द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 27 एप्रिल 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
[1] तक्रारदारांनी त्यांच्या पॅशन प्लस दुचाकी गाडीचा जाबदेणार क्र.। यांच्याकडे रुपये 35,000/- चा विमा दिनांक 14/4/2009 ते 13/4/2010 कालावधीसाठी विमा उतरविला होता. विम्याचा हप्ता रुपये 990/- तक्रारदारांनी भरली होता. दिनांक 13/12/2009 ते 14/12/2009 रोजी सकाळी 8 च्या सुमारास तक्रारदारांची गाडी चोरीला गेली, दिनांक 24/12/2009 पर्यन्त गाडीचा शोध घेऊनही सापडली नाही. म्हणून दिनांक 24/12/2009 रोजी समर्थ नगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली. दिनांक 26/12/2009 रोजी जाबदेणार क्र.1 यांच्याकडे रुपये 35,000/- क्लेम साठी अर्ज दाखल केला. जाबदेणार यांच्या मागणीनुसार गाडीच्या किल्ल्या तक्रारदारांनी दिल्या. क्लेम संदर्भात वारंवार संपर्क साधूनही जाबदेणार क्र.1 यांनी क्लेम देण्याचे टाळले. नोटीस पाठवूनही उपयोग झाला नाही. गाडी अभावी तक्रारदारांचा इतर वाहनांवरील खर्च वाढला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 35,000/- क्लेमची रक्कम, इतर वाहनखर्चापोटी रुपये 30,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, दुरध्वनी खर्च रुपये 5000/-, कोर्ट खर्च रुपये 15,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
[2] जाबदेणार क्र.1 ते 3 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द मंचाने दिनांक 06/01/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
[3] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी पॅशन प्लस दुचाकी गाडीचा जाबदेणार क्र.1 यांच्याकडे रुपये 35,000/- चा 14/4/2009 ते 13/4/2010 या कालावधीकरिता विमा उतरविलेला होता, विम्याचा हप्ता रुपये 990/- तक्रारदारांनी भरला होता हे दाखल मोटर व्हेईकल कव्हर नोट वरुन स्पष्ट होते. दिनांक 13/12/2009 ते 14/12/2009 रोजी सकाळी 8 च्या सुमारास तक्रारदारांची गाडी चोरीला गेली, म्हणून तक्रारदारांनी दिनांक 24/12/2009 रोजी समर्थ नगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली हे दिनांक 24/12/2009 च्या FIR वरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी दिनांक 26/12/2009 रोजी जाबदेणार क्र.1 यांच्याकडे क्लेमची रक्कम मिळण्यासाठी म्हणून अर्ज केलेला असला तरी जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम बाबत निर्णय घेऊन तक्रारदारांना तसे कळविल्या संदर्भातील कागदोपत्री पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या दिनांक 26/12/2009 रोजीच्या क्लेम संदर्भातील अर्जावर आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून दोन आठवडयांच्या आत निर्णय घ्यावा असे आदेशित करणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या दिनांक 26/12/2009 रोजीच्या क्लेम
संदर्भातील अर्जावर आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून दोन आठवडयांच्या आत निर्णय घ्यावा
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.