निकाल
पारीत दिनांकः- 30/06/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार संगणक अभियंता आहेत व त्यांचे साधना सहकारी बँकेमध्ये बचत खाते आहे, तसेच त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया, मगरपट्टा शाखा येथे प्रायव्हेट फंडाचे खाते आहे. तक्रारदारास दि. 16/3/2009 रोजी त्यांच्या प्रायव्हेट फंडाच्या खात्यामध्ये रक्कम रु. 40,000/- जमा करावयाची होते, म्हणून त्यांनी त्यांच्या साधना सह. बँकेचा अकाऊंट पेयी चेक त्यांच्या वडीलांकडे दिला. तक्रारदारांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडिया, मगरपट्टा शाखा येथील खात्यामध्ये चेक भरावयास गेले असता, तेथील कर्मचारी सौ. मंजु थोरवडे यांनी, चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाका असे सांगितले, त्यानुसार तक्रारदारांच्या वडीलांनी चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकला व तशी पोच व बँकेचा शिक्का तेथील कर्मचारी श्री उत्कर्ष आगरकर यांनी दिली. त्यानंतर तक्रारदारांच्या वडीलांनी पासबुक भरुन घेतले, परंतु धनादेशाची रक्कम वटल्याशिवाय पासबुकमध्ये शेरा येत नाही असे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तीन दिवसांनंतर जेव्हा रक्कम ट्रान्सफर झाली किंवा नाही, हे विचारण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, मगरपट्टा शाखा येथे चौकशी केली, तेव्हा रक्कम अजून ट्रान्सफर झाली नाही, असे त्यांना सांगण्यात आले. म्हणून तक्रारदार साधना सह. बँकेमध्ये चौकशीकरीता गेले, तेव्हा त्यांना बँकेच्या मॅनेजरने दि. 16/3/2009 रोजीच चेक वटला आहे, असे सांगितले. तक्रारदारांनी त्यांना धनादेश वटला असला तरी त्याची नोंद त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यामध्ये झालेली नाही, असे साधना सह. बँकेच्या मॅनेजरना सांगितले, त्यावर त्यांनी सदरचा चेक हा बेअरर म्हणून वटला आहे, असे सांगितले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांना अकाऊंट पेयी चेक दिला होता, बेअरर चेक कधी दिलेलाच नव्हता. तक्रारदारांनी लगेचच सदरचा चेक दाखविण्याची विनंती केली, तो चेक पाहिला असता, त्यावर अकाऊंट पेयी चा शेरा खोडून “cross cancelled please pay cash only” असे लिहून तक्रारदारांची खोटी सही करुन सदरचा चेक वटविला. तक्रारदार, सदरच्या चेकची प्रत घेऊन जाबदेणार, स्टेट बँक ऑफ इंडिया, हडपसर शाखेच्या मॅनेजरना भेटले व चेकची प्रत व त्यांच्या शाखेचा शिक्का असलेली पोच दाखवून घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देऊन चेक त्यांच्या शाखेमध्य भरलेलाच नव्हता आणि त्यावरील शिक्का व पोच त्यांच्या शाखेची नाही, असे त्यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदार वारंवार सदर स्टेट बँक ऑफ इंडिया येथे गेले असता त्यांना कोणीही दाद दिली नाही, म्हणून त्यांनी दि. 24/3/2009 रोजी हडपसर पोलिस स्टेशन येथे रितसर लेखी तक्रार दाखल केली. तेथील निरिक्षकाने साधना बँकेमध्ये चौकशी केली असता, बँकेच्या मॅनेजरने सदर चेकवरील स्वाक्षरी व त्यांची सही जुळत असल्याचे व ते रक्कम रु. 1,00,000/- पर्यंतचे चेकबाबत कोणतीही पडताळणी करीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस निरिक्षकाने स्टेट बँकेच्या मॅनेजरकडे चौकशी केली असता व त्या बँकेच्या शिक्क्यांचे नमुने मागविले असता, त्या नमुन्यांमधील एक शिक्का तक्रारदार यांच्याकडील पोच पावतीवरील शिक्क्याशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले व नंतर भारतीय स्टेट बँकेच्या मॅनेजरने पोलिसांसमोर सदरचा चेक त्यांच्या शाखेमध्ये भरल्याचे मान्य केले. परंतु हा चेक कोणी खोट्या सह्या करुन वटविला व रक्कम काढून घेतली याबाबत खुलासा होऊ शकला नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडीलांनी स्टेट बँकेच्या कर्मचार्याने सांगितल्यानुसार चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकला होता व बँकेच्या निष्काळजीपणामुळे व आंधळ्या कारभारामुळे कोणीतरी तो चेक ड्रॉप बॉक्समधून काढून त्यावर खोत्या सह्या करुन त्यांच्या खात्यामधून रक्कम काढून गैरव्यवहार केलेला आहे, त्यामुळे त्यांना विनाकारण रक्कम रु. 10,000/- इन्कम टॅक्स भरावा लागला व आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 40,000/-, आयकर खात्याने केलेल्या दंडाची रक्कम रु. 10,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी भरपाई 25,000/-, असे एकुण रक्कम रु. 75,000/- मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] सर्व जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार क्र. 1 व 3 यांनी त्यांच्या संयुक्त लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांचे वडील दि. 16/3/2009 रोजी जाबदेणार क्र. 1 यांच्या शाखेमध्ये चेक जमा करण्यास आले होते, हे त्यांना मान्य नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या बँकेतील कर्मचारी सौ. मंजु थोरवडे यांनी, चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाका असे सांगितले, हेही त्यांना मान्य नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकल्यानंतर पोच देण्याची पद्धत नाही. बँकेचे कर्मचारी श्री. उत्कर्ष आगरकर यांनी त्यांना चेकची पोच दिली हे जाबदेणारांना मान्य नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, श्री. उत्कर्ष आगरकर नावाची कुठलीहे व्यक्ती त्यांच्या जाबदेणार क्र. 1 बँकेमध्ये कर्मचारी नाही. जे चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकले जातात, ते सुरक्षित असतात व ज्या-त्या खात्यामध्ये जमा केले जातात व जे चेक काऊंटरवर जमा केले जातात त्यांची पोच दिली जाते. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे साधना बँकेचा कुठलाही चेक आला नाही त्याचप्रमाणे सदरचा चेक हा बेअरर होता, याबद्दल त्यांना कल्पना नाही. पोलिसांनी जाबदेणारांकडे असलेले स्टँम्पचे सॅम्पल घेतले होते, त्यापैकी कुठलेही सॅम्पल तक्रारदारानी दाखविलेल्या पोचबरोबर जुळत नव्हते, म्हणून पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, साधना सहकारी बँकेने कुठलीही पडताळणी न करता, चेकमध्ये एवढी खाडाखोड असताना तो चेक वटविला, त्यांच्याविरुद्ध तक्रारदारांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांची मुळ तक्रार हे त्यांचा चेक चोरीला गेल्याची आहे, परंतु तक्रारदारांनी सेवेतील त्रुटीकरीता प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे, त्यामुळे ती खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणार क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबाच्यापुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
5] जाबदेणार क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार क्र. 2 यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांचा दि. 16/3/2009 रोजीचा चेक बेअरर म्हणून वटला असे त्यांनी तक्रारदारांना सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी चेक दाखविण्याची विनंती केली असता, त्यांनी चेक दाखविला. सदरील चेकवरील खोटी सही करुन क्रॉस असलेला चेक बेअरर करुन त्रयस्थ व्यक्तीने तो चेक वटविला, हे जाबदेणार क्र. 2 यांना मान्य नाही. जाबदेणार क्र. 2 यांच्या म्हणण्यानुसार, सदर चेक हा साधना सहकारी बँक लि. शाखा हडपसर यांच्याकडे बेअरर स्वरुपात रक्कम मिळण्यासाठी आला होता व सदर चेकवरील असणार्या सह्यांची खात्री करुन चेकवरील रक्कम संबंधीत व्यक्तीस दिलेली आहे व त्यांची कायदेशिर जबाबदारी पार पाडलेली आहे. जाबदेणार क्र. 2 यांच्या म्हणण्यानुसार, सदरचा वाद हा फौजदारी स्वरुपाचा असून तक्रारदारांनी योग्य त्या ऑथॉरिटीकडे दाद मागणे आवश्यक आहे, त्यमुळे प्रस्तुतची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार क्र. 2 करतात.
6] जाबदेणार क्र. 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबाच्यापुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
7] सर्व पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारास दि. 16/3/2009 रोजी त्यांच्या प्रायव्हेट फंडाच्या खात्यामध्ये रक्कम रु. 40,000/- जमा करावयाची होते, म्हणून त्यांनी त्यांच्या साधना सह. बँकेचा अकाऊंट पेयी चेक त्यांच्या वडीलांकडे दिला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडीलांनी तेथील कर्मचारी सौ. मंजु थोरवडे यांच्या सांगण्यावरुन, चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकला व तशी पोच व बँकेचा शिक्का तेथील कर्मचारी श्री उत्कर्ष आगरकर यांनी दिली. परंतु जाबदेणार क्र. 1 बँकेच्या म्हणण्यानुसार, चेक जर ड्रॉप बॉक्समध्ये टाकला तर त्याची पोच मिळत नाही. जाबदेणार क्र. 1 व 3 यांनी दि. 16/3/2009 रोजीची ड्रॉप बॉक्समधून चेक मिळाल्याची यादी दाखल केली आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या चेक नंबर व रक्कम आढळून येत नाही. यावरुन तक्रारदारांच्या वडीलांनी सदरचा चेक ड्रॉप बॉक्समध्ये टाकला नव्हता, हे दिसून येते. जाबदेणार क्र. 2 यांनी जी व्यक्ती बेअरर चेक घेऊन आली होती त्या व्यक्तीस पडताळणी करुन, चेकवरील सह्यांची खात्री करुन रक्कम दिली, असे नमुद केले आहे. सदरचा चेक हा जाबदेणार क्र. 1 व 3 यांच्याकडे सादरच केला गेला नाही, त्यामुळे या प्रकरण्यामध्ये मंचास त्यांची कुठलीही सेवेतील त्रुटी आढळून येत नाही. त्याचप्रमाणे जाबदेणार क्र. 2 यांनी कुठलीही शहानिशा न करता बेअरर चेक वटविला, यासाठी तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केला नाही. तक्रारदारांनी वादातीत चेक चोरीला जाऊन त्याआधारे अज्ञात इसमाने अकाऊंट पेयी, क्रॉस केलेच्या चेकवर खोडून “cross cancelled please pay cash only” असे लिहिले व रक्कम काढून घेतली व जाबदेणार यास जबाबदार ठरतात यासाठी कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही, म्हणून मंच प्रस्तुतची तक्रार नामंजूर करते.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.