(घोषित दि. 05.11.2014 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
अर्जदार या रा.गोपी ता.जाफ्राबाद जि.जालना येथील रहिवाशी असून, अर्जदार यांचे पती गजानन पांडूरंग डुकरे यांचा दिनांक 16.08.2013 रोजी वाहन अपघातात मृत्यू झालेला आहे. अर्जदाराने सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन जाफ्राबाद यांना दिली. त्यानुसार जाफ्राबाद पोलीस यांनी घटनेची चौकशी करुन भा.द.वि. कलम 304 अ, 279, 337, 338 अन्वये गुन्हा नोंदणी रजिस्टर क्रमांक 50/13 नुसार गुन्हयाची नोंद करुन मयत व्यक्तीस वैद्यकीय अधिकारी यांचेकडे पोस्ट मार्टमसाठी पाठविण्यात आले.
अर्जदाराचे पती व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना या योजने अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमा काढलेला आहे. या योजनेच्या कार्यवाहीसाठी शासना मार्फत संबंधित तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित विमा कंपनी यांची संयुक्तीक जबाबदारी आहे. अर्जदार यांनी दिनांक 27.09.2013 रोजी विमा दावा मिळणेबाबत रितसर अर्ज दाखल केलेला आहे. तसेच गट नंबर 101 चा 7/12, 8 अ, 6 क, तहसीलदार यांचे प्रमाणपत्र व फेरफार नक्कल दाखल केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने 14.08.2013 ते 13.08.2014 या कालावधीचा विमा हप्ता गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे जमा केलेला आहे. सदर कालावधीत अर्जदार यांचे पतीचा अपघाती मृत्यू झाल्याने अर्जदार हिने सदरचा विमा मागणी दावा गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे दिनांक 27.09.2013 रोजी जमा केला त्यामुळे अर्जदार या विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत असे अर्जदार यांचे म्हणणे आहे.
अर्जदार यांनी आपल्या तक्रारी सोबत विमा दाव्याचा अर्ज, तलाठी व तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, 7/12 व गट नंबर 101 चा उतारा, 8 अ चा दाखला, 6 क चे प्रमाणपत्र, फेरफार नक्कल, एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र तसेच ओळपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात गैरअर्जदार यांचेकडून विमा रक्कम रुपये 1,00,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/- मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांना नोटीस मिळूनही ते मंचा समोर गैरहजर आहेत. म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी हजर होवून आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणण्यानुसार अर्जदार यांनी त्यांचे पतीच्या मृत्यू दाव्याबाबची रितसर मागणी त्यांचेकडे केलेली असून, त्यांनी अर्जदार यांचा दावा दिनांक 20.09.2013 रोजी अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांचेकडे सादर केलेला आहे. तसेच अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सदरचा दावा डेक्कन इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. औरंगाबाद यांचेकडे दिनांक 27.09.2013 रोजी सादर केलेला आहे.
वरील सर्व मुद्यांचा विचार करता विद्यमान मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे येतात.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदार यांना
द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी - अर्जदार यांचे पती गजानन पांडूरंग डुकरे यांचा दिनांक 16.08.2013 रोजी वाहन अपघातात मृत्यू झालेला आहे. ही बाब अर्जदार हिने दाखल केलेल्या पोलीसांचा प्रथम खबर अहवाल तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक ग्रामीण रुग्णालय जाफ्राबाद यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालावरुन दिसुन येते, सदर दस्त अर्जदार हिने प्रकरणा सोबत नि. 4/3 व 4/6 वर दाखल केलेले आहेत. अर्जदार हिचे गजानन पांडूरंग डुकरे हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांची मौजे गोपी ता.जाफ्राबाद जि.जालना येथे गट नंबर 101 मध्ये शेतजमिन होती. त्याचा 7/12 नि. 4/2 वर दाखल केलेला आहे. अर्जदार हिचे पती गजानन डुकरे यांचा महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे काढलेला होता. अर्जदार हिच्या पतीच्या मृत्यूनंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे विमा दावा रक्कम रुपये 1,00,000/- हे मिळण्या करिता विमा दावा दाखल केलेला आहे. सदरचा विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी जिल्हा कृषी अधिकारी, जालना यांचे मार्फत दिनांक 27.09.2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे सादर केल्याचे नि.8 वरील दस्तानुसार दिसुन येते. त्यामुळे शासन निर्णयानुसार गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यावर दोन महिन्यांच्या आत कार्यवाही करणे आवश्यक होते.
अर्जदाराने सदरचा तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांना विद्यमान मंचा मार्फत नोटीस काढण्यात आली. परंतू गैरअर्जदार 1 यांना नोटीस तामील होवूनही ते मंचा समोर प्रकरणात हजर झाले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे कोणतेही म्हणणे अथवा लेखी जबाब दाखल केला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. वास्तविक पाहता अर्जदार हिचा विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 1 यांना दिनांक 27.09.2013 रोजी जिल्हा कृषी अधिकारी, जालना यांनी पाठविल्या नंतर अर्जदाराचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करणे हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे कर्तव्य होते. परंतू त्यांनी अर्जदाराच्या विमा दाव्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- अर्जदाराचा तक्रार अर्ज हा अशंत: मंजूर करण्यात येतो.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदार यांना तिच्या पतीच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) तक्रार दाखल दिनांका पासून म्हणजे 24.12.2013 पासून द.सा.द.शे. 10 टक्के व्याज दरासह विमा दाव्याची रक्कम अर्जदार हिच्या हातात मिळे पर्यंत देण्यात यावी.
- तसेच सदर प्रकरणाचा खर्च रुपये 1,500/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त) अर्जदार हिला देण्यात यावा.