ग्राहक तक्रार क्र. 51/2014
अर्ज दाखल तारीख : 07/02/2014
अर्ज निकाल तारीख : 21/05/2015
कालावधी : 01 वर्षे 03 महिने 15 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. नामदेव आंबादास राठोड,
वय - 34 वर्षे, धंदा – बेरोजगार,
रा.सेवालाल कॉलनी,
तेरणा कॉलेज जवळ, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
भारतीय स्टेट बँक शाखा उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.बी.बी.देशमूख.
विरुध्द पक्षकारातर्फे विधीज्ञ : श्री.पी.डी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
अ) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचेकडे शिपाई पदासाठी पाठविलेल्या अर्जासोबत विरुध्द पक्षकार (विप) यांनी दिलेला डि.डि. चुकीचा असल्यामुळे अर्ज स्वीकारला न गेल्याने नोकरीची संधी हुकून सेवेत त्रुटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दिलेली आहे.
1. तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे...
तक हा उस्मानाबाद येथील 34 वर्षे वयाचा बेरोजगार आहे. तो लमाण या विमुक्त जातीचा आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शिपाई पदाची जागा भरण्याची जाहिरात आली अर्ज मिळणेसाठी सोबत रु.150/- बँकेचा डि.डि. पाठवणे जरुर होते तक ने दि.09/11/2013 रोजी विप कडे रु.150/- चे डि.डि. ची मागणी केली त्यासाठी डि.डि. रक्कम रु.150/- व कमीशन रु.25/- असे रु.175/- विप कडे जमा केले. विप ने डि.डि. क्र.558584 विदयापीठाचे नावे दिला. दि.14/11/2013 रोजी तक ने कोल्हापूर येथे जाऊन फॉर्म व डि.डि. विद्यापीठात हजर केले. विद्यापीठाने डि.डि.वर मॅनेजरची सही नाही तसेच तारीख नाही म्हणून तक चा फॉर्म नाकारला व तसे पत्र दिले. विमुक्त जाती प्रवर्गातून तक हा एकमेव उमेदवार होता मात्र विप चे चुकीमुळे तक ला नोकरी मिळू शकली नाही. त्याचे शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान रु.4,50,000/- झाले ते मागण्यासाठी त्याने विप ला दि.11/12/2013 रोजी नोटीस पाठविली. मात्र विप ने भरपाई दिली नाही म्हणून तक ने ही तक्रार दि.07/02/2014 रोजी दाखल केलेली आहे.
2. तक ने तक्रारीसोबत विप ने दिलेला डि.डि., रु.175/- ची पावती, विद्यापीठाकडे दिलेला फॉर्म, विद्यापीठाने तो परत दिल्याचे पत्र विद्यापीठाची जाहीरात, नोटीसीची स्थळप्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
ब) विप यांनी हजर होऊन दि.14/07/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही असे विप चे म्हणणे आहे. सदर कामी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर जरुर पक्षकार असल्याचे विप चे म्हणणे आहे. विद्यापीठाने डि.डि. हा संबंधीत बँकेत जमा न करता परत दिला हि चूक झाली सदरहू डि.डि. कोणत्याही बँकेने नाकारला नव्हता. तारीख नाही व स्वाक्षरी नाही या कारणावरुन बँकेने डि.डि. नाकारण्याचा प्रश्न उदभवत नाही. वादोत्पत्तीची तारीख काल्पनीक आहे. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) तक ची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) हुकूम कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1. तक ने विप कडील डिमांड ड्राफ्ट क्र.558584 तसेच तो काढल्याची पावती दि.09/11/2013 ची हजर केली आहे. ड्राफ्ट वरची तारीख 00/11/2013 अशी टाकलेली आहे. म्हणजेच महिना व वर्ष बरोबर आहे पण दिनांक लिहलेला नाही. अथोराईज्ड सिग्नेटोरी व ब्रँच मॅनेजर लिहले आहे पण त्यावर कोणाचीही सही नाही. डि.डि.वर असेही लिहले आहे की व्हॅलीड ओन्ली इफ कंम्प्यूटर प्रिंटेड शिवाजी विद्यापीठाचे दि.16/11/2013 चे पत्र असे दाखवते की तक चा डि.डि. नाकारला कारण त्यावर बँक मॅनेजरची सही नव्हती तसेच तारीख नव्हती. तो डि.डि. सोबत परत केल्याचे लिहले आहे.
2. विप चा बचावाचा मुख्य रोख असा आहे की शिवाजी विद्यापीठ या कामी आवश्यक पक्षकार आहे. मात्र तक ने तो पक्षकार करण्याचे टाळले आहे. विप चे म्हणणे आहे की विद्यापीठाने डि.डि. कोणत्याच बँकेत जमा न केल्यामुळे बँकेने डि.डि. स्विकारण्यास असमर्थता दाखविल्याचे शाबीत होत नाही. डि.डि. वर दिनांक व स्वाक्षरी नसली तरी तो परत करण्याचा पश्न उदभवत नाही.
3. सर्वसाधारणपणे कोणत्याही शासकीय / निमशासकीय पत्रावर / दस्तावर संपूर्ण तारीख असणे जरुर असते केवळ महिना व वर्ष बरोबर असेल तर बँकेचा डिमांड ड्राफ्ट वैध ठरतो हे दाखविण्यास विप ने संबधीत नियम हजर केलेला नाही. अलीकडील व्यापारी व्यवहारात कंम्प्यूटर प्रिंटवर सहया आढळून येत नाहीत उलट आय.टी. कायद्याखाली डिजीटल सिग्नेचरची तरतूद आहे. अशा प्रकारे मॅनेजरच्या सहीची डि.डि.वर जरुर नाही हे विप ला दाखवता आले असते पण विप ने तसे केले नाही. म्हणून त्यांच्या विरुध्द निष्कार्ष काढावा लागेल.
4. तक ने शिवाजी विद्यापीठाला पक्षकार करण्याचे टाळले आहे. विद्यापीठाने डि.डि. स्टेट बँकेच्या कोल्हापूर शाखेत जमा केला असता व त्या शाखेने डि.डि. नाकारला असता तर तक चे म्हणण्यास जास्त पुष्टी मिळाली असती विद्यापीठाने असे केल्याचे दिसत नाही. विद्यापीठ पक्षकार नसल्यामुळे त्यांचे या विषयीचे म्हणणे समजून येत नाही. विद्यापीठाची कोणतीच चूक नव्हती असे आता तरी म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे विप ने दिनांक न टाकता व सही न करता डि.डि. देणे समर्थनीय असल्याचे शाबीत केले नाही. त्यामुळे विप ने सेवेत त्रुटी केली असे आमचे मत आहे.
5. तक ने बेरोजगार असल्यामुळे विद्यापीठात अर्ज केला असे म्हंटले आहे. विप चे चुकीमुळे त्याचा अर्ज नाकारला गेला. तक चे म्हणणे आहे की विमुक्त जाती या कॅटॅगीरीत त्याच्या एकटयाचाच अर्ज होता मात्र हे दाखविण्यास पुरावा नाही. तक ने दुसरीकडे नोकरीचे प्रयत्न सुरु ठेवणे जरुर होते कदाचित विद्यापीठाने त्याला नाकारले सुध्दा असते तथापि तक हा बेराजगार असल्यामुळे त्याला विद्यापीठात उमेदवारीची संधी मिळणे जरुर होते. विप चे सेवेतील त्रुटी मुळे त्याला संधी गमवावी लागली. त्यामुळे विप ने भरपाई म्हणून रु.25,000/- तक ला देणे योग्य आहे असे आमचे मत आहे म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) विप ने तक ला सेवेतील त्रुटीची भरपाई म्हणून रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार फक्त) द्यावेत.
2) विप ने तक ला वरील रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 9 दराने व्याज दयावे.
3) विप ने तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) दयावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन विरुध्द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.