(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 फेब्रूवारी 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्ता यांनी महिन्द्रा ट्रॅक्टरचे डिलर नवीन ऑटोमोबाईल, ब्रम्हपूरी येथून महिन्द्रा-265 डी.आय. भुमिपूञ या कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले त्याचा क्र.एम.एच.33-एफ-94 आहे. सदर ट्रॅक्टरकरीता गैरअर्जदार क्र.1 च्या शाखेतून फायनान्स दि.21.2.2007 ला मंजूर करण्यात आले होते. सदर ट्रॅक्टरची किंमत रुपये 4,25,500/- होती व कराराप्रमाणे गाडी उचल करतांना 45 टक्के रक्कम अर्जदाराने भरणा केलेला होता व उर्वरीत रक्कम दि.20.5.2007 पासून प्रती 3 महिण्याप्रमाणे रुपये 22,962/- चे 16 किस्ती पाडून शेवटची किस्त दि.20.2.2011 ला भरणा करावयाची होती. अर्जदाराने किस्ती प्रमाणे वेळोवेळी दि.27.8.2009 पर्यंत किस्तीचा भरणा केलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे किस्ती भरणा केल्याबाबतची स्टेटमेंटची मागणी केली असता त्यांनी स्टेटमेंट देण्यास नकार दिला. अर्जदारास किती किस्ती भरावयाच्या आहेत यासंबंधी माहिती होऊ शकली नाही. त्यामुळे, उर्वरीत देय किस्त भरण्यास अडचण निर्माण झाली. गैरअर्जदाराने अर्जदाराकडे कुठल्याही प्रकारची विचारणा न कारता दि.29.12.2009 ला परस्पर गैरअर्जदार क्र.1 चे एजंटनी घरुन घेऊन गेले व गैरअर्जदार क्र.2 यांना परस्पर विकली आहे. अर्जदाराने आपले ट्रॅक्टर परत करण्यास सचविलेले होते, परंतु गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी नोटीसाला उत्तर न देता अर्जदाराला ट्रॅक्टर सुध्दा परत केले नाही. त्यामुळे अर्जदारास मानसिक ञास होत आहे, त्यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई खर्च रुपये 5,64,000/-, दावा दाखल खर्च रुपये 11,000/- व मानसिक ञासापोटीचा खर्च रुपये 25,000/- असे एकूण रुपये 6,00,000/- व त्यावर 12 टक्के द.सा.द.शे. प्रमाणे व्याजासह आदेश व्हावा, अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीच्या पृष्ठयर्थ नि.क्र.4 नुसार 5 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.14 नुसार प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर दाखल केले व सोबत नि.क्र.15 नुसार 7 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ला संधी मिळूनही लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे नि.क्र.1 वर दि.30.11.2011 ला गैरअर्जदार क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.14 नुसार लेखी उत्तर प्राथमिक आक्षेपासह दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 लेखी उत्तरातील प्राथमिक आक्षेपात नमूद केले की, अर्जदाराने मामला दाखल करतांना ब्रॅन्च मॅनेजरच्या व्यक्तीशः नावानी मामला दाखल केला. सदर मामला कोर्टाचे अधिकारक्षेञात व्यवहार झालेला नाही व गडचिरोली जिल्ह्यात कर्जाची परतफेड केली नाही म्हणून कोर्टाला हा मामला चालविण्याचा क्षेञाधिकार नाही. गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराला सुचना देवून गाडी विकलेली आहे व ही बाब अर्जदाराने तक्रारीत नमूद केली आहे की, गाडी विकलेली आहे अशा परिस्थितीत गाडीचा ताबा मागणे हे चुकीचे आहे. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीसोबत केलेल्या करारामध्ये मान्य केले की, व्यवहारासंबंधी कोणताही वाद उत्पन्न झाल्यास त्याचे निवारण आर्बिट्रेटर करणार. सदर मामला विद्यमान मंचानी आर्बीट्रेटरकडे कराराचे अटी क्र.26 प्रमाणे हस्तांतरण करावे व मामला विद्यमान कोर्टासमोर चालविण्याचा अर्जदाराला अधिकार नाही. सदर मामला प्राथमिक दृष्टया खारीज होण्यास पाञ आहे.
4. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी बयाणात पुढे नमूद केले की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ट्रॅक्टर क्र.एम.एच.33-एफ-94 वर रुपये 2,34,000/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड तिन महिण्याचे हप्त्याप्रामणे 16 हप्त्यात 22,962/- हप्ता प्रमाणे दि.20.5.2007 ते 20.2.2011 या कालावधीमध्ये रुपये 3,67,392/- भरावयाचे होते व अर्जदारा दि.21.2.2007 रोजी करारावर सही करुन मान्य केले होते. अर्जदाराने ऑगस्ट 2009 पर्यंत हप्त्याचा भरणा केला व त्यानंतर अर्जदाराने हप्त्याची रक्कम भरणे बंद केले. अर्जदाराने दाखल केलेला नोटीस दि.16.3.2010 हा गैरअर्जदार क्र.1 ला मिळाला नाही. अर्जदाराने दि.27.5.2010 रोजी स्वतःहून गैरअर्जदार क्र.1 चे कार्यालयात येवून गाडीचा ताबा दिल्याबाबत लेखी पञ देवून गाडीचा ताबा दिला व सदर पञामध्ये थकीत रक्कम व भविष्यातील रक्कम भरण्यास असमर्थ असल्याचे दर्शविले आहे. अर्जदाराने गाडीचा ताबा दिल्यानंतर कंपनीने कायद्याची पुर्तता करुन दि.2.6.2010 रोजी गाडी विकण्याच्या आधी व रजिस्टर्ड पोष्टाने पाठवून थकीत रक्कम भरण्याची संधी दिली व गाडी विक्री करण्याची तयारी दर्शविली. सदर पञ अर्जदार व त्याचे जमानतदार यांना प्राप्त झाला असून सुध्दा अर्जदारांनी कोणतीही दखल घेतली नाही. अर्जदाराने कधीही किस्त नियमीतपणे भरली नाही. अर्जदार हा कंपनीचा थकबाकीदार आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही कोटाकडे दाद मागण्याचा अधिकार नाही. वरील गाडी गैरअर्जदार क्र.1 चे ताब्यात नसून गाडी परत मागण्याचा अधिकार अर्जदाराला नाही. गैरअर्जदार क्र.1 ला ञास देण्याचे उद्देशाने खोटा मामला विद्यमान कोर्टात दाखल केला असून तक्रार रुपये 10,000/- खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
5. अर्जदाराने पुरावा शपथपञ नि.क्र.24 व नि.क्र.26 नुसार 1 दस्त दाखल केले. तसेच नि.क्र. 30 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.16 नुसार पुन्हा उत्तर दाखल करायचे नाही अशी पुरसीस दाखल. गैरअर्जदाराने नि.क्र.17 दस्ताऐवज व नि.क्र.20 नुसार ग्राहकाचा खाते उतारा दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली : नाही
आहे काय ?
3) अर्जदार हा मागणीप्रमाणे दाद मागण्यास पाञ आहे काय ? : नाही
4) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराने ट्रॅक्टर क्र.एम.एच.-33 एफ/94 करीता गैरअर्जदार क्र.1 च्या शाखेतून दि.21.7.2007 ला कर्ज घेतलेले होते, ही बाब गैरअर्जदार क्र.1 ला मान्य आहे. म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे असे सिध्द होते म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
7. गैरअर्जदाराने दाखल केलेले नि.क्र.15 खालील दस्त क्र.1 लोन अॅग्रीमेंटची प्रत, तसेच दस्त क्र.2 वर शेडयुल 1 दाखल केलेले आहेत. सदर दस्ताऐवजाबाबत अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात कोणताही वाद नाही. नि.क्र.15 दस्त क्र.2 शेडयुल 1 ची पडताळणी करतांना असे दिसून आले की, अर्जदाराला रुपये 22,962/- दरमहा किस्त दि.20.5.2007 ते 20.2.2011 पर्यंत गैरअर्जदाराला कर्ज परतफेड करण्यासाठी द्यायचे होते. सदर बाब ही दोन्ही पक्षांना मंजूर होती आणि या प्रकरणात सुध्दा दोन्ही पक्षांनी त्या संदर्भात कोणताही वाद उत्पन्न केलेला नाही. म्हणून अर्जदाराचे तक्रारीत केलेले कथन की, त्यांना किती पैसे भरावयाचे होते आणि किती किस्ती भरावयाची आहे याबाबत त्यांना माहिती नव्हती व त्याने ती माहिती गैरअर्जदाराकडून मागीतली, हे कथन स्विकाण्यात येत नाही. गैरअर्जदाराच्या नि.क्र.15 दस्त क्र.3 वर असलेले पञ दि.27.5.2010 याचेमध्ये अर्जदार हा स्वतः ट्रॅक्टरचे हप्ते भरु शकत नाही आणि सदर ट्रॅक्टर गैरअर्जदाराकडे जमा करतो आणि ट्रॅक्टर विकण्यास त्याची पूर्ण समंती आहे असे दिसून येते. सदर पञामध्ये अर्जदाराची सही आहे हे अर्जदाराला मान्य आहे. नि.क्र.15 दस्त क्र.4, 5 व 6 चे अवलोकन केले असता असे दिसून येते की, गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला दि.2.6.2010 ला नोटीसामार्फत कळविले की, जर अर्जदार वरील ट्रॅक्टर लोन अमाऊंट पूर्ण भरली नाहीतर सदर ट्रॅक्टर गैरअर्जदार लोनची रक्कम वसूलीसाठी विकूण टाकणार. दि.8.6.2010 ला सदर नोटीस गैरअर्जदाराने अर्जदाराला रजीस्टर पोष्टाने पाठविले आणि ती नोटीस दि.8.6.2010 ला अर्जदाराला भेटली असे नि.क्र.15 दस्त क्र.7 वरुन दिसून येते. सदर नोटीस अर्जदाराला भेटली याबाबत अर्जदाराचा कोणताही वाद नाही आणि अर्जदाराने गैरअर्जदाराचे नोटीस दि.2.6.2010 चे कोणतेही उत्तर दिले नाही हे सुध्दा अर्जदाराला मान्य आहे. सबब, अर्जदाराने तक्रारीत केलेले कथन की, गैरअर्जदाराने अर्जदारास काही पूर्व सुचना न देता गाडी ताब्यात घेतली व विकली हे विचारात घेण्यासारखे नाही. अर्जदाराला हे सुध्दा मान्य आहे की, गैरअर्जदाराकडे कर्जाचे पूर्ण किस्तीचा भरणा केलेला नाही. यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदाराने कायदेशिररित्या अर्जदाराचा ट्रॅक्टर विकलेला आहे म्हणून गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराचे प्रती सेवेत कोणतीही ञुटी केलेली नाही आणि अर्जदार गैरअर्जदार क्र.1 कडून कोणतीही दाद मिळण्यास पाञ नाही, म्हणून मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
8. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र.2 विरुध्द कोणतीही मागणी केलेली नाही म्हणून गैरअर्जदार क्र.2 विरुध्द कोणताही आदेश नाही.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
9. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-28/2/2014