निकाल
दिनांक- 03.09.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12अन्वये सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे, त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार यांनी महिंद्रा अडमहिंद्रा कंपनीची बोलेरो जीप क्र.एम.एच.-44/407ही स्वतःच्या वापरासाठी घेतलेली आहे. सदरील कंपनीच्या सवलतीमुळे बोलेरो ही टुरीस्ट टॅक्सी केलेली असून सदरील जीपचा इन्शुरन्स सामनेवाला यांच्याकडे उतरविलेला आहे. दि.20.08.2010रोजी तक्रादार व त्याचे कुटूंबीय व ड्रायव्हर चिंतामणी हे बोलेरो जीपमधून खाजगी कामासाठी परळीहून गंगाखेडला जात होते. सदरील जीप पांडे पेट्रोलपंपाजवळ आली. त्यांचे संमोर एक टेम्पो चाललेला होता टेम्पो ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे सदरील बोलेरो जीप टेंपोवर धडकली, बोलेरो जीपचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी अपघाताची खबर परळीग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा तयार केला. तक्रारदार यांनी इन्शुरन्स कंपनीला खबर दिली. सामनेवाला यांच्या सर्व्हेअरने जीपची पाहणी करुन दुरुस्ती करुन घेण्यास सांगितले.
तक्रारदार यांनी सदरील जीप महिंद्रा अड महिंद्रा कंपनीचे विक्रेते रत्नप्रभा मोटार्स,औरंगाबादयांच्याकडे दुरुस्तीसाठी दिली.सदरील जीपच्या दुरुस्तीकामी रु.1,35,000/-खर्च आला.तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे दुरुस्ती खर्चासाठी लागलेल्या रकमेची मागणी करण्यासाठी क्लेम खर्चाच्या पावत्या व इतर कागदपत्राची पुर्तता केली. सामनेवाला यांनी दि.26.09.2011 रोजी रजिस्टर पत्राद्वारे ड्रायव्हरकडे ड्रायव्हींग लायसन्स व बॅच नसल्याचे चुकीचे कारण देऊन तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला. पॉलीसीच्या करारामध्ये ड्रायव्हरकडे बॅच असावा असा कोणताही मसूदा नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारुन सेवा देण्यास त्रुटी ठेवलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत अशी मागणी केली आहे की, जीप दुरुस्तीसाठी लागलेला खर्च रु.1,35,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कमरु.20,000/- तक्रारीचा खर्च रु.5,000/- तक्रारदार यांना सामनेवालाकडून देण्यात यावी.
सामनेवाला इन्शुरन्स कंपनी मंचासमोर हजर झाली व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दिले. सामनेवाला यांनी सदरीलवाहनाचा विमा त्यांच्या कंपनीत काढला होता ही बाब मान्य केलेली आहे. सामनेवाला यांचे कथन की, सदरील जीप ही टुरीस्ट टॅक्सी म्हणून तक्रारदारास दिलेली आहे व तशी पॉलीसी काढण्यात आली आहे. सदरील टॅक्सी ही टुरीस्ट टॅक्सी असल्यामुळे ड्रायव्हरकडे टुरीस्ट टॅक्सी चालविण्याचा परवाना व बिल्ला नसल्यामुळे पॉलीसीच्या शर्ती व अटीचा भंग झाला आहे. सामनेवाला याच्याकडे सदरील वाहन प्रवासी वाहन म्हणून इन्शुअर्ड केलेली आहे. ड्रायव्हरकडे योग्य व वाजवी लायसन्स नसल्यामुळे इन्शुरन्स कंपनी तक्रारदारास देणे लागत नाही.
सामनेवाला यांनी त्यांच्या लेखी जबाबात पुढे असे कथन केले आहे की,सामनेवाला यांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब सर्व्हेअर वाहनाचे निरीक्षण करण्यासाठी नियुक्त केले. सर्व्हेअर श्री.कदमयांनी स्पॉट सर्व्हे रिपोर्ट दिला.तदनंतर कंपनीने श्री.अरविंद आंब्रे यांना पुन्हा सदरील वाहनाचा सर्व्हे करण्याकामी व रिपोर्ट करण्याकामी नियुक्त केले. सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे वाहनाचे एकूण नुकसान रु.60,468/- झाल्याचे चेक बिल रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलेले आहे. सामनेवाला यांनी असे निवेदन केले आहे की, तक्रारदार यांच्या ड्रायव्हरकडे टॅक्सी चालविण्याचा वैध परवाना नसल्यामुळे व बॅच नसल्यामुळे पॉलीसीच्या शर्ती व अटींचा भंग झाला आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपनी तक्रारदार यांना काही देणे लागत नाही. इन्शुरन्स कंपनीने कोणतीही सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी ब्रॅच मॅनेजर यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सदरील वाहनाचा इन्शुरन्स परवाना, कार दुरुस्त करण्यासाठी रत्नप्रभा मोटार्स औरंगाबाद यांच्याकडील बिले दाखल केली आहे. तसेच घटनास्थळ पंचनामा, खबर दाखल केली. सामनेवाला यांनी तक्रारदार यास पाठविलेले पत्र, वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, पॉलीसीची नक्कल, सर्व्हे रिपोर्ट, बिल चेक रिपोर्ट, फायनल सर्व्हे रिपोर्ट, इत्यादी कागदपत्र दाखल केले आहे.
तक्रारदार यांचे वकील श्री.जाधव यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे वकील श्री.ए.पी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराचे शपथपत्र सोबत दाखल केलेले कागदपत्र तसेच सामनेवाला यांचे शपथपत्र व दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले.
न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार यांनी त्यांचे ड्रायव्हर यांच्याकडे टुरीस्ट टॅक्सी चालविण्याचा परवाना होता ही
बाब सिध्द केली आहे काय? होय.
2) तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सेवा देण्यास त्रुटी ठेवली आहे, ही बाब सिध्द केली आहे काय? होय.
3) तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रक्कम मिळण्यास पात्र आहे काय? होय. 4) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 4 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याचे अवलोकन केले असता, तक्रारदार हे वाहन क्रमांक एम.एच.-44/407 चेमालक आहे. सदरील वाहन हे सामनेवाला इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुअर्ड केलेले होते. सदरील वाहनाचा अपघात झाला हीबाब मान्य आहे. अपघातामध्ये सदरील वाहनाचे नुकसान झाले ही बाब ही मान्य आहे.सदरील वाहन रत्नप्रभा मोटार्स औरंगाबाद येथे दुरुस्त केले आहे ही बाब मान्य आहे. अपघात झाल्यानंतर तक्रारदार यांनी अपघाताची माहिती सामनेवाला यांना दिली होती. व सामनेवाला यांचे सर्व्हेअर यांनी वाहनाचे निरीक्षण करुन अहवाल दिला होता व बिल चेक रिपोर्ट दिले होते ही बाब मान्य आहे.
सामनेवाला यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, सदरील वाहन टुरीस्ट टॅक्सी असल्यामुळे वाहनाचे चालक यास टुरीस्ट टॅक्सी चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. सदरील केसमध्ये ड्रायव्हर चिंतामणी मोतीलाल संघई हे वाहन चालवित होते असे निष्पन्न होते. सदरील ड्रायव्हर यांना टुरीस्ट टॅक्सी चालविण्याचा परवाना नसल्यामुळे तक्रारदार यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई अगर वाहन दुरुस्तीचा खर्च मागता येणार नाही. सामनेवाला यांच्या वकीलांनी या मंचाचे लक्ष ड्रायव्हरच्या लायसन्सकडे वेधले. तसेच इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेले पॉलीसीच्या शर्ती व अटी यांच्याकडे वेधले, तसेच मा.उच्च न्यायालय यांनी 2008 ACJ 627 न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड विरुध्द प्रभूलाल हा निवाडा दाखवला. सदरील निवाडयामध्ये मा.उच्च न्यायालय यांनी इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम नाकारला तो योग्य व वाजवी आहे असे ठरविले आहे. कारण ड्रायव्हरकडे ट्रान्सपोर्ट वेहिकल चालविण्याचा परवाना नव्हता. ड्रायव्हरकडे लाईट मोटार वेहिकल चालविण्याचा परवाना होता, लाईट मोटार वेहिकल परवाना असलेला ड्रायव्हर ट्रान्सपोर्ट वेहिकल चालवू शकत नाही.
सामनेवाला यांच्या वकीलांनी राज्य ग्राहक वाद निवारण आयोग मुंबई सर्किट बेंच औरंगाबाद यांनी दिलेले फर्स्ट अपील नं.296/2009 ब्रँच मॅनेजर बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, विरुध्द पुडलिक निवृत्तीराव इंगळे या केसचा हवाला दिला. सदरील केसमध्ये ड्रायव्हरने लायसन्स हे दि.17.03.92रोजी काढले होते व दि.04.12.03रोजी त्याची मुदत संपली होती. अपघात हा दि.02.12.2008 रोजी घडला होता सबब ड्रायव्हरकडे वैध व योग्य वाहन चालविण्याचा परवाना नव्हता असा निर्णय दिला. तसेच सामनेवाला यांच्या वकीलांनी तक्रारदार यांनी पॉलीसीच्या शर्ती व अटीचे मुलभूत भंग झाला आहे असे कथन केले आहे.
तक्रारदार यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार व त्यांचे कुटूंबिय सदरील कारमध्ये बसून जात होते. ड्रायव्हर चिंतामणीहा वाहन चालवित होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा योग्य व वाजवी परवाना आहे.सदरील वाहन चालविण्यासाठी बॅच व बिल्ला याची गरज नाही. तशी अट इन्शुरन्स कंपनीच्या सेवा शर्तीमध्ये नोंदविलेली नाही. तक्रारदार यांच्या ड्रायव्हरकडे ट्रान्सपोर्ट लाईट मोटार वेहिकल 3 w. Cab अशा प्रकारचे लायसन्स होते. सदरील ड्रायव्हरकडे योग्य व वाजवी परवाना असल्यामुळे सामनेवाला यांनी जी तक्रारदाराची मागणी व नुकसान भरपाई देण्याची मागणी नाकारली आहे, ही त्यांची सेवेमध्ये त्रुटी आहे असे कथन केले आहे. सामनेवाला यांच्या वकीलांनी त्यांचे युक्तीवादाचे समर्थनार्थ खालील नमुद केलेले न्याय निवाडा निदर्शनास आणला आहे.
1) 2011 (1) T.A.C.189 (M.P.) Gwalior Bench मोहन राय विरुध्द महेशसिंग व इतर सदरील केसमध्ये इन्शुरन्स कंपनीने असा मुददा उपस्थित केला होता की, अपीलेंट यांचेकडे बॅच नव्हता तसेच सार्वजनिक सेवा वाहन चालविणेबाबत लायसन्सवर इन्डॉसमेंट नव्हते. मध्यप्रदेश हायकोर्ट यांनी इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे असा न्यायनिवाडा दिला.
वर नमूद केलेल्या संपूर्ण पुरावा व कागदपत्राचे अवलोकन केले असता यामंचाचे असे मत पडते की, ड्रायव्हर चिंतामणी संघई हा अपघातग्रस्त झालेले वाहन चालवित होता,त्यावेळेस त्याच्याकडे लाईट मोटार वेहिकल ट्रान्सपोर्ट वेहिकल चालविण्याचा योग्य व वाजवी परवाना होता. इन्शुरन्स सर्टिफिकेट व शर्ती, अटी याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदर वाहन हे पब्लिक सर्व्हिस PCCV-4 व्हीलरकॅरींग पॅसेंजर कॅपासिटी 6 पॅकेज पॉलीसीनंतर सामनेवाला यांच्याकडे विमा काढलेला आहे. सदरील पॉलीसीच्या शर्ती व अटी याचे अवलोकन केले असता कुठेही सदरील वाहन चालविण्यासाठी बॅच व बिल्ला ड्रायव्हरला असणे गरजेचे आहे, याबाबत स्पष्ट उल्लेख केलेला नाही. ड्रायव्हरकडे ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेस सदरील वाहनामध्ये कोणतेही पॅसेंजर बसलेले नव्हते. तक्रारदार व त्यांचे कुटूंबिय हे स्वतःच्या कामासाठी जात होते त्यावेळेस अपघात घडला.ज्या वेळेला अपघात घडला, त्यावेळेस वाहन हे भाडे घेऊन प्रवाशी वाहतूक करत नव्हते. मोटार वेहिकल कायदा व नियम क्रमांक 3 केंद्रीय मोटार वेहिकल अधिनियम याचा विचार करता व दाखल केलेले वाहन परवाना यांचे अवलोकन करता या मंचाचे मत असे पडते की, सदरील वाहनाचा अपघात घडला, त्यावेळेस वाहन चालकाकडे योग्य व वाजवी वाहन चालविण्याचा परवाना होता. केवळ बॅच आणि बिल्ला नव्हता म्हणून तो वाहन चालविण्यास अपात्र आहे असे म्हणता येणार नाही. वाहन चालकाकडे लाईट मोटार वेहिकल व प्रवासी भाडे वाहन चालविण्याचा परवाना होता.सबब,सामनेवाला हे तक्रारदार यांच्या वाहनाचे अपघातात जे नुकसान झाले आहे ते देण्यास पात्र आहे.
तक्रारदार यांचे कथन की, वाहन दुरुस्तीसाठी त्यांना रु.1,35,000/-खर्च आला. सामनेवाला यांनी सदरील वाहनाचा अपघात झाला आहे व नुकसान झाले आहे ही बाब मान्य केली आहे. सामनेवाला यांनी सर्व्हेअर यांची नियुक्ती करुन नुकसानीबाबत रिपोर्ट दाखल केलेला आहे,त्या रिपोर्टच्या अनुषंगाने व बिल चेक रिपोर्टच्या अनुषंगाने एकूण खर्च रु.60,468/-आला आहे असे दर्शविले आहे. सदरीलबिल चेक रिपोर्ट तयार करताना तक्रारदार यांनी दाखल केलेल्या एकूण खर्चाच्या बिलाचा विचार करण्यात आला आहे व जो खर्च अनुज्ञेय नाही त्याच्याही खर्चाचा विचार करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेले बिल सामनेवाला यांनी दाखल केलेले बिल चेक रिपोर्ट त्यातनमुद केलेल्या रकमेचा तपशिल व तक्रारदार यांनी दाखल केलेल्या खर्चाची तपासणी यांचा प्रामुख्याने विचार केल्यानंतर हया मंचाचे मत असे पडते की, तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून वाहन दुरुस्तीसाठी जो खर्च केला आहे, त्यापोटी रक्कम रु.80,000/- घेण्यास पात्र आहे. सदरील रक्कम ठरवितांना जो खर्च अनुज्ञेय नाही व घसारा इत्यादी बाबीचा विचार केला आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन त्यास मानसिक शारिरिक त्रास झाला त्यापोटी रक्कम रु.5,000/- द्यावे, व तक्रारीचा खर्च रक्कम रु.3,000/-द्यावे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना
वाहन दुरुस्तीसाठी लागलेला खर्च रु.80,000/-(अक्षरी रु.ऐंशी
हजार) निकाल लागल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी. 3) वरील रक्कम मुदतीत अदा न केल्यास तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज, रक्कम वसूल होईपावेतो द्यावे. 4) सामनेवाला यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटीरु.3,000/- द्यावे.
5) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड