ग्राहक तक्रार क्र. 119/2013
अर्ज दाखल तारीख : 13/08/2013
अर्ज निकाल तारीख: 09/12/2014
कालावधी: 01 वर्षे03 महिने 27 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीमती मंगलबाई ललितदास शेटे,
वय-75 वर्षे, धंदा – काही नाही,
रा.शिवशिंकर नगर, भुम ता. भूम, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सह. बँक.
शाखा, भुम.
2. मुख्या कार्यकारी अधिकारी,
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सह. बँक
मुख्यालय, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य..
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.देवीदास.वडगावकर.
विरुध्द पक्षकार क्र.1, 2 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
आपली विप बँकेमधील रक्कम परत न मिळाल्याने ते मिळण्यासाठी तसेच झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्तीने (तक) ही तक्रार दिलेली आहे.
1) तक हीचे कथन असे की ती निवृत्तीवेतन धारक आहे. निवृत्ती वेतनातून शिल्लक रक्कम तसेच आणखीची रक्कम असे रु.6,00,000/- तिने विप क्र.1 म्हणजे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा भूम यांच्याकडे दि.18/04/2011रोजी दोन वर्षासाठी मुदतठेव म्हणून ठेवली. त्यावर द.सा.द.शे.9 दराने व्याज देय आहे. ठेव पावती क्र.292608 त्याबददल विप क्र.1 यांनी दिली. विप क्र.2 हे विप क्र.1 यांचे प्रशासकीय प्रमूख आहेत. विप बँक लोकांकडून ठेवी घेतात तसेच लोकांना कर्ज देवून व्यावसाय करुन नफा कमावितात.
तक हीच्या ठेवीची मुदत दि.18/04/2013 रोजी संपली त्यानंतर ता.20/04/2013 रोजी ठेव पावती घेवून तक विप यांच्याकडे गेली. त्यांच्या सांगण्यावरुन पावतीच्या मागील बाजूस तिकीट लावून स्वाक्षरी केली. विप क्र.1 यांनी सांगितले की तूमचे आमच्याकडे बचत खाते आहे. त्या खाते क्र.7523 मध्ये तुम्ही तुमची रक्कम वर्ग करु. तक त्या खत्याचे पासबूक घेवून विप क्र.1 यांच्याकडे गेली. तेव्हा असे निदर्शनास आले की ठेव व व्याजाची रक्कम विप यांनी खात्यात जमा केली नाही. सततच्या पाठपूराव्या नंतर ता.11/05/2013 रोजी विप क्र.1 यांनी तकच्या खात्यात रु.7,15,771/- एवढी रक्कम जमा केली. मात्र शिल्लक रक्कम चुकीची दाखविली. कारण पुर्वीची शिल्लक रु.1,108/- अशी होती. सदरहू रक्कम उचलण्यासाठी तकने विप क्र. 1 यांच्याकडे मागणी केली. सध्या बँकेची परीस्थिती नाजूक आहे असे सांगून विप क्र.1 यांनी तक हिला तिची रक्कम उचलू दिली नाही व गैरव्यवसायीक मार्गाचा अवलंब केला. तक हीने दि.30/05/2013 रोजी विप क्र.1 यांना नोटीस पाठवून रक्कमेची मागणी केली. तरीसूध्दा रक्कम दिली नाही. अगर उत्तरही दिले नाही. त्यामुळे तक हीची रक्कम व त्यावर दि.11/05/2013 रोजी पासून द.सा.द.शे. 18 दराने व्याज मिळावे तसेच मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.2,00,000/-, नोटीसचा खर्च रु.1,500/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- अशी तकने मागणी केली आहे.
तक हिने तक्रारीसोबत रु.6,00,000/- ची ठेव पावती ची प्रत, बचत खात्याचे पासबुकाची प्रत, व नोटीसीची प्रत हजर केली आहे.
2) विप क्र.1 व 2 यांनी दि.14/02/2014 रोजी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विपचे म्हणणे आहे की ठेवीची रक्कम व्याजासह तकच्या बचत खात्यामध्ये ठेव डिसचार्ज करण्यासंबंधात पुर्तता होताच वर्ग करण्यात आलेली आहे. तक हिला खात्यातुन पैसे काढू दिले नाहीत अगर स्लीप दिली नाही हे अमान्य आहे. विपने गैरव्यवसायीक मार्गाचा अवलंब केला हे अमान्य आहे. तकने दि.30/05/2013रोजी दिलेली नोटीस गैरसमजूतीवर आधारलेली होती. उलट तकने आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
3) तक्रारकर्तीची तक्रार, तिने दिलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात. त्यांची उत्तरे त्यांच्यासमोर आम्ही खालील दिलेल्या कारणासांठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे.
1) विप यांनी आपल्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय हुकुम ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
4) ठेवपावतीवरुन हे स्पष्ट होते की ठेवीची मुदत दि.18/04/2013 रोजी पर्यंत होती. विपचे म्हणणे आहे की पावती डिस्चार्ज करण्यासाठी तक त्याच्याकडे आली नाही. पावतीच्यामागे तकची सही दिसून येते. हे लक्षात घेतले पाहीजे की तक ही निवृत्त 75 वर्ष वयाची स्त्री आहे साहजीकच ठेवीची मुदत संपल्यानंतर तिने पैश्याची मागणी केली असणार, मात्र विपने तिच्या बचत खात्यात ठेवीची रक्कम दि.11/05/2013 रोजी जमा केली आहे. व्याजासह रक्कम रु.7,15,771/- झाली. आधीची शिल्लक रु.1,108/- होती एकूण बाकी रु.7,16,880/- होते मात्र बाकी रु.7,15,771/- दाखविली आहे तर जमा रु.7,16,880/-दाखविली आहे. बँकेतील हिशोब पुस्तकात अशा प्रकारे आकडयांची उलट-पालट कुठल्याही परीस्थितीत समर्थनीय होवू शकणार नाही.
5) ठेवीची मुदत दि.18/04/2013 रोजी संपली. मात्र विपने तक हीला तिची रक्कम तिला देण्यास टाळाटाळ केली. ता.08/08/2013 रोजी तक हिने तातडीच्या वैदयकीय उपचारासाठी रु.2,50,000/ ची मागणी केली ता.13/08/2013 च्या आदेशान्वये विप यांनी तीन दिवसात ती रक्कम तक हिला दयावी असे कळविले. खाते उता-याप्रमाणे रु.2,38,960/- दि.28/08/2013 रोजी दिल्याचे दिसते तर रु.2,50,000/- दि.16/08/2014 रोजी दिल्याचे दिसते. नंतर तकच्या पुरसीसप्रमाणे रु.2,27,920/- दि.01/10/2014 रोजी दिल्याचे दिसते. विप यांनी तक हिला रक्कम देण्यात टाळाटाळ केल्याचे उघड आहे.
6) विप तर्फे विधीज्ञ श्री.दानवे यांनी असा युक्तिवाद केला की विप बँक ही आर्थीक अडचणीत आहे. तरीसुध्दा सेव्हींग दराने तक हिच्या रक्कमेवर व्याज देता येईल. विप यांनी तक हिच्या मुदत ठेवीची रक्कम मुदत संपताच परत न देवून सेवेत त्रूटी केली हे उघड आहे. 75 वर्षे वयाच्या वृध्देला जी निवृत्त आहे तिला आपल्याच पैशाचा लाभ विप यांनी होवू दिला नाही. त्यामुळे दि.18/04/2013 रोजीपासून शिल्लक रक्कमेवर तक हिला 9 टक्के दराने व्याज मिळणे जरुर आहे. म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे हुकुम करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 यांनी ठेवीची रक्कम व्याजासह तक्रारदारकर्ती हिला देणे जरुर आहे आता ती दिलेली आहे मात्र रु.7,15,771/- वर द.सा.द.शे.9 दराने दि.18/04/2013 रोजी पासून पूर्ण रक्कम फिटेपर्यंत विरुध्द पक्षकार यांनी तक हिला व्याज दयावे.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च म्हणून तक्रारकर्ती हिला रु.3,000/-(रुपये तीन हजार फक्त) दयावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.