रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 165/2012
तक्रार दाखल दि. 06/03/13
तक्रार निकाली दि. 30/03/2015.
श्री. आनंद भाले राम शर्मा,
सध्या रा. व्हिलेज खरक कालन,
जि. भिवनी, (हरयाणा) 127114.
व दुसरा पत्ता –
बी – 401, मातोश्री अपार्टमेंट, प्लॉट नं. 37,
सेक्टर 6, कामोठे, नवी मुंबई – जि. रायगड. ..... तक्रारदार.
विरुध्द
दि. ब्रँच मॅनेजर,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि.,
210, साई इन्फोटेक, आर. बी. मेहता मार्ग,
पटेल चौक, घाटकोपर (ईस्ट), मुंबई. ..... सामनेवाले
उपस्थिती- मा. अध्यक्ष श्री. उमेश वि. जावळीकर.
मा. सदस्या श्रीमती उल्का अं. पावसकर
मा. सदस्य, श्री.रमेशबाबू बी. सिलीवेरी,
तक्रारदारतर्फे वकील- अँड. व्ही. बी. शर्मा
सामनेवाले विरुध्द एकतर्फा आदेश
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बि. सिलीवेरी
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी मे. युनिटेक ऑटोमोबाईल्स प्रा. लि. यांचेकडून ट्रेलर स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी विकत घेतला होता व त्याचा क्र. एम.एच.-06- एक्यू 3053 असा होता. तक्रारदारांनी मे. सिटीकॉर्प फायनान्स लि. यांचेकडून कर्ज घेऊन सदर ट्रेलर गहाण ठेवला होता. सदर वाहनाचा विमा करार दि. 05/09/2009 ते 04/09/2010 या कालावधीसाठी वैध होता. सदर ट्रेलर दि. 17/12/09 रोजी कळंबोली – तळोजा महामार्गाच्या बाजूला सर्विस रोड वर पार्क केला असताना रात्री 8.30 वाजता चोरीस गेला. सदर बाबत तक्रारदारांनी कळंबोली पोलिस स्टेशन येथे एफ.आय.आर. क्र. 552/2009 अन्वये रीतसर तक्रार दाखल केली तसेच तक्रारदारांनी, सामनेवाले, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व फायनान्स कंपनीला देखील कळविले. सामनेवाले यांनी मे. व्ही. बी. असोसिएटस, सर्व्हेअर व इनव्हेस्टीगेटर प्रा. लि. यांना ट्रेलरच्या तपासा संदर्भात नेमले होते. सर्व्हेअर यांनी तक्रारदारांस दि. 11/01/10 रोजी याबाबत अहवाल दिला. तक्रारदारांनी विमा रक्कम प्राप्त होणेकामी सर्व्हे अहवालासोबत अन्य संबंधित दस्त, हमीपत्र व प्रतिस्थापन पत्र सामनेवाले यांचेकडे दाखल केली व सामनेवालेंकडून त्याची पोच घेतली. दरम्यान तक्रारदारांना आर्थिक समस्या असल्याने तक्रारदार हे आपल्या मूळ गांवी निघून गेले. परंतु अद्याप पर्यंत सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विमा दावा मान्य अथवा अमान्य केल्याबाबत तक्रारदारांस काहीही न कळविल्याने व सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
3. सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊन देखील ते मंचासमक्ष हजर न राहिल्याने व त्यांना अनेक संधी देऊनही त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने सामनेवाले यांचेविरुध्द एकतर्फा तक्रार चालविण्यात येते असे आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
4. तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले असता, तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा कराराप्रमाणे वाहन (ट्रेलर) चोरी
विमा दावा प्रतिपूर्ती रक्कम अदा न करुन सेवा सुविधा पुरविण्यात
कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदार यांस नुकसानभरपाई देण्यास पात्र
आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमिमांसा :-
5. मुद्दा क्रमांक 1- तक्रारदारांनी मे. युनिटेक ऑटोमोबाईल्स प्रा. लि. कडून ट्रेलर क्र. एम.एच.-06- एक्यू 3053 हे विकत घेऊन सामनेवालेंकडून सदर ट्रेलरचा विमा उतरवला. सदर विमा करार 05/09/09 ते 04/09/10 या कालावधीसाठी वैध होता. दि. 17/12/09 रोजी ट्रेलर चोरीला गेल्यानंतर तक्रारदारांनी सदर बाबत कळंबोली पोलिस स्टेशन येथे एफ.आय.आर. क्र. 552/2009 अन्वये रीतसर तक्रार दाखल केली तसेच सामनेवाले, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व फायनान्स कंपनीला देखील कळविले. सामनेवाले यांनी मे. व्ही. बी. असोसिएटस, सर्व्हेअर व इनव्हेस्टीगेटर प्रा. लि. यांना ट्रेलरच्या तपासा संदर्भात नेमले होते. सर्व्हेअर यांनी तक्रारदारांस दि. 11/01/10 रोजी याबाबत अहवाल दिला. तक्रारदारांनी विमा रक्कम प्राप्त होणेकामी सर्व्हे अहवालासोबत अन्य संबंधित दस्त, हमीपत्र व प्रतिस्थापन पत्र सामनेवाले यांचेकडे दाखल केली.
परंतु तक्रारदारांनी विमा दावा मान्य करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सामनेवाले यांचेकडे जमा करुन देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल करेपर्यंत कोणताही निर्णय न घेऊन तक्रारदारांस कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्रमांक 2- सामनेवाले यांना दि. 12/04/11 रोजी तक्रारदारांनी विमा दावा रक्कम प्राप्त होणेकामी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देऊनही सामनेवाले यांनी तक्रारदारांस विमा दाव्याची रक्कम अदा न करुन किंवा त्याबाबत कोणतीही उपाययोजना न करुन तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब सिध्द होत आहे. सबब, सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत असल्याने मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. वर नमूद निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 165/2012 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांचा वाहन चोरी विमा दावा प्रतिपूर्ति रक्कम अदा न करुन
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे वाहन चोरी विमा दावा प्रतिपूर्ति रक्कम रु.
15,12,099/- (रु. पंधरा लाख बारा हजार नव्व्याण्णव मात्र) दि. 12/04/2011 पासून ते
दि. 30/03/2015 पर्यंत द.सा.द.शे. 6% व्याजासह या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
4. सामनेवाले यांनी वर नमूद क्र. 3 ची पूर्तता विहीत कालावधीत न केल्यास, सामनेवाले यांनी तक्रारदार यांस रक्कम रु. 15,12,099/- (रु. पंधरा लाख बारा हजार नव्व्याण्णव मात्र) दि. 12/04/2011 पासून ते तक्रारदारांस सदर रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह अदा करावी.
5. सामनेवाले यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. 80,000/- (रु. ऐंशी हजार मात्र) या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून 30 दिवसांत द्यावेत.
6. सदर न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 30/03/2015.
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.