निकालपत्र पारित व्दारा –मा. श्री. आनंद बी. जोशी, अध्यक्ष
1. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम मिळण्याकरिता दाखल केली आहे. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्तीचे पती मयत लक्ष्मण पिता सखाराम लाखाडे हे शेतकरी असून त्यांच्याकडे मौजे रामेश्वर, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथे शेत गट नंबर 73 मध्ये 1 हेक्टर 14 आर क्षेत्रफळाची जमीन आहे.
3. दिनांक 31/10/2017 रोजी सायंकाळी 7.30 वाजता तक्रारकर्तीचे पती लक्ष्मण सखाराम लाखाडे हे औंढा नागनाथ येथून कामावरून घरी येत असतांना जिंतूर रोडवरील साळणा फाट्याजवळ त्यांच्या मोटरसायकलला ट्रक क्रमांकः MH-20-AT-904 ने जोराची धडक दिली. त्यामुळे त्यांना गंभीर स्वरूपाची जखम होऊन डोक्याला मार लागला. उपचारादरम्यान दिनांक 03/11/2017 रोजी रात्री 2.35 वाजता तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू झाला. तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असल्याने तक्रारकर्तीने शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार विम्याचा लाभ मिळण्याकरिता सर्व आवश्यक ते कागदपत्र विरूध्द पक्ष क्रमांक 3 यांच्याकडे दिनांक 09/01/2018 रोजी सादर केले. परंतु तक्रारकर्तीला वेळोवेळी आश्वासने देण्यांत आली मात्र विम्याची रक्कम देण्यांत आली नाही. त्यानंतर दिनांक 19/07/2018 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने मयत लक्ष्मण लाखाडे यांच्याजवळ अपघाताच्या वेळी मोटरसायकल चालविण्याचा वैध परवाना नसल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा रद्द करण्यांत आल्याचे तक्रारकर्तीला कळविले. या बाबीमुळे व्यथित होऊन तक्रारकर्तीने सदर तक्रार सोबत जोडलेल्या कागदपत्राच्या यादीसह दाखल केली आहे. त्याद्वारे विमा रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
4. तक्रारकर्तीची प्रस्तुत तक्रार दाखल करून घेण्यांत आल्यानंतर विद्यमान मंचामार्फत विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांना नोटीस बजावण्यांत आली. विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी हजर होऊन त्यांचा लेखी जबाब दाखल केला.
5. विरुध्द पक्ष क्रमांक 1 ने त्यांच्या लेखी जबाबामध्ये तक्रारकर्तीच्या तक्रारीतील कथन नाकारले आहे. तसेच अपघाताची सूचना ही 28 दिवस उशीराने देण्यांत आल्याचे व अपघात घडला त्यावेळी करण्यांत आलेल्या मरणोत्तर पंचनाम्यामध्ये मयताच्या मोटरसायकलला अज्ञात ट्रकने धडक दिली असे नमूद केलेले आहे. म्हणजेच दिनांक 31/10/2017 ते 27/11/2017 पर्यंत मयताच्या कोणत्याही नातेवाईकाने ट्रक क्रमांकाची माहिती पोलीसांना दिली नाही. तक्रारकर्तीने ट्रक मालकाशी पोलीसांसोबत संगनमत करून ट्रक क्रमांकः MH-20-AT-904 ला गोवण्यांत आलेले आहे. सदर ट्रक कुणाच्या मालकीचा आहे व त्याचा विमा आहे अथवा नाही याबाबत कोणताही उल्लेख नाही. शिवाय प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. तक्रारकर्तीने सुध्दा ही घटना बघितलेली नाही. पुन्हा असे की, अपघाताचे वेळी मयताजवळ मोटरसायकल चालविण्याचा परवाना नव्हता. मोटर वाहन अधिकारी यांनी दिलेला परवाना असल्याशिवाय मोटरसायकल चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तक्रारकर्तीला विम्याचा लाभ मिळू शकत नाही. गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या अटी व शर्तीनुसार मोटर वाहन जे अपघातामध्ये लिप्त आहे ते वाहन चालविणा-या व्यक्तीजवळ वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे. तशा प्रकारचा परवाना नसल्यामुळे या योजनेच्या अटी व शर्तींचा भंग झालेला आहे. त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्याची मागणी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने केली आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने त्यांच्या लेखी जबाबामध्ये असे नमूद केले आहे की, विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करणे हे विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांच्या अखत्यारित असते. यामध्ये विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांचा काहीही सहभाग नसतो. विरूध्द पक्ष क्रमांक 2 हे विमा कंपनी, तक्रारदार व शासन यांच्यामधील मध्यस्थ म्हणून काम करतात. तक्रारकर्तीच्या पतीचा अपघाती मृत्यू झालेला आहे हे मान्य आहे. तक्रारकर्तीने योजनेनुसार विरूध्द पक्ष क्रमांक 3 यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. विरूध्द पक्ष क्रमांक 3 यांचेमार्फत सदर प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 2 ला प्राप्त झाला. त्यानंतर सदर प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे पाठविला. त्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित व योग्यरितीने पार पाडलेली आहे. त्यांनी त्यांच्या सेवेत कोणताही कसूर केलेला नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांनी मयत व्यक्तीच्या नांवे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याने विमा दावा नामंजूर केला यांत विरूध्द पक्ष क्रमांक 2 चा कोणताही दोष नसल्याने त्यांच्या विरूध्दची प्रस्तुत तक्रार खारीज करण्यांत यावी अशी विनंती विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने केली आहे.
