::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/09/2015 )
आदरणीय अध्यक्षा , सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
तक्रारकर्त्याचे वडील नामे विठ्ठलराव येवले, वय 48 वर्ष हे शेतकरी होते, त्यांचा दिनांक 27/10/2011 रोजी शेलू बाजार ते कारंजा रोडवर तपोवन फाट्या जवळ वेळ 9:30 वाजता अपघात झाला. सदर अपघात कोणत्या वाहनाने झाला ते कळाले नाही, तसेच पोलीस तपासामध्येही आढळून आले नाही. दिनांक 28/10/2011 रोजी पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे अपघाताची खबर देण्यात आली. त्यानुसार गुन्हा क्र. 184/2011 कलम 279, 304 (अ) दाखल केला.
विठ्ठलराव येवले हे शेतकरी असल्याने, शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने तालुका कृषी अधिकारी, मंगरुळपीर यांच्याकडे अर्ज केला होता. सदर योजना ही दिनांक 15/08/2011 ते 14/10/2012 या कालावधी करिता होती व सदर योजनेचा विमा हप्ता महाराष्ट्र शासनाने भरला होता. सदर योजनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्याही शेतक-यांना अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास विमा पॉलीसी नुसार त्यांच्या वारसांना लाभ मिळतो. परंतु तक्रारकर्त्यास सदर योजनेचा लाभ मिळाला नाही. विमा कंपनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत आहे.
विरुध्द पक्षांकडून विमा रक्कम मिळाली नाही. म्हणून, तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल करुन, विमा रक्कम रुपये 1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासुन द.सा.द.शे. 18 % दराने व्याज ,तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाबद्दल रुपये 10,000/- व तक्रार खर्च रुपये 5,000/- विरुध्द पक्षाकडून देण्यात यावेत, या व्यतिरिक्त योग्य ती दाद द्यावी, अशी विनंती केली.
तक्रारीचे पृष्ठयर्थ पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र केले व दस्तऐवज यादीप्रमाणे एकूण 19 कागदपत्रे दाखल केलीत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 चा लेखी जबाब :- विरुध्द पक्ष क्र. 1 – दि न्यु इंडिया एश्योरंन्स कंपनीने त्यांचा लेखी जबाब )निशाणी 11) दाखल करुन, तक्रारकर्त्यांचे बहुतांश कथन नाकबूल केले व पुढे अधिकचे कथनामध्ये नमुद केले की, दिनांक 26/12/2012 चे पत्रानुसार तक्रारकर्त्याला 30 दिवसचे आत कागदपत्रांची पुर्तता करणेबाबत कळविले होते व त्याच 30 दिवसात कागदपत्रांची पुर्तता न झाल्यास, कंपनीच्या शर्ती व अटीनुसार नाईलाजास्तव दावा बंद करणे भाग पडेल, असे कळविले होते. त्यानुसार तक्रारकर्त्याने विहीत मुदतीत कागदपत्रांची पुर्तता केली नाही. तक्रारकर्त्याने हेतुपुरस्परपणे या विरुध्द पक्षाला त्रास देण्याच्या व बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी व खोडसाळपणाची तक्रार दाखल केलेली आहे. या विरुध्द पक्षाने कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, सेवेत कोणतीही न्युनता दर्शविलेली नाही, तसेच कोणत्याही अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीमुळे नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 50,000/- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना देण्याबाबत आदेश व्हावा.
3) विरुध्द पक्ष क्र. 2 चा लेखी जबाब :- विरुध्द पक्ष क्र. 2 – तालुका कृषी अधिकारी यांनी पत्रानुसार त्यांचा लेखी जबाब ( निशाणी-08) दाखल केला. त्यामध्ये नमुद केले की, मृतक विठ्ठलराव ज्ञा. येवले रा. तपोवन ता. मगरुळपीर जि. वाशिम यांचे अपघात विमा योजने अंतर्गतचा प्रस्ताव त्यांचा मुलगा श्री. सचिन विठ्ठलराव येवले यांनी दि. न्यु इंडिया एश्योरंन्स कं. कडे या कार्यालया मार्फत सादर करण्यात आला आहे. सदर दावा अर्जाची पाहणी केली असता शासन निर्णय दिनांक 08 ऑगष्ट 2011 मधील मुद्दा क्र. 8 नुसार दावा नाकारता येत नाही.
तरी सदर विमा कंपनीने दावा मंजुर करावा असे वाटते.
4) का र णे व नि ष्क र्ष :::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तसेच उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून पारित केला तो येणेप्रमाणे , . . .
या प्रकरणात तक्रारकर्ते व विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्यात ही बाब मान्य आहे की, मयत विठ्ठलराव ज्ञा. येवले हे शेतकरी होते व त्यांनी शेतकरी जनता अपघात विमा विरुध्द पक्ष क्र. 1 कडून काढलेला होता. उभय पक्षात याबद्दलही वाद नाही की, मयत विठ्ठलराव ज्ञा. येवले यांचा दिनांक 27/10/2011 रोजी, अपघाती मृत्यू झाला होता. विमा कालावधीबद्दल उभय पक्षात वाद नाही. उभय पक्षात तक्रारकर्ते यांनी जे दस्तऐवज दाखल केलेत त्याबद्दलही वाद नाही. विरुध्द पक्ष क्र. 2 यांचा बचाव तक्रारकर्ते यांच्या तक्रारीस पुरक आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 चे असे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास दिनांक 26/12/2012 रोजी पत्र देवून कागदपत्रांची पुर्तता (मृतकाचा व्हिसेरा रिपोर्ट ) विहीत मुदतीत पाठविण्याबद्दल सुचित केले असतांनाही, तक्रारकर्त्याने मृतकाचा व्हिसेरा रिपोर्ट विरुध्द पक्ष क्र. 1 कडे विहीत मुदतीत न पाठविल्यामुळे, त्यांना तक्रारकर्त्याचा विमा दावा बंद करावा लागला. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 कडे विमा दाव्यासोबत सर्व आवश्यक ईतर दस्तऐवज तक्रारकर्त्याने पाठविले होते. शिवाय मृतकाचा व्हिसेरा रिपोर्ट प्राप्त होण्यास कालावधी लागतो. रेकॉर्डवर दाखल असलेल्या दस्तांवरुन असे दिसते की, तक्रारकर्त्यास सदर मृतक व्हिसेरा रिपोर्ट दिनांक 24/03/2013 रोजी प्राप्त झाल्यावर तो त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 यांना पाठवला होता. म्हणजे यात तक्रारकर्ते यांची कोणतीही चूक दिसून येत नाही. मात्र विरुध्द पक्ष क्र.1 यांना ईतर दस्त पाहून विमा दावा देण्यास अडचण नव्हती. परंतु त्यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा बंद करुन सेवेत न्युनता ठेवली, असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा मयताच्या ईतर वारसाबद्दलचा आक्षेप गृहीत धरता येणार नाही, कारण तक्रारकर्त्याने मयताच्या ईतर वारसाचे ना हरकत प्रमाणपत्र रेकॉर्डवर दाखल केले आहे. अशा परीस्थितीत विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्यास त्याचे मयत वडील विठ्ठलराव ज्ञा. येवले यांच्या शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम रुपये 1,00,000/- सव्याज, व इतर नुकसान भरपाई दिल्यास, ते न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
- तक्रार अर्ज विरुध्द पक्ष क्र. 1 -विमा कंपनी विरुध्द अंशतः मान्य करण्यांत येतो. तर, विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द अमान्य करण्यांत येतो.
- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/- ( अक्षरी - रुपये एक लाख ) ही दरसाल, दरशेकडा 6 टक्के व्याजदराने प्रकरण दाखल दिनांक 05/12/2013 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- ( रुपये पाच हजार फक्त ) व प्रकरण खर्च रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त ) तक्रारकर्त्यास द्यावे.
- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).
svGiri