(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 15.04.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार श्री सुरेख नामदेवराव रामगुंडे, रा.बल्हारपूर, तह. बल्हारपूर, जि. चंद्रपूर येथील रहिवासी आहे. अर्जदाराने गाडी क्र.एम.एच.34-के-6945 सॅन्ट्रो गाडी खरेदी करण्यास गै.अ.कडून रक्कम रुपये 2,33,000/- चे कर्ज घेतले. त्यावेळी अर्जदाराने डिपॉझीट रक्कम रुपये 45,000/- गै.अ. यास दिले व अर्जदाराला गै.अ.यांनी लोन अग्रीमेन्ट क्र.एन.आर.एफ.डब्ल्यु.सी.एन.-30705166 अन्वये अग्रीमेन्ट केला आणि व्याजाची रक्कम रुपये 59,117/- अशी लावून एकूण रक्कम रुपये 2,92,117/- ही समान किस्त रुपये 10,073/- मासीक किस्तीमध्ये 29 महिन्यात पूर्ण रक्कम अर्जदाराला गै.अ.कडे भरावयाची होती.
2. अर्जदाराने, गै.अ. यांनी दिलेल्या कर्जाचे खाते विवरण पञानुसार रक्कम करारनाम्याच्या अटी नुसार मुदतीच्या आतमध्ये रुपये 3,31,324/- गै.अ.कडे नगदी व धनादेशाचे स्वरुपाने भरणा केलेला आहे. सदरील रक्कम गै.अ.स मिळाल्याची त्याच्या कर्जाचे विवरण पञामध्ये नमूद आहे. गै.अ.ने, अर्जदाराकडून रुपये 39,207/- ही रक्कम अतिरिक्त वसूल केलेली आहे. गै.अ. सदरील रक्कम दि..7.5.2010 पासून 12 % व्याजासह अर्जदारास देण्यास जबाबदार आहे. गै.अ. यांनी विवरण पञामध्ये नमूद केलेले बाऊंसींग चार्जेसची रक्कम रुपये 7300/- बेकायदेशिरपणे लावून ती अर्जदाराकडून वसूल केलेली आहे. गै.अ.ने अर्जदाराकडून कर्ज देतांना 29 कोरे चेक घेतले होते. गै.अ.यांनी उपयोगात आणलेले चेक वगळता उर्वरीत चेक हे अर्जदारास परत करणे आवश्यक आहे. गै.अ. रुपये 59,575/- ही तातडीने भरा अन्य गाडीची उचल करुन व अर्जदारावर वसूलीची कारवाई करु अशी धमकी वारंवार देत आहे. ही बाब गै.अ.चे सेवेतील न्युनता असून अनुचीत व्यापार पध्दती आहे. अर्जदाराने, गै.अ. कडे तक्रार अर्ज दि.11.10.10 आणि दि.12.11.10 रोजी लेखी नोटीस पाठविला आहे. गै.अ.ने अर्जदाराचे नोटीस स्विकारले, परंतू नोटीसाला कोणतेही उत्तर दिले नाही. म्हणून अर्जदाराला या कामी गै.अ.कडे वारंवार चकरा माराव्या लागल्या, यामुळे अर्जदारास मानसीक, शारीरीक ञास झाला. त्यामुळे, गै.अ.ने अर्जदाराचे चार चाकी गाडी क्र.एम.एच.34-के-6945 सॅन्ट्रो याकरीता घेतलेल्या कर्जाची रक्कम पूर्णपणे पेड झाल्यामुळे गाडीचे संबंधी मुळ कागदपञ व नाहरकत प्रमाणपञासह अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. अर्जदाराचा कर्जाचा करारनामा रद्द करण्यात यावा व गै.अ.ने विवरण पञामध्ये दाखविलेले रक्कम रुपये 59,575/- बेकायदेशिर व चुकीची असल्याने रद्द करण्यात यावी. तसेच, शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- व तक्रार खर्च रुपये 5000/- अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे. 3. अर्जदाराने नि.5 नुसार 8 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गै.अ.स नोटीस काढण्यात आला. गै.अ.हजर होऊन नि.11 नुसार लेखी बयान व नि.12 नुसार 3 दस्ताऐवज दाखल केले. 4. गै.अ.ने लेखी बयानात नमूद केले की, हे म्हणणे खरे आहे अर्जदार श्री सुरेश नामदेवराव रामगुंडे, रा.बल्लारपुर, तह.बल्लारपुर, जि.चंद्रपूर येथील रहिवासी आहे. हे म्हणणे खरे आहे की, अर्जदाराने गाडी क्र.एम.एच.34-के-6945 सॅन्ट्रो गाडी खरेदी करण्यास गै.अ.कडून कर्ज घेतले. हे म्हणणे खोटे व बनावटी असल्याने नाकबूल आहे की, अर्जदाराला दिलेल्या कर्जामध्ये गै.अ.यांनी मुनाफा घेतला त्यामुळे अर्जदार हे गै.अ.चे ग्राहक आहेत. हे म्हणणे खरे आहे की, अर्जदाराने सदरील गाडी खरेदी करतांना गै.अ. कडून रुपये 2,33,000/- चे कर्ज घेतले. हे म्हणणे खोटे असल्यामुळे नाकबूल आहे की, त्यावेळी अर्जदाराने डिपॉझीट रक्कम रुपये 45,000/- गै.अ.स दिले. हे म्हणणे खोटे व नाकबूल आहे की, अर्जदाराला गै.अ.यांनी लोन अग्रीमेंट क्र.एन.आर.एफ.डब्ल्यु.सी.एन. 30705166 करार केला आणि व्याजाची रक्कम रुपये 59,117/- अशी लावून एकूण रक्कम रुपये 2,92,117/- ही समान किस्त रुपये 10,073/- मासीक किस्त मध्ये 29 महिन्यात पूर्णपणे गै.अ.कडे भरावयाची होती. गै.अ.ने उर्वरीत मजकूर खोटे असल्याने नाकबूल केले आहे. 5. गै.अ.ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले आहे की, अर्जदार व गै.अ. यांचे वाहन कर्जासाठी दि.27.11.07 रोजी लेखी करारनामा करण्यात आला. गै.अ.ने अर्जदारास रुपये 2,33,000/- चे वाहन कर्ज मंजूर केले. अर्जदारास वाहन कर्जाची परतफेड एकूण 29 महिण्यात करावयाचे होते. सदर परतफेडीसाठी अर्जदार गै.अ.चे कार्यालयात दर महिण्याला बँकेचा चेक देत होते. अर्जदाराची दरमहा किस्त रुपये 10,073/- एवढी ठरविण्यात आली होती. अर्जदाराने वेळोवेळी दिलेल्या चेक पैकी काही चेक अर्जदाराचे खात्यात अपुरी रक्कम असल्याने न वटता परत यायचे त्यामुळे गै.अ.स चेक न वटल्याने बँकेला बाऊसींग चार्जेस द्यावे लागले. अर्जदाराचे चेक न वटल्यामुळे एकूण रुपये 7300/- व ओव्हर डयू चार्जेस गै.अ. देण्यास जबाबदार आहेत. अर्जदाराचे नोटीसाला गै.अ.ने दि.24.12.10 ला उत्तर दिले. गै.अ.ने, अर्जदाराचे मागणी प्रमाणे अर्जदारास अकाऊंट स्टेटमंटची प्रत दिलेली आहे. नोटीसाचे उत्तरात वरील रकमेची परतफेड करुन नाहरकत प्रमाणपञ व इतर कागदपञ परत घेण्यासही कळविले. परंतु, अर्जदाराने रक्कम परतफेड न करण्याचे उद्देशाने हा खोटा मामला गै.अ.चे विरुध्द दाखल केला आहे. गै.अ.ने, अर्जदारास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही, त्यामुळे अर्जातील मागणी पूर्णतः खोटी व बनावटी असल्याने सदर अर्ज खारीज करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 6. गैरअर्जदाराने नि.13 नुसार रिजाईन्डर शपथपञ व नि.15 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराने नि.16 नुसार शपथपञ दाखल केले. अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षाच्या प्रतिनीधी/वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 7. अर्जदाराने सेन्ट्रो एम.एच.34 के 6945 खरेदी करण्याकरीता गै.अ.कडून रुपये 2,33,000/- कर्ज घेतले होते, त्याबाबत लोन अग्रीमेंट एनआरएफ डब्लुसीएल 30705166 करार करण्यात आला याबाबत वाद नाही, तर गै.अ.यांनी अर्जदाराकडून करारनाम्याच्या पेक्षा रुपये 59575/- बेकायदेशीर व चुकीने घेत असल्यामुळे ती रद्द करुन मुळ गाडीचे कागदपञ व प्रमाणपञ देण्याचा वाद उपस्थित केला आहे. 8. अर्जदाराच्या तक्रारीनुसार गै.अ.कडून रुपये 2,33,000/- चे कर्ज घेतले, त्या कर्जावर रुपये 59,117/- जोडून एकूण कर्जाची परतफेड रक्कम रुपये 2,92,117/- समान 29 मासीक किस्त रुपये 10,073/- प्रमाणे परतफेड करायची होती. अर्जदाराचे कथनानुसार गै.अ.स 29 कोरे चेक कर्ज घेतेवेळी देण्यात आले होत. गै.अ.ने ही बाब नाकारली असून प्रत्येक महिन्याला अर्जदार किस्तीच्या रकमेचा चेक देत होता, अर्जदाराने तक्रारीत गै.अ.यांनी कर्ज विवरण पञात बाऊसींग चार्जेस म्हणून 7300/- रुपये बेकायदेशीरपणे लावलेले आहे असे कथन केले आहे. परंतू, बेकायदेशीरपणे कसे लावले आहे याबाबत काहीही उल्लेख तक्रारीत केलेला नाही. वास्तविक, अर्जदाराने दिलेल्या चेकची रक्कम वळती होऊनही, गै.अ.यांनी बाऊंसींग चार्जेस लावून बेकायदेशीरपणे वसूल केलेले आहेत, हे अर्जदार सिध्द करुन शकला नाही. वास्तविक, चेक बाऊंसची रक्कम गै.अ.यांनी बेकायदेशीर पणे लावले आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे, परंतू अर्जदाराने अ-1 वर बँकेच्या पासबुकाची झेरॉक्सप्रत दाखल केलेली आहे ती झेरॉक्स प्रत कोणत्या बँकेची आहे हेच स्पष्ट होत नाही. तसेच, बँकेच्या खात्याची झेरॉक्स प्रत पूर्णपणे दाखल केलेली नाही, फक्त पहिला पेज आणि सन 2006 व 7.2.2010 चे 8.7.10 या कालावधीचे झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. जेंव्हा की, चेक बाऊंस झाल्याची रक्कम 1.7.08 ते 7.5.10 या कालावधीतील आहे. त्या कालावधीत कोणते चेक वटले व कोणते चेक वटले नाही आणि त्यावेळी अर्जदाराच्या खात्यात रक्कम होती याबाबतचा कोणताही पुरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे, गै.अ.ने चेक बाऊंसचे रुपये 7300/- बेकायदेशीरपणे लावले ही बाब उपलब्ध रेकॉर्ड वरुन व पासबुकच्या अपूर्ण झेरॉक्स प्रतीवरुन सिध्द होत नाही,या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 9. अर्जदाराने तक्रारीत रुपये 46,482/- ही रक्कम खोटया स्वरुपाची असून बेकायदेशीर आहे. ही रक्कम ओव्हर डयू चार्जेस म्हणून गै.अ.यांनी लावले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतू, अर्जदारानी दिलेले चेक बाऊंस न झाल्याची बाब अर्जदार सिध्द करु शकला नाही, त्यामुळे मासीक हप्त्याची किस्त ही निश्चित तारखेला देण्यात आली असे ग्राह्य धरता येत नाही. अशास्थितीत कर्जाची किस्त ही उशिराने देण्यात आल्यामुळे त्याचेवर ओव्हर डयू चार्जेस लावण्यात आले असा निष्कर्ष निघतो, परंतू तो ओव्हर डयून चार्जेस कर्ज कराराप्रमाणे किती टक्के आहे ही बाब अर्जदाराने आणली नाही, त्याचे प्रमाणे गै.अ.ने कराराप्रमाणे किती आहे हे ही दाखविले नाही. त्याकरीता, गै.अ.यांनी कराराची प्रत सुध्दा दाखल केलेली नाही. अशास्थितीत ओव्हर डयू चार्जेस रुपये 46,482/- हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे ही बाब उपलब्ध रेकॉर्डवरुन सिध्द होत नाही. अर्जदाराने अ-4 वर कर्ज खाता उताराची प्रत दाखल केली आहे. गै.अ.यांनी नि.15 ब-1 नुसार ओव्हर डयून चार्जेस व चेक बाऊंसच्या स्टेटमेंटची प्रत दाखल केली आहे. त्यानुसार, 23.12.09, 21.1.10, 30.1.10, 7.5.10 आणि 10.6.10 ला चेक बाऊंस झाल्याचे स्टेटमेंट मधून दिसत आहे. परंतू, गै.अ.यांनी सुध्दा ओव्हर डयू चार्जेस आणि चेक बाऊंसच्या स्टेटमेंटच्या व्यतीरिक्त खातेउतारा दाखल केला नाही. उलट पक्षी, अर्जदार यांनी दाखल केलेला दस्त अ-4 आणि गै.अ.यांनी दाखल केलेला ब-1 या दोन्ही दस्तात विसंगती दिसत आहे. त्यामुळे, गै.अ.यांनी योग्य प्रकारे शहानिशा करुन अर्जदारास खातेउताराची पडताळणी करुन सविस्तर माहिती अर्जदारास देण्यास जबाबदार आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 10. अर्जदाराने तक्रारीमध्ये गै.अ.स इनेशीअली पेमेंट म्हणून रुपये 45,000/- दिल्याचे म्हटले आहे. गै.अ. यांनी सुध्दा आपल्या स्टेटमेंट रुपये 42,000/- व 3000/- असे एकूण रुपये 45,000/- दाखविले आहे. परंतू, ही रक्कम कर्जाच्या रकमेत समाविष्ठ नाही. अर्जदाराने अ-4 वर दाखल केलेला स्टेटमेंट आणि नि.15 ब-1 वर दाखल केलेले दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता, असे दिसून येते की, कर्जाची रक्कम रुपये 2,33,000/- आणि त्यावरील व्याज रुपये 59,117/- असे एकूण रुपये 2,92,117/- एवढे होते. ही रक्कम 29 महिन्याच्या किस्त मध्ये विभाजन केल्यास रुपये 10,073/- ऐवढी होतो. नि. ब-1 वर त्याच पध्दतीने रक्कम दाखविलेली आहे, त्यामुळे अर्जदाराने इनेशीअली दिलेली रक्कम रुपये 45,000/- दिल्याचे उपलब्ध रेकॉर्डवरुन सिध्द होत नाही. यावरुन गै.अ. यांनी सेवेत न्युनता केली ही बाब उपलब्ध रेकॉर्डवरुन सिध्द होत नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे. 11. वरील कारणे व निष्कर्षावरुन गै.अ. यांनी सेवा देवून अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला ही बाब उपलब्ध रेकॉर्डवरुन सिध्द होत नसल्यामुळे तक्रार नामंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER | |