::निकालपत्र::
(पारीत व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारीत दिनांक– 30 नोव्हेंबर, 2017)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष पंजाब नॅशनल बँके विरुध्द त्याच्या बचतखात्यातून अनधिकृतपणे रक्कम काढल्या संबधी जिल्हा ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार संक्षीप्त कथन पुढील प्रमाणे-
सर्व विरुध्दपक्ष हे नागपूर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा आहेत. तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं-2) पंजाब नॅशनल बँक, शाखा सी.ए. रोड, नागपूर येथे बचत खाते असून त्याचा बचत खाते क्रमांक-2737000100031222 असा आहे. तक्रारकर्त्याने आपल्या दुकानाच्या नुतनी करणा करीत अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, सुभाष पुतला, नागपूर यांचे कडून दिनांक-30/04/2011 रोजी रुपये-25,00,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते आणि ती रक्कम त्याने आपल्या वरील बचत खात्यात जमा केली होती.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याला आवश्यकता पडल्यावर सदर बचतखात्यातून धनादेशाव्दारे तो रक्कम काढीत असे. त्याने रुपये-3540/- एवढया रकमेचा डिमांड ड्रॉफ्ट सब रजिस्ट्रार क्रं-1, नागपूर यांचे नावे धनादेशाव्दारे त्याच्या खात्यातून काढला होता, त्यानंतर त्याचे बचत खात्यात रुपये-4,28,161/- एवढी रक्कम शिल्लक राहिली होती.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्यानंतर तो दि.-20/07/2011 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) बँकेच्या शाखेत धनादेश क्रं-570128 व्दारे रुपये-50,000/- काढण्यासाठी गेला असता त्याला असे सांगण्यात आले की, दिनांक-17/06/2011 रोजी त्याच्या बचत खात्यातून रुपये-3,25,000/- एवढी
रक्कम काढण्यात आलेली आहे. त्यानंतर दिनांक-13/07/2011 रोजी रुपये-50,000/- काढलेले आहे तसेच धनादेश क्रं-570126 व्दारे रुपये-50,000/- एवढी रक्कम न्यु ताज हॅन्डलुमच्या खात्यात गेलेली आहे व त्यावेळेस तक्रारकर्त्याचे खात्यात फक्त रुपये-3,161/- एवढीच रक्कम शिल्लक असल्याचे त्याला सांगण्यात आले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, चौकशी अंती त्याला माहिती पडले की, कोण्या तरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या वरील बचत खात्यातून विड्रॉल स्लीप (Withdrawal Slip)व्दारे रुपये-3,25,000/- एवढी रक्कम दिनांक-17/06/2011 रोजी काढलेली आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने केंव्हाही त्याचे बचत खात्यातून विड्रॉल स्लीप (Withdrawal Slip)व्दारे पैसे काढलेले नाहीत कारण तो नेहमी धनादेशाव्दारे व्यवहार करीत असतो. त्याचा असा आरोप आहे की, विरुध्दपक्ष क्रं-2) ते क्रं-4) यांनी संगनमत करुन विड्रॉल स्लीप (Withdrawal Slip) वरील स्वाक्षरीची त्याच्या बँकेतील प्रमाणित स्वाक्षरीशी कोणतीही शहानिशा वा पडताळणी न करता निष्काळजीपणाने रुपये-3,25,000/- एवढी रक्कम त्याच्या बचतखात्यातून कोण्यातरी अज्ञात ईसमाला दिली आणि अशाप्रकारे सेवेत कमतरता ठेऊन अनुचित व्यापारी पध्दतीचा सुध्दा अवलंब केला. या घटने संबधाने पोलीस स्टेशन मध्ये सुध्दा तक्रार करण्यात आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षांच्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले म्हणून या तक्रारीव्दारे त्याने अशी विनंती केली की, विरुध्दपक्षानां आदेशित करण्यात यावे की, त्यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारकर्त्याचे बचत खात्यातून दिनांक-17/06/2011 रोजी काढलेली रक्कम रुपये-3,25,000/- तक्ररकर्त्याला परत करण्यात यावी. तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- नुकसान भरपाई आणि रुपये-20,000/- तक्रारखर्च तसेच सेवेतील त्रृटी आणि अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्यामुळे रुपये-1,00,000/- अशा रकमा विरुध्दपक्षां कडून मिळाव्यात.
03. विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (4) पंजाब नॅशनल बँके तर्फे एकत्रित उत्तर जिल्हा ग्राहक मंचा समक्ष दाखल करण्यात आले. विरुध्दपक्षांचे लेखी उत्तर नि.क्रं 7 प्रमाणे अभिलेखावर दाखल आहे. त्यांनी लेखी उत्तरात हे नाकबुल केले की, तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातून कोण्या तरी अज्ञात इसमाने त्याची बनावट स्वाक्षरी करुन विड्रॉल स्लीप (Withdrawal Slip)व्दारे रुपये-3,25,000/- एवढी रक्कम काढली. तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्रं-2) बँकेच्या शाखेत बचत खाते असल्याची बाब मान्य करुन पुढे हे नाकबुल केले की, तक्रारकर्त्याने रुपये-25,00,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते. तसेच हे सुध्दा नाकबुल केले की, त्याच्या बचत खात्यातून रक्कम रुपये-3,25,000/-काढल्याचे त्याला बँके तर्फे सांगण्यात आले होते. तसेच ही बाब सुध्दा नाकबुल केली की, विड्रॉल स्लीप (Withdrawal Slip) वर तक्रारकर्त्याची बनावट स्वाक्षरी करुन कोण्यातरी अज्ञात इसमाने रक्कम रुपये-3,25,000/- काढलेली आहे. तक्रारकर्त्याने विड्रॉल स्लीप (Withdrawal Slip) व्दारे कधीही बँकेतून रकमा काढलेल्या नाहीत हे त्याचे विधान नाकबुल केले. तसेच हे सुध्दा नाकबुल केले की, विड्रॉल स्लीप वरील स्वाक्षरीशी तक्रारकर्त्याच्या बँकेच्या रेकॉर्डवर असलेल्या स्वाक्षरीशी पडताळणी न करता आणि कुठलीही काळजी न घेता सदर रक्कम रुपये-3,25,000/- चे पेमेंट करण्यात आले.
विरुध्दपक्षां तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, दिनांक-20/07/2011 ला तक्रारकर्त्याने त्याचे मूळ पासबुक गहाळ झाले म्हणून दुस-या पासबुकाची प्रत मिळण्यासाठी अर्ज केला होता आणि त्याने शुल्क भरल्या नंतर त्याला दुसरे पासबुक देण्यात आले होते. दिनांक-22/07/2011 रोजी पहिल्यांदा तक्रारकर्त्याने अशी तक्रार केली की, त्याच्या बचतखात्यातून अनधिकृतपणे कोणी तरी रुपये-3,25,000/- एवढी रक्कम काढली आहे. विरुध्दपक्षांचे पुढे असे म्हणणे आहे की, पूर्वी विड्रॉल स्लीपव्दारे पैसे काढण्याची मर्यादा रुपये-7000/- एवढीच होती परंतु आता ती मर्यादा काढण्यात आली आहे. परंतु विड्रॉल स्लीपवर या बाबत आवश्यक ती दुरुस्ती झालेली नसल्याने तक्रारकर्त्याने या गोष्टीचा गैरफायदा घेतला आणि ही खोटी तक्रार दाखल केली, सबब तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री अली तर विरुध्दपक्षां तर्फे वकील श्री अंजनकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर आणि प्रकरणातील दाखल दस्तऐवज यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे पुढील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे हे प्रकरण विड्रॉल स्लिपवर त्याची बनावट स्वाक्षरी करुन त्याव्दारे धोखाघडी करुन त्याचे बँकेतील बचतखात्यातून पैसे काढल्याचे दिसते. या संबधी तक्रारकर्त्याने वादातीत विड्रॉल स्लिपवरील स्वाक्षरी बद्दल हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल प्राप्त केला परंतु त्या अहवाला वर आम्ही नंतर विचार करतो.
06. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने त्यापूर्वी विड्रॉल स्लीप (Withdrawal Slip) व्दारे त्याच्या बँकेतील बचतखात्यातून कधीही रकमा काढलेल्या नाहीत आणि प्रत्येक वेळेस तो बँकेत धनादेशाव्दारे व्यवहार करीत होता परंतु त्यचे हे विधान खोटे असल्याचे दिसून येते कारण विरुध्दपक्षाने या संबधी पुराव्या दाखल तक्रारकर्त्याचे खात्याचा खाते उतारा आणि त्याचे पूर्वीच्या काही विड्रॉल स्लीपस दखल करुन हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे की, घटने पूर्वी तक्रारकर्त्याने बरेचदा विड्रॉल स्लिप व्दारे रकमा काढलेल्या आहेत.
07. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की, तक्रारकर्त्याने त्याच्या बँकेतील बचतखात्यातून विड्रॉल स्लिप व्दारे रुपये-3,25,000/- एवढी रक्कम काढली होती कि नाही. वादातील विड्रॉल स्लिप वरील स्वाक्षरी तक्रारकर्त्याची दिसते, परंतु त्याने ती स्वाक्षरी नाकबुल केलेली आहे. तक्रारकर्त्याचे वकीलानीं विरुध्दपक्षाचे बचावातील खोटेपणा दाखविण्यासाठी आमचे लक्ष विरुध्दपक्ष बँकेच्या दोन कर्मचा-यानीं दिलेल्या प्रतिज्ञापत्रांकडे वेधले, त्या दोन बँक कर्मचारी/अधिकारी यांची नावे श्री श्रावण नत्थुजी नन्नावरे आणि श्री भगवंत महादेवराव खांडवे अशी आहेत. त्या दोघानीं आप-आपल्या प्रतिज्ञापत्रात असे नमुद केले की, ते दोघेही तक्रारकर्त्याला व्यक्तीशः ओळखतात कारण त्याचे विरुध्दपक्ष क्रं-2) बँकेच्या शाखे मध्ये बचत खाते आहे आणि तो बरेचदा विरुध्दपक्ष क्रं-2) बँकेच्या शाखेत बँक व्यवहारासाठी येत असतो. श्री श्रावण नत्थुजी नन्नावरे या बँकेच्या कर्मचा-याने आपल्या प्रतिज्ञापत्रात असे नमुद केले की, दिनांक-17/06/2011 रोजी तक्रारकर्ता त्याचे बचतखात्यातून रुपये-3,25,000/- एवढी रक्कम काढण्यासाठी आला होता, त्यावेळी त्याने विड्रॉल स्लिप सोबत त्याचे पासबुक सुध्दा दिले होते. तक्रारकर्त्याने श्री नन्नावरे याचे समक्ष विड्रॉल स्लिपच्या मागे स्वाक्षरी केली तसेच मोबाईल क्रमांक सुध्दा लिहिला, श्री नन्नावरे यांना केवळ रुपये-20,000/- पर्यंतच्या रकमेचे भुगतान करण्याचे अधिकार होते त्यामुळे त्यांनी ती विड्रॉल स्लिप बँकेचे अधिकारी श्री खांडवे यांचे कडे पाठविली. श्री भगवंत महादेवराव खांडवे (सध्या सेवानिवृत्त) यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात असे नमुद केले की, ते विरुध्दपक्ष क्रं-2) बँकेच्या शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत असताना त्यांनी वादातीत घटनेच्या वेळी तक्रारकर्त्याला त्यांच्या केबीन मध्ये बोलाविले, त्याचे ओळखपत्र तपासले आणि एवढी मोठी रक्कम विड्रॉल स्लिपव्दारे का काढत आहे म्हणून विचारणा सुध्दा केली होती, त्यावर तक्रारकर्त्याने असे सांगितले होते की, नुतनीकरणासाठी त्याला पैशाची गरज आहे, तो चेकबुक सोबत आणावयास विसरला आहे. त्यानंतर त्याला ती रक्कम देण्यात आली. परंतु पोलीसांनी घेतलेल्या बयानामध्ये वरील दोन बँकेचे कर्मचारी/अधिकारी यांनी असे सांगितले की, ते बँकेच्या कुठल्याही खातेदाराला व्यक्तीशः ओळखत नाही. त्याच प्रमाणे पासबुक शिवाय केवळ विड्रॉल स्लिपवर रक्कम काढू देण्याची परवानगी नाही. श्री भगवंत महादेवराव खांडवे, वि.प.क्रं-2) बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक यांनी पोलीस बयानात असे सांगितले की, विड्रॉल स्लिप सोबत तक्रारकर्त्याचे पासबुक सुध्दा असल्याने त्यांनी तक्रारकर्त्याला त्यांच्या केबीन मध्ये बोलाविले नाही किंवा त्याचे ओळखपत्र सुध्दा तपासून पाहिले नाही. पुढे पोलीस बयाना मध्ये असे सुध्दा नमुद केले की, तक्रारकर्ता रक्कम काढण्यासाठी आला होता हे सुध्दा त्यांना माहित नव्हते. विड्रॉल स्लिपवरील स्वाक्षरीशी, बँकेच्या रेकॉर्ड मध्ये असलेल्या तक्ररकर्त्याच्या स्वाक्षरीशी तपासणी केल्या नंतर ती रक्कम त्याला देण्यात आली होती.
08. या दोन विरुध्दपक्ष क्रं-2) बँकेतील संबधित कर्मचारी/अधिकारी यांनी पोलीसानां दिलेल्या बयानात आणि ग्राहक मंचा समोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील बयाना मध्ये तफावत आहे. पोलीसानीं घेतलेल्या बयानाचा विचार करता ते बयान पुरावा म्हणून ग्राहय धरता येत नाही आणि पोलीसानीं घेतलेल्या बयानाचा उपयोग हा केवळ साक्षदाराने दिलेल्या साक्षीशी “Corroboration” करण्या इतपत मर्यादित आहे. या दोन बँकेच्या कर्मचारी/अधिका-यानीं पोलीसां समोर जे बयान दिले त्या मध्ये असलेल्या तफावती त्यांना दाखविण्यात आल्या नाहीत तसेच ज्या पोलीस अधिका-याने त्यांचे बयान घेतले त्याचे मार्फत बयानातील तफावती सिध्द झालेल्या नाहीत, त्यामुळे पोलीस बयानाला अशा परिस्थितीत कुठलेही महत्व प्राप्त होत नाही. त्याशिवाय केवळ विरुध्दपक्ष बँकेच्या कर्मचारी/अधिकारी यांच्या पोलीस बयानात आणि त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रां मध्ये तफावत आहे म्हणून तक्रारकर्त्याने केलेले आरोप आपोआप सिध्द होत नाही.
09. तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातून रकमेची उचल दिनांक-17/06/2011 रोजी झाली होती. विरुध्दपक्षाचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, त्या घटनेची खबर लगेच विरुध्दपक्षाला किंवा पोलीसानां तक्रारकर्त्याने दिली नाही. यावर तक्रारकर्त्या तर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, त्याचे बँकेचे मूळ पासबुक हे गहाळ झाले होते म्हणून त्याने दिनांक-20/07/2011 रोजी दुसरे पासबुक मिळण्यास बँके मध्ये अर्ज केला होता, त्यामुळे दुसरे पासबुक मिळे पर्यंत त्याला त्याच्या बचतखात्यातून रुपये-3,25,000/- एवढी रक्कम काढली हे माहिती होणे शक्य नव्हते. परंतु विरुध्दपक्ष बँकेचे कर्मचारी श्री नन्नावरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने विड्रॉल स्लिप सोबत पासबुक आणले होते. सहसा कुठलीही बँक केवळ विड्रॉलस्लिपवर एवढया मोठया रकमेचे भुगतान पासबुक सादर केल्या शिवाय देत नाही. श्री खांडवे, तत्कालीन शाखा व्यवस्थापक यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात, बँकेचे कर्मचारी श्री नन्नावरे यांच्या बयानाशी विसंगत बयान दिले की, तक्रारकर्त्याने त्यांना सांगितले की, तो चेकबुक सोबत आणण्यास विसरला. परंतु श्री खांडवे यांनी तक्रारकर्त्याचे पासबुक पाहिले होते की नाही या बद्दल काहीच सांगितले नाही. यावरुन असे दिसते की, विरुध्दपक्ष बँकेच्या कर्मचारी/अधिकारी यांनी जी प्रतिज्ञापत्रे दाखल केलेली आहेत, त्यातील मजकूर बरोबर नसून त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, त्यामुळे विड्रॉल स्लिप देताना पासबुक बँकेच्या कर्मचारी/अधिकारी यांनी पाहिले होते की नाही या बद्दल ठोस पुरावा विरुध्दपक्ष बँके कडून आलेला नाही.
आता आम्ही हस्ताक्षर तज्ञांनी दिलेल्या अहवाला कडे वळतो-
10. हस्ताक्षर तज्ञाने विड्रॉल स्लिपवरील वादग्रस्त स्वाक्षरीची, तक्रारकर्त्याच्या प्रमाणित (Admitted) स्वाक्षरीशी तुलना करुन असे मत दिले की, ज्या ईसमाने तुलनात्मक स्वाक्ष-या केलेल्या आहेत, त्या इसमाने विड्रॉल स्लिपवरील वादग्रस्त स्वाक्षरी केलेली नाही. हस्ताक्षर तज्ञांचे हे मत स्वाक्षरींच्या झेरॉक्स प्रती वरुन दिलेले आहे, त्यामुळे हस्ताक्षर तज्ञाने आपल्या अहवालात असे पण नमुद केले आहे की, वादग्रस्त आणि तुलनात्मक स्वाक्ष-या जर मूळ स्वरुपात मिळाल्यात तर त्याची तुलनात्मक तपासणी केल्या नंतर त्यांनी दिलेल्या मताला पुष्टी मिळू शकेल आणि त्यावर सखोल कारणमिमांसा पण देता येऊ शकेल. हस्ताक्षर तज्ञांची उलट तपासणी विरुध्दपक्षा तर्फे वकीलांनी घेतली, उलट तपासणीत तज्ञांनी हे मान्य केले की, विरुध्दपक्ष बँके कडून त्यांनी तक्रारकर्त्याच्या मूळ स्वाक्ष-या मागितल्या नाहीत किंवा तक्रारकर्त्याला सुध्दा समक्ष बोलावून स्वतः समक्ष त्याची स्वाक्षरी घेतली नाही. अशाप्रकारे हस्ताक्षर तज्ञानीं वादग्रस्त आणि तुलनात्मक स्वाक्ष-यांच्या झेरॉक्स प्रती वरुन आपले मत प्रदर्शित केले आहे.
11. वास्तविक पाहता हस्ताक्षर तज्ञां कडून हे अपेक्षीत असते की, त्यांनी वादग्रस्त सही किंवा लिखाण या संबधी अहवाल देण्यासाठी वादग्रस्त तसेच प्रमाणित सही आणि लिखाणाच्या मूळ प्रती वरुन तपासणी करावयास हवी आणि त्यानंतर मत प्रदर्शित करायला हवे. परंतु या संबधी हरीयाणा पंजाब मा. उच्च न्यायालयाने “ झरणसिंग –विरुध्द – लाभसिंग”-C.R.No.-1271 of 2016 या मध्ये दिनांक-17/07/2017 ला दिलेल्या निर्णयात असे म्हटले आहे की, दस्तऐवजाच्या फोटो कॉपी वरुन सुध्दा हस्ताक्षर तज्ञ अहवाल देऊ शकतो आणि दस्तऐवजाच्या फोटो कॉपीवरुन तुलनात्मक तपासणी करता येत नाही असा केलेला युक्तीवाद मा.उच्च न्यायालयाने खोडून काढला.
12. विड्राल स्लिप वरील वादग्रस्त स्वाक्षरी आणि तक्रारकर्त्याची प्रमाणित स्वाक्षरी यांची, जर हस्ताक्षर तज्ञाने दिलेल्या कारण मिमांसे प्रमाणे तुलनात्मक तपासणी केली तर आम्हाला सुध्दा विड्राल स्लिप वरील वादग्रस्त स्वाक्षरी आणि तक्रारकर्त्याची प्रमाणित स्वाक्षरी यामध्ये फरक दिसून येतो. वादग्रस्त स्वाक्षरी मध्ये शब्द “RASHID” हा ठळक असून त्यातील मूळाक्षर ही वाचण्या योग्य आहेत परंतू तक्रारकर्त्याच्या प्रमाणित स्वाक्षरी मध्ये केवळ मूळाक्षर “R” हाच फक्त ठळक आणि वाचण्यालायक स्पष्ट दिसून येतो. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याचे स्वाक्षरीतील मूळाक्षर “D” हा वादातीत स्वाक्षरी मध्ये एकसारखा म्हणजे जवळ जवळ नक्कल केल्या नुसार दिसून येतो परंतु प्रमाणित स्वाक्षरी मध्ये “D” हे मूळाक्षर अर्धवट स्वरुपात आणि एकसारखे नसल्याचे दिसून येते. अशाप्रकारे वादातीत आणि तक्रारकर्त्याचे प्रमाणित स्वाक्षरीतील तफावत ही सुक्ष्मपणे पाहिल्या नंतर स्पष्टपणे दिसून येते आणि म्हणून तज्ञानीं दिलेल्या अहवालाला आधार मिळतो. तज्ञानीं दिलेला अहवाल हा केवळ वादग्रस्त आणि प्रमाणित स्वाक्ष-यांच्या झेरॉक्स प्रतीवरुन दिलेला आहे म्हणून त्या कारणास्तव तज्ञांचा अहवाल अयोग्य होत नाही. अशाप्रकरे तज्ञांचा अहवाल आणि अभिलेखावरील इतर पुराव्याच्या आधारे आम्ही या निष्कर्षा पर्यंत पोहचलो आहोत की, विड्रॉल स्लिप वरील वादग्रस्त स्वाक्षरी तक्रारकर्त्याने केलेली दिसून येत नाही. परिणाम स्वरुप असे ठरविण्यात येते की, घटनेच्या दिवशी विड्रॉल स्लिपव्दारे तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातून रुपये-3,25,000/- एवढया रकमेची उचल तक्रारकर्त्याचे स्वाक्षरीने केलेली नव्हती.
13. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-2) शाखा व्यवस्थापक, पंजाब नॅशनल बँक, गांधी बाग शाखा, नागपूर यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यातून त्याच्या स्वाक्षरीची योग्य प्रकारे पडताळणी न करता रक्कम रुपये-3,25,000/- काढू दिली आणि अशाप्रकारे त्यांच्या सेवेतील कमतरता सिध्द होते. सबब विरुध्दपक्ष क्रं-2) पंजाब नॅशनल बँके तर्फे शाखा व्यवस्थापक, शाखा गांधीबाग नागपूर हे तक्रारकर्त्याला त्याची झालेली आर्थिक नुकसानी भरुन देण्यास जबाबदार ठरतात. तक्रारकर्त्याने तक्रारी मध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) शाखा व्यवस्थापक, पंजाब नॅशनल बँक, मुख्य शाखा स्टेशन रोड, नागपूर तसेच विरुध्दपक्ष क्रं-3) पारीतकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-4) भुगतानकर्ता अनुक्रमे पंजाब नॅशनल बँक, शाखा गांधीबाग, नागपूर यांना प्रतिपक्ष केलेले आहे परंतु तक्रारी वरुन तक्रारकर्त्याचे वादग्रस्त रकमेचा व्यवहार हा विरुध्दपक्ष क्रं-2) पंजाब नॅशनल बॅंक शाखा गांधीबाग नागपूर येथून झालेला आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-1) मुख्य शाखेचा त्या व्यवहाराशी संबध दिसून येत नाही तसेच विरुध्दपक्ष क्रं-3) पारीतकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-4) भुगतानकर्ता हे विरुध्दपक्ष क्रं-2) शाखा व्यवस्थापक, पंजाब नॅशनल बँक, शाखा गांधीबाग नागपूर येथील कार्यरत कर्मचारी असून ते विरुध्दपक्ष क्रं-2) शाखा व्यवस्थापकाच्या अधिकाराखाली कार्य करतात म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1), विरुध्दपक्ष क्रं-3) आणि विरुध्दपक्ष क्रं-4) यांचे विरुध्द कोणतेही आदेश पारीत करण्यात येत नाहीत.
14. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
1) तक्रारकर्ता अब्दुल रशीद वल्द शेख अब्दुल्ला यांची, विरुध्दपक्ष क्रं-2) पंजाब नॅशनल बँक, गांधी बाग शाखा, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक, यांचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष क्रं-2) पंजाब नॅशनल बँक, गांधी बाग शाखा, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याच्या बचत खात्यातून बनावट स्वाक्षरीने उचल झालेली रक्कम रुपये-3,25,000/- (अक्षरी रुपये तीन लक्ष पंचविस हजार फक्त) आणि त्यावर तक्रार दाखल दिनांक-20/12/2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6%दराने व्याज यासह येणारी रक्कम तक्रारकर्त्याला द्दावी.
3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-2) पंजाब नॅशनल बँक, गांधी बाग शाखा, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांनी तक्रारकर्त्यास द्दावेत.
4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-2) पंजाब नॅशनल बँक, गांधी बाग शाखा, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.