निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,तक्रारदाराचे पती श्री.सुभाष कनिराम राठोड शेतकरी असून, गट क्र.24ए मौ.साकुड ता.अंबाजोगाई जि.बीड येथे त्यांचे मालकीची शेत जमिन आहे. दुर्दैवाने तक्रारदाराच्या पतीचा ता.11.05.2009 रोजी अपघाती मृत्यू झाला. सदर अपघाताची माहीती भैसा पोलिस स्टेशन जि.अदिलाबाद यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनेची चौकशी करुन पंचनामा केला. तसेच मयताचे प्रेत पोस्ट मार्टम साठी पाठवले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई जि.बीड यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे आवश्यक कागदपत्रासह दाखल केला. परंतु अद्यापपर्यत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी विमा प्रस्ताव मंजूर केला नाही अशी अर्जदाराची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.1 यांनी ता.12.02.2012 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेंडर असून गैरअर्जदार क्र.1 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी विहीत मुदतीत तसेच शासनाच्या परिपत्रकातील निर्देशानुसार आवश्यक कागदपत्रासहीत नियमानुसार गैरअरर्जदार क्र.1 यांचेकडे पाठवला नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदारांचा प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर केला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांची तक्रार (Premature) मुदतपूर्व दाखल केली.
गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स यांचे लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव ता.22.09.2009 रोजी प्राप्त झाला. सदर प्रस्तावामध्ये एफ.आय.आर., मृत्यू प्रमाणपत्र, इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट वगैरे कागदपत्र अपूर्ण असल्याबाबतच्या शे-यासह प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने ता.21.06.2010 रोजी पाठविण्यात आला. तक्रारदारांनी सदर कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे ता.24.11.2010 रोजी प्रस्तावाची फाईल बंद करण्यात आली.
गैरअर्जदार क्र.3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार शासनाने सदरची कल्याणकारी योजना शेतक-यांच्या हितासाठी सुरु केली असून योजनेच्या अंमलबजावणीसाठी विमा हप्त्याची एकत्रित रक्कम शेतक-यांच्या वतीने विमा कंपनीकडे अदा केली आहे. सदरील योजना 12 ते 75 वयोगटातील खातेदार शेतकरी यांना लागू आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्र.1, 2, 3 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे पती सुभाष कनिराम राठोड हे शेतकरी असून दुर्दैवाने ता.11.05.2009 रोजी झालेल्या अपघातात मृत्यू पावले.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई जि.बीड यांचेकडे ता.7.8.2009 रोजी दाखल केल्याचे दिसून येते. तक्रारीत दाखल पुराव्यानुसार तक्रारदारांचे पती शेतकरी असून अपघाती मृत्यू पावल्याचे स्पष्ट होते.
गैरअर्जदार क्र.2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या प्रस्तावामध्ये काही कागदपत्रांची अपूर्णता असल्यामुळे “ अपुर्ण कागदपत्रे ” अशा शे-यासह गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे पाठवला. तक्रारदारांनी सदर कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे प्रस्तावाची फाईल ता.24.11.2010 रोजी बंद करण्यात आली. तक्रारीत दाखल पुराव्यानुसार गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदारांना ता.24.1.1.2010 रोजीचे पत्र पाठवल्याबाबतचा कोणताही पुरावा न्यायमंचासमोर नाही. तक्रारदारांना प्रस्तावाबाबतची कोणतीही माहीती न मिळाल्यामुळे सदर कागदपत्रांची पुर्तता झालेली नाही. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने प्रस्तावा बाबतची कोणतीही माहीती न देता तक्रारदारांच्या प्रस्तावाची फाईल बंद केली. त्यामुळे तक्रारदारांच्या प्रस्तावाचा गुणवत्तेवर निकाल होऊ शकला नाही. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीची सदरची कृती सेवेतील त्रूटी असल्याचे स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे.तक्रारदारांना विमा प्रस्तावाची फाईल बंद झाल्याबाबत माहीती न मिळाल्यामुळे तक्रारदारांना सदरची तक्रार दाखल करण्यास विलंब झाला आहे. सदरची योजना शासनाने शेतक-याकरिता कल्याणकारी योजना राबवलेली असल्यामुळे विलंबाच्या तांत्रिक कारणास्तव तक्रार फेटाळणे उचित नाही अशा परिस्थितीत तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करणे योग्य होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी सदर प्रकरणात 7/12 उतारा, फेरफार,6-क चा उतारा, पोलिस पाटील अहवाल, एफ.आय.आर., वगैरे पोलिस पेपर्स, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वारसाचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, वगैरे कागदपत्र दाखल केली आहेत. सदर कागदपत्रानुसार तक्रारदार हे शेतकरी असून त्यांचे अपघाती निधन झाल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत तक्रारदार सदर योजने अंतर्गत न्याय मिळण्यास पात्र झाल्याचे स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने सदर योजनेअंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की,
तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत
विमा लाभा रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त)
आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात आंत द्यावेत.
2) वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास 9 टक्के
व्याजदरासहीत द्यावी.
3) खर्चाबाबत आदेश नाही.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड