- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 ऑगष्ट 2015)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, आवर्ती बचत खाते क्र. 33826069958 स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा - आष्टी कडून उर्वरीत रक्कम रुपये 20,000/- मिळण्याकरीता दाखल केली. तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा – आष्टी यांचेककडे दि.8.5.2014 ला प्रतिमाह रुपये 25,000/- एक वर्षाच्या मुदतीने आवर्ती बचत खाते उघडले होते. अर्जदार विदेशात नोकरीवर असल्यामुळे अर्जदार व त्यांची पत्नीचे नावाने दोघांचा संयुक्त बचत खाते गैरअर्जदाराचे शाखेत असून त्याचा खाते क्र.31598332310 आहे. या बचत खात्यातून आवर्ती बचत खात्यात रक्कम रुपये 25,000/- प्रत्येक महिण्याला कपात होत होती. आवर्ती खात्याची मुदत दि.8.4.2015 पर्यंत होती. अर्जदार गैरअर्जदाराच्या शाखेत गेले असता, भरलेल्या 12 मासिक किस्तीपैकी फक्त 6 किस्त जमा झाले असल्याचे उर्वरीत रक्कम ही Hold असल्याचे सांगीतले. गैरअर्जदाराकडून एकूण रक्कम रुपये 3,30,000/- मिळू शकली असती परंतु रक्कम Hold झाल्यामुळे तुंम्हाला व्याज मिळणार नाही व दंड सुध्दा तुम्हाला भरावा लागेल असे सांगण्यात आले. अर्जदारास एक वर्षाच्या मुदतीअंती सहा महिन्याची रक्कम Hold झाल्यामुळे मुद्दल रक्कम रुपये 3,10,769/- मिळाले. शाखा व्यवस्थापकाच्या चुकीमुळे झालेली नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे. गैरअर्जदारास दि.25.5.2015 लेखी निवेदन देवून सुध्दा कारवाई केली नाही. त्यामुळे, गैरअर्जदाराकडून उर्वरीत रक्कम रुपये 20,000/- द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह मिळावी, तसेच अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 15,000/- व तक्रार दाखल खर्च रुपये 3000/- मिळावे, अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार यांनी नि.क्र.11 नुसार लेखीउत्तर व नि.क्र.13 नुसार 7 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदार यांनी नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार शेशांद्र उंदिरवाडे व त्यांची पत्नी यांचे गैरअर्जदाराकडे संयुक्त खाते क्र.31598332310 असा आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे दि.8.5.2014 रोती एक वर्षाचे मुदतीकरीता आवर्ती बचत खाते क्र. 33826069958 काढले, या आवर्ती जमा खात्यात दरमहा रुपये 25,000/- त्यांचे संयुक्त बचत खाते क्र.31598332310 मधून दरमहिन्याचे 8 तारखेस वळते करण्याचे गैरअर्जदारास सुचीत केले होते. अर्जदाराचे यांची पत्नीने सुध्दा गैरअर्जदाराचे शाखेमध्ये दि.10.4.2012 रोजी तीन वर्षाचे मुदतीचे आवर्ती जमा खाते क्र. 32278591963 काढले होते, या खात्यात दरमहा रुपये 10,000/- भरण्याबाबत संयुक्त खाते क्र.31598332310 मधून दर महिण्याच्या 10 तारखेस वळते करण्याचे गैरअर्जदारास सुचीत केले होते. त्याप्रमाणे संयुक्त खाते क्र.31598332310 मधून अर्जदाराचे पत्नीचे आवर्ती खात्यामध्ये दर महिण्याच्या 10 तारखेला रुपये 10,000/- व अर्जदार यांचे आवर्ती खात्यामध्ये दरमहिण्याच्या 8 तारखेला रुपये 25,000/- संगणकीय प्रणालीमार्फत आपोआप वळते होऊन त्यांचे आवर्ती जमा खात्यात जमा होत होते. त्यानुसार अर्जदार व तिचे पतीचे नावे असलेल्या संयुक्त खात्यामध्ये दर महिण्याचे 8 व 10 तारखांना आवश्यक असलेली पुरेशी रक्कम संयुक्त बचत खात्यात जमा नसल्याने दोघांचेही आवर्ती जमा खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही. अर्जदाराचे आवर्ती जमा खात्यात शेवटचा हप्ता दि.8.4.2015 रोजी जमा करायचा होता व दि.8.5.2015 रोजी परिपक्वता राशी जर अर्जदार नियमितपणे सर्व हप्ते वेळच्यावेळी भरले असते तर रुपये 3,30,000/- अर्जदाराला देय असते. परंतु, अर्जदार 6 महिण्याची किस्त वेळेवर भरली गेली नाही, त्यामुळे बँकेच्या नियमानुसार अर्जदाराचे आवर्ती जमा खात्यात असलेले रुपये 1,50,000/- एवढया रकमेवर रुपये 10769/- व्याज असे एकूण अर्जदारास देय रक्कम रुपये 1,60,769/- अर्जदार व तिचे पतीचे संयुक्त खात्यात दि.1.5.2015 रोजी जमा करण्यात आले. यामध्ये गैरअर्जदाराने कुठलिही हयगय, गैरकायदेशीर कृत्य केले नाही व अर्जदाराचा अर्ज हा खोटा व बनावटी, बेकायदेशीर व चुकीच्या माहितीच्या आधारे असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी, अशी मागणी केली.
4. अर्जदाराने नि.क्र.16 नुसार शपथपञ व नि.क्र.18 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार यांनी नि.क्र.22 सोबत 1 दस्ताऐवज व नि.क्र.19 व 20 नुसार पुरसीस दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, शपथपञ, दस्ताऐवज, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : नाही.
व्यवहार केला आहे काय ?
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचित व्यवहार पध्दतीचा : नाही.
अवलंब केला आहे काय ?
4) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराने स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा – आष्टी यांचेककडे दि.8.5.2014 ला प्रतिमाह रुपये 25,000/- एक वर्षाच्या मुदतीने आवर्ती बचत खाते उघडले होते. अर्जदार विदेशात नोकरीवर असल्यामुळे अर्जदार व त्यांची पत्नीचे नावाने दोघांचा संयुक्त बचत खाते गैरअर्जदाराचे शाखेत असून त्याचा खाते क्र.31598332310 आहे. ही बाब, अर्जदार व गैरअर्जदार दोन्ही पक्षाना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
6. गैरअर्जदाराने नि.क्र.23 वर अर्जदाराचे खाते उता-याची पडताळणी करतांना असे दिसून आले की, अर्जदाराचे खात्यातून प्रत्येक महिण्यात रुपये 25,000/- कापून अर्जदाराचे मुदत बचत ठेव मध्ये वळती करण्यात येत होते. सदर खात्याचा उतारामध्ये ब-याचवेळी अपूर्ण रक्कम असल्याने अर्जदाराचे खातेमधून रुपये 25,000/- कपात करण्यात आली नव्हती व त्यांच्या आवर्ती जमा खात्यात जमा झाली नाही. सबब, गैरअर्जदाराने अर्जदाराला दि.9.11.2014, 10.12.2014 ला पञ लिहिलेले होते, ही बाब गैरअर्जदाराने नि.क्र.13 वर दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होते. अर्जदाराने तक्रारीत पारिच्छेद क्र.4 त्यांचे खात्यात होल्ड झाला होता याबाबत उल्लेख केलेला आहे. तसेच, अर्जदाराने त्यांची रक्कम होल्डवर का राहिली याचा कोणताही खुलासा तक्रारीत केलेला नाही, याउलट, गैरअर्जदाराने त्यांचे जबाबात या संदर्भात खुलासा देवून असे नमूद केलेले आहे की, अर्जदाराचे बचत खात्यातून रक्कम रुपये 25,000/- प्रत्येक महिण्यात आवर्ती जमा खात्यात वळती करण्यात आलेली नाही, कारण त्यांचे बचत खात्यात अपूर्ण रक्कम होती,त्यामुळे अर्जदाराचे वादातील खात्यात होल्डमध्ये ठेवण्यात आलेले होते. गैरअर्जदार यांनी सदर प्रकरणात अर्जदाराचे बँक खात्यात व त्यांचे शपथपञावरुन हे सिध्द केलेले आहे की, अर्जदाराने जेवढी रक्कम त्यांचे मुदत बचत खात्यात जमा केली होती ती रक्कम अर्जदाराला व्याजासह देण्यात आलेली होती. यावरुन, असे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती कोणतीही न्युनतम सेवा किंवा अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केलेली नाही. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/8/2015