(घोषित दि. 13.11.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी दाखल केली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 23.12.2000 रोजी गॅस कनेक्शन घेतले होते. त्यांचा ग्राहक क्रमांक 108084 असून एस.व्ही.नं. 1002039 असा आहे. त्यानंतर 2008 पर्यंत तक्रारदार नियमित गॅस सिलेंडर घेत होते.
नंतर तक्रारदार 2008 ते 2012 पर्यंत औरंगाबाद येथे रहावयास गेले त्या काळात गरज न भासल्यामुळे त्यांनी गॅस सिलेंडर घेतले नाही 2012 मध्ये परत आल्यानंतर ते गॅस सिलेंडर घेण्यासाठी गेले असता गैरअर्जदारांनी त्यांना एस.व्ही पावती मागितली तक्रारदारांनी त्याची एस.व्ही पावती गहाळ झाली आहे असे सांगितले व दुस-या प्रतीची मागणी केली परंतु गैरअर्जदारांनी ती देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारदारांना गॅस सिलेंडर मिळाले नाही. म्हणून तक्रारदारांची तक्रार आहे. त्यांनी आपल्या तक्रारी सोबत गॅस उपभोक्ता कार्डची झेरॉक्स, मतदान ओळखपत्र, अशी कागदपत्रे जोडली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार ग्राहक उपभोक्ता कार्ड व मतदान ओळखपत्र यांच्या प्रतीचे अवलोकन केले असता दोनही कागदपत्रे वेगळया लोकांची आहेत असे दिसते. तक्रारदारांनी सांगितलेल्या ग्राहक क्रमांकाची व नोंदणी पावती क्रमांकाची नोंद एजन्सीच्या संगणकीय ग्राहक डाटात नाही. त्यामुळे तक्रारदारांना याबाबत हिंदुस्थान पेट्रोलियम यांनाच संपर्क करावा लागेल व त्यासाठी त्यांचेकडे गॅस कनेक्शनची एस.व्ही पावती, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, के.वाय.सी फॉर्म व ग्राहकाचा कॉर्पोरेशनच्या नावे वितरका मार्फत अर्ज अशी कागदपत्रे पाठवावी लागतील. तक्रारदाराच्या ओळखपत्रावरुन स्पष्ट होते की, तो गैरअर्जदार यांचा ग्राहक नाही. सदरच्या प्रकरणात हिंदुस्थान पेट्रोलियम ही आवश्यक पार्टी होती त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा.
दोनही पक्षाचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन पुढील गोष्टी स्पष्ट होतात.
- तक्रारदारांनी दाखल केलेल्या उपभोक्ता कार्डवर बद्रीनाथ पाटील असे नाव लिहीलेले दिसते तर त्यांच्या मतदान ओळखपत्रावर तट्टू बद्रीनारायण गणपतराव असे नाव आहे. ही दोनही नावे एकाच व्यक्तीची असल्या बद्दलचे कोणतेही शपथपत्र अथवा इतर पुरावा मंचा समोर नाही.
- गॅस उपभोक्ता रीफील पावती नुसार सन 2008 पर्यंतच 108084 या ग्राहक क्रमांकावर सिलेंडर दिल्याचे दिसत आहे.
- गैरअर्जदार यांच्या लेखी जबाबात त्यांनी म्हटले आहे की, गैरअर्जदार यांच्या संगणकीय डाटात ग्राहक क्रमांक 108084 अन्वये तक्रारदारांच्या नावाची नोंद नाही. मंचाच्या आदेशावरुन तक्रारदार स्वत: गैरअर्जदार यांचेकडे गेले व या गोष्टीची त्यांनी स्वत: खातरजमा केली. त्याबाबतचे त्यांचे पत्र (नि.11/1) मंचासमोर दाखल आहे.
- गैरअर्जदार ही हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनची डीलर आहे. परंतु प्रस्तुत तक्रारीत कंपनी गैरअर्जदार नाही. तक्रारदार गैरअर्जदारांनी त्यांचे लेखी जबाबात नमूद केलेल्या कागदपत्रांसह हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडे पत्रव्यवहार करु शकतात.
सन 2008 नंतर उपरोक्त कार्डावर गॅस सिलेंडर दिलेले नाही. तक्रारदारा जवळ नोंदणी पावती (एस.व्ही.पावती) नाही. गैरअर्जदारांच्या संगणकीय डाटात ग्राहक क्रमांक 108084 अन्वये तक्रारदारांच्या नावाची नोंद नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदारांनी तक्रारदारांना गॅस कनेक्शन कार्ड नियमित करुन दिले नाही यात गैरअर्जदारांनी तक्रारदारांना दिलेल्या सेवेत काहीही कमतरता केलेली नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.