विरूध्द पक्ष क्रमांक 3 ने दिनांक 26/03/2019 रोजी अर्ज सादर करून ललिताबाई लक्ष्मण लाखाडे यांच्या प्रकरणांत दिनांक 06/02/2019 रोजी लेखी पत्र दिले आहे तो युक्तिवाद समजावा असे अर्जामध्ये नमूद केले आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार, त्यासोबत जोडलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष यांचा लेखी जबाब व युक्तिवाद यावरून खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत येत आहेत.
अ.क्र. | मुद्दा | निर्णय |
1. | तक्रारकर्ती विरुध्द पक्ष यांची ग्राहक आहे काय? | होय |
2. | विरूध्द पक्ष यांच्या सेवेत कसूर आहे काय? | नाही |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशापमाणे |
कारण मिमांसा
7. मुद्दा क्रमांक 1 ः शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यांत येते. त्यानुसार शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा लाभ मयत शेतक-यांच्या कुटुंबियांना मिळावा हा शासनाचा हेतू असून त्याकरिता अटी व शर्ती सुध्दा लावण्यांत आलेल्या आहेत. या योजनेमध्ये शेतकरी हा लाभार्थी असल्याने तो ग्राहक ठरतो. मयत लक्ष्मण सखाराम लाखाडे हा शेतकरी असून त्यांच्या शेतीचा 7/12 उतारा अभिलेखावर दाखल आहे. त्यामुळे मयत लक्ष्मण या योजनेमध्ये शेतकरी या नात्याने लाभार्थी ठरतो. तसेच त्याच्या मृत्यूनंतर त्याचे कायदेशीर वारस म्हणजेच तक्रारकर्ती ही लाभार्थी ठरते. त्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 हे सेवा प्रदान करणारे असून लाभार्थी या नात्याने तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष क्रमांक 1 व 2 ची ग्राहक ठरते. सबब मुद्दा क्रमांक 1 चा निष्कर्ष होकारार्थी ठरविण्यांत येतो.
8. मुद्दा क्रमांक 2ः- सदर प्रकरणामध्ये विमा, अपघाताची घटना तसेच योजना या बाबींविषयी कोणताही वाद नाही. प्रकरणामध्ये केवळ मयताजवळ अपघाताचे वेळी मोटरसायकल चालविण्याचा परवाना नसल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करण्यांत आला आहे. अभिलेखावरील दस्ताचे अवलोकन केले असता त्यांत मयताचा कुठलाही वाहन चालक परवाना किंवा वाहन नोंदणी विवरणपत्र इत्यादी दाखल नाही. त्याचप्रमाणे तक्रारकर्तीने तिच्या तक्रारीमध्ये तिच्या मयत पतीजवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना होता याबाबतचा उल्लेखही केलेला नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये सुध्दा हाच आक्षेप घेतलेला आहे. शिवाय त्यांच्या युक्तिवादामध्ये सुध्दा त्यांनी महाराष्ट्र शासनाचे शासन शुध्दीपत्रक दिनांक 29 मे, 2009 हे दाखल केले. त्यानुसार दिनांक 6 सप्टेंबर, 2008 च्या शासन निर्णयामधील अ. क्र. 23 (इ)(7) नंतर अ. क्र. (8) खालील प्रमाणे नव्याने समाविष्ट करण्यांत येत आहे असे नमूद करण्यांत आलेले आहे.
अ. क्र. 23 (इ) (8) ‘ जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना (Valid Driving License) सादर करणे आवश्यक राहील’.
वरील प्रमाणे महाराष्ट्र शासनातर्फे या योजनेमध्ये सुधारणा करण्यांत आलेली आहे. त्यामुळे शेतकरी जो वाहन चालवित असेल व त्याचा मृत्यू वाहन अपघातामध्ये झाला असेल अशा प्रकरणी मयताजवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे गरजेचे आहे. याच कारणास्तव विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारलेला आहे. शिवाय विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांचे कथन आहे की, तक्रारकर्तीच्या मयत पतीने शासन निर्णयातील अटी व शर्तींचा भंग केलेला असल्यामुळे तक्रारकर्ती विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरत नाही. करिता विरूध्द पक्ष यांच्या कथनामध्ये मंचाला तत्थ्य असल्याचे आढळून येते. त्यामुळे सदर प्रकरणात विरूध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्याचे दिसून येत नाही. सबब मुद्दा क्रमांक 2 चा निष्कर्ष हा नकारार्थी ठरविण्यांत येतो.
9. मुद्दा क्रमांक 3ः- वरील विवेचनावरून खालील आदेश पारित करण्यांत येतो.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यांत येते
2. खर्चा विषयी कोणताही आदेश नाही.
3. उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क पुरवावी