जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 158/2016.
तक्रार दाखल दिनांक : 02/06/2015.
तक्रार आदेश दिनांक : 27/03/2017. निकाल कालावधी: 01 वर्षे 09 महिने 25 दिवस
धनराज मच्छिंद्र माने, वय 30 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, प्रोप्रा. राज ऑप्टीकल्स्, समता नगर,
उस्मानाबाद, रा. अनसुर्डा, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा अधिकारी, अलाहाबाद बँक,
शाखा बार्शी नाका, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
(2) सहायक महाप्रबंधक, अलाहाबाद बँक, झोनल ऑफीस,
फर्ग्युसन कॉलज गेटसमोर, शिवाजी नगर, पुणे. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ : एस.बी. तावरे
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे विधिज्ञ : एस.ए. देशपांडे
न्यायनिर्णय
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ता यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, कौटुंबीक चरितार्थाकरिता ते समता नगर, उस्मानाबाद येथे ‘राज ऑप्टीकल्स’ नांवे चष्मा विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्ता यांचे विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 संक्षिप्त रुपामध्ये ‘अलाहाबाद बँक’) यांच्याकडे चालू खाते असून त्या खात्याद्वारे ते व्यापाराचे संपूर्ण व्यवहार करीत आहेत. तक्रारकर्ता यांना व्यवसायाकरिता कॅश क्रेडीटची आवश्यकता होती. त्यांनी अलाहाबाद बँकेशी चर्चा करुन त्यांच्या मान्यतेनंतर रु.7,00,000/- कर्ज मागणी अर्जासह दुकानाचा परवाना, आयकर विवरणपत्र, राहत्या घराचे गहाणखत इ. कागदपत्रे सादर केली. अलाहाबाद बँकेचे पॅनल अॅडव्होकेट एम.ए. पाटील यांनी मिळकतीच्या अनुषंगाने सर्च रिपोर्ट दाखल केला आहे. तक्रारकर्ता यांचे पुढे असे वादकथन आहे की, कर्जाचे अनुषंगाने त्यांनी कागदपत्रे व सर्च रिपोर्ट दाखल केल्यानंतरही अलाहाबाद बँकेने कर्ज वाटप केलेले नाही. तक्रारकर्ता यांना व्यवसायवाढीकरिता भांडवलाची आवश्यकता असल्यामुळे स्वखर्चाने व सर्च फी भरणा करुन कागदपत्रे दाखल केली आहेत. परंतु कर्ज देण्याकरिता अलाहाबाद बँकेने टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी तक्रार केली असता तक्रार मागे घेतल्यास कर्ज देण्यात येईल, असे सांगितल्यामुळे तक्रारकर्ता यांनी तक्रार मागे घेतली. परंतु त्यानंतरही तक्रारकर्ता यांना अलाहाबाद बँकेने कर्ज वाटप केले नाही. तक्रारकर्ता यांना कर्ज प्रकरण करण्यासाठी रु.10,000/- ते रु.12,000/- खर्च आला. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी कर्ज प्रकरणासाठी आलेला खर्च रु.12,000/- देण्याचा व कर्ज रक्कम देण्यासह मानसिक त्रासाकरिता रु.1,00,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा अलाहाबाद बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. अलाहाबाद बँकेने अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील मजकूर व विधाने अमान्य केली आहेत. त्यांच्या प्रतिवादाप्रमाणे तक्रारकर्ता हे त्यांचे ‘ग्राहक’ नाहीत आणि त्यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. तसेच तक्रारकर्ता यांची तक्रार मुदतीमध्ये दाखल केलेली नाही. पुढे असे कथन आहे की, तक्रारकर्ता यांचे त्यांच्याकडे ‘राज ऑप्टीकल्स’ नांवे व्यवसायाकरिता चालू खाते क्र.503019855201 असून त्या खात्याचे संदर्भात तक्रारकर्ता यांना वेळोवेळी सेवा देण्यात येत आहे. तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे कोणताही कर्ज मागणी अर्ज सादर केलेला नाही. अलाहाबाद बँकेचे तत्कालिन शाखाधिकारी श्री. वासणिक यांनी कॅश क्रेडीट मर्यादेसाठी चालू खात्यावर कमीतकमी 6 महिने प्रत्यक्ष व्यवहार करणे गरजेचे आहे, असे सांगितले. तक्रारकर्ता यांचे पूर्वीचे कॅश क्रेडीट खाते सोलापूर जनता बँकेकडे असल्यामुळे अनसुर्डा येथील घर मिळकत गहाणखताद्वारे सोलापूर जनता बँकेकडे तारण असल्याचे विधिज्ञांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेले आहे. ज्या मिळकतीवर तारण कर्ज घेण्याचे असते, त्या मिळकतीच्या मालकी-हक्काचे संदर्भाने ती मिळकत बोजारहीत असल्याबाबत पडताळणी करण्यासाठी विधिज्ञांचा अहवाल व मिळकतीचे मुल्यांकन सादर करणे गरजेचे असते. तक्रारकर्ता यांनी बँकेचे विधिज्ञ व मुल्यांकनकर्ता यांचेशी कायदेशीर फी संदर्भात वाद निर्माण केला. तसेच शाखाधिका-यांची वाद घालून दबाव आणण्याकरिता झोनल ऑफीस, पुणे येथे खोटा अर्ज केला. अलाहाबाद बँकेने तक्रारकर्ता यांना कर्ज देण्यास नकार दिलेला नाही; परंतु आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कर्जवाटप करता येणार नाही, असे सांगितलेले आहे. त्याप्रमाणे तक्रारकर्ता यांनी सोलापूर जनता बँकेचे कर्ज प्रकरण संपुष्टात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. तक्रारकर्ता यांनी झोनल ऑफीस, पुणे यांचेकडे दाखल केलेली तक्रार दि.11/4/2016 चे पत्रानुसार काढून घेतली. तक्रारकर्ता हे बँकेच्या दैनंदीन कामकाजामध्ये अडथळा आणत असल्यामुळे तक्रारकर्ता यांचेविरुध्द दि.22/6/2016 रोजी उस्मानाबाद येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे. व्यवसायासाठी कर्ज वाटप करताना आवश्यक कागदपत्रे पडताळून कर्ज वाटप करणे गरजेचे असते. तक्रारकर्ता यांची तक्रार खोटी असल्यामुळे खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
3. तक्रारकर्ता यांची तक्रार, अलाहाबाद बँकेचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- अलाहाबाद बँकमध्ये ‘राज ऑप्टीकल्स’ नांवे व्यवसायाकरिता तक्रारकर्ता यांचे चालू खाते क्र.503019855201 असल्याबाबत उभयतांमध्ये वाद नाही. असे दिसते की, अलाहाबाद बँकेने तक्रारकर्ता यांना कॅश क्रेडीट वितरीत न केल्यामुळे उभयतांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. तक्रारकर्ता यांचे वादकथनाप्रमाणे कॅश क्रेडीट मिळण्याकरिता त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. उलटपक्षी अलाहाबाद बँकेच्या प्रतिवादाप्रमाणे ज्या मिळकतीवर तारण कर्ज घेण्याचे असते, त्या मिळकतीच्या मालकी-हक्कासंदर्भाने ती मिळकत बोजारहीत असल्याबाबत पडताळणी करणे गरजेचे असते. सोलापूर जनता बँकेकडे तक्रारकर्ता यांचे पूर्वीचे कॅश क्रेडीट खाते आहे आणि अनसुर्डा येथील घर मिळकत गहाणखताद्वारे सोलापूर जनता बँकेकडे तारण असल्याचे विधिज्ञांच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी सोलापूर जनता बँकेचे कर्ज प्रकरण संपुष्टात आणणे गरजेचे असल्याचे सांगितलेले असतानाही तक्रारकर्ता खोट्या तक्रारी करीत आहेत.
5. हे खरे आहे की, तक्रारकर्ता हे व्यवसायाकरिता कॅश क्रेडीट मागणी करीत आहेत. उभयतांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता सकृतदर्शनी तक्रारकर्ता यांचे अलाहाबाद बॅंकेमध्ये चालू खाते असल्याचे निदर्शनास येते. तसेच ते करु इच्छित असलेले कर्ज प्रकरण व त्या संदर्भातील वाद पाहता तक्रारकर्ता हे ‘ग्राहक’ होऊ शकत नाहीत आणि त्यांची तकार मुदतबाह्य आहे, हे आक्षेप ग्राह्य धरता येत नाहीत.
6. मुख्य विवादाकडे गेल्यानंतर अलाहाबाद बँकेचा प्रतिवाद असा आहे की, तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे कोणताही कर्ज मागणी अर्ज सादर केलेला नाही. परंतु उभयतांमधील विवादाचे स्वरुप पाहता तक्रारकर्ता यांचेद्वारे कर्ज मागणी अर्ज व कागदपत्रे दाखल केल्यानंतरच कॅश क्रेडीट वितरीत करण्यासंदर्भाने त्यांच्यामध्ये विवाद निर्माण झालेला आहे, अशी शक्यता आहे. अलाहाबाद बँकेच्या कथनाप्रमाणे तक्रारकर्ता यांना कर्ज देण्यास नकार दिलेला नसून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कर्जवाटप करता येणार नाही. अशा परिस्थितीत तक्रारकर्ता यांनी अलाहाबाद बँकेकडे कर्ज मागणी अर्ज व कागदपत्रे दाखल केलेली आहेत, या अनुमानास आम्ही येत आहोत.
7. हे खरे आहे की, अलाहाबाद बँकेने तक्रारकर्ता यांना कॅश क्रेडीट वितरीत केलेले नाही. त्या संदर्भात अलाहाबाद बँकेचा असा प्रतिवाद आहे की, त्यांनी कर्ज देण्यास नकार दिलेला नसून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कर्जवाटप करणे अशक्य आहे. तक्रारकर्ता यांची अनसुर्डा येथील घर मिळकत गहाणखताद्वारे सोलापूर जनता बँकेकडे तारण आहे आणि ज्या मिळकतीवर तारण कर्ज घेण्याचे असते, त्या मिळकतीच्या मालकी-हक्काचे संदर्भाने ती मिळकत बोजारहीत असणे गरजेचे असते, असे अलाहाबाद बँकेचे कथन आहे. असे दिसते की, अलाहाबाद बँकेच्या प्रस्तुत हरकतीचे तक्रारकर्ता यांनी खंडन केलेले नाही किंवा प्रत्युत्तरादाखल पुराव्याचे स्वतंत्र कागदपत्रे दाखल केलेले नाहीत.
8. वित्तीय संस्थेकडे कर्ज मागणी प्राप्त झाल्यानंतर कर्ज रक्कम वितरीत करण्यापूर्वी कर्ज मिळवण्यास व परतफेडीकरिता अर्जदार सक्षम व पात्र असल्याबाबत सर्वांगीन अभ्यास करुन उचित कर्ज रक्कम करण्याचा वित्तीय संस्थेला स्वविवेकाधिकार आहे, हे अमान्य करता येत नाही. प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता तक्रारकर्ता हे अलाहाबाद बँकेकडून कॅश क्रेडीट घेण्यास इच्छूक आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी कर्ज रकमेची मागणी केलेली आहे. गहाणखतासाठी त्यांनी मौजे अनसुर्डा, ता.जि. उस्मानाबाद येथील राहत्या घराची कागदपत्रे दिलेली आहेत. त्या घराचे गहाणखत सोलापूर जनता बँकेकडे करण्यात आल्याची नोंद शोध अहवालामध्ये आहे. एका अर्थाने गहाणखतासाठी आवश्यक मिळकत ही बोजाविरहीत नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे बँकेच्या हित लक्षात घेऊन अलाहाबाद बँकेने योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कॅश क्रेडीट देण्याकरिता असमर्थता दर्शवली असल्यास प्रस्तुत कृत्य सेवेतील त्रुटी ठरणार नाही आणि तक्रारकर्ता हे अनुतोषाकरिता पात्र ठरत नसल्यामुळे तक्रार नामंजूर होण्यास पात्र आहे, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. शेवटी मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(3) न्यायनिर्णयाची प्रथम प्रत उभय पक्षांना नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
(संविक/स्व/21317) -00-