जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : १६८/२०१७. तक्रार दाखल दिनांक : १८/०७/२०१७. तक्रार निर्णय दिनांक : ३०/०६/२०२१.
कालावधी : ०३ वर्षे ११ महिने १२ दिवस
श्री. बालाजी दादासाहेब बागल, वय ३३ वर्षे, व्यवसाय : खाजगी नोकरी,
रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(१) शाखा व्यवस्थापक, राजयोग बजाज, बजाज ॲटो लि., भानू नगर, उस्मानाबाद.
(२) शाखा व्यवस्थापक, राजयोग बजाज, बजाज ॲटो लि., बार्शी रोड, लातूर.
(३) व्यवस्थापकीय संचालक, बजाज ॲटो कंपनी, बजाज नगर, वाळूज, औरंगाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एस.एच. साळुंके
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एस. यादव
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, दि.१५/११/२०१६ रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडून Bajaj V 15 दुचाकी वाहन रु.६६,३४९/- किंमतीस खरेदी केली असून वाहनाचा नोंदणी क्र. एम.एच.२५/ए.एफ.८१९२ आहे. वाहन खरेदीच्या चार दिवसानंतर इंजीनमध्ये आवाज येऊ लागला. त्यांनी विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे वाहन सर्व्हीसिंगसाठी नेले आणि वाहनाच्या इंजीनचा आवाज येत असल्याबाबत व ॲवरेज कमी असल्याबाबत सांगितले. त्यावेळी वाहनाचे सर्व्हीसिंग केल्यानंतर यापुढे इंजीनमध्ये आवाज येणार नसल्याचे मेकॅनिकने सांगितले. त्यानंतरही वाहनाच्या इंजीनमधील आवाज कमी न झाल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे पुन्हा वाहन नेले असता त्यांनी लातूर येथील सर्व्हीसिंग सेंटरमध्ये वाहन नेण्यास सांगितले. त्यानंतर ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार नोंदवली. दि.२/२/२०१७ रोजी विरुध्द पक्ष क्र.२ यांच्या सर्व्हीसिंग सेंटरमध्ये वाहन नेले आणि तेथे वाहनाची तपासणी करुन इंजीनची टॅपेड सेटींग व ॲवरेज सेटींग करुन देण्यात आले. तीन ते चार दिवसानंतर पुन्हा वाहनाच्या इंजीनमधून आवाज येऊन लागला आणि वाहन व्हायब्रेट होऊ लागले. विरुध्द पक्ष क्र.२ यांच्याकडे पुन्हा वाहन नेले असता मेकॅनिकने चेसीजचे नट फिट करुन व हवा चेक करुन वाहन व्यवस्थित चालेल, असे सांगितले. परंतु वाहनाचा तांत्रिक दोष दुरुस्त झाला नाही. दि.२४/२/२०१७ रोजी विरुध्द पक्ष क्र.२ यांच्या सर्व्हीसिंग सेंटरमध्ये वाहनाची दुसरी सर्व्हीसिंग केली; परंतु वाहनाच्या इंजीनमधून आवाज येणे व व्हायब्रेशन होणे, हे दोष सुरुच राहिले. तक्रारकर्ता यांनी दि.२४/४/२०१७ रोजी नोटीस पाठवून वाहन बदलून देण्याचे कळविले असता उत्तर देऊन वाहन बदलून देण्यास नकार दिला. विरुध्द पक्ष यांनी त्यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी सदोष वाहन बदलून देण्याचा किंवा वाहनाची किंमत परत करण्यासह मानसिक त्रासाकरिता रु.१०,०००/- व तक्रार खर्चाकरिता रु.५,०००/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
(२) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले असून तक्रारीतील कथने अमान्य केली आहेत. त्यांचे कथन आहे की, दि.१०/१०/२०१६ रोजी वाहन खरेदी केल्यानंतर ९ महिन्यामध्ये जवळपास ९५०१ कि.मी. वाहन चालविण्यात आले. वाहनाचा सातत्यपूर्ण व मोठ्या प्रमाणावरील वापर हा त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्याचे सिध्द करते. वाहनाच्या दोषाच्या आरोपाशिवाय तक्रारकर्ता यांनी सबळ पुरावा दाखल केला नाही किंवा तज्ञ अहवाल किंवा मत दाखल केले नाही. तक्रारकर्ता यांनी समाधान दर्शविणारे पत्र दिलेले असल्यामुळे तक्रार खोटी आहे. शेवटी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची वादकथने, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन, उभय पक्षांनी दाखल केलेले कागदपत्रे इ. चे अवलोकन करण्यात आले असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विक्री केलेले वाहन सदोष
असल्याल्याचे सिध्द होते काय ? होय.
(२) तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(४) मुद्दा क्र. १ व २ :- तक्रारकर्ता यांनी दि.१५/११/२०१६ रोजी विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडून Bajaj V 15 दुचाकी वाहन खरेदी केले, ही बाब विवादीत नाही. त्या वाहनाचा नोंदणी क्र. एम.एच.२५/ए.एफ.८१९२ दिसून येतो.
(५) वाहन खरेदी केल्यानंतर इंजीनमध्ये आवाज, ॲवरेज कमी येणे, वाहन व्हायब्रेट होणे इ. दोष वाहनाची दुरुस्ती केल्यानंतरही सुरुच राहिले, हा तक्रारकर्ता यांचा मुख्य वाद आहे. उलटपक्षी विरुध्द पक्ष यांच्या कथनानुसार वाहनाचा सातत्यपूर्ण व मोठ्या प्रमाणावरील वापर हा त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्याचे सिध्द करते. तसेच वाहनाच्या दोषाच्या आरोपाशिवाय तक्रारकर्ता यांनी सबळ पुरावा दाखल केला नाही किंवा तज्ञ अहवाल किंवा मत दाखल केले नाही.
(६) वादविषयाच्या अनुषंगाने दखल घेतली असता वाहनामध्ये दोष निर्माण झाल्यानंतर त्याचे निराकरण करताना दुरुस्ती केल्याबाबत नोंद ठेवणे विरुध्द पक्ष यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीनुसार वाहनाची दुरुस्ती केल्याबाबत विरुध्द पक्ष यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्ता यांच्या वाहनाच्या सातत्यपूर्ण दुरुस्तीनंतर तेच दोष पुन्हा पुन्हा उद्भवत असल्यास व दोषाचे निराकरण कायमस्वरुपी होत नसल्यास तो दोष उत्पादकीय स्वरुपाचा ठरेल. उत्पादकीय दोषाबाबत तज्ञ अहवाल किंवा उचित पुरावा अभिलेखावर दाखल नसला तरी ती जबाबदारी विरुध्द पक्ष यांच्यावर होती. तक्रारकर्ता यांना विक्री केलेले वाहन दोषरहीत असल्याचे किंवा वाहनामध्ये निर्माण झालेल्या दोषाकरिता तक्रारकर्ता हेच जबाबदार असल्याचे विरुध्द पक्ष यांनी सिध्द केलेले नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ता यांच्या वाहनामध्ये असणा-या दोषाचे निराकरण करण्यास विरुध्द पक्ष असमर्थ ठरले आहेत. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दोषयुक्त वाहन विक्री केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ता वाहन बदलून किंवा वाहनाची किंमत परत मिळण्यास पात्र ठरतात. मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(१) तक्रारकर्ता यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(२) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचे वादकथित Bajaj V 15 वाहन परत घेऊन नवीन वाहन बदलून द्यावे किंवा त्या वाहनाकरिता स्वीकारलेले मुल्य रु.६६,३४९/- परत करावे.
(३) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चाकरिता रु.२,०००/- द्यावेत.
ग्राहक तक्रार क्रमांक : १६८/२०१७.
(४) विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून ४५ दिवसाच्या आत करावी.
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-०-