(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 16.07.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 प्रमाणे दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार यांनी, दि.28.5.2009 रोजी गैरअर्जदार कंपनी कडून जप्त केलेले जुने वाहन क्र.एम.एच.34-एम-4417 मिनीट्रक खरेदी केला होता. सदर वाहन खरेदी करण्यापूर्वी गैरअर्जदार यांनी उपरोक्त वाहन हे अत्यंत उत्कृष्ट कंडीशन मध्ये आहे, याची हमी दिली होती. तसेच, यदाकदाचीत खरेदी केलेल्या वाहनास लगेच वारंवार बिघाड झाल्यास ते वाहन स्वतःचे खर्चाने दुरुस्त करुन देण्याची हमी दिली होती. गैरअर्जदार ही एक प्रतिष्ठीत कंपनी आहे म्हणून त्यांचे संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून गाडी रुपये 2,00,000/- मध्ये खरेदी केली व त्यासाठी अर्जदाराने रक्कम रुपये 50,000/- नगदी भरुन गैरअर्जदार कंपनीकडून रुपये 1,50,000/- फायनांन्स घेतले होते. त्याकरीता, गैरअर्जदार कंपनीने वेगवेगळ्या फार्मवर सह्या घेतल्या होत्या व कराराप्रमाणे कर्जाची रक्कम रुपये 1,50,000/- एकूण 34 किस्तीमध्ये प्रतिमाह ईएमआय रुपये 6,520/- घेण्याचे ठरले होते. 2. कराराप्रमाणे कर्ज घेतलेल्या परतफेडीची किस्त नियमितपणे ऑक्टोंबर 2009 पर्यंत भरणा केली. त्यानंतर वेळोवेळी जुन 2010 पर्यंत परतफेडीपोटी भरणा केलेला आहे. एकूण रक्कम रुपये 65,970/- आजपर्यंत भरणा केली आहे. मागील सहा महिन्यांपासून सदर वाहन दुरुस्तीसाठी अपे शोरुम (यश मोटर्स) कडे ठेवण्यात आली आहे. उपरोक्त वाहनात खरेदी केलयानंतर त्यामध्ये वेळोवेळी बिघाड येणे सुरु झाले. त्यामुळे, त्याकरीता अर्जदारास दुरुस्तीचा खर्च करावा लागला, याची पूर्ण माहिती वेळोवेळी गैरअर्जदाराकडे दिलेली आहे. आजपावेतो सदर वाहन दुरुस्तीचा खर्च अंदाजे 50,000/- आलेला आहे. सदर वाहन वेळोवेळी बंद पडल्यामुळे अर्जदाराचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडे दुरुस्ती खर्चाची मागणी केली. परंतु, गैरअर्जदाराने नेहमी खोटी आश्वासने देवून दुरुस्ती बिलाची थकीत रक्कम आजपर्यंत दिलेली नाही. उलट, अर्जदार यांना कर्जाच्या किस्तीची रक्कम न भरल्यास वाहन जप्तीची धमकी वेळोवेळी दिलेली आहे. म्हणून अर्जदार यांनी दि.10.9.2010 रोजी रजिस्टर्ड नोटीस वकीलामार्फत पाठविला. या नोटीसाचे उत्तर गैरअर्जदाराने दि.7.10.2010 ला वकीलामार्फत खोट्या बचावाखाली दिलेली आहे. परंतु, आजपर्यंत, गैरअर्जदार यांनी सदर वाहनाचे निरिक्षण केलेले नाही, अथवा बिघाड झाल्याने वाहनास लागणारा खर्च रुपये 18,037/- दिला नाही.
3. अर्जदार यांनी दि.25.11.2010 ला गैरअर्जदार यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून उपरोक्त वाहनास आजपर्यंत लागलेल्या खर्चाची रक्कम थकीत कर्जाच्या रकमेमध्ये समावेश करुन संबंधीत वाहनासंबंधी जप्तीची कार्यवाही मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच, याप्रकरणी फायनल निवाडा करण्याची सुध्दा तयारी दर्शविली होती. परंतु, गैरअर्जदार यांनी दि.9.12.2010 ला वकीलामार्फत नोटीस पाठवून डिसेंबर 2010 पर्यंत थकीत असलेली रक्कम परतफेड करण्याची मागणी केली, अन्यथा अर्जदाराविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याची धमकी दिली. गैरअर्जदार यांनी दिलेली सेवा ही न्युनतापूर्ण सेवा व अनुचीत व्यापार पध्दती ठरविण्यात यावी, सदर वाहनास दुरुस्तीकरीता लागलेला खर्चाची रक्कम रुपये 50,000/- चा समावेश थकीत कर्जाच्या रकमेत करावे असे आदेश पारीत करावे. इस्टीमेट दुरुस्ती खर्च रुपये 18,030/- गैरअर्जदाराने संबंधीत शो रुमला जमा करावे असा आदेश, गैरअर्जदाराचे विरुध्द पारीत करावा. जोपर्यंत हिशोबाची दखल घेण्यात येत नाही, तोपर्यंत वाहन जप्त, तसेच कर्जाच्या रकमेची वसूली करु नये. अर्जदारास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये 20,000/- व तक्रार खर्च रुपये 5000/- अर्जदाराला द्यावा, अशी प्रार्थना केली आहे. 4. अर्जदाराने तक्रारीचे कथना पृष्ठयर्थ नि.क्र.5 नुसार 24 दस्ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आला. गैरअर्जदार हजर होऊन नि.क्र.10 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.11 नुसार 9 दस्ताऐवज दाखल केले आहे. 5. गैरअर्जदाराने लेखी उत्तरातील बहुतांश कथन चुकीचे व खोटे असल्याने अमान्य केले आहे. गैरअर्जदाराने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले आहे की, अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून ट्रक क्र.एम.एच.34 एम 8417 खरेदी करण्याकरीता दि.6.5.09 ला कोटेशन दिले होते. अर्जदाराने, गाडीचे निरिक्षण करुन सदरहू गाडी ज्या स्थितीमध्ये आहे, त्या स्थितीमध्ये घेण्याचे मान्य केले. अर्जदार सदर गाडी रुपये 1,70,000/- ला घेण्यास तयार झाला. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडे रुपये 20,000/- जमा केले व उर्वरीत रक्कम रुपये 1,50,000/- चे कर्ज गैरअर्जदाराकडून घेतले.
6. अर्जदाराने गाडीची पाहणी केली होती. गैरअर्जदार सदर गाडीची किंमत त्याचे परिस्थितीनुसार निश्चित केली होती. अर्जदाराला गाडी योग्य वाटल्याने त्या किंमतीत विकत घेतली. गैरअर्जदाराने, गाडीची क्षमता व गुणवत्तेबद्दल कुठलीही हमी घेतली नव्हती व तसी हमी देण्याचा गैरअर्जदारास कुठलाही अधिकार नाही. गैरअर्जदर व अपेटर हे दोन्ही वेगवेगळे व्यवस्थापन आहे. अर्जदाराने विकत घेतलेल्या गाडीमध्ये कोणताही तांञीक दोष बिघाड निर्माण झाला, त्याकरीता अर्जदार गाडी निर्मीतीच्या कंपनी विरुध्द दाद न मागता गैरअर्जदार कंपनीला विनाकारण ञास देण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराला कर्जाची रक्कम भरायची नाही म्हणून अर्जदाराने गाडीमध्ये बिघाड असल्याचे सांगून कर्जाच्या थकीत किस्तीची रक्कम भरु शकत नाही असा खोटा बचाव करीत आहे व गैरअर्जदारावर खोटे आरोप करीत आहे. 7. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून गाडी खरेदी करण्याकरीता दि.14.5.09 ला रुपये 1,50,000/- चे कर्ज घेतले होते व आहे. अर्जदाराला या कर्जाच्या रकमेची व्याजासहीत नियमितपणे परतफेड दरमहा रुपये 6518/- दि.20.6.09 पासून 35 किस्तीमध्ये करायची होती व आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये दि.14.5.09 ला कर्ज दिल्याबद्दल करारनामा झाला. अर्जदारांनी करारनाम्यावर वाचून व समजावून घेऊनच सह्या केलेल्या आहे व करारनाम्याची प्रत अर्जदारास दिली होती. 8. तसेच, अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून दि.24.10.09 रोजी रुपये 8605/- चे विमा कर्ज घेतले होते व आहे. सदर कर्जाची परतफेड दि.20.11.09 पासून रुपये दरमहा 865/- प्रमाणे 12 किस्तीमध्ये करायची होती. सदर कर्जाच्या रकमेची अर्जदाराला व्याजासहीत रुपये 10,380/- परतफेड करायची होती. त्यापैकी, अर्जदाराने रुपये 7020/- भरले असून रुपये 3,460/- अर्जदाराकडून घेणे बाकी आहे. 9. अर्जदाराने एकूण किस्त रकमेचे रुपये 1,26,339/- पैकी रुपये 59,200/- फक्त भरलेले आहे. आज रोजी अर्जदार हा थकीतदार आहे. अर्जदार हा नियमितपणे कर्जाच्या किस्तीचा भरणा करीत नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराला दि.4.6.2010 रोजी थकीत कर्जाच्या रकमेची मागणीची नोटीस पाठविली होती. तसेच, त्यानंतर दि.9.9.2010 परत अर्जदारास थकीत कर्जाच्या मागणीची नोटीस पाठविली. अर्जदाराला थकीत कर्जाची किस्त भरायची नाही म्हणून अर्जदार हा गैरअर्जदारावर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत आहे. अर्जदाराने सदर गाडी मे 2009 मध्ये विकत घेतले व गाडी चालविली, तसेच ऑक्टोंबर महिन्यापर्यंत किस्तीची रक्कम सुध्दा भरली व नंतर गाडीमध्ये बिघाड आहे असे खोटे आरोप गैरअर्जदावर करीत आहे. कारण, अर्जदाराला थकीत कर्जाच्या किस्तीची रक्कम रुपये 75,339/- भरायची नाही व गैरअर्जदाराने वाहन खराब दिलेले आहे म्हणून कर्जाच्या किस्तीची रक्कम दुरुस्ती खर्चामध्ये समावेश करावे, म्हणून मंचाची दिशाभूल करीत आहे. 10. गैरअर्जदाराने, अर्जदाराला किस्तीची रक्कम रुपये 65182- वरुन रुपये 5493/- करुन दिला व 35 महिन्या कालावधी वाढवून 47 महिन्याचा कालावधी करुन दिला होता. किस्तीची कमी केलेली रक्कम रुपये 5493/- पुढील किस्त सुध्दा भरली आहे. गैरअर्जदाराला अर्जदारावर थकीत रकमेच्या वसुलीसाठी करारनाम्याप्रमाणे कारवाई करण्याचा अधिकार आहे. अर्जदार हा थकीत कर्जाची रक्कम रुपये 71,879/- गैरअर्जदारास देणे लागते. गैरअर्जदाराने अर्जदारास केंव्हाच कोणतीही धमकी दिली नाही. अर्जदार एकूण 71,879 + 3460 = 75,339/- रुपये गैरअर्जदारास देणे लागतो. गैरअर्जदाराने अर्जदाराला सेवा देण्यास कोणतीही कमतरता दाखविली नाही. गैरअर्जदाराने, अर्जदाराच्या नोटीसाला उत्तर दि.7.10.2010 व 9.12.2010 ला पंजीबध्द डाकेव्दारे पाठविले आहे. अर्जदाराने दाखल केलेला अर्ज अर्थहीन असल्यामुळे अर्ज प्रार्थना खर्चासहीत खारीज करण्यात यावा, अशी विनंती केली आहे. 11. अर्जदाराने नि.क्र.16 नुसार शपथपञ दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.12 रिजाईन्डर शपथपञ दाखल केले. अर्जदाराने नि.क्र.18 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदाराने नि.क्र.24 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, रिजाईन्डर शपथपञ, व लेखी युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 12. अर्जदाराने, गै.अ.कडून एम.एच.34 एम 8417 हे वाहन घेतले व त्याकरीता गै.अ.कडून कर्ज घेतले याबाबत वाद नाही. परंतु, अर्जदाराच्या कथनानुसार गै.अ. यांनी जप्त केलेले वाहन अर्जदारास विक्री केले त्यावेळी वाहनात काहीही बिघाड आल्यास त्याची जबाबदारी गै.अ.ने घेतली, परंतु ती जबाबदारी गै.अ.यांनी पारपाडली नाही. अर्जदाराने, गै.अ. कडून जुने वाहन खरेदी केल्यानंतर, त्यात वारंवार बिघाड येवून अंदाजे रुपये 50,000/- खर्च करावा लागला आणि आजच्या स्थितीतही वाहन हे शो रुम मध्ये असून गै.अ. वाहन दुरुस्तीचे रुपये 18,030/- शोरुमला जमा करावे अशी विनंती केली आहे. अर्जदाराने, गै.अ.कडून जुने वाहन खरेदी केले हे निर्विवाद आहे. परंतु, वाहनात येणारा बिघाड दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी गै.अ.ने घेतली हा मुद्दा विवादीत आहे. गै.अ. यांनी नि.11 ब-4 वर निविदा प्रत दाखल केली. त्यानुसार दि.6.5.2009 ला अर्जदाराने वाहन क्र.एम.एच.34 एम 8417 खरेदी करीता रुपये 1,70,000/- चा कोटेशन भरणा केला. अर्जदाराने, गै.अ.कडून रि-पजेस केलेले वाहन खरेदी केलेले आहे. परंतु, त्यांनी पुढे वाहनात येणारा बिघाड दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी गै.अ.ने घेतली, हे अर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही. वास्तविक, ज्यास्थितीत वाहन होते त्यास्थितीत अर्जदाराने वाहन घेतले. त्यात येणारा बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी ही अर्जदाराचीच आहे. गै.अ.यांनी वाहनात येणारा बिघाड दुरुस्त करुन देण्याची हमी दिली होती, याबाबतचा कुठलाही पुरावा अर्जदाराने तक्रारीत जोडलेला नाही, त्यामुळे गैरअर्जदाराने शोरुमला रुपये 18,030/- जमा करावे अशी केलेली मागणी मंजूर करण्यास पाञ नाही. 13. अर्जदाराच्या तक्रारीनुसार असे ही दिसून येते की, वाहनात वारंवार येणारा बिघाड हा उत्पादनातील दोषामुळे येतो. परंतु, अर्जदाराने आपले तक्रारीत हे कोठेही दाखविले नाही की, वाहन कोणत्या वर्षी उत्पादीत केले आहे आणि वाहनाची गॅरंटी कालावधीत दोष निर्माण झालेले आहे. वास्तविक, गै.अ.ने दाखल केलेले दस्त ब-4 नुसार वाहन हे जुन 2008 मध्ये उत्पादीत झालेले आहे. परंतु, त्यापूर्वी त्या वाहनात वारंवार बिघाड निर्माण होत असल्याने उत्पादनात दोष असल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही किंवा उत्पादकाला या तक्रारीत पक्ष केले नाही. त्यामुळे, अर्जदाराने वाहनाच्या उत्पादनात दोष आहे असे सिध्द होत नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 14. अर्जदाराचे वकीलांनी लेखी युक्तीवादात असे नमूद केले की, वाहन खरेदीचे वेळी स्वतः रुपये 50,000/- नगदी देवून रुपये 1,50,000/- कर्ज घेतले व कर्जाची रक्कम 34 समान किस्तीत रुपये 6500/- प्रमाणे परतफेड करण्याचे ठरले होते. गै.अ.यांनी आपले लेखी युक्तीवादात ही बाब नाकारुन वाहन रुपये 1,70,000/- मध्ये विक्री करण्यात आले असून, अर्जदाराने नगदी रुपये 20,000/- जमा केले आणि रुपये 1,50,000 कर्ज घेतले. म्हणजेच रुपये 1,70,000/- वाहन खरेदी केले. अर्जदाराने लेखी युक्तीवादात मिनी ऑटो एम.एच.34 एम 4417 खरेदी केला असे कथन केले आहे. परंतू, उपलब्ध रेकॉर्डवरुन आणि गै.अ.ने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन वाहन क्रमांक एम.एच. 34 एम 4417 हा नसून वाहन क्र.एम.एच.34 एम 8417 असा आहे व तो रुपये 1,70,000/- मध्येच विक्री करुन त्यावर अर्जदारास रुपये 1,50,000/- चे कर्ज दिले आहे. अर्जदारास स्वतःचे वाहन हे किती हजारात घेतले, कोणता क्रमांक आहे, हे सुध्दा माहित नाही. अर्जदाराने नगदी रुपये 50,000/- गै.अ.कडे जमा केले याचा पुरावा नाही. अर्जदार स्वतः खोटे कथन करुन स्वच्छ हाताने तक्रार घेवून आलेला नाही, असाच निष्कर्ष निघतो. 15. अर्जदाराने, तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गै.अ.नी वाहन दुरुस्ती करीता लागलेल्या खर्चाची रक्कम रुपये 50,000/- थकीत कर्जाच्या रकमेत समावेश करण्याचा आदेश देण्यात यावा. अर्जदाराने याबाबत वाहन दुरुस्तीचे बील सादर केलेले आहे, त्याचे अवलोकन केले असता, बरेच वेळा ऑईल चेंज करण्यात आल्याचे दिसून येते आणि वेळोवेळी जो खर्च केला त्या खर्चाची भरपाई करुन देण्याची हमी गै.अ.ने दिली होती, त्यामुळे आलेला खर्च रुपये 50,000/- कर्ज खात्यात जमा करावे अशी अर्जदाराची मागणी न्यायसंगत नाही. 16. गै.अ.यांनी, अर्जदारास थकीत कर्जाच्या रकमेचा भरणा करावा या आशयाचे पञ अ-19 नुसार दिल्यानंतर अर्जदाराने वाहन दुरुस्ती करीता येणा-या खर्चाची परतफेड गै.अ.ने करण्याची हमी घेतली असे कथन करुन प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. वास्तविक, अर्जदाराने जुने वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले परंतू त्याची नियमितपणे परतफेड केली नाही, ही बाब अर्जदाराने स्वतः मान्य केली आहे. गै.अ.च्या वाहन जप्तीच्या कारवाईपासून सुटका मिळावी, याच वाईट हेतुने प्रस्तुत तक्रार दाखल केली असल्याचे, दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होत असल्याचे तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही. 17. गै.अ.ने लेखी युक्तीवादात असा मुद्दा उपस्थित केला आहे की, अर्जदार हा गै.अ.चा ग्राहक नाही, तसेच कोणतीही अनुचीत व्यापार पध्दतीचा वापर केला नाही. अर्जदाराने तक्रारीत गै.अ.यांनी कोणती सेवा देण्यात न्युनता केली हे बाब सिध्द केलेली नाही. अर्जदाराचे तक्रारीवरुन व दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन स्वतः कर्जाची परतफेड केली नाही आणि वाहनाचा स्वतः वापर केला. परंतु, वापर करतेवेळी आलेल्या बिघाड दुरुस्तीची रक्कम टायर खरेदीची रक्कम, ऑईल व छोटे-मोठे जे काम केले त्याची रक्कम गैरअर्जदाराकडून मागणी करण्याकरीता प्रस्तूत तक्रार दाखल केली. म्हणजेच, अर्जदाराने आपली जबाबदारी गै.अ. वर लादण्याचा प्रयत्न करुन कर्जाच्या किस्ती भरण्यापासून सुट मिळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा, उपलब्ध रेकॉर्डवरुन दिसून येते. अर्जदाराने तक्रारीत गै.अ. यांनी अनुचीत व्यापार पध्दतीचा अवंलब करुन सेवा देण्यात न्युनता केली ही बाब सिध्द केली नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 18. वरील कारणे व निष्कर्षावरुन गै.अ. यांनी सेवेत न्युनता करुन अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला हे अर्जदाराने सिध्द केले नाही या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार नामंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) अर्जदार व गैरअर्जदाराने आपआपला खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |