नि का ल प त्र :- (मा. सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्या) (दि . 26-03-2014)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये वि.प. विमा कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स् कंपनी लि. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी या मंचात दाखल केला आहे.
प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रारदार यांचा शेती हा व्यवसाय आहे. वि.प. ही विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे वडिलांचा विमा वि.प. कंपनीकडे केसरी केदारलिंग विकास सेवा संस्था मर्या, सावर्डे, ता. राधानगरी यांचे माध्यमातून जनता व्यक्तीगत अपघात विमा यांना या योजनेअंतर्गत उतरविलेला होता. सदर पॉलिसीचा हप्ता हा सदर संस्थेकडून वि.प. कंपनीकडे अदा केलेला आहे. तक्रारदार यांचे वडील हे दि. 15-02-2010 रोजी त्यांचे स्वत:चे शेतात ऊसाचे वाडे (वैरण) आणणेकरिता गेलेले होते. त्या दिवशी त्यांना साप चावल्याने मयत झाले होते. तक्रारदार यांचे वडिलांचा शोध साताप्पा तुकाराम कवडे व इतरांनी घेतला असता तक्रारदाराचे वडील हे साप चावल्याने मयत अवस्थेत नदीकडील शेत या नावाने ओळखणारे शेतात आढळून आले. त्यावेळी त्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, सोळांकुर येथे झालेले असून तक्रारदार यांचे वडिलांची मृत्यूबाबतची नोंद राधानगरी पोलिस स्टेशनकडे झालेली आहे. तक्रारदार यांचे वडील पांडूरंग दत्तू वरुटे साप चाऊन अपघाताने मयत झालेनंतर त्यांचे विमा क्लेमची रक्कम मिळणेसाठी तक्रारदार यांनी केदारलिंग विकास सेवा संस्था मर्या, सावर्डे, ता. राधनगरी यांचे माध्यमातून दि. 06-07-2010 रोजी क्लेम फॉर्मची मागणी करुन वि.प. कंपनीकडे दि. 18-02-2011 रोजी योग्य त्या कागदपत्रांसह भरुन दिलेला आहे. वि.प. कंपनीने तक्रारदार यांचे क्लेमबाबत काहीही कळविलेले नाही. तक्रारदारांचा न्याययोग्य क्लेम नाकारुन वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, मयत झालेली गायीची विमा रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 5,000/- मिळावेत अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केली आहे.
3) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत अ.क्र. 1 ला दि. 06-07-2010 ला विमा कंपनी प्रस्तावपत्र, अ.क्र. 2 ला वि.प. विमा कंपनी पत्र, अ. क्र. 3 ला पांडूरंग वरुटे यांचा मृत्यू दाखला, अ. क्र. 4 ला राधानगरी पोलिस ठाणे वर्दी जबाब, दि. 16-02-2010, अ.क्र. 5 ला मयताचा Inquest Panchanama, अ.क्र. 7 ला घटना स्थळाचा पंचनामा, अ. क्र. 8 ला ग्रामीण रुग्णालय, सोळांकुर यांनी दिलेला मृत्यूदाखला, अ.क्र. 9 ला पी.एम. रिपोर्ट, अ.क्र. 10 ला दि. 20-06-2011 रोजीचा मयत पांडूरंग वरुटे यांचा ग्रामीण रुग्णालय, सोळांकुर यांनी दिलेले Medicolegal Certificate दि. 27-11-2013 रोजी तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
(4) वि.प. यांनी तक्रादारांचे तक्रार अर्जास दि. 22-07-2013 रोजी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. विमादार मयत पांडूरंग वरुटे याचा मृत्यू साप अगर अन्य विषारी दंशाने झालेला नाही. मृत्यूचे कोणतेही कारण आजतागायत स्पष्ट नाही. वि.प. यांचे मागणीप्रमाणे कागदांची पुर्तता आजतागायत केलेली नाही. विमादार यांना नक्की मरण कशामुळे आले आहे व दि. 15-02-2010 घटनास्थळी नक्की काय झाले हे सांगणारा अगर पाहणारा कोणीही साक्षीदार नाही. मयताचे पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये देखील कोणतेही निश्चित मरणाचे कारण स्पष्ट नाही. व्हिसेरा रिपोर्ट आजतागायत दाखल केलेला नाही. मयत सर्पदंशामुळे मृत्यू पावला आहे असा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे मयत विमादार याचा मृत्यू हा पुर्णपणे नैसर्गिक आहे. त्याकारणाने तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
(5) तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल कागदपत्रे, वि.प. यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे, दि. 27-11-2013 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकिलांचा तोंडी युक्तीवादाचा विचार करता पुढील मुद्दे निष्कर्षासाठी मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1 वि.पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय.
2. तक्रारदार हे विमा पॉलिसी रक्कम मिळण्यास
पात्र आहे का ? ----होय
3. तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? -----होय.
4. आदेश काय ? ----- अंतिम निर्णयाप्रमाणे.
कारणमीमांसा:-
मुद्दा क्र. 1 :
प्रस्तुत कामी तक्रारदारांचे वडील पांडूरंग दत्तु वरुटे यांचा वि.प. विमा कंपनीकडे, केसरी केदारलिंग विकास सेवा संस्था मर्या सावर्डे, ता. राधानगरी यांचे माध्यमातून जनता व्यक्तीगत अपघात योजना या योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. सदर पॉलिसीचा हप्ता संस्थेकडून वि.प. विमा कंपनीकडे अदा केलेला होता. विमा पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. तथापि वि.प. विमा कंपनी यांना तक्रारदार यांनी व्हिसेरा रिपोर्ट दाखल केलेला नाही. त्यामुळे मयताचे मरणाचे कारण स्पष्ट ( Cause of Death) स्पष्ट होत नाही. सर्पदंशामुळे मृत्यू पावला आहे असा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. विमाधारकाचा मृत्यू नैसर्गिक आहे असे कारण देवून तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला आहे. सबब, प्रस्तुत कामी तक्रारदारांचे वडील पांडूरंग दत्तु वरुटे यांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला आहे का? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता अ.क्र. 3 कडील दि. 8-03-2010 रोजीचे मयत पांडूरंग दत्तू वरुटे यांचा मृत्यू दाखल्यावर मृत्यूचे कारण साप चावल्याने असे नमूद आहे. अ. क्र. 4 कडील दि. 16-02-2010 रोजीचा शामराव वरुटे याचा जबाब पाहता सर्प चावलेने मयत झाला असावा त्याचे मरणाबाबत माझी कोणाविरुध्द तक्रार संशय नाही असे नमूद असून सदरचा जबाब पोलिस निरिक्षक, राधानगरी पोलिस स्टेशन यांचेसमोरील आहे. अ.क्र. 5 कडील फौजदारी प्रक्रिया सहिंतेच्या कलम 174 प्रमाणे मरणोत्तर पंचनामा मध्ये शरीरावरील जखमांचे वर्णन- ठिकठिकाणी फोड उठून ते फुटून आतील पांढरट काळसर भाग दिसत आहे असे नमूद असून opinion of panchas and police about cause of death – उसाचे पिकात वाडे काढत असताना साप चावलेने मयत झाले आहे असे नमूद असून सदर पंचनाम्यावर पंचाच्या सहया आहेत व पोलिस निरिक्षक राधानगरी पोलिस स्टेशन यांची सही आहे. दि. 16-02-2010 रोजीचे पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये cause of death viscera are preserved and opinion recurred नमूद आहे. त्यावर Dr. Kadam Medical Superintendent ग्रामीण रुग्णालय, सोळांकुर, जि. कोल्हापूर यांची सही आहे. तथापि दि. 22-06-2011 रोजी सदर रुग्णालयाने पोलिस निरिक्षक, राधानगरी यांना दाखला पाठविलेला असून सदर दाखल्यामध्ये After regarding viscera reports from chemical analysis and panchanama death may be due to snake bite असे नमूद असून सदर Medicolegal Certificate वर डॉ. कदम, मेडीलक सुप्रिंटेंडेट, रुलर हॉस्पीटल, सोळांकूर यांची सही आहे व पोलिस निरिक्षक राधानगरी, पोलिस ठाणे यांची स्विकारलेची सही आहे. तथापि वि.प. विमा कंपनी तक्रारदारांचे वडिलांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला व त्या अनुषंगाने कोणतेही कागदपत्रे या मंचात दाखल केलली नाहीत. सबब, वरील सर्व कागदपत्रांचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदारांचे मयत वडिलांचे मृत्यू हा सर्पदशांने झालेला असलेने, वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांचा क्लेम नाकारुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 :-
वर मुद्दा क्र. 1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदार हे विमा रक्कम रु. 1,00,000/- व त्यावर तक्रार स्विकृत दि. 22-03-2013 पासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 :
प्रस्तुतची तक्रार ही वि.प. विमा कंपनी यांनी विमा क्लेम नाकारल्यामुळे तक्रारदारांना दाखल करावी लागली. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तसेच त्यांना सदरची तक्रार दाखल करण्यासाठी खर्च करावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब, मुद्दा क्र. 3 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 4 : सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. वि. पक्ष विमा कंपनीने तक्रारदारांना पॉलिसीप्रमाणे असलेली रक्कम रु. 1,000,00/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर दि. 22-03-2013 पासून ते संपूर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
3. वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.