निकाल
दिनांक- 27.08.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये पॉलीसी नं.161991/48/2010/763 दि.21.01.2010 नुसार सोने चोरी बाबत विमा रक्कम मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार रावसाहेब दत्तात्रयराव टाक यांचे पाटील चौक मंडी बाजार अंबाजोगाई येथे प्रगती ज्वेलर्स या नावाने दुकान आहे. तक्रारदार हयाचे सोने चांदीचे दागीने विक्रीचे दुकान आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे सोने चांदीचे दुकानाची ब्लॉक पॉलीसी नं. 161991/48/2010/763 दि.21.01.2010 नुसार एक वर्षाकरीता म्हणजे विमा पॉलीसीच्या कालावधीचा दि.21.01.2010 ते 20.01.2011 पर्यंत आहे व या क्रमांकाच्या पॉलीसी पोटी तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे विमा रक्कम जमा केलेली आहे व ती गैरअर्जदाराने स्विकारलेली आहे. त्यानुसार विम्याची जबाबदारी ही गैरअर्जदाराने घेतली आहे.
तक्रारदाराचे मालकीचे दुकानात दि.03.11.2010 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास दुकानात दोन महिला व एक पुरुष सोन्याचे गंठण घेण्याकरीता आले होते, त्यांनी गंठण पाहण्यासाठी हातात घेतले आणि थोडयाच वेळात नजर चुकवून ते गंठण चोरुन घेऊन दुकानाबाहेर निघून गेले. त्या दागीन्याचे वजन 37 ग्राम 500 मि ली असून त्याची किंमत अंदाजे रु.75,000/- एवढी होते ही बाब तक्रारदाराच्या लक्षात येताच त्यांनी दुकानात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेरा वरुन त्याची सी डी बनवून तक्रारदाराने पाहिल्यांदा आरोपीचा शोध घेतला व त्यानंतर दि.06.11.2010 रोजी अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे व त्याचा गुन्हा रजिस्टर नं.168/2010 आहे. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सदर चोरीच्या घटनेबाबतची माहिती स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झालेली आहे.
तक्रारदाराने सदरच्या घटनेची माहिती गैरअर्जदार यांचे अंबाजोगाई येथील कार्यालयात तोंडी त्यांचे कर्मचारी विमा प्रतिनिधी यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी त्यांचा सर्व्हेअर येईर व चौकशी करु असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने वाट पाहिली व नंतर सवर्हेअर न आल्यामुळे पुन्हा चौकशी केली असता, एक साधा अर्ज द्या आम्ही माणूस पाठवितो असे म्हटल्यावरुन तक्रारदाराने अर्ज दिला आहे व जवळपास तीन महिन्याच्या अंतराने थातूरमातूर कारणे दाखवून बेकायदेशिररित्या विमा रक्कम देण्यास नकार दिला.
वास्तविक पाहता, विमा कंपनीची स्वतःची जबाबदारी व कर्तव्य आहे की, त्यांनी ज्याचा विमा उतरविलेला आहे, त्या विमाधारकास तात्काळ सेवा दिली पाहिजे. विमा कंपनी अप्रचलित व्यापार पध्दत व बेकायदेशिर अटी ज्या कायद्याप्रमाणे घालता येत नाही, ज्यावरुन नैसर्गिक न्यायतत्व व घटनेस कायद्याच्या विरुध्द काही अटी असतील तर त्या विचारात घेता येणार नाही. तक्रारदाराचा दावा हा फक्त उशिरा कळविला या एकाच बेकायदेशिर मुददा जो कायद्याप्रमाणे नाही. यामुळे विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करतात.
तक्रारदाराने गैरअर्जदार यांचे प्रतिनिधी विकास अधिकारी श्री.ललित जोशी यांना दि.03.11.2010 रोजीच चोरीची घटना घडल्यानंतर लगेच त्यांनी मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा त्यांनी अर्ध्या तासात येतो असे सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी 5 ते 6 वेळा फोन लावले परंतू ते आले नाही, ऑफीसला कळविले आहे सर्व्हेअर येतील असे सांगितले. त्यानंतर नेहमी दररोज पत्र देईपर्यंत संपर्क करीत होते. मोबाईलवर संपर्क साधला असता कधी उदया येतो, कधी बाहेरगावी आहे, असे कारणे देऊन आले नाहीत. गैरअर्जदारांना माहिती व कबूल असून सुध्दा त्यांनी बनावट व खोटे दि.22.02.2012 चे पत्र दिले. तसेच श्री.ललित जोशी हे संपर्क व तक्रार दिली नाही हे म्हणत नाहीत.
