- आ दे श –
(पारित दिनांक – 29 जून, 2018)
श्री. शेखर प्र. मुळे, मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
1. तक्रारकर्त्याची सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 खाली वि.प.ने विमा दावासंबंधी सेवेत कमतरता ठेवली म्हणून दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्ता हा चार चाकी वाहन क्र. MH 40 AC 6711 चा मालक असून त्याने सदर गाडीचा विमा वि.प.क्र. 1 कडून काढला होता. विमा अस्तित्वात असतांना तक्रारकर्ता सदरहू गाडीने हैद्राबाद येथे जात असतांना रस्त्यावरुन एक म्हैस आली व त्यामुळे गाडीची टक्कर होऊन तिला नुकसान झाले. तक्रारकर्त्याने हैद्राबाद येथील श्री. ऑटो कार्स लिमिटेड येथे गाडी दुरुस्तीला टाकून गाडी दुरुस्त झाल्यानंतर, तक्रारकर्त्याला दुरुस्तीचे बिल रु.2,40,380/- देण्यात आले, जे तक्रारकर्त्याने दिले. त्यानंतर तक्रारकर्त्याने दावा रकमेची मागणी वि.प.कडे केली. परंतू वि.प.ने केवळ रु.1,70,800/- चा दावा मंजूर केला. तक्रारकर्त्याने दावा रक्कम स्विकारुन डिस्चार्ज व्हाऊचरवर सही करुन द्यावी म्हणून वि.प.ने त्याला सांगितले. परंतू तक्रारकर्त्याने ती रक्कम स्विकारण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याने बरेचदा वि.प.कडे रु.2,40,380/- ची मागणी केली. परंतू वि.प.ने ती मंजूर केली नाही, म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठवून पूर्ण दावा मंजूर करण्यास सांगितले. परंतू वि.प.ने त्याची मागणी मंजूर न केल्यामुळे त्याने ही तक्रार दाखल करुन बिलाची एकूण रक्कम रु.2,40,380/- मागितली आहे, तसेच झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मागितला आहे.
3. सदर तक्रारीची नोटीस वि.प.ला पाठविली असता वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले.
4. वि.प.ने आपल्या लेखी जवाबात नि.क्र. 9 वर दाखल केला व असे नमूद केले की, त्याने पूर्वीच सर्व्हेयरच्या अहवालानुसार रु.1,70,800/- चा दावा मंजूर केला आहे. त्यामुळे त्याच्या सेवेत कुठलीही कमतरता नाही. तक्रारकर्त्याला त्यानुसार दावा सेटलमेंट व्हाऊचरवर सही करुन देण्यास सांगितले. तसेच त्याच्या ओळखपत्राचा आणि निवासी पत्याचा पुरावा देण्यास सांगितले. परंतू तक्रारकर्त्याने मागितलेले दस्तऐवज दिले नाही आणि जास्त रकमेची मागणी केली. सर्व्हेयरने गाडीला झालेले नुकसान आपल्या अहवालामध्ये नमूद केले आहे आणि त्यानुसार वि.प.ने तक्रारकर्त्याचा दावा मंजूर केला. तक्रारकर्त्याने आता जी मागणी केली आहे ती अवास्तव असून त्याला कुठलाही आधार नाही. पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 ला या प्रकरणात नाहक गुंतविले आहे. कारण वि.प.क्र. 2 चा वि.प.क्र. 1 च्या दैनंदिन व्यवहाराशी काहीही संबंध नाही. अशाप्रकारे तक्रारकर्त्याची मागणी नाकबूल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
5. मंचाने तक्रारकर्ता व वि.प.क्र. 1 व 2 तर्फे त्यांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच उभय पक्षांनी आपल्या म्हणण्याचे समर्थनार्थ दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले. त्यावरुन मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- नि ष्क र्ष –
6. याबद्दल वाद नाही की, तक्रारकर्त्याच्या गाडीचा विमा वि.प.क्र. 1 कडून काढण्यात आला होता आणि विमा अवधीमध्ये त्या गाडीला अपघात होऊन तिचे नुकसान झाले होते. याबद्दल वाद नाही की, त्या गाडीची दुरुस्ती हैद्राबाद येथे करण्यात आली होती आणि तक्रारकर्त्याने दुरुस्तीचा खर्च रु.2,40,380/- दिला होता. वाद केवळ एवढाच आहे की, वि.प. पॉलिसी अंतर्गत किती रक्कम तक्रारकर्त्याला देणे लागतो. वि.प.चे असे म्हणणे आहे की, सर्व्हेयरने नुकसानीचा जो अंदाज काढला त्यानुसार तक्रारकर्ता केवळ रु.1,70,800/- घेण्यास पात्र आहे आणि दावा रक्कम वि.प.ने मंजूर सुध्दा केलेली आहे.
7. वि.प.ने आपली भीस्त सर्व्हेयरच्या अहवालावर ठेवलेली आहे. सर्व्हेयरच्या अहवालाचे निरीक्षण केले, त्यानुसार गाडीला अपघात दि.17.11.2015 ला सायंकाळी झाला होता आणि दुस-या दिवशी सर्व्हेयर मार्फत गाडीचे निरीक्षण करण्यात आले होते. अशाप्रकारे अपघात झाल्यानंतर लगेच सर्व्हेयरमार्फत गाडीची तपासणी झाली होती असे दिसून येते. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतिउत्तरामध्ये असे लिहिले आहे की, हा सर्व्हेयर अहवाल त्याच्या अपरोक्ष लिहिण्यात आलेला आहे आणि म्हणून तो बरोबर नाही. परंतू याठिकाणी हे नमूद करण्यात येते की, तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमध्ये सर्व्हेयर अहवालाविषयी एकही शब्द लिहिला नाही. तक्रारीनुसार सर्व्हेयर अहवाल चूक आहे किंवा पक्षपाती आहे किंवा त्याच्या अपरोक्ष तयार केला आहे असा आरोप कुठेही केलेला नाही. वि.प.ने जेव्हा तक्रारीला लेखी उत्तर दिले त्यानंतर प्रतिउत्तरामध्ये तक्रारकर्त्याने सर्व्हेयर अहवालावर त्याप्रमाणे आक्षेप घेतलेला आहे. ज्यावेळी सर्व्हेयर अपघातग्रस्त गाडीच्या नुकसानाबद्दल सर्व्हे करतात त्यावेळी त्यांनी दिलेल्या अहवालाला महत्व आहे. सर्व्हेयरचा अहवाल सहजासहजी आणि कुठलेही कारण नसतांना फेटाळून लावता येत नाही. सर्व्हेयरचा अहवाल जर बरोबर नसेल किंवा तो तक्रारकर्त्याला मंजूर नसेल तर तक्रारकर्त्याने त्यासाठी विशेष कारण देणे अपेक्षीत आहे आणि ही बाब त्यांनी तक्रारीमध्ये नमूद करायला हवी. दुसरी बाब अशी की, विमा पॉलिसी अंतर्गत गाडीच्या प्रत्येक भागाला विमा सुरक्षा मिळत नाही कारण प्लास्टिक, काच किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू या विमा सुरक्षेमध्ये समाविष्ट केले नसतात. परंतू अपघातग्रस्त गाडीची जेव्हा दुरुस्ती होती त्यावेळी या सर्व भागाच्या जेथे दुरुस्ती किंवा वस्तू प्रतिस्थापीत (replacement) करण्यात येते त्याचा खर्च गाडी मालकाला द्यावा लागतो. परंतू विमा पॉलिसी अंतर्गत अशा भागाची दुरुस्ती किंवा प्रतिस्थापीती (replacement) चा खर्च देय होत नाही. या प्रकरणात सर्व्हे अहवालामध्ये गाडीच्या अशा काही भागाच्या दुरुस्तीचे आणि प्रतिस्थापीती (replacement) चा खर्च सर्व्हेयरने विचारात घेतलेला नाही आणि आमच्या मते त्यामध्ये कुठलीही चूक नाही. सर्व्हेयरच्या अहवालानुसार वि.प.ने रु.1,70,800/- चा दावा मंजूर केलेला आहे. त्यामुळे त्यांनी सेवेत कमतरता ठेवली असे दिसून येत नाही.
8. वि.प.क्र. 2 हे वि.प.क्र. 1 चे कलकत्ता येथील मुख्य कार्यालय आहे आणि वि.प.क्र. 2 चा वि.प.क्र. 1 च्या दैनंदिन व्यवहाराशी काहीही संबंध नसतो. गाडीचा विमा वि.प.क्र. 1 मार्फत काढण्यात आलेला होता आणि विमासंबंधी उद्भवलेल्या कुठल्याही वादाशी केवळ वि.प.क्र. 1 चा संबंध आहे. त्यामुळे वि.प.क्र. 2 ला या प्रकरणात काहीही संबंध नसतांना सामिल केल्याचे दिसून येते. वरील कारणास्तव या प्रकरणात वि.प.च्या सेवेत कमतरता दिसून येत नसल्याने तक्रार खारिज करणे योग्य आहे. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.