निकाल
(घोषित दि. 12.09.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार या जालना येथील रहिवाशी असून, नगर परिषद जालना येथे सफाई कामगार म्हणून नोकरीत होत्या. नोकरीवर असतांना त्यांचा पगार गैरअर्जदार बॅंके मार्फत त्यांना मिळत असे. त्यासाठी तक्रारदांचे गैरअर्जदार यांचेकडे सरस्वती बबन जाधव या नावाने बचत खाते आहे. त्यांचा खाते क्रमांक 52070906594 असा आहे. अशा प्रकारे त्यांचा व गैरअर्जदार यांचा ग्राहक संबंध आहे.
वरील बचत खाते तक्रारदार स्वत: वापरत व त्यासाठी त्या मराठीत “सरस्वती” अशी स्वाक्षरी करत. दिनांक 31.01.2013 पर्यंत तक्रारदारांनी सर्व व्यवहार Withdrawal Slip व्दारे स्वत:ची सही करुन केलेला आहे त्या कधीही अंगठा करत नाहीत.
तक्रारादारांनी कोणासही जामीनदार म्हणून सही केलेली नाही. असे असतांना दिनांक 31.07.2007 ते 31.01.2013 या काळात तक्रारदारांच्या खात्यातून त्यांची सम्मती नसतांना गैरअर्जदार यांनी रुपये 2,500/- प्रति माह काढलेले आहेत व ते खाते क्रमांक 62021135035 या कर्ज खात्यावर टाकलेले आहेत. ही बाब लक्षात आल्यावर तक्रारदारांनी तोंडी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले की, शाम शिवाजी मसले यांच्या ओम फर्निचर या दुकानाच्या कर्जासाठी तक्रारदार जामीनदार असल्याने त्यांच्या खात्यात रक्कम वळती केली आहे. तक्रारदारांनी या बाबतीत अधिक चौकशी केली असता गैरअर्जदार यांनी रक्कम काढल्या बाबत जी पावती दाखवली त्यात सहीच्या जागेवर अंगठा केलेला आहे. यावरुन गैरअर्जदारांनी नावाच्या व अडनावाच्या साम्यतेचा गैरफायदा घेवून खोटा अंगठा उठवून परस्पर रक्कम उचलली आहे. तक्रारदार यांचा व ओम फर्निचर यांचा काहीही संबंध नाही व जामीनदार म्हणून त्यांनी कशावरही सही केलेली नाही. असे असतांना खोटा अंगठा लावून रुपये 1,17,000/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांनी इतर खात्यात वळवली आहे. तक्रारदारांनी त्यांना वरील रक्कम परत तक्रारदारांच्या खात्यात टाकण्या बाबत विनंती केली होती. गैरअर्जदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशा रितीने त्यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत कसूर केला आहे.
तक्रारदार यांनी दिनांक 08.05.2013 रोजी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठविली. त्याचे गैरअर्जदारांनी चुकीचे उत्तर दिले. तक्रारदार वारंवार या बाबतीत गैरअर्जदार व त्यांचे वरीष्ठ यांचेकडे पाठपुरावा करत राहील्या. पण त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी अंतर्गत तक्रारदार रक्कम रुपये 1,17,000/- व शारिरीक व मानसिक त्रासा पोटी रक्कम रुपये 50,000/- अशी मागणी करत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत त्यांनी गैरअर्जदारांशी केलेला पत्रव्यवहार, त्यांचा खाते उतारा, तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, त्याचे आलेले उत्तर अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबा नुसार तक्रारदारांची तक्रार सात वर्षा नंतर दाखल केलेली आहे. त्यामुळे त्यांना तक्रार नोंदविण्याचा अधिकार नाही. तक्रारदारांनी दिनांक 11.10.2006 रोजी गैरअर्जदार बॅंकेकडे एक Letter Of Understanding (कपात पत्र) दिले. त्यावर तक्रारदारांचा अंगठा आहे. त्यात त्यांनी त्यांच्या खात्यातून जानेवारी 2007 पासून रुपये 2,500/- कपात करुन वरील कर्ज खात्यात भरणा करावा असे लिहून दिले आहे. त्या अनुषंगाने गैरअर्जदारांनी 2007 – 2013 या कालावधीत वरील कपात केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्या अंगठा न देता सही करत व बॅंकेच्या रेकॉर्डमध्ये तक्रारदार या सही करत असल्याचे दिसते. म्हणून त्यांनी कधीच अंगठा केलेला नाही हे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदारांच्या नोटीसच्या उत्तरात म्हटल्या प्रमाणे तक्रारदारांनी येवून अंगठा हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविण्याची आवश्यकता होती परंतू तसे तक्रारदारांनी केलेले नाही.
गैरअर्जदार पुढे म्हणतात की, तक्रारदारांच्या खात्यातून सन 2007 – 2013 या कालावधीत रक्कम वळती झाली आहे. परंतू तक्रारदारांनी यासाठी लगेचच तक्रार दाखल केली नाही. कर्ज खाते बंद झाल्यावर 6 – 7 वर्षा नंतर तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ती मुदतीत नाही म्हणून तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी व तक्रारदारांना रुपये 10,000/- दंड करण्यात यावा.
गैरअर्जदारांनी आपल्या जबाबा सोबत Letter Of Understanding (कपात पत्र) व शाम शिवाजी मसले (खाते क्रमांक 62021135035) चा खाते उतारा दाखल केला आहे. तक्रारदारांची तक्रार गैरअर्जदारांचा जबाब व दाखल कागदपत्र यांच्या अभ्यासावरुन खलील मुद्दे मंचाने विचारात घेतले आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1.तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे का ? होय
2.गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत काही कमतरता केली आहे का ? होय
2.काय आदेश ? अंतिम आदेश नुसार
तक्रारदारातर्फे विव्दान वकील श्री.जी.एम.जक्कलवार व गैरअर्जदारांतर्फे विव्दान वकील श्री.एन.डी.देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला.
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – तक्रारदारांच्या खात्यातून सन 2007 ते 2013 पर्यंत रुपये 2,500/- कर्ज खात्यात वळते होत होते. त्यामुळे तक्रारदारांच्या पक्षात तक्रार घडण्यास कारण सातत्याने सन 2013 पर्यंत चालूच होते. त्यामुळे दिनांक 31.01.2014 रोजी दिलेली ही तक्रार तांत्रिक द्ष्टया मुद्तबाहय आहे असे म्हणता येणार नाही असे मंचाला वाटते. गैरअर्जदार म्हणतात की, सन 2007 पासून तक्रारदारांच्या खात्यातून रक्कम सातत्याने वळती होत होती असे असतांना 6 – 7 वर्ष तक्रारदारांनी काहीच केले नाही व 2014 मध्ये ही तक्रार दाखल केली. त्यामुळे त्यांना इतक्या उशीराने तक्रार करण्याचा अधिकार राहीलेला नाही. परंतू दाखल कागदपत्रावरुन त्यांनी दिनांक 16.07.2012 पासून सातत्याने वरील गोष्टीचा पाठपुरावा केलेला दिसतो. त्यांनी दिनांक 16.07.2012, 15.02.2013, 18.02.2013 असे गैअर्जदार यांच्याकडे विनंती अर्ज केलेले दिसतात व दिनांक 08.05.2013 व 20.05.2013 अशा नोटीसा देखील पाठविलेल्या दिसतात. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी तक्रार उशीराने दाखल केलेली आहे म्हणून फेटाळणे योग्य ठरणार नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे व मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांक 2 साठी – गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रात नि.12/1 वर त्यांनी Letter Of Understanding (कपात पत्र) म्हणून एक कागद दाखल केला आहे. परंतू त्यावर सरस्वतीबाई बबन जाधव असे लिहून अंगठा केलेला दिसतो. त्या अंगठयाला कोणाचीही निवेदकास ओळखत असल्या बाबत स्वाक्षरी नाही. वरील कथीत कपात पत्रावर ते कोणत्या बॅंकेसाठी आहे याचा देखील उल्लेख नाही. ज्या Loan Account ला रक्कम वळती करावयाची त्या धारकाचे नाव नाही. रक्कम वळती करण्यासाठी कालावधी दिलेला नाही. अशा परिस्थितीत मंच नि.12/1 वर विश्वास ठेवू शकत नाही. गैरअर्जदार बॅंकेने अतिशय बेजबाबदारपणाने हे कथीत कपातपत्र दाखल केलेले दिसते. तक्रारदारांनी नि.4/4 वर गैरअर्जदारांच्या अधिका-यांनी वरिष्ठांना लिहीलेले दिनांक 01.11.2012 चे पत्र दाखल केले आहे. त्या पत्रात तसेच नोटीसच्या उत्तरात व मंच पुढील लेखी जबाबात गैरअर्जदारांच्या अधिका-यांनी त्यांच्या रेकॉर्डला बचत खाते क्रमांक 52070906594 धारक सरस्वतीबाई जाधव या “सरस्वती” अशी मराठीत स्वाक्षरी करत असल्याचे दिसते. ही गोष्ट कबूल केली आहे. असे असतांना कथीत कपातपत्रावर सरस्वतीबाई जाधव यांचा अंगठा घेवून त्यावर कोणाचाही दस्तूर नसतांना गैरअर्जदारांनी त्यांच्या खात्यातून वरील प्रमाणे कपात केल्याचे दिसते. सरस्वती जाधव “सरस्वती” अशी स्वाक्षरी करत असताना कपात पत्रावरच त्यांचा अंगठा कसा घेतला याचे कोणतेही स्पष्टीकरण गैरअर्जदार देवू शकले नाहीत.
गैरअर्जदार म्हणतात की, त्यांनी तक्रारदारांना नोटीसच्या उत्तरात बॅंकेत येवून अंगठा करावा म्हणजे तो अंगठा व कपातपत्र हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविता येईल असे लिहीले होते. परंतू तक्रारदार बॅंकेकडे आले नाहीत. त्यामुळे तपासणी झाली नाही गैरअर्जदार तक्रार चालू असतांना मंचात देखील दस्ताऐवज हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविण्या बाबत अर्ज करु शकत होते. परंतू गैरअर्जरांनी कपातपत्रावरील अंगठा तक्रारदार सरस्वतीबाई यांचाच आहे हे दर्शविणारा कोणताही पुरावा मंचा समोर आणलेला नाही. त्याच प्रमाणे शाम मसले यांच्या कर्जासाठी सरस्वतीबाई जामीन होत्या किंवा कसे या बाबत देखील काहीही पुरावा मंचासमोर नाही.
अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचे बचत खात्यातून शिवाजी मसले यांचे कर्ज खात्यात परस्पर व तक्रारदारांची सम्मती नसतांना रुपये 2,500/- प्रति माह अशी रक्कम अयोग्य पध्दतीने खात्यातून वळती केली. त्यामुळे तक्रारदारांना त्यांची रक्कम बचत खात्यात नमूद केलेल्या व्याज दरासहित परत करणे व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई व तक्रार खर्च म्हणून रुपये 10,000/- देणे न्याय्य ठरेल असे मंचाला वाटते.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यातून काढलेली रक्कम, काढलेल्या दिवसा पासून 4 टक्के व्याज दरासहीत तक्रारदारांच्या खात्यावर वळती करावी.
- गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाची नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) द्यावेत.