मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 21/05/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या कथनानुसार, त्याचे गैरअर्जदार क्र. 1 यांचे बँकेत खाते क्र. 2723000102026708 अन्वये दि.20.02.2007 रोजी खाते असून त्याद्वारे धनादेश व ए टी एम ची सेवा घेतलेली आहे. तक्रारकर्ते गैरअर्जदार क्र. 2 च्या ए टी एम मध्ये दि.30.11.2009 ला गेले व रु.10,000/- ची रक्कम काढली. नंतर परत रु.10,000/- ची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता तक्रारकर्त्याला सदर रक्कम प्राप्त झाली नाही. पावतीमध्येही सदर रक्कम प्राप्त न झाल्याचे दर्शवून रु.22,561/- उर्वरित राशी दर्शविली होती. परंतू पासबूकमध्ये मात्र दोनदा रु.10,000/- ही रक्कम काढल्याचे दर्शविण्यात आले. जेव्हा की, तक्रारकर्त्याला एकच वेळा रु.10,000/- ही रक्कम प्राप्त झाली होती. याबाबत कस्टमर केअरला दिली असता त्यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निवारण केले नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल करुन, मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाकरीता नुकसान भरपाईची मागणी केली.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये सदर बाब अफरातफरीची असल्याने फौजदारी कारवाई व्हावी, गुंतागुंतीचे प्रश्न असल्याने मंचाचे अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे, तक्रार फार उशिरा केली असे आक्षेप घेतले आहे. आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरात, गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्याने दि.30.11.2009 ला रु.10,000/- दोनदा ए टी एम मशिनद्वारे काढल्याचे खाते उता-यात नमूद आहे. तक्रारकर्त्याने 22.01.2010 ला गैरअर्जदार क्र. 1 ला खात्यातील अनियमिततेबाबत कल्पना दिली. लगेच याबाबत कल्पना दिली असती तर रोख रकमेची एटीएम मध्ये पडताळणी करता आली असती. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ही खोटी दाखल केलेली आहे व गैरअर्जदार क्र. 1 यांच्या सेवेत कुठलीच कमतरता नसल्याने ती खारीज करण्याची मागणी केलेली आहे.
4. गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारकर्ता त्यांचा ग्राहक नाही, मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र नाही, तक्रार दिवाणी न्यायालयात चालविल्या जावी असे आक्षेप तक्रारीवर घेतलेले आहे आणि पुढे नमूद केले आहे की, तक्रारकर्ता दुस-या बँकेचा खातेधारक असल्याने तो फक्त रु.10,000/- काढू शकत होता. त्यामुळे पहिल्यांदा रु.10,000/- आधिक रु.20/- बँकेचे शुल्क वजा करण्यात आले व शिल्लक रु.22,562/- दर्शविण्यात आली. नंतर 17.45 वाजता रु.32,581/- मुळ रक्कम शिल्लक होती आणि या पावतीचा फायदा घेऊन तक्रारकर्त्याने रु.10,000/- काढले व सदर पावतीचा अवैध फायदा घेतला. तसेच गैरअर्जदार क्र. 1 कडून तक्रार प्राप्त होताच चौकशीअंती रकमेत विसंगती आढळली नाही आणि रोख रक्कम 30.11.2009 रोजी दिवस संपल्यावर अधिक आढळली नाही. वस्तुस्थिती लपवून तक्रारकर्त्याने मुद्दाम तक्रार उशिरा दाखल केली, कारण तक्रारकर्ता ए टी एम मशिनच्या सुरक्षा कर्मचा-याजवळ आपली तक्रार दाखल करु शकत होता. गैरअर्जदार बँकेकडून रक्कम उकळण्याकरीता सदर तक्रार दाखल केलेली आहे, म्हणून ती खारीज करण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदार क्र. 2 ने केलेली आहे.
5. सदर तक्रार युक्तीवादाकरीता आली असता, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारकर्त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता, मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
6. सदर प्रकरण दाखल दस्तऐवज यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 1 यांचा बँकेत खाते क्र. 2723000102026708 अन्वये ग्राहक आहे. तक्रारकर्त्याचे मते त्याने पहिल्यांदा रु.10,000/- एटीएम मशिनला हाताळले व त्याला ती रक्कम प्राप्त झाली. परंतू दुस-यांदा रु.10,000/- काढण्याकरीता मशिनला हाताळले असता, रक्कम प्राप्त झाली नाही व पावतीमध्ये खात्यातील बाकी रक्कम रु.22,561/- जशीच्या तशी दर्शविण्यात आली होती. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे मते तक्रारकर्त्याने दि.30.11.2009 रोजी दोनदा काही वेळेच्या अंतराने रु.10,000/- काढले. तसेच पृष्ठ क्र. 39 वरील दस्तऐवजावरुन तक्रारकर्त्याने दि.30.11.2009 ला दोन वेळेस रु.10,020/- रक्कम काढल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्त्याचे मते त्याला दुस-यांदा काढलेली रक्कम प्राप्त झालेली नाही आणि गैरअर्जदारांच्या मते त्याला दोन्ही वेळेस रकमा प्राप्त झालेल्या आहेत. सदर प्रकरणामध्ये बरेच तांत्रिक मुद्दे उपस्थित होत आहेत. तक्रारकर्त्याला खरोखरीच रु.10,000/- प्राप्त झाले किंवा नाही हे स्पष्ट होण्याकरीता साक्ष, पुरावे तपासून पाहण्याची गरज आहे. त्यामुळे या मंचाचे क्षेत्रात सदर मुद्दा निकाली काढणे शक्य नाही. तक्रारकर्ते सदर तक्रार दिवाणी न्यायालयात किंवा योग्य त्या सक्षम न्यायालयामध्ये दाखल करुन दाद मागू शकतात. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येत असून, तक्रारकर्ते योग्य त्या सक्षम न्यायालयात जाऊन दाद मागण्यास मुक्त आहे.
2) तक्रारीचा खर्च आप-आपला सोसावा.