(घोषित दि. 07.08.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून मोटर सायकलची विमा पॉलीसी घेतली आहे. वाहनास अपघात झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वाहन दुरुस्तीस लागलेला पूर्ण खर्च न दिल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे खर्चाची पूर्ण रक्कम देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी तक्ररीची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 2010 मध्ये जालना येथील मे.अंबरिश बजाज यांच्याकडून पल्सर हे दुचाकी वाहन खरेदी केले. ज्याचा नोंदणी क्रमांक एम.एच. 21 अेअे 6066 असा आहे. गैरअर्जदार यांच्याकडून त्यांनी सदरील वाहनाची विमा पॉलीसी घेतली आहे. दिनांक 30.05.2012 रोजी अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाला ज्याची सुचना त्यांनी गैरअर्जदार यांना दिली. गैरअर्जदार यांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करुन दिनांक 19.11.2012 रोजी अर्जदारास नुकसान भरपाई म्हणून 16,964/- रुपयाचा धनादेश पाठविला. अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांना वाहन दुरुस्तीचा एकूण खर्च 54,466/- रुपये आला असून गैरअर्जदार यांनी ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावयास पाहिजे. याबाबत त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतू गैरअर्जदार यांनी दाद न दिल्यामुळे अर्जदाराने त्यांना वकीलामार्फत दिनांक 11.02.2013 कायदेशीर नोटीस पाठविली व खर्चाची पूर्ण रक्कम देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी या नोटीसची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी 96,460/- रुपये देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वाहन दुरुस्तीसाठी लागलेल्या खर्चाचा तपशील, गैरअर्जदार यांना पाठविलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने वाहनाचा विमा घेतला असल्याचे त्यांना मान्य आहे. सदरील विमा पॉलीसीची मुदत दिनांक 07.12.2012 पर्यंत आहे. वाहनाचा अपघात झाल्यानंतर व अर्जदाराने दाखल केलेला क्लेम फॉर्म मिळाल्या नंतर त्यांनी श्री.संतोष शेळके, सर्व्हेअर यांना वाहनाचे निरीक्षण करण्यास सांगितले. सर्व्हेअरने दाखल केलेल्या अहवालावरुन त्यांनी 16,967/- रुपये नुकसान भरपाई पोटीचा धनादेश अर्जदारास पाठविला. गैरअर्जदार यांनी अर्जदारास देण्यात येणा-या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत विमा पॉलीसीची प्रत, सर्व्हेअर रिपोर्ट व अर्जदारास देण्यात येणा-या नुकसान भरपाईचा तपशील सोबत जोडला आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे पल्सर या दुचाकी वाहनाचा विमा काढला आहे. सदरील वाहनाचा क्रमांक एम.एच. 21 – अेअे 6066 असा असून विमा पॉलीसीचा क्रमांक ओजी – 2006–1802-00011907 असा आहे. वाहनाची विमा पॉलीसी दिनांक 07.11.2012 पर्यंत आहे. त्यामुळे वाहनाचा अपघात झाला तेंव्हा सदरील विमा पॉलीसी अस्त्विात असल्याचे दिसून येते.
दिनांक 30.05.2012 रोजी वाहनास अपघात झाल्यानंतर व अर्जदाराने क्लेम फॉर्म दाखल केल्यानंतर गैरअर्जदार यांनी संतोष विनायक शेळके यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली. सर्व्हेअरच्या अहवालानुसार वाहनास लागणारा एकुण खर्च 19882 .72 रुपये दर्शविण्यात आल्याचे दिसून येते. या रकमेतून बदली केलेले सुटे भाग व डिप्रीसिएशन वगळून अर्जदारास 16,967/- रुपयाचा धनादेश दिलेला दिसून येतो, जो योग्य असल्याचे मंचाचे मत आहे.
अर्जदाराने आपल्या तक्रारीत रस्त्यावरुन जाताना घसरुन अपघात झाल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने अपघाताच्या दिलेल्या कारणावरुन मोटर सायकल घसरुन पडल्यास कोणत्याही एका बाजूचे नुकसान होणे अपेक्षित आहे. परंतू अर्जदाराने दाखल केलेल्या एस्टिमेंट व बिलात दोनही बाजूचे आरसे, इंडिकेटर, पॅनेल, मागचे व पुढचे चाक इत्यादीचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे जे तांत्रिक दृष्याही योग्य नाही.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- खर्चाबद्दल आदेश नाही.