात्यातून कमी झालेली रक्कम रु.5000/- त्याच्या खात्यात पुन्हा जमा झाली नाही. सबब अर्जदाराने त्याचे वकीलामार्फत विरुध्द पक्षाला नोटीस पाठवून वजा झालेल्या रकमेची मागणी केली, परंतु वि.प.यांनी पुर्तता न केल्यामुळे अर्जदारानेवि.प.चे सेवेतील न्युनतेबाबत प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे.
3. अर्जदाराची मागणी अशी आहे की त्याच्या बचत खात्यातून वजा झालेली रक्कम रु.5000/- त्याच्या बचत खात्यात जमा करण्याचे वि.प.ना आदेश देण्यांत यावेत तसेच नुकसान-भरपाईपोटी तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरीक व मानसीक त्रासापोटी रक्कम देण्याचे आदेश वि.प. यांना दयावेत.
4. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन विरुध्द पक्षांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष बँकेने प्रकरणात उपस्थीत राहून त्यांचे लेखी उत्तर दाखल करीत प्रकरणातील अर्जदाराचे आरोप खोडून काढीत कथानात पुढे नमूद केले की अर्जदाराने दिनांक 9/5/2016 रोजी भारत पेट्रोलपंप, गडडीगोदाम, नागपूर येथील एटीएमद्वारे रु.5000/- काढण्याचा प्रयत्न केला हे खरे आहे. मात्र ती रक्कम त्याला मिळालीच नाही ही बाब खोटी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सदर रक्कम अर्जदाराला मिळाली नसती तर अर्जदाराने त्याच दिवशी वि.प. बँकेकडे तक्रार नोंदविली असती. मात्र अर्जदाराने याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर वि .प. यांनी मुंबई स्वीच सेंटरच्या ई.जे.लॉग रिपोर्टनुसार सदर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल दाखविण्यात आले असल्यामुळे अर्जदाराला सदर रक्कम रु.5000/- प्राप्त झाली आहे. तसेच तक्रारदाराने ज्या अन्य बँकेच्या एटीएम चा वापर केला, त्या बँकेला प्रस्तूत तक्रारीमध्ये पक्षकार करणे आवश्यक असूनही तसे केलेले नाही व त्यामुळे नॉनजॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टी या सदराखाली तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे. सबब वि प यांनी अर्जदाराप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे सदर तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे सबब ती खारीज करण्यांत यावी, अशी त्यांनी आयोगास विनंती केली आहे.
5. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, वि.प. यांचेलेखी कथन,तसेच उभय बाजूंचे लेखीयुक्तीवादतसेच परस्परविरोधी कथन यांचा आयोगाने सखोल विचार केला असताखालील मुद्दे आयोगाचे विचारार्थ घेण्यात आले.
पुढील प्रमाणेबाबतची कारणमिमांसा व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदारहा वि.प.बँकेंचा ग्राहक आहे काय ? होय
2) विरूध्द पक्ष क्र.1 ने अर्जदाराप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे काय ? : नाही
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १बाबतः-
6. अर्जदाराचे वि प. बँकेत बचत खाते क्र. 31502405633 असून विरुध्द पक्ष बँकेने सदर खात्याला डेबीट कार्ड एटीएम सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे ही बाब वि.प. यांनीदेखील मान्य केली आहे. त्यामुळे अर्जदारहा वि.प. बँकेचा ग्राहक आहे हे सिध्द होते.सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दर्शविण्यांत येत आहे.
मुद्दा क्रं. 2बाबतः-
7. अर्जदाराने त्याचे खात्याचे एटीएम कार्डद्वारे दिनांक 9/5/2016 रोजी भारत पेट्रोलपंप, गडडीगोदाम, नागपूर स्थीत एटीएममधून सकाळी 10.30 ते 11.10 वाजताचे सुमारास रु. 5000/- काढण्याचा प्रयत्न केला याबाबत वाद नाही. मात्र तक्रारीत वि प. यांनी दाखल केलेला दस्तावेज, मुंबई स्विच सेंटर चार्ज इ.जे.लॉग रिपोर्टचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराने दिनांक 9/5/2016 रोजी सकाळी 11.03 वाजता रु.5000/- चे विड्रॅावल केल्याचे नमूद असून सदर व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची नोंद इ.जे. लॉग रिपोर्टमध्ये आहे.
8. मा.राज्य ग्राहक आयोग, दिल्ली यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया विरुध्द पी.एन.सिन्हा या प्रकरणात दिनांक 9/1/2019 रोजी दिलेल्या निवाडयात, मुळ अर्जदाराला एटीएम मधून रक्कम प्राप्त न झाल्याबाबत त्याने कोणतेही दस्तावेजी पुरावे दाखल केले नाहीत. याबाबत अर्जदाराने लगेच संबंधीत बँकेत तक्रार नोंदवावयास हवी होती. मात्र तसे केलेले नाही. मात्र विरुध्द पक्ष बँकेने ई.जे.लॉग हे डॉक्युमेंट दाखल करुन सदर व्यवहार यशस्वीरीत्या पार पडला आहे हे सिध्द केलेले असल्यामुळे तक्रार खारीज करण्यांत येते असा निवाडा दिलेला आहे. तसेच मा.राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांनी सत्यनारायण पांडे –विरूध्द- स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इतर IV (2017) CRJ 199 यातही राष्ट्रीय आयोगाने वरिलप्रमाणे स्पष्ट निरीक्षण नोंदविलेले आहे.
9. प्रस्तूत प्रकरणी, दिनांक 9/5/2016 रोजी सकाळी 11.03 वाजता रु.5000/- चे विथ्ड्रॉवल करण्याचा प्रयत्न केला असता एटीएम मधून रक्कम निघाली नाही तसेच सदर व्यवहाराबददल पावतीदेखील मिळाली नाही म्हणून अर्जदाराने तशी ऑनलाईन तक्रार दिनांक 19/5/2016 व 17/9/2016 रोजी नोंदविली, असे स्वत: अर्जदारानेच तक्रारीत नमूद केलेले आहे. याचाच अर्थ घटनेचे दिवशी ऑनलाईन तक्रार नोंदविणे शक्य असूनही त्याने ती नोंदविली नाही आणी ११ दिवसांचे विलंबानंतर तशी तक्रार नोंदविलेली आहे.
10. प्रस्तूत प्रकरणीदेखील एटीएममधून रक्कम प्राप्त न झाल्याबाबत अर्जदाराने कोणताही दसतावेजी पूरावा दाखल केलेला नाही. उलट स्विच सेंटरच्या जे पी लॉग रिपोर्टमधील नोंदींवरुन सदर रक्कम अर्जदाराला प्राप्त झाली आहे, व सदर व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झालेला आहे असे निदर्शनांस येते. पर्यायाने वि.प.बँकेने कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नसून तक्रारीत तथ्य नसल्याचे कारणास्तव ती खारीज होण्यांस पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.२ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रं. 4 बाबतः-
11. वरील मुद्दा क्र.१व 2 चे विवेचन व निष्कर्षावरून आयोगखालील प्रमाणे आदेश पारीत करीत
आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदारची तक्रार क्र.43/2019 खारीज करण्यांत येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी.आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, चंद्रपूर.