::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/03/2017 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
दिनांक 20/04/2013 रोजी तक्रारकर्ता त्याची मालकीची क्रुझर जीप क्र. एम.एच. 40-अे-1893 ने तीन मित्रांसह मानोरा वरुन डिग्रसला जात होता. जीप ग्राम पंचाला फाट्याजवळ पोहचली त्यावेळेस टॅंकर क्र. अेपी.-12-2533 च्या चालकाने निष्काळजीपणाने व वाहतूकीच्या नियमाचे पालन न करता तक्रारकर्त्याच्या गाडीला जोराने धडक मारली. हया अपघातामध्ये जीपचे एकूण रुपये 1,50,000/- चे नुकसान झाले.
सदर वाहनाचा अपघात विमा दिनांक 07/12/2012 ते 06/12/2013 या कालावधी करिता विरुध्द पक्षाकडे उतरविलेला आहे. सदरहू अपघातानंतर त्याबाबतचा दावा आवश्यक कागदपत्रांसह विरुध्द पक्षाकडे दाखल करण्यांत आला. परंतु विरुध्द पक्षाने नुकसान भरपाई रक्कम तक्रारकर्त्यास दिली नाही तसेच विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली. विरुध्द पक्ष अनुचित व्यापार प्रथेचा वापर करीत आहे.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली, व विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्यास वाहनाची नुकसान भरपाई रुपये 1,50,000/- देण्यात यावी व तक्रार दाखल केल्यापासून 18 % दराने व्याज रक्कम मिळावी, मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा तसेच ईष्ट व न्याय दाद तक्रारकर्त्याच्या हितावह देण्यात यावी, अशी प्रार्थना केली. सदर तक्रारीसोबत निशाणी-4 प्रमाणे एकंदर 6 दस्त पुरावा म्हणून दाखल केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जबाब – विरुध्द पक्षाने निशाणी 12 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब मंचासमोर दाखल करुन, तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनामध्ये हक्कास बाधा न येता नमुद केले की, तक्रारकर्त्याचे जीप वाहन क्र. एम.एच. 40-ए-1893 हे विरुध्द पक्षाकडे खाजगी वाहन म्हणून विमाकृत होते. परंतु घटनेच्या वेळी तक्रारकर्ता हा सदरहू वाहन प्रवाशी वाहतुकीकरिता वापरीत होता. ज्यावेळी सदरहू अपघात घडला, त्यावेळी तक्रारकर्त्याच्या गाडीमध्ये संदीप मोहन आडे रा. माहूली, शेख नासीर शेख मज्जीद रा. मानोरा, राजू उत्तम बडवे रा. धामणी हे प्रवासी म्हणून प्रवास करीत होते व त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये सांगितले की,‘‘ अनिसशहा जब्बारशहा यांच्या क्रुझर गाडीमध्ये मानोरा जाण्याकतिा दिग्रसमधून निघालो. आम्ही गाडीमध्ये एकूण 04 लोक बसलेलो होतो. वाईगौळ गावापासून 03 कि.मी. अंतरावर पंचाळा फाट्याजवळ मानोरा गावाकडून एक रिकामा टॅंकर समोरुन आला व त्याने जीपला धडक दिली. ’’ सदरहू सर्व प्रवासी हे वेगवेगळया ठिकाणी उतरणारे होते. तसेच तक्रारकर्त्याने स्वतः वि.प. कंपनीकडे प्रतिज्ञापत्र दिले की, दिनांक 20/04/2013 रोजी तक्रारकर्त्याची क्रुझर गाडी लोकल ट्रीप घेउन मानोरा जाण्याकरिता निघाल्याचे, स्पष्टपणे नमुद केले. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्याच्या मालकीचे वाहन स्वतःचे वापराकरिता असून सुध्दा सदरहू वाहनाचा उपयोग प्रवासी वाहनाकरिता केला, त्यामुळे त्याने विमा कंपनीच्या अटी व शर्तीचा भंग केला. याबाबत तक्रारकर्त्याला दिनांक 30/06/2014, 12/03/2014, 17/07/2014, तसेच 12/03/2014 रोजी दिलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमुद केले की, विमा कंपनीच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे तक्रारकर्त्याचा क्लेम कंपनीने रेपुडिएट केला. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये गाडीचे नुकसान रुपये 1,50,000/- झाल्याचे नमूद केले. विरुध्द पक्षाने नुकसान भरपाईचा सर्व्हे केल्यानंतर संपूर्ण कपात वजा जाता रुपये 47,900/- एवढीच नुकसान भरपाई तक्रारकर्त्याला मिळू शकली असती, परंतु तक्रारकर्त्याने वाहनाचा प्रवासी वाहतुकीसाठी, व्यावसायिक उद्देशाने वापर करुन, विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केला, त्यामुळे तक्रारकर्त्याला सदरहू नुकसान भरपाई मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा अर्ज खर्चासह खारीज करण्यांत यावा.
3) कारणे व निष्कर्ष ::
तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्षाचा पुरावा, उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वकअवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवून पारित केला.
उभय पक्षाला ही बाब कबूल आहे की, तक्रारकर्ते यांचे वाहन क्र. एम.एच. 40-ए-1893 चा विमा विरुध्द पक्षाने काढलेला आहे. विमा कालावधी बद्दल वाद नाही. यावरुन तक्रारकर्ते, विरुध्द पक्षाचे ग्राहक ठरतात या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
उभय पक्षात याबद्दल वाद नाही की, विमा कालावधीत तक्रारकर्त्याच्या सदर वाहनाचा अपघात दिनांक 20/04/2013 रोजी झाला होता. तक्रारकर्त्ेा यांच्या म्हणण्यानुसार विमा पॉलिसीनुसार रक्कम रुपये 1,50,000/- ची रिस्क कव्हर आहे व या अपघातात गाडीचे खुप नुकसान झाले आहे. नियमानुसार विमा रक्कम मिळणे भाग आहे. परंतु विरुध्द पक्षाने विमा रक्कम न देण्याचे एकच कारण दाखविले की, तक्रारकर्ते सदर जीप ही घटनेच्या वेळेस व्यावसायीक उद्देशाकरिता वापरत होते, परंतु विरुध्द पक्षाचे हे म्हणणे पुर्णतः खोटे आहे.
विरुध्द पक्षाच्या मते तक्रारकर्ते यांच्या वाहनाचा विमा खाजगी वाहनाचा आहे. परंतु अपघाताच्या वेळेस तक्रारकर्ता हे वाहन प्रवाशी वाहतुकीकरिता वापरत होते व ही बाब यावरुन स्पष्ट होते की, विरुध्द पक्षाकडे तक्रारकर्त्यासहीत वाहनातील ईतर प्रवाशी यांनी तसे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामुळे ही बाब सदर पॉलिसीच्या अटी, शर्तीचा भंग करणारी आहे. विरुध्द पक्षाने सदर वाहनाचा नुकसान भरपाईचा सर्वे केला आहे व संपूर्ण कपात वजा जाता रुपये 47,900/- एवढी नुकसान भरपाई तक्रारकर्त्याला मिळू शकली असती परंतु प्रवासी वाहतूक करुन तक्रारकर्त्याने पॉलिसीच्या अटी, शर्तीचा भंग केल्यामुळे तो नुकसान भरपाई मागू शकत नाही.
अशाप्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद एैकल्यानंतर, विरुध्द पक्षाने दाखल केलेले दस्त जसे की, पॉलिसी प्रत, चार्जशिट, जबाब, तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञापत्र, प्रवाशांचे प्रतिज्ञापत्र, सर्वे रिपोर्ट, तक्रारकर्ते यांना दिलेले पत्र इ. यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ते यांच्या सदर वाहनाचा विमा खाजगी वाहनाचा काढलेला होता परंतु अपघाताच्या वेळेस तक्रारकर्ते सदरहू वाहन प्रवासी वाहतुकीकरिता वापरत होते, असे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दाखल केलेल्या शपथपत्रातील मजकूरावरुन दिसते. तसेच त्या वाहनात त्या वेळेस बसलेले प्रवासी ईसमांचे देखील शपथपत्र विरुध्द पक्षाने दाखल केलेले आहेत. त्यातील मजकूरावरुन देखील विरुध्द पक्षाच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. याऊलट तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्षाचा बचाव खोडून काढलेला नाही. म्हणून तक्रारकर्ते यांनी स्वतःचे खाजगी विमाकृत वाहन प्रवासी वाहतुकीकरिता उपयोग करुन पॉलिसीच्या अटी, शर्तीचा भंग केला आहे हे सिध्द होते. विरुध्द पक्षाने या कारणावरुन तक्रारकर्ते यांचा दावा दिनांक 17 जुलै 2014 रोजी नाकारलेला होता, परंतु ही बाब तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केली नाही.
तक्रारकर्ते यांनी सदर गाडीचे रुपये 1,50,000/- चे नुकसान झाले ही बाब, सिध्द केली नाही. याऊलट विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर त्यांच्या सर्वेअरचा सर्वे रिपोर्ट व बिल चेक मेमो हे दस्त दाखल करुन हे सिध्द केले की, संपूर्ण कपात वजा जाता रुपये 47,900/- एवढी रक्कम नुकसान भरपाईपोटी देय आहे. परंतु वर नमुद विश्लेषणानुसार तक्रारकर्ते यांनी निश्चितच विमा पॉलिसीच्या अटी, शर्तीचा भंग केला असल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांच्या वाहनाचा विमा दावा सर्वेअर रक्कमेच्या 75 % रक्कम तक्रारकर्त्यास अदा करुन, नॉन स्टॅंडर्ड बेसीसनुसार विमा दावा मंजूर करावा, असे आदेश, विरुध्द पक्षास दिल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. मात्र ईतर नुकसान भरपाईपोटी व प्रकरण खर्च रक्कमेबद्दल कोणतेही आदेश पारित करण्यात येत नाही. सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांचा विमा दावा विरुध्द पक्षाने नॉन स्टॅंडर्ड तत्वानुसार मंजूर करुन, सर्वेअरच्या सर्वे रिपोर्ट नुसारची रक्कम रुपये 47,900/- च्या 75 % रक्कम म्हणजेच रुपये 35,925/- ( अक्षरी रुपये पस्तीस हजार नऊशे पंचवीस फक्त ) तक्रारकर्त्यास अदा करावी.
- ईतर नुकसान भरपाई रक्कम व प्रकरणाचा न्यायिक खर्च याबाबत कोणतेही आदेश पारित करण्यांत येत नाहीत.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 45 दिवसाचे आत करावे.
- या आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वाशिम,(महाराष्ट्र).
svGiri