तक्रारदाराने कल्पना देऊनही व कागदपत्रे देऊनही जवळपास तीन महिने काही उत्तर देणे ही सुध्दा एक प्रकारे अप्रचलित व्यापार पध्दत आहे. आजपर्यंत तक्रारदाराच्या अर्जावर व दाखल केलेल्या क्लेम अर्जावर गैरअर्जदाराने उत्तर दिलेले नाही. तक्रारदाराने ग्राहक मंचाकडे तक्रार केल्यानंतर गैरअर्जदाराने विमा रक्कम न देता दावा हा मुदतीत नाही म्हणून फेटाळलेला आहे. वास्तविक पाहता लागू असलेल्या मुदतीच्या कालावधीमध्ये विम्याची रक्कम मागणी करण्यासाठी 14 दिवसाचा कालावधी आहे असे कोठेही नाही. या उलट काही रक्कम दाव्यानुसार कराराप्रमाणे मागणी करणे असेल तर त्या करता तीन वर्षाचा कालावधी दिलेला आहे. परंतू गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे व तक्रारदाराचे कधी भरुन न येणारे असे नुकसान केलेले आहे. सबब तक्रारदाराने विमा रक्कम मिळणेबाबत व नुकसान भरपाई मिळणेबाबत विनंती केलेली आहे.
सामनेवाला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे प्रगती ज्वेलर्स नावाचे सोने चांदीचे दुकान आहे ही बाब मान्य केली आहे. तसेच तक्रारदार यांनी सदर दुकानाचा विमा काढलेला आहे हा मजकूर मान्य केला आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदाराच्या दुकानात चोरीच्या घटनेबददल आम्हाला काही कल्पना नाही. तसेच रक्कम रु.75,000/- ची चोरी झाली हे सुध्दा माहित नाही. तसेच घटनेची चौकशी करण्यासाठी कोणत्याही सर्व्हेअरची निवड केलेली नव्हती. पॉलीसीच्या शर्ती व अटी नुसार विमाधारकास नुकसान भरपाई देण्यात येते. पॉलीसीच्या शर्ती व अटीचा भंग झाला असल्यास सदर विमा रकमेची मागणी देता येत नाही. तक्रारदाराने चोरीच्या घटनेची माहिती अंबाजोगाई येथील कार्यालयात दि.29.11.2010 रोजी दिलेली आहे.
पॉलीसीच्या शर्ती व अट नं.13 (6) च्या नुसार विमाधारकाने 14 दिवसाच्या आत घटनेची माहिती विमा कंपनीला कळविली पाहिजे, तसेच तक्रारदाराने अट नं.13 (a) नुसार तक्रारदाराने सदर घटनेची माहिती पोलीसाला 24 तासाच्या आत दिली पाहिजे.
तक्रारदाराने सदर घटनेची माहिती 14 दिवसाच्या आत दिलेली नाही, घटना ही दि.03.11.2010 रोजी दिलेली आहे, आणि तक्रारदाराने तीन हप्त्यानंतर म्हणजे दि.29.11.2010 रोजी माहिती कळविलेली आहे. तक्रारदाराने सदर अटीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आम्ही नो क्लेम म्हणून सदर प्रस्ताव नाकारला आहे. तसे दि.13.01.2011 रोजीचे पत्र देऊन तक्रारदाराला कळविले आहे.
दि.14.02.2011 रोजी ग्राहक पंचायत अंबाजोगाई येथे तक्रारदाराची मागणी मान्य करण्यासाठीचे पत्र पाठविलेले आहे, सदर पत्राचे दि.22.02.2011 रोजी उत्तर पाठविलेले आहे. तक्रारदार हा ग्राहक नाही, आणि त्याला कोणतीही सेवा देण्यास कसूर केलेली नाही. सदर तक्रार ही खोटी व बनावट असल्याची दाखल केलेली आहे.म्हणून सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्र याचे अवलोकन केले.
न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी , सामनेवाला यांना घडलेल्या
घटनेची माहिती मुदतीत दिली आहे, हे सिध्द
केले आहे काय? नाही.
2. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र
आहे काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदाराची तक्रार व दाखल केलेले कागदपत्र तक्रारदाराने दि.22.02.2011 चे सामनेवाला यांचे पत्र, विमा पॉलीसी दि.14.02.2011 चे ग्राहक पंचायत अंबाजोगाई यांचे पत्र, तक्रारदार याने सामनेवाला यांना दि.29.11.2010 ला दिलेले पत्र, चोरीची घटना घडलेल्याची दिलेली फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, विमा हप्ता भरल्याची पावती, वर नमुद केलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहे.
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, तक्रारदार याने त्याचे दुकान नावे प्रगती ज्वेलर्सचा विमा सामनेवाला यांच्याकडे उतरविलेला आहे. व त्यासाठी तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे विमा हप्ता भरलेला आहे. पोलीसाच्या जबाबावरुन असे निदर्शनास आले की, तक्रारदार यांच्या दुकानात दि.03.11.2010 रोजी दोन महिला व एक पुरुष गंठण घेण्याकरीता आले होते व पाहता पाहता तक्रारदाराच्या नजरचुकीने त्यांनी गंठण चोरुन नेले त्याचे वजन 37 ग्रॅम 500 मि ली एवढे होते व किंमत अंदाजे रु.75,000/- एवढी होते.
सामनेवाला हे हजर झाले त्यानी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला यांचे कथन असे की, तक्रारदार हयांचे ज्वेलर्सचे दुकान आहे व सदरील दुकानाचा विमा सामनेवाला यांच्याकडे उतरविलेला आहे ही बाब मान्य आहे. बाकीचे मजकूर अमान्य आहे. सामनेवाला यांचे कथन असे की, विमा पॉलीसीच्या शर्ती व अटी नुसार विम्याची मागणी मान्य करतात. शर्ती व अटीचे उल्लंघन झाल्यास मागणी नाकारण्यात येते.
तक्रारदाराच्या दुकानात घडलेली चोरीच्या घटनेची माहिती सामनेवाला यांना दि.29.11.2010 रोजी दिली. म्हणजे घटना घडल्यानंतर तीन हप्त्याने दिली. पॉलीसीच्या शर्ती व अट नं.13 (6) प्रमाणे सदर घटनेची माहिती ही 14 दिवसाच्या आत देणे गरजेचे आहे व अट नं.13 (a) प्रमाणे 24 तासाच्या आत पोलीसांना माहिती देणे गरजेचे आहे. तसेच तक्रारदार याने घटनेची माहिती मुदतीत दिली नाही म्हणून सदर प्रसताव हा ‘नो क्लेम’ म्हणून नाकारण्यात आला.
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला यांनी युक्तीवाद केला. सामनेवाला यांचा युक्तीवाद व तक्रारदारानी दाखल केलेले कागदपत्र यावरुन तक्रारदार याने विहीत मुदतीत माहिती सामनेवाला यांना दिली आहे काय? हे ठरविणे महत्वाचे आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाला यांना घटनेची माहिती सामनेवाला यांचे विकास अधिकारी यांना फोनवर संपर्क साधून दिली होती पण त्याबददलचा पुरावा किंवा कागदपत्र दाखल केले नाही. तसेच तक्रारदार याने दि.29.11.2010 चे पत्राद्वारे सामनेवाला यांना सदर धटनेची माहिती दिली आहे. तक्रारदार यांच्या दुकानात चोरी झाली दि.03.11.2010 व त्याची माहिती सामनेवाला यांना दि.29.11.2010 रोजी दिली यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार याने पॉलीसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे म्हणजेच तक्रारदार याने 14 दिवसाच्या आत देणे गरजेचे होते. सबब तक्रारदार याने विहीत मुदतीत माहिती सामनेवाला यांना दिली नाही.
तक्रारदार याने विमा पॉलीसीच्या शर्ती व अटी याचे पालन न केल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराची मागणी फेटाळली आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कसूर केला नाही. किंवा कोणतीही टाळाटाळ केली नाही. सबब तक्रारदार हा नुकसान भरपाई मागण्यास पात्र नाही असे मंचाचे मत आहे.
म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड