ग्राहक तक्रार क्र. : 247/2014
दाखल तारीख : 14/11/2014
निकाल तारीख : 20/07/2015
कालावधी: 0 वर्षे 08 महिने 06 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. अशोक पि. रामहारी लिमकर,
वय - 37 वर्ष, धंदा – शेती,
रा.आंद्रुड, ता. भुम, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
शाखा र्इट ता. भुम, जि. उस्मानाबाद.
2. सरव्यवस्थापक,
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
मुख्य कार्यालय, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्रीमती शालिनी अंधारे.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधिज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) विरुध्द पक्षकार (विप) बँकेकडे आपले बचत खात्यात पूरेशी रक्कम असताना तक्रारकर्ती (तक) ने दिलेला धनादेश विप न वटवल्यामुळे व त्यानंतर बचत खात्यातील रक्कम परत देण्यास नकार देऊन सेवेत त्रूटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दिलेली आहे.
1. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक हा आंद्रुड ता.भूम चा रहिवासी आहे व सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेला आहे व शेती व्यवसाय करतो. विप क्र.1 उस्मानाबाद डिसीसी बँक ईट शाखा येथे तक चे बचत खाते क्र.10393 असे आहे. विप क्र.2 डिसीसी बँकेचे उस्मानाबाद येथील मुख्य कार्यालय आहे. विप क्र.1 ने धनादेश पुस्तक तक ला दिलेले आहे. दि.20.3.2014 रोजी तक ने आपल्या खात्यात रु.3,00,000/- जमा केले. दि.17.07.2014 रोजी त्या खात्यात रु.2,02,473/- एवढी शिल्लक राहिली. तक चे मित्र यूसूफ अरब यांना आर्थिक व्यवहारापोटी रु.1,00,000/- द्यायचे होते. तक ने धनादेश क्र.4097173 रु.1,00,000/- चा दि.13.8.2014 रोजी यूसूफ रा.राजेश्वर ता.भूम यांना दिला. यूसूफ यांचे ग्रेटेस्ट बॉंम्बे को-ऑप मुंबई येथे खाते आहे. यूसुफ यांनी मुंबई येथे जाऊन त्या बँकेमध्ये धनादेश दाखल केला. त्या बँकेने विप क्र.1 कडे तो धनादेश दि.11.9.2014 रोजी पाठवून दिला. विप क्र.1 ने धनादेश न वटवता फुल कव्हर नॉट रिसीव्हर आणि रेफॅर टू ड्रावर अशा शे-यासह धनादेश त्या बँकेकडे परत पाठवला. वास्तविक तक च्या खात्यात पूरेशी रक्कम होती. मात्र चुकीचे कारण नमूद करुन विप क्र.1 ने धनादेश परत पाठवून सेवेत त्रूटी केली आहे. तक व त्यांचा मित्र यांचे संबंध बिघडले व तक ला मानसिक त्रास सहन करावा लागला. तथापि, तक च्या मित्राने त्यांचे वर फौजदारी कारवाई केलेली नाही.
2. त्यानंतर तक ने विप क्र.1 कडे आपल्या खात्यावरील संपूर्ण रक्कमेची मागणी केली. त्यासाठी चेक व विड्राल स्लीप देऊ केल्या. विप क्र.1 ने चेक अगर विड्राल स्लीप स्विकारल्या नाहीत. तक यांला खात्यातील रक्कमेची दैनदिन कामासाठी तसेच शेती कामासाठी गरज आहे. मात्र विप ने तक ची रक्कम देण्याचे टाळून सेवेत त्रूटी केलेली आहे. त्यामुळे बचत खात्यातील रक्कम रु.2,02,000/- तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावे म्हणून तक ने ही तक्रार दि.14.11.2014 रोजी दाखल केलेली आहे.
3. तक ने तक्रारीसोबत आपले बचत खात्याचा उतारा,दि.13.08.2014 चे धनादेशाची प्रत, चेक रिटर्न मेमो, ग्रेटर बॉम्बे को ऑप बाम्बे डेबीट अॅडव्हाईस, विप कडे दिलेले दि.20.9.2014 चा अर्ज, दि.09.10.2014 रोजी दिलेली नोटीस व पोहच पावती इत्यादी कागदपत्राच्या प्रति हजर केलेल्या आहेत.
ब) विप क्र.1 व 2 यांनी हजर होऊन लेखी म्हणणे दि.20.04.2015 रोजी दाखल केलेले आहे. तक ने आपले मित्राला धनादेश दिला व तो न वटता परत आला त्यामुळे तक ला त्रास सहन करावा लागला हे कथन विप ने अमान्य केले आहे. विप ने सेवेमध्ये त्रूटी केली हे अमान्य आहे. तक ने विप कडे खात्यातील रक्कमेची मागणी केली व विप ने नकार दिला हे अमान्य केलेले आहे. तक ला रक्कम देण्यास विप ने इन्कार केलेला नाही. तक ला जमा रक्कमेची मुदत ठेवी मध्ये पूर्नगुतंवणूक करणे बाबत विनंती करण्यात आलेली आहे. विप चे तात्कालीन चेअरमन व अधिकारी यांनी आपसात संगनमत करुन रु.30/- कोटीचा भ्रष्टाचार करुन विप ला मोठया अडचणीत टाकलेले आहे. त्यामुळे विप बँकेवर प्रशासकाची नेमणूक झालेली आहे. तेरणा साखर कारखाना, तुळजाभवानी साखर कारखाना यांचेकडे रु.250/- कोटी रुपयाचे कर्ज थकीत झालेले आहे. डीआरटी औरंगाबाद व डिआरटी मुंबई येथे प्रकरणे झाली आहेत. ठेवीदारांनी ठेवीच्या रकमा काढून घेतलेल्या आहेत. विप यांना बँकींग व्यवहारासाठी निधी उपलब्ध नाही. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने कलम 22 व 35 बँकीग रेग्यूलेशन अॅक्ट प्रमाणे विप ला नवीन ठेवी घेण्यास प्रतिबंध केलेला आहे. अशा प्रकारे विप आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे तक ची रक्कम परत देण्यास विप यांना योग्य हप्ते मिळणे जरुरी आहे.
क) तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे, तसेच विप चे म्हणणे, यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
- ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
-
मुद्दा क्र.1 व 2 :
- ? यूसूफ यांचे बँकेने नियमाप्रमाणे चेक वटणेसाठी विप यांचेकडे पाठविला. विप यांनी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यायला पाहिजे होती किंवा रिझर्व्ह बँकेने प्रतिबंध केला असे दर्शविणारे पत्र द्यायला पाहिजे होते. असे विप ने काहीही केलेले नाही. त्यामुळे विप च्या कथनाचे समर्थन होऊ शकत नाही.
2. विप ने आता म्हटले आहे की तात्कालीन चेअरमन व अधिकारी यांनी रु.30/- कोटीचा भ्रष्टाचार केला. सहकारी साखर कारखान्यानी रु.250/- कोटीची कर्जे थकीत ठेवली. आता विप बँकेवर प्रशासकाची नियूक्ती झाली आहे. सहकारी बँकातील तसेच सहकारी साखर कारखानदारातील भ्रष्टाचाराबद्दल पुष्कळच चर्चा चालू आहे. त्यापैकीच विप हे प्रकरण आहे. राजकारण्यांनी तसेच सहकारी संस्थाच्या पदाधिका-यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला हे जगजाहीर आहे. विप ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून जिल्हयातील निम्न स्तरातील लोकांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी कायदयाने निर्माण झालेली आर्थिक संस्था आहे. मात्र संचालक व अधिकारी यांनी संगनमत करुन बँक डबघाईला आणली. सामान्य ठेवादारांना ठेवीच्या रक्कमा मिळणे अवघड करुन टाकले. यांची वैयक्तीक जबाबदारी तात्कालीन संचालक व अधिकारी यांनी घेतली पाहिजे. कूठल्याही परिस्थितीत ठेवीदाराच्या ठेवी परत मिळण्याचा त्यांला अधिकार आहे. आपले संचालक व अधिकारी यांचे भ्रष्टाचारामुळे आपण अशा ठेवी परत देऊ शकत नाही हा विप चा बचाव टिकणार नाही. विप ने ठेवीदार तक ची रक्कम परत न देऊन सेवेत त्रुटी केली हे उघड आहे.
3. तक चे म्हणणे प्रमाणे त्यांचा दि.13.8.2014 चा धनादेश विप ने विनाकारण परत पाठविला. तेव्हा पासून तक आपल्या खात्यावरील रु.2,02,000/- ही रक्कम विप कडून परत मागत आहे. विप चा प्रयत्न असा आहे की, तक ने ती रक्कम बचत खात्याऐवजी मुदत ठेवीत ठेवावी. आपली रक्कम सुरक्षीत राहील अगर त्यावर चांगले व्याज मिळेल असा भरवसा तक ला देणे हे विप चे काम आहे. सध्यांची पार्श्वभूमी पाहता तक ला असा भरवसा कसा वाटेल हा मोठा प्रश्न आहे. ती रक्कम मुदत ठेवी मध्ये ठेवायची की नाही हा सर्वस्वी तक च्या मर्जीचा प्रश्न आहे. याबाबत कोणतीही बळजबरी करता येणार नाही. विप चे म्हणणे आहे की, विप ला हप्ते पाडून मिळावे. जवळजवळ एक वर्षाचा कालावधी निघून गेला आहे. विप चा कारभार प्रशासकाने हाती घेतलेला आहे. अशा परिस्थितीत विप ला योग्य ती मुदत आधीच मिळालेली आहे. त्यामुळे तक हा अनुतोषास पात्र आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो
आदेश
1) तक ची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते.
2) विप यांनी तक ला त्यांचे बचत खात्यातील रक्कम रु.2,02,000/- (रुपये दोन लक्ष दोन हजार फक्त) व त्यात जमा झालेले पूढील व्याज रक्कम फिटेपर्यतचे अशी ताबडतोब द्यावी.
3) विप यांनी तक ला या तकारीचा खर्च म्हणून रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
5) